एकदा सुनील गावसकर यांनी एका पुस्तकांची प्रस्तावना लिहिली होती की, सचिन तेंडूलकरने मिडलक्लास लोकांना काय दिले? तर जो त्याने पैसा कमावला त्याचा मध्यम वर्गियांना काहीच उपयोग नाही, त्याने जी इतकी शतके मारली त्याचा मध्यम वर्गीयांना काहीच उपयोग नाही. त्याला जो सर्व जगात मान सन्मान भेटला त्याचा मध्यम वर्गीयांना काहीच उपयोग नाही. मग जे सचिनने तेवीस वर्षात केले त्याचा सामान्य माणसासाठी काहीच उपयोग नाही का? तर या प्रश्नांचे उत्तर आहे की “उपयोग आहे”. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा आपण एक दिवस हिमालयाचे उत्तुंग शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करू शकतो हा विश्वास आणि यशाचे उंच शिखर गाठून सुद्धा आपले पाय जमीनीत घट्ट रोवून ठेवावे हा संस्कार ज्या माणसाने बहुजन समाजाला दिला तो सचिन रमेश तेंडुलकर आहे. या एका परिच्छेदात सुनील गावसकर यांनी सचिनचा गौरव केला होता. माझ्या सारख्या ८० च्या दशकात जन्मलेल्या मुलांनी सचिनची कारकीर्द पूर्ण पाहिली. तो जरी वयाने मोठा असला तरी तो बहुधा समवयिन आहे असा भास व्हायचा. तरी माझे वय आणि सचिनचा खेळ एकत्र बहरत होते. सचिन रिटायर्ड झाला आणि अनेकासाठी क्रिकेट पाहण्यासाठी जे प्रमुख कारण होते तेच रिटायर्ड झाल्यासारखे वाटले. विराट किंवा रोहित हे उत्तम खेळाडू असले तरी तो सचिनचा फिल या सचिन वेड्या प्रेक्षकांना येत नव्हता. बहुतेक जनरेशन गॅप हा काही प्रकार आहे तो आडवा येत असावा. पण सचिन रिटायर्ड झाल्यावर फार मोठी पोकळी निर्माण झाली. हे ८० च्याच दशकात जन्मलेले आता वयाने ३५ - ४० च्या घरात येऊन पोहचले होते. यांना समवयींन असा, सामान्य कुटुंबात जन्माला आलेला कोणी, पण असामान्य कर्तृत्व असलेला कोणी मिळू शकतो का असा प्रश्न मला पडू लागला. सैराट रिलीज होऊन एव्हाना तीन वर्ष उलटली. सैराट…म्हणजे १०० करोड बिझिनेस करणारा एकमेव मराठी चित्रपट. इतकं घवघवीत यशाचे शिखर गाठून सुद्धा आपला साधेपण न सोडता आपले पाय जमिनीवर ठेवणारा नागराज मंजुळेमध्ये मला तो सचिनचा फिल येऊ लागला. त्याचा विचार करता करता त्याच्यासाठी प्रेम दिवसागणिक वाढतच गेले. अमिताभ बच्चन अभिनित आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना नागराजवर दृष्टीक्षेप टाकणारा हा छोटासा प्रयत्न.

नागराजचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा तालुक्यातील, जेऊर या गावी वडार समाजातील एका कुटुंबात १९७७ रोजी झाला. नागराजचे वडील दगड, खडी फोडण्याचे काम करत होते. नागराजचे वडील पोपटराव याचे मोठे भाऊ बाबूराव यांना मुल नव्हते. तेव्हा पोपटरावांनी दिलेल्या वचनाप्रमाणे तीन महिन्याचा आपला मोठा मुलगा नागराज याला बाबूरावाच्या झोळीत टाकला. म्हणून नागराज जेव्हा आपला कविता संग्रह प्रकाशित करतो त्यास आपले नाव “नागराज बाबूराव मंजुळे” देतो तर चित्रपट प्रदर्शित करतो त्यास आपले नाव “नागराज पोपटराव मंजुळे” देतो. नागराज म्हणतो की तो दहावीला असताना त्यास वजाबाकी सुद्धा येत नव्हती पण तो चित्र, रांगोळी सुंदर काढत होता. कॅरम सुद्धा चांगला खेळत होता. पण त्याला हे सुंदर विषय अवगत होते त्याच्या परीक्षा शाळेत होत नव्हत्या तर ज्या विषयाची त्याला किळस वाटत असे त्याच्या शाळेत परीक्षा होत असे. परिणामी तो दहावीत नापास झाला. दहावीच्याच सुट्टीत त्याला वाचनाची आवड जडली. ही आवड इतकी जडली की तो वर्तमानपत्रे, पुस्तके, लायब्ररी वाचून पालथ्या घातल्या. मग त्याने हळूहळू शालेय पुस्तकांचा अभ्यास केला. एक त्याच्या मित्राने त्याला गणितात मदत केली. कधीही पाठ न करता येणारा गणित विषयातील काही गणिते, प्रमेय त्याने तोंडपाठ केली आणि तो कसाबसा दहावी पास झाला. पुढे त्याने सोलापूर जिल्ह्यात तो पदवी झाला. पुढे पुण्याला जाऊन मराठी विषयात त्याने एम ए केले. नंतर एम फिल पूर्ण केले. नगर जिल्ह्यात मास कम्युनिकेशन चा दोन वर्षाचा कोर्स करताना अभ्यासाचा भाग म्हणून त्याने पिस्तुल्या ही लघुकथा लिहली आणि शूट केली. त्यास नागराज मंजुळेस आणि बाल कलाकार सूरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार भेटला. या लघुकथेत जाती धर्माची मक्तेदारी असलेल्या समाजात एक चिमुरड्यास शिक्षणाची आवड असून सुद्धा त्याला काय अडथळे, समस्या येतात याच सुंदर, पण कमीत कमी दृश्यात सुंदर प्रदर्शन केले. या लघुकथेमुळे कला क्षेत्रात लोकांना नागराज माहिती होऊ लागला.

नागराजने मग चित्रपटाचा मार्ग हेरला. फॅन्ड्री विषय लिहिताना त्याची भाषा मराठी असावी की ग्रामीण बोली भाषा असावी यापासून वाद होते. पण नागराज आपल्या बोली भाषेवर अटळ होता. फॅन्ड्री या शब्दाचा अर्थ आहे डुक्कर. ही कथा खालच्या एका वर्गातील डुक्कर पकडणाऱ्या कुटुंबाची आहे. यात वरचा वर्ग आणि खालचा वर्ग हा वाद आहे, खालच्या वर्गातील समस्या आहेत. खालच्या वर्गातील मुलांचे वरच्या वर्गातील मुलींशी एकतर्फी प्रेम आहे. या चित्रपटाचा शेवट सगळ्या प्रेक्षकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या करतात. चित्रपटातील तथाकथित कुटुंब जेव्हा एक डुक्कर पकडत होते. तेव्हा पूर्ण गाव हा तमाशा निर्ल्लजपणे पाहत होता. शेवटी जेव्हा तो डुक्कर हाताशी लागणार असे वाटले होते तितक्याच बाजूच्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होते. खालच्या वर्गातील त्या कुटुंबाची ओढाताण होत असून सुद्धा राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी ते कुटुंब डुक्कर न पकडता ताठ उभे राहते. कारण राष्ट्रगीत बोलताना येणारा शहारा हा कोणाची जातपात विचारत नाही तर प्रत्येक देशभक्त व्यक्तीच्या अंगावर हा शहारा येतो. जात पात यासारख्या प्रकाराला सुरुंग लावणारा हा चित्रपट होता. २०१४ साली फॅन्ड्री प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राला एक उत्तम दिग्दर्शक भेटला.

२००९ साली नागराजने एक संहिता लिहिली होती. ती वर्क होणार नाही असे वाटून त्याने ही संहिता बाजूला ठेवली. पण फॅन्ड्रीच्या यशाने तो आधी चेपावलेला आत्मविश्वास पुन्हा उचल खाऊ लागला. २०१३ साली या चित्रपटाची कास्ट आणि लोकेशन निवड सुरू झाली. सर्व काही परफेक्ट असावे असा नागराजचा आग्रह होता. सर्व नागराज आणि टीमच्या अथक परिश्रमाने हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला. तो चित्रपट म्हणजे आपला सैराट होय. या चित्रपटातनंतर सर्वाचे जीवन बदलले. मग नागराज असो किंवा आर्ची परशा असो किंवा अजय अतुल चे संगीत असो. सर्व काही विलक्षण होते. सैराटच्या संगीताने बहुजन समाजाला भुरळ घातली. सैराट जितका चांगला चित्रपट होता तितकीच सैराट बनविण्यासाठी लागलेली मेहनत वाखण्याजोगी होती. पुढे ही मेहनत लोकांना समजावी म्हणून “सैराटच्या नावानं चांगभलं” नावाने गार्गी कुलकर्णी हिने लघुकथा लोकाच्या समोर आणली. १०० करोड कमावणारा एकमेव मराठी चित्रपट म्हणजे सैराट होय. २००९ साली चित्रपट विषयी कोणतेही बॅकग्राऊंड नसलेल्या एका इसमाने हे स्वप्न पाहिले आणि मराठी चित्रपट सृष्टीस नवी दृष्टी दिली.

नागराजने नाळ नावाचा चित्रपट निर्माता म्हणून प्रदर्शित केला. यात त्याने एक महत्त्वाची भूमिका सुद्धा केली. हा यशस्वी चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना टिव्हीवरील फुकट मनोरंजन सोडून चित्रपटगृहाकडे घेऊन आला. नागराजने “उन्हाच्या कटाविरुद्ध” हा कविता संग्रह लिहला आहे. “पावसाचा निंबंध” ही लघुकथा बनविली आहे. पिस्तुल्यापासून व्हाया सैराट ते नाळ पर्यंत नागराजला राष्ट्रीय पुरस्कार सह अनेक पारितोषिके, अनेक मान सन्मान भेटले. पण या मातीतल्या माणसाची मती काही भ्रष्ट झाली नाही. त्याच्या हातांनी काही अहंकारास शिवले नाही.

ज्याची मुळे या मातीत घट्ट रुळली आहेत तो नागराज आता झुंड हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट घेऊन येत आहे. लहानपणी चोरी करून ज्या बच्चन साहेबांचे त्याने चित्रपट पाहिले. त्या बिग बी बरोबर चित्रपट करणे म्हणजे मानाचा तुरा होय. ही कथा एका विजय बारसे नावाच्या नागपूर स्थित क्रिडा प्रशिक्षकाची आहे. विजय बारसे यांनी कितीतरी झोपडपट्टीमधील मुलांना फुटबॉलसाठी प्रवृत्त केले. अमली पदार्थ आणि निरनिराळ्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या झोपडपट्टीतील तरुणांना त्यांनी खेळाचा मार्ग दाखवून त्यांचे पुनवर्सन केले. बिग बी च्या आवाजात जेव्हा हे स्वर ऐकू येतात की “सर, ईसे झुंड नाही तो टीम बोलीये”…तेव्हा हे कळून चुकते की पुन्हा ही आपल्या मातीतील कथा आहे. ही कथा संघर्षाची आहे. ही कथा बुराई पे सच्चाईचा विजय आहे. अशा या निश्चयाच्या कथेला, संघर्षाच्या कथेला पूर्ण जगात उदंड प्रतिसाद भेटू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

पूर्वी राजा हा फक्त राणीच्या पोटातून जन्म घेत होता. राजाचाच मुलगा राजा होऊन सिंहासनाधीष होत असे. पण आता राजा राणीच्या पोटातून नव्हे तर मतदारांच्या पेटीतून जन्मतो. त्याचप्रमाणे आता कलेच्या क्षेत्रात कर्तुत्वाची मक्तेदारी आता फक्त खान, कपूर आदी आडनावात राहिली नाही. ही कला झिरपत झिरपत बहुजन समाजाच्या हातात आली आहे. ही कला जितकी ग्रामीण भागात रुळेल, ही कला जितकी गरीब, भटक्या जमाती मध्ये पाझरेल तितकीच ती आपले प्रचंड रूप धारण करून समाजासमोर, प्रेक्षकांसमोर उत्कृष्ट रूप धारण करेल. त्याचेच उदाहरण म्हणजे छोट्याशा खेड्यात जन्मलेले नागराज मंजुळेसारखी वल्ली. अशी उदाहरणच आपल्या काळजात हात घालून मानवी स्पंदनाची आठवण करून देत माणूसपण बहाल करतात. हेच उद्याचा नवीन भारत बनविण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरेल.