श्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक! - राज जाधव, पुणे

श्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक! - राज जाधव, पुणे

meettheraj@gmail.com

अब्बास मस्तानच्या टिपिकल थ्रिलरला सरावलेल्या आमच्या पिढीला ‘श्रीराम राघवन’, हे एक भन्नाट स्वप्न पडलं ते बरं झालं.

अर्थात, अब्बास-मस्तानने एक काळ गाजवला आणि आजही त्यांच्या काही क्लासिक फिल्म्स फेवरीट लिस्टमध्ये आहेत आणि राहतील. नव्वदीच्या दशकाने अनेक थ्रिलर्स दिले, काही चांगले, काही वाईट, काही ठीकठाक, पण त्यांची एकूण रचना अगदीच टिपिकल आणि ठरलेली असायची. पण, श्रीराम राघवन आला आणि त्याने वेगळा पायंडा पाडायला सुरुवात केली. त्याची वाटच वेगळी होती आणि त्यावर चालायचा प्रवासही. जिथे अब्बास-मस्तान मंडळी काही महत्त्वाचे पत्ते शेवटपर्यंत ताणत ठेवायचे, तिथे राघवन ते पत्ते पहिल्याच काही सीन्समध्ये ओपन करु लागला. त्याचे बरेचसे चित्रपट पाहताना मला याचे अनेकदा आश्चर्य वाटले, की ही गोष्ट आत्ता रिविल झाली नसती, तर पुढे अजून मजा आली असती.

उदाहरणार्थ, एक हसीना थी मध्ये सैफचं कॅरॅक्टर सुरुवातीपासूनच ग्रे शेडचं दाखवणं त्याने पसंत केलं. तो सारिका वर्तकला फसवणार हे आपल्याला जाणवत असतं आणि होतंही तेच. पूर्णतः संस्कारी माणूस जर धक्कादायकपणे बॅड गाय निघाला तर ती टॅक्ट खूप जास्त परिणाम करेल, अश्या काही अलिखित नियमांत आपण जखडलेलो असताना, अश्या वेळी राघवन आपल्यासमोर डॅशिंग, स्टायलीश आणि ग्रे सैफ उभा करतो. सुरुवातीला सैफ जितका सेन्सिबल वाटत असतो, तितकाच तो पुढे मिस्टीरियस होत जातो. तो, त्याच्या चांगल्या, वाईट इराद्यांचा नेमका थांगपत्ता लागू देत नसला, तरी एक शंकेची पाल आपल्या मनात कायम चुकचुकत राहते, जे, ‘संस्कारी टू बॅड गाय’ या धक्क्यांपेक्षा जास्त भयावह होतं.

हेच जॉनी गद्दारच्या बाबतीतही जाणवतं. गद्दार विक्रमचे इरादे आपल्याला सुरुवातीलाच कळतात. राघवनच्या जागी इतर कुणी असता, तर त्या पाच-सहा साथीदारांवर शंकेची सुई फिरवत फिरवत आपली मजा पाहत बसला असता. पण, या केसमध्ये विक्रम गद्दार आहे हे तो आपल्याला सुरुवातीलाच सांगून बसतो आणि तरीही आपल्याला तितक्याच सफाईदारपणे खिळवून ठेवतो. कारण ही एक गोष्ट रिलीव करून, तो पुढचे अनेक ब्लाइंड गेम्स आपल्यासमोर ओपन करण्याच्या तयारीत असतो, जे या एका धक्क्यांपेक्षा कैकपटींनी उत्कंठावर्धक आणि सरप्रायजिंग असतात.

बदलापूर तर अनेक बाबतीत धक्कादायक प्रयोग होता. लायककडून अनावधानाने झालेला खून, त्याच्या मागावर असणारा आणि बदला घेण्यास आतुर रघू, हे सगळं सगळं स्पष्ट आपल्यापुढे ठेवलं होतं. मग राहिलंच काय थ्रिलरमध्ये? हा विचार येणं, साहजिक आहे. रघू लायकचा बदला घेणार हा सर्वमान्य समज आम्ही आमच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे करून बसलो असताना, लायक आणि रघू यांचं होतं जाणारं रिव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन हे कल्पनेच्या पलीकडचं होतं.

लेटेस्ट अंधाधूनमध्येही तोच प्रकार. जिथं एखाद्या टिपिकल थ्रिलर लेखकाने आयुषमान आंधळा असल्याचं शेवटच्या अर्ध्या तासात, क्लायमॅक्सच्या आधी रिविल केलं असतं, आणि तो चित्रपटातला सर्वात मोठा धक्का म्हणून सर्वांनी नावाजलं देखील असतं, तिथे राघवनने ते पहिल्या अर्ध्या तासात आपल्याला सांगून टाकलं. शिवाय, त्याला जस्टीफाईड कारणही देऊन टाकलं. कारण, त्याने ही एक गोष्ट सांगून पुढे असणाऱ्या अनेक धक्क्यांच्या मालिकेला आपल्याला तयार केलं, हे, चित्रपट पुढे सरकत गेला की आपल्याला कळतं की त्या धक्क्याहूनही बरंच काही अफलातून आपल्या समोर मांडण्यात आलं आहे.

मला बऱ्याचदा वाटतं अब्बास-मस्तान आजवर आपल्याला थिएटरच्या खुर्चीवर बसवून कल्प्रीट कोण असावा हे न सांगता आपली मजा बघत बसत होते. तर राघवन, आपल्याला त्याच्यासोबत दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसवून, ‘हा बघ, हा कल्प्रीट आहे, पण खरी मजा वेगळीच आहे, ती बघ’ असे म्हणत आपल्याला त्याच्या खेळाचा एक भाग बनवून टाकतो. आपण त्याच्या नजरेने हे सगळं पाहू लागतो आणि थक्क होतो, मेस्मराईज होऊन जातो.

टीप: ‘यात स्पोईलर्स आहेत’ हे मुद्दाम लिहिलं नाहीये, कारण हे चित्रपट तुम्ही अजून पाहिले नसतील तर तुम्ही खरे चित्रपटरसिक नक्कीच नाही आहात आणि त्यामुळे हे चित्रपट तुम्ही या पुढेही पाहणार नाही, हे मी गृहीत धरतोय. त्यामुळे तुम्हाला स्पोईलर्सने काहीच फरक पडणार नाही (हा ट्विस्ट श्रीराज जाधवनचा होता).


comments powered by Disqus