माझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव

माझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर,  मालेगांव

sharayu.vadalkar@gmail.com
9527892995

“हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे”

साधारण 1960 चा काळ. श्रावण महिना आला म्हणजे उपवासाचा व व्रतवैकल्यांचा महिना. कुणाकडे हरतालिका असो वा मंगळागौर, बारसे असो किंवा देवाला फुले लागोत, “अहो जा की बेलपत्री व फुले आणायला भुजबळ यांचे मळ्यात तेथे हमखास आपले काम होईल” असे सर्वजण म्हणत.

माझ्या वडिलांचा मळा म्हणजे जळगाव जामोद या खेडेगावाचा केंद्रबिंदू. त्याला कोणी नंदनवन म्हणत. प्रवेशद्वाराजवळ मोठी बोगनवेल व गुलमोहर आपले स्वागत करीत असे. उजव्या बाजूला लाल कन्हेर, पांढरा कन्हेर आणि त्याच्यापुढे चांदणी दुधी मोगरा, नंतर डाव्या बाजूने जाईजुईचा मंडप व चमेली त्यावर दिसणारी पांढरी शुभ्र सुवासिक फुले. व नंतर पारिजातक. सुवासिक फुलांची उधळण बघून तर असे वाटत होते की सर्व आसमंत सुगंधाने दरवळला आहे.

पावसाळ्यात तेरडा बहरतो. गुलाबी शेंदरी केशरी पांढरा जांभळा अशा विविध रंगाच्या फुलांचे ताटवे बघितल्यावर असे वाटे की निसर्गाने रंगीबिरंगी फुलांचा गालीचा तयार केला आहे. हिरव्यागार वेलीवर केशरी गुलाबी जांभळ्या रंगाची फुले त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे उडत. ही फुलपाखरेसुद्धा विविध रंगाची असत. काळा व त्यावर पांढरे ठिपके नंतर पांढरा व त्यावर काळे ठिपके असलेली, तसेच विविध रंगसंगती असलेली विविध रंगाची फुलपाखरे बघितल्यावर मंत्रमुग्ध होई. पक्षी किलबिल करीत. मधूनच कोकिळेचे कूजन ऐकू येई. फुलांवर भ्रमर गुंजारव करीत असत पोपटांचे थवे आकाशात उडत असत. चिमण्यांचा चिवचिवाट सुरू असायचा. थोडे पुढे गेल्यावर विहिर. विहिरीला बाराही महिने पाणी भरपूर असायचे. हौदाजवळ झोपडी होती. सखाराम नावाचा गडी तेथे राहत होता तो सर्व मळ्याचा कारभार बघत असे. झोपडीच्या बाजूला एक लिंबाचे झाड होते. श्रावणात या हिरव्यागार झाडावर छान लिंबे लागत. जवळ चार-पाच हिरवीगार नारळाची झाडे होती त्यामुळे तेथील सृष्टीसौंदर्य नेत्रदीपक दिसे.

त्यापुढे सर्व पेरूची झाडे लावलेली होती, जवळपास अर्धा मळा पेरूचा होता. नंतर 500 झाडे बोरीची होती. बोरीच्या झाडाची खोडं इतके मोठे होते ते आपल्या कवेत मावत नव्हते. त्या झाडा खाली गेल्यावर ऊन लागत नव्हते, दाट सावली असायची. त्यामुळे ते दृश्य मनोहरी दिसत असे, जणू काही कोणी मंडप घातला आहे असा भास व्हायचा. पाऊस पडू लागल्यानंतर त्याची शोभा अवर्णनीय दिसत असे. “परोपकार शरीरम्” या उक्तीची आठवण यायची. निसर्गाने वेली फुले वृक्ष नद्या सूर्य चंद्र तारे हे परोपकारासाठी निर्माण केले.

याच मळ्याच्या मागच्या बाजूला 100 फुटांवर राजा भ्रतुर्हरीचे देऊळ होते. देवळापासून शंभर ते दीडशे फुटावर संत्री व मोसंबीचा अजुन एक मळा होता. फाटकातून आत शिरताच दुतर्फा मेंदीची झाडे व रामफळांची झाडे होती. नंतर मोठी विहीर होती. विहिरीत रहाटगाडगेची माळ होती. माळेमुळे संत्री व मोसंबीचा झाडाला पाणी जात असे. विहिरीजवळ झोपडी होती, तेथेही एक नोकर राहत असे. झोपडीच्या मागच्या बाजूला कांदे गाजर लसूण मिरची वांगी लावलेली असत. भरताचे अर्धा किलोचे एकच वांगे असायचे व चवदेखील गुळचट असायची. त्यामुळे वांग्याला खूप मागणी असायची. मळ्यातील संत्री व मोसंबीचे पेटारे मुंबई येथे जात असत, त्यामुळे माझ्या वडिलांचा नावलौकिक खूप वाढला. माल देखील उच्च प्रतीचा असे. संत्री व मोसंबी पातळ सालीची व गोड असतात.

परंतु एके वेळी कोणीतरी खोटे सांगून मधल्यामध्ये पैसे खाल्ले त्यामुळे वडिलांनी मुंबईला माल पाठवण्याचे बंद केले. अकोला खामगाव येथील व्यापारी घेऊन स्वतः घेऊन जात व काही माल गावात खपत असे. रामनवमीला एक बैलगाडी भरुन रामफळे शेगावला जायची. रामफळेदेखील मोठी व गोड होती. पेरू व बंदी बोरे व्यापारी स्वतः घेऊन जात. कित्येक मुले पेरू लिंबू घेऊन खामगावला विकण्यासाठी नेत.

गाई बैल व म्हशी साठी पावसाळ्यात मळ्यातले गवत रोज बैलगाडी भरुन येत असे त्यामुळे बैल गाई म्हशी धष्टपुष्ट असत. अधून-मधून जनावरांना सरकी मिळत असे त्यामुळे गाई म्हशी भरपूर दूध देत. घरी वापरायला दूध ठेवून काही बंध्या लावलेले असत उरलेले दूध डेअरीवर जायचे.

शेतात तूर भुईमूग ज्वारी राजगिरा उडीद कापूस मूग तीळ भगरी हे धन्य होत असे. त्या बरोबर कांद्याची सुद्धा रेलचेल होती. तिळाचे शेंगदाण्याचे तेल एक नोकर तेलाच्या घाणी वरून पिळून आणत असे. तिळाची वर शेंगदाण्याची ढेप नोकर लोकांना वाटल्या जाई.

चौथ्या-पाचव्या दिवशी एक मोठा कप भरून ताक व्हायचे, ते सर्व गल्लीत व ओळखीच्या लोकांना वाटले जायचे. गल्लीतले लोक ताकासाठी तांबे आणून ठेवायचे. ताक घट्ट व गोड असायचे. ताकावर माझ्या वडिलांनी दोन कुटुंबे पोसली. चक्कीतले पीठ, ताक मळ्यातील भाजी व फळे इत्यादी एक नोकर त्या कुटुंबाला नेऊन देत असे. ताकाचा व फुलांचा पैसा वडीलांनी कधीही केला नाही. अशाप्रकारे फळाफुलांनी समृद्ध बाराही महिने हिरवेगार दोन्ही मळे असत.

आता पेरणी बद्दल सांगते. प्रत्येक स्त्रीला माहेरचे आकर्षण जास्त असते पावसाळा म्हटला म्हणजे मला माहेरची पेरणीची खुप आठवण येते. माझ्या वडिलांकडे शेती पुष्कळ असल्यामुळे जवळजवळ महिनाभर पेरणी चाले. लवकर उठणे कामाची धावपळ गडी माणसांचे येणे-जाणे, घाईगर्दीच्या दिवस आई. उन्हाळा संपत आल्यानंतर आमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ कमी होत असे. शेतीची कामे नांगरणे सूरी होत असे. आणि मग आस लागलेली असते पावसाची! रखरखीत ऊन नको वाटे! आषाढ महिना उजाडतो, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात.

“आखाड्याचे मौसम राहिला उभा, निळी कळी बघा गगनाची शोभा”

पहिला पाऊस पडतो मातीचा सुगंध दरवळतो. वातावरण थंड होते. दोन-तीन पाऊस झाल्यानंतर आमच्याकडे पेरणीची धावपळ सुरू होते. उडीद मूग ज्वारी कापूस तूर भुईमूग तीळ भगर व राजगिरा इत्यादी पिकांची पेरणी होत असे.

सकाळी पाच वाजताच माझे वडील व घरातील मोठी मंडळी उपस्थित नोकर मंडळी म्हशीचे व गाईचे दूध काढण्यासाठी येत. त्या सर्वांना चहा होत असे. काही ठिकाणी बंद्या लावलेल्या असत व उरलेले दूध डेअरीत नोकरी पोचवीत. गाईचे दूध घरी वापरायला असे.

सकाळीच माझी काकू किंवा आई चार-पाच नोकरांसाठी भाकरी, कधी मुगाची डाळ, कधी चवळीची उसळ, मूगवड्या, भाजी भाकरी, बरोबर लोणचे किंवा तिळाची चटणी, कधी शेंगदाण्याची चटणी अशी शिदोरी द्यायची. हे सगळे नऊ वाजेपर्यंत व्हायलाच पाहिजे असायचे. माझा मोठा भाऊ या नोकरांबरोबर शेतात जात असे. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ताक व्हायचे. एक बरणी भरून नोकरांसाठी शेतात ताक जात असे कारण पावसाळ्याचे म्हणजे रोगाचे दिवस म्हणून ताजे ताक वडील आवर्जून शेतात पाठवीत. ताक म्हणजे अमृत, ते पाचक असते असे माझे वडील नेहमी म्हणायचे.

नोकरांची तब्येत जर बिघडली तर वडील डॉक्टरांकडून औषध उपचार करून घेत. वडील शेतमजूरांवर अत्यंत प्रेम करीत. तेसुद्धा वडिलांवर प्रेम करीत. त्यांच्या अडचणी जाणणे, त्यांना पैशांची मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे असे वडील करत. तेदेखील वडिलांना सल्ला विचारीत होतो आणि सल्ला त्यांना पटतही होता.

वडील नेहमी म्हणायचे, काळी जमीन, पाणी व मजुरांचे अथक परिश्रम यामुळेच माझी धान्याची कोठारे भरलेली आहेत.

शेतातून घरी परतल्यावर सर्व मजुरांना चहा होत असे नंतर गाई-म्हशींचे दूध काढून ते घरी जात. अशा प्रकारे पेरणीचे दिवस म्हणजे अतिशय कष्टाचे! नंतर निंदणी व कोळपणी! घरात पीक येईपर्यंत त्याची निगा राखली जात असे. असे हे दिवस कधीही विसरायला होत नाहीत.


comments powered by Disqus