कोरोनाच्या संकटाकाळातील माझा...

कोरोनाच्या संकटाकाळातील माझा...

- समीर गणपत दिवेकर

(तृतीय क्रमांक)

“राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा….. “

या गीतातून आपल्या महाराष्ट्राचे अतुलनीय असे वर्णन केलेले आहे आणि ते खरेच आहे माझा हा महाराष्ट्र राकट आहे,कणखर आहे, कोणत्याही संकटाच्या छाताडावर पाय देऊन समर्थ पणे उभा राहतो, पण आज हाच महाराष्ट्र एका भयंकर अशा वैश्विक संकटाला धैर्याने, चिकाटीने, लढवय्या वृत्तीने, तोंड देतोय आणि या संघर्षातूनच आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही महाराष्ट्रीय आहोत आणि ते भयानक संकट म्हणजेच सर्व जगाला, देशाला पर्यायाने समस्त मानव जातीला वेठीस धरणारा एक छोटासा विषाणू “कोरोना “.

कोरोना च्या या संकटांने जग,देश, राज्य, शहरे, खेडी, गावे सर्व काही क्षणात लॉकडाऊन केले, माणसाचा संपर्क, सहवास, बाहेर फिरणे, किंबहुना मानवाचे घराबाहेर पडणेच बंद केले, एवढेच काय तर या विषाणूने माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उभे केले, आणि मानवजातीला “जिवंत राहणे “हीच प्राथमिकता आहे हे अधोरेखित केले. ग्रामीण भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मंजुरांची आगतिकता पाहून मात्र माणूस आणि मजूर यांच्यातील फरक लक्षात आला भांडवली व्यवस्थेला माणसांची गरज नाही तर मजुरांची गरज असते हे अलिखित सत्य लक्षात आले. आणि जगात महासत्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देशांची हतबलता देखील दिसून आली. आज कोरोनाच्या या संकटात आपल्या राज्याची असलेली स्थिती यानंतर पुढे येणारे बिकट संकट म्हणजे कोलमडलेली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात रोजगार हिरावून घेणार यात दुमत नाही, पुढे हाच बेजोजगारीचा राक्षस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे करून समस्त मानवजातीला वाकुल्या दाखविणार हेच सत्य आहे.

लॉकडाऊनच्या नंतरच्या या काळात सरकार, प्रशासन, बँका, उद्योजक, शेतकरी, कामगार या सर्व समाज घटकांसमोर तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसमोर वेगवेगळी आव्हाने उभी राहणार आहेत, आणि याचे खरे चित्र येणारा काळच पुढे घेउन येईल. माझ्या मते बेरोजगारी आणी आर्थिक चणचण हे दोन प्रमुख विषय राज्यासमोर पर्यायाने देशा समोर असतील, तोच प्रश्न उद्योग धंद्याच्या बाबतीत कारण लॉकडाऊनच्या या काळात उद्योग बंद रहिल्यामुळे त्याना खेळत्या भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. एक मात्र गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली कि, आजपर्यंत काही गोष्टी अथवा साहित्य यासाठी आपण इतर देशांवर अवलंबून होतो किंबहुना त्या गोष्टीची निर्मिती आपणदेखील करू शकतो हा प्रयत्न देखील कधी केला गेला नव्हता परंतु या अतीतटीच्या काळामध्ये आपण मास्क, पिपीई किट, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर यांचे उत्पादन आपण युद्धपातळीवर सुरु केले आणि आपणास कळून चुकले की आपणही या साहित्यांची निर्मिती करू शकतो, या लॉकडाऊन काळात शहरी भागांवर जसा परिणाम झाला आहे तसाच तो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर देखील झाला राज्यातील बारा बलुतेदार अडचणीत आले आणि या नंतर च्या काळातही त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे,या काळात एक विरोधाभास देखील जाणवत होता तो म्हणजे गोदामात एका बाजूला धान्य पडून आहे परंतु दुसऱ्या बाजूला देशातील कित्येक लोक उपाशी झोपत होते हया परिस्थितीचा देखील राज्याने भविष्यात विचार केला पाहिजे, शेतकरी, मजूर, लघु व्यवसायिक, यांच्या समोर येणारा काळ आर्थिक कसोटीचा आहे. कदाचित या लॉकडाऊन नंतर राज्यातील पर्यटन क्षेत्रावर देखिल दूरगामी परिणाम जसे विदेशातून येणारे पर्यटक कमी होणार तसे भारतामधून बाहेर जाणारे देखील आपल्याच देशातील पर्यटनाला प्राधान्य देतील त्यातून देशांतर्गत आणि राज्यातील पर्यटनाला चांगली संधी असेल. त्या दृष्टींने या राज्यांतर्गत पर्यटन विकासासाठी राज्याने प्रयन्त केले तर रोजगार निर्मिती देखील होईल.

या कोरोना संकटात शासन, प्रशासन, पोलीस दल, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, आणि इतर सर्व खरतर या सर्वानी मृत्यूची जोखीम पत्करलेली आहे, ते आपला जीव संकटात घालून समाजाचे रक्षण करीत आहेत अशी वेळ यापूर्वी कधीच आलेली नव्हती, तेव्हा या काळात आपण स्वतःला एकच प्रश्न विचारला पाहिजे की, खरंच आपल्याला जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि आज पर्यंत आपण कोणत्या गोष्टी मिळविण्यासाठी स्पर्धा करीत होतो. महाराष्ट्रात आणि मुंबईत स्थलांतरित मजुरांचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर देखील आपण यापुढे कधी अशी परिस्थिती आलीच तर उपाययोजना करून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रात उद्योगाचे थांबलेले चक्र पुन्हा गतीमध्ये येईल पण या काळानं माणसाची, कामगारांची, शेतकऱ्याची हिरावून घेतलेली मानसिक गती सुद्धा आपणास परत मिळविण्याचा प्रयन्त निश्चितच केला पाहिजे. मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या मध्ये लपलेल्या अर्ध्या मुंबईची गरज ओळखून त्यादृष्टीने उपाय योजना आखल्या गेल्या पाहिजेत.या लॉक डाऊन मुळे समाजात काही सकारात्मक बदल देखील झाले, लोक वैयक्तिक स्वच्छतेचे धडे गिरवू लागले, रस्त्यावर थुंकणे कमी झाले, प्रदूषण कमी झाल्याने नद्या स्वच्छ झाल्या, प्राण्यांना कित्येक वर्षानंतर मुक्तपणे, निर्भयपणे संचार करायला मिळाले, राज्यातील कित्येक देवस्थाने माणसांच्या गर्दीमुळे कायम अस्वच्छ होती ती सुंदर दिसू लागली, जात - पात धर्म हे सर्व बाजूला सारून माणूस माणुसकी जपत आहे, हे चित्र कायमच असे राहावे असे वाटते. घरी रहा… सुरक्षित राहा… प्रशासनाला सहकार्य करा… कोरोनाला हरवा

comments powered by Disqus