...आणि इलाज सापडला

...आणि इलाज सापडला

- संपदा राजेश देशपांडे

टीप - ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याची नोंद घ्यावी

अशोक देशमुख आणि अपर्णा देशमुख यांचा एकुलता एक मुलगा अर्णव डॉक्टर झाला आणि अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला. अशोक आणि अपर्णा यांचं मन अभिमानाने भरून गेले. एकीकडे त्यांना हेही कळत होतं की आपला मुलगा आपल्याला कायमचा दुरावला, कारण परदेशात शिक्षणासाठी गेलेली मुलं तिकडेच शिकून स्थायिक होतात. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना काही तिकडे चैन पडत नाही. म्हणजे ही ताटातूट सहन करायलाच हवी. अर्णव मुळातच हुशार होता. त्यांनी आपल्या नावाची ख्याती अमेरिकेतही पसरवली. अनेक दुर्धर आजारांवर यशस्वी संशोधन केले. त्याचे नाव आज जगभरात मानाने घेतले जात होते. जानेवारी 2020 अर्णव आज तीन वर्षांनी भारतात येत होता. त्यानी एका अमेरिकन डॉक्टर मुलीशी लग्न केले होते. त्याच्या आई-वडिलांनी या लग्नाला संमती दिली कारण तेच योग्य होते. नाही म्हणून आजची मुलं ऐकणार थोडीच! बेला खूप गोड मुलगी होती. व्हिडिओ कॉल वर ती सासूला वेगवेगळे पदार्थ विचारायची आणि करूनही बघायची. अर्णवनी तिला मराठी शिकवलं होतं ती मोडकं तोडकं मराठी बोलायची. त्यामुळे तिला सासू-सासऱ्यांबरोबर बोलताही यायचं.

5 जानेवारी 2020 ला ते दोघे भारतात आले. त्यांना विमानतळावर घ्यायला अर्णवचे सगळे नातेवाईक आले होते. मग दोन-तीन दिवस भेटीगाठी आणि धमाल करण्यात गेले. इकडे चीन मध्ये कोरोना नामक विषाणूचा कहर वाढत होता. हजारो लोक त्याला बळी पडत होते. मग बातम्यांमध्ये येऊ लागले की भारतातही हा आजार पसरू लागला आहे. इंटरनॅशनल विमाने बंद करण्यात आली. अमेरिकेवरून अर्णवला फोन येऊ लागले. या आजारावर संशोधन करणे गरजेचे होते. पण अर्णव आणि बेला भारतातून हलू शकत नव्हते. मग अर्णव आणि बेलानी भारत सरकारला विनंती करून आजारी लोकांवर इलाज आणि संशोधन करायची परवानगी मागितली. अर्णव आंतरराष्ट्रीय ख्यातीचा डॉक्टर होता. तो भारतात संशोधन करतोय म्हटल्यावर सरकारने आनंदाने परवानगी दिली.

अर्णव आणि बेला प्रयोगशाळेजवळच्या एका फ्लॅट मध्ये राहू लागले. अशोक आणि अपर्णाला आपला मुलगा भारतात आहे याचे समाधान वाटले. ते दिवसरात्र या कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यानी आपल्या आई-वडिलांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. सॅनिटायझरनी हात साफ करा. सारखे हात धुवा, घरात स्वच्छता ठेवा अशा अनेक सूचनांनी अपर्णा वैतागून गेल्या होत्या. अर्णव हसून म्हणायचा,”आई ! लहानपणी बाहेरून खेळून आल्यावर, शाळेतून आल्यावर, परीक्षेला जाताना, जेवताना तू किती सूचना द्यायचीस आठवतंय का?”अपर्णा मग फोन वर म्हणायची, “हो रे बाबा त्याचाच बदला घेतोस की काय?”इकडे अर्णव आणि बेला त्यांच्या टीमसोबत दिवसरात्र संशोधनात खपत होते पण त्यांना हवे तसे यश मिळत नव्हते. इकडे अर्णवला मृत व्यक्तीचे प्रेत संशोधनासाठी हवे होते ज्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परंतु सरकार तशी परवानगी देत नव्हते कारण त्यात अतिशय धोका होता. मृत व्यक्तीवर ताबडतोब दाहसंस्कार होणे गरजेचे होते हे त्याला समजत होते. इकडे अपर्णाचे न ऐकता अशोक मित्रांना भेटायला जात असत. अशातच एक दिवस त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली. अर्णवला अपर्णानी कळवताच त्यानी तातडीने दोघांनाही हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात ठेवले. अशोकची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. अपर्णाचीसुद्धा पॉझिटिव्ह आली. परंतु तिच्यातली लक्षणे अतिशय सौम्य होती. अशोकची तब्बेत दिवसोंदिवस ढासळत गेली. त्यांना हाय ब्लड प्रेशर, तसेच मधुमेह होता. अर्णवने त्यांना वाचवायला प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु ते त्यातून वाचले नाहीत. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्णव अतिशय दुःखी झाला. या कोरोनाच्या राक्षसाने आपल्या बाबांचा बळी घेतला. आपण इतके मोठे डॉक्टर असून काहीच करू शकलो नाही हे त्याच्या मनात खुपत होते.

आपले वडील जाणार हे त्याला समजले होते. त्यामुळे त्याने त्यांच्यावर काही प्रयोग केले. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यानी त्यांचे हृदय, फुफुसे असे अवयव घेऊन त्याची तपासणी केली. त्याला काहीच निदान होत नव्हते. हा विषाणू एकदा शरीरात गेला कि तो त्याचे परिणाम दाखवतच होता. मग काही ठिकाणांहून अशा बातम्या येऊ लागल्या की मलेरियासाठी असलेली औषधे, BCG (Bacille Calmette Guerin.) लस जे घेतात त्यांना कोरोना होत नाही. यावर त्यानी आधीच संशोधन करून झाले होते. मग त्यांनी अशा अफवा पसरू नये असे आव्हान केले. ही औषधे नक्कीच प्रभावी होती परंतु ती कोरोनाचा कहर थांबवू शकत नव्हती. फार फार तर काही लक्षणे कमी होत होती.

दिवसेंदिवस तणाव वाढत होता. भारत सरकारने वेळीच पावले उचलल्यामुळे हा विषाणू दुसऱ्याच पायरीवर थांबला होता. लॉकडाउनमुळे बरेच लोक घरात अडकले होते. फक्त गरजेच्या सोयी-सुविधा चालू होत्या. लॉकडाउनचा परिणाम म्हणून लोकांना मानसोपचारतज्ज्ञांची गरज वाढली होती. लोक मानसिकदृष्ट्या खचत चालले होते. जग आर्थिक मंदीच्या दिशेने वेगाने जाऊ लागले. इकडे अर्णव त्याच्या केबिनमध्ये डोक्याला हात लावून बसला होता. इतक्यात एक पेशंट आल्याचे त्याला समजले. त्याच्यात कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नव्हती. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रक्त तपासायला पाठवले. तो तिकडून बाहेर पडत असतानाच एक साधू समोर बाकावर बसलेला त्याला दिसला.

“काय डॉक्टर ! नाही ना सापडत उपाय ? थकलात शोधून ? अहो ! तुमच्या या आजच्या विज्ञानात हा आजार बरा करायची शक्ती कुठे असणार?”तो टिंगल करत बोलला.

“मग तुमच्याकडे उपाय आहे? सांगा ना मग ! जगावर फार मोठे उपकार होतील.”अर्णव चिडून बोलला.

विश्वास ठेवाल माझ्या बोलण्यावर? मला असा एक उपाय माहिती आहे की जो कोणालाही माहित नाही.” तो म्हणाला.

अर्णवला आता त्याच्या बोलण्यात रस वाटू लागला होता. अर्णवनी ऐकले होते की भारतातले आयुर्वेदशास्त्र खूप प्रगत होते. फार पूर्वीच्या काळी अनेक दुर्धर आजारही जडीबुटींच्या साहाय्याने सहज बरे होतं असत तेही कोणत्याही साईडइफेक्ट शिवाय. मग त्यानी एक संधी घ्यायचे ठरवले. त्याने आपले वडील गमावले होते. निदान जर प्रभावी औषध मिळाले तर तो इतर कोणाचे जिवलग गमावणार नाहीत असे त्याला मनापासून वाटू लागले.

मग तो त्या साधूला म्हणाला, “ठीक आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. बोला काय औषध आहे?”

“ते इतकं सोपे असते तर काय पाहिजे होते ! तुला माझ्याबरोबर यावे लागेल मी नेईन तिथे. एकही प्रश्न न विचारता मान्य आहे का सांग?”तो साधू बोलला.

तसंही काहीतरी उपाय हवाच आहे जर ह्यांनी शोधून दिला तर काय फरक पडतो? लोकांचं भलं तर होईल आणि मुळात म्हणजे हे संकट टळेल.”त्याने मनात विचार केला.

मग बेलाला सांगून तो निघाला. तिने खूप अडवलं अर्णव तिला समजावून निघाला. निघताना तिला आईची काळजी घ्यायला सांगितले. अर्णव खाजगी गाडी घेऊन निघाला. त्याच्याकडे पास होता. तो डॉक्टर म्हणून कुठेही जाऊ शकत होता. रस्त्यानी जाताना त्याला दिसत होते की लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय उद्योग पार बसले होते अनेक लोक बेरोजगार झाले होते. त्यांची अवस्था पाहून अर्णवचा कोरोनावर उपाय शोधण्याचा निश्चय अजून पक्का झाला. ते साधू त्याला घेऊन हिमालया जवळच्या छोट्या खेड्यात आले. त्यांनी तिथे गाडी सुखरूप ठेवली. आता पुढचा रस्ता चालत होता.

ते साधू त्याला म्हणाले,”बघ इथपर्यंत आला आहेस आता पुढचा रस्ता खूप कठीण आहे. जर तूला परत जायचं असेल तर आताच जाऊ शकतोस. पुढे गेल्यावर इच्छा असली तरी परत फिरू शकणार नाहीस.”

“मी मागे फिरायला आलोच नाही.”अर्णव निश्चयाने म्हणाला.

मग साधू त्याला घेऊन निघाला. ते सतत चालत होते. रात्री एखाद्या गुहेत मुक्काम करत होते. ते साधू देतील ते तो खात होता. असे चार दिवस ते सतत चालत होते. ते चालत चालत बहुतेक तिबेटच्या बाजूला आले असावेत असा अर्णवने अंदाज केला. मग अतिशय घनदाट वृक्षांचा एक प्रदेश लागला ते वृक्ष इतके उंच होते की, सूर्यप्रकाशही खालपर्यंत पोहोचत नव्हता. ते चालत चालत त्या जंगलाच्या मधोमध आले तिथे दाट झाडांमध्ये एक पोकळी दिसू लागली. तो साधू त्या पोकळीच्या आत गेला. अर्णवही त्याच्या मागे गेला. समोर एक छोटेसे खेडे होते. त्यात अनेक साधू वावरत होते.

सेकंड डायमेन्शन”अर्णवच्या मनात विचार आला.

“बरोबर आहे !”चार दिवसात पहिल्यांदाच तो साधू बोलला,

“तू दुसऱ्या मितीत आला आहेस. हे स्थान कोणत्याही नकाशावर नाही. तरीही ते आहे. अनेक लोक जन्मभर याचा शोध घेतात. खूप पुण्य असल्याशिवाय माणूस इथे येऊ शकत नाही. इथे फक्त थोर आत्मेच येऊ शकतात. तुझ्या मनात लोकांचे भले करण्याचाच विचार आहे. त्यात तुझा कोणताही स्वार्थ नाही, हे मला जाणवले म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. ही जागा पुरातन काळापासून, ‘शांग्रीला, शंभल, ज्ञानगंज’ अशा अनेक नावानी प्रसिद्ध आहे. इथले लोक अमर आहेत. सध्या इतकी माहिती पुरे. चल आता.”तो साधू अर्णवला घेऊन त्या गावाच्या मधोमध असलेल्या एका गोलाकार किल्ल्यात गेला. ते गाव अतिशय रमणीय आणि सुंदर होते. जणू काही स्वप्नातले गाव. तिथे असलेल्या वनस्पती पृथ्वीवरच्या वाटत नव्हत्या. संपूर्ण गावच अलौकिक होते. किल्ल्यात अनेक साधू तप करत बसले होते. अर्णवला, किल्ल्याच्या आतल्या गोलाकार दालनात नेण्यात आले. तिथून एका जिन्याने तो खाली गेला आणि जाताच थक्क झाला. ते एका भव्य वाचनालय होते. अगदी उंच छतापर्यंत ग्रंथांनी भरलेलं. तिथे अनेक पुरातन ग्रंथ जतन केलेले दिसत होते.

साधू म्हणाला,”फार पुरातन काळापासूनचे हे ग्रंथ आहेत. आपल्या भारतातले अमूल्य ज्ञान. परंतु जसे सत्ययुग संपून कलियुग सुरु झाले लोक स्वार्थी झाले त्या ज्ञानाचा गैरवापर करू लागले. म्हणून आम्हाला हे सर्व ग्रंथ इथे ठेवावे लागले. हे ठिकाण सामान्याच्या दृष्टीला कायम अदृश्य आहे; ये.”

मग त्यांनी त्याला एका आसनावर बसण्याचा इशारा केला आणि एका भूर्जपत्रावर लिहिलेला ग्रंथ काढला.

ते म्हणाले,”हा ग्रंथ सुमारे चार हजार वर्षे जुना आहे यात संपूर्ण जगावर 2020 साली एक मोठी आपत्ती येईल असे वर्णन केले आहे, ते मी तुला वाचून दाखवतो, - यात असे लिहिले आहे की सन 2020 मध्ये संपूर्ण जग एका महाभयंकर व्याधीला सामोरे जाईल. तो आजार त्यावेळच्या ‘चीन’ नामक देशातून पसरेल. तो आजार एका विषाणू मुळे होईल. जगभरात मोठ्या मोठ्या प्रगत देशांमध्ये ज्यांची त्यावेळची नावे अमेरिका, इटली, फ्रान्स असतील, हाःहाकार माजेल. लाखो लोक मृत्युमुखी पडतील. तेंव्हा एक भारतीय वंशाचा वैद्य ज्याचे नाव अर्णव असेल तो यावर इलाज शोधून काढेल. शंभल प्रांतात सापडणारी ‘नीलमया’ नामक वनस्पती यावर उपयुक्त ठरेल. त्याचे काही थेंब हजारो व्याधीयुक्त लोकांना तात्काळ ठीक करतील. “साधू महाराज वाचायचे थांबले. “आता ही नीलमया तुला मिळवायची आहे. ती या गावचे मुख्य साधू त्यांच्याकडे आहे. तू जाऊन त्यांच्याकडे ती माग.”

अर्णव निघाला त्या साधूंनी सांगितल्याप्रमाणे गावप्रमुखाच्या कुटीजवळ जाऊन थांबला. ते बाहेर आले. ते इतके तेजस्वी होते की अर्णवचे डोळे दिपून गेले. अर्णवनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. ते हसत म्हणाले,”नीलमया हवी आहे ना ? फक्त एक अट आहे. तू तिचे रहस्य तुझ्या पत्नीशिवाय कोणाला सांगता काम नये. ज्याक्षणी तू हे जाहीर करशील त्याक्षणी नीलमया नाहीशी होईल. आम्ही इथले प्रत्येक रोपटे देवाप्रमाणे पुजतो. तुही तिचा योग्य तो मान ठेवला पाहिजेस.”अर्णवनी मान डोलावली. तो इतकेच करू शकत होता. समोरचे ऋषी अतिशय तेजस्वी होते. त्यांचे दिव्य तेज सर्वत्र पसरले होते. ते अर्णवला घेऊन आश्रमात गेले. तिथे अनेक वनस्पती होत्या, सर्वांमधून एक प्रकाश पसरला होता. त्यात निळ्या तेजाने चमकणाऱ्या एका वृक्षाला त्यांनी नमस्कार केला. अर्णवनेही त्यांचे अनुकरण केले. ते म्हणाले,”हे महान नीलमया माते. आज जग खूप मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे. हा मुलगा ते वाचवायचा प्रयत्न करतो आहे. जर तू त्याला साहाय्य केलेस तर अनेक निरागस जीव वाचतील. मदत कर माते.”इतक्यात त्या वृक्षाची एक फांदी अर्णवच्या हातात पडली. अर्णवने त्या वृक्षाला आणि ऋषींना मनापासून नमस्कार केला. मग ते ऋषी त्याला एका वृक्षाजवळ घेऊन गेले. तिकडे एक पोकळी होती. अर्णवनी त्यात प्रवेश केला आणि तो हिमालयाच्या ज्या गावात त्याची गाडी ठेवली होती त्या ठिकाणी आला. एक चुटपुट लागून राहिली की आपण त्या ऋषींचे नावही विचारले नाही.

अर्णव तडक निघून मुंबईला आपल्या प्रयोगशाळेत आला. बेला आणि अपर्णा तो सुखरुप आल्याचे पाहून खूष झाल्या. मग त्याने बेलाला सर्व गोष्ट सांगितली. तिला खूप आश्यर्य वाटले. मग नीलमया एका कुंडीत लावली तिची पूजा करून अर्णवने तिच्या पानाचा रस काढून त्यात इतर रसायने मिसळली तो काही थेंब रसच पुरेसा होता, पण जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्याला इतर गोष्टी मिसळाव्या लागल्या. त्याच्या या प्रयोगाने रोगी झपाट्याने बरे होऊ लागले. काही थेट फवाऱ्यात घालून सर्वत्र फवारताच त्या विषाणूचा नाश होऊ लागला. भारत देश कोरोना मुक्त झाला. संपूर्ण जगभरात हे औषध वापरले गेले. अर्णव आणि बेला अमेरिकेत परत आले, अपर्णाही त्यांच्यासोबत होती. आता सगळे ठीक झाले होते. कुठेही लॉकडाउन नव्हता. लोकांना त्यांचे रोजगार परत मिळाले होते.

नीलमया अर्णवच्या अमेरिकेच्या घरात होती. रोज रात्री ती निळ्या तेजाने चमकत असे. जे फक्त अर्णवलाच दिसे. ते साधू कोण होते ज्यांनी आपल्यावर इतके उपकार केले हे त्याला समजू शकले नाही. अर्णवचा भव्य सत्कार झाला सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या मेडिकल कॉन्फरन्स मध्ये त्याला गौरवण्यात आले. भारताच्या प्रतिनिधीनी त्याला भेट म्हणून एक बॉक्स दिला. घरी येऊन त्यानी तो उघडला. आत एका तेजस्वी साधूचा पुतळा होता. हे तेच होते जे अर्णवला शंभलमध्ये भेटले होते. त्या पुतळ्याच्या खाली त्यांचे नाव होते. “समस्त वैद्यांचे देव - महाराज धनवंन्तरी”.

comments powered by Disqus