अंतर्गत उर्मीच्‍या हाका प्रत्‍येकाला येत असतात, मात्र त्‍याला कसा प्रतिसाद दयायचा हे प्रत्‍येकाला जमतेच असे नाही. शासकीय सेवेत असतांना कोणतीही आवड किंवा छंद “ रजा नाही “ या सब‍बीखाली टाळले जातात.

मात्र मी शासकीय सेवेत वर्ग- १ पदावर कार्यरत असुन‍ही माझ्या अंतर्गत उर्मीला सकारात्‍मक प्रतिसाद देवुन माझा पर्यटनाचा विशेषतः बुलेटवर भारत भ्रमण करण्‍याचा छंद जोपासला आहे.

अलिबाग झाले, गोवा झाले, लडाख झाले, भुतान झाले आता विजयनगर साम्राज्याची राजधानी “ हम्पी “ येथे बुलेटवर जायचे असे ठरविले होते मात्र तो योग येत नव्हता. अखेर दहावीच्या गृपमधील नितिन(बंडया) तयार झाला आणि हम्‍पीला जाण्याची तयारी सुरु झाली. हा बंडया जयहिंद कॉलेज, धुळे येथे प्राध्यापक आहे. दहावीत असतांना तो, मी व राजुशिंदे “ खो-खो “ च्या टिममध्ये होतो व आम्ही सात मिनीटे खिंड लढवायचो.

यापूर्वी बुलेटवर ब-याच ठिकाणी गेलेली असल्याने मला ते नविन नव्हते. मात्र बंडया प्रथमच इतक्या दुर म्हणजे येवून जावून 1800 कि. मी. प्रवास करणार होता. संदीप व धनु यांनाही सोबत घ्यायचा विचार होता मात्र त्यांनी नकार दिला. संदीपने सांगितले कि. मी. सध्या बाहेरचे काहीच खात नाही. हि शोएब अख्तरचा फेकाड बॉलींग आहे आमच्या तेव्हाच लक्षातआले होते. कारण “कधीतरी घरीही जेवत जा” ! असे वहिनी त्याला सतत म्हणतात हे सर्वांना माहित होते. धन्याचा तर प्रश्नच नव्हता, कारण त्याने
फक्त संग्रहालयात ठेवण्यासाठीच घेतलेली आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या मित्रांचेही तेच म्हणणे पडले की, जर तुम्ही यांना नेले तर तुम्ही जास्तीत जास्त सिन्नर पर्यंत पोहचू शकाल. मग त्यांना रद्दच केले.

अखेर हम्पीला जाण्याचा दिवस उजाडला. हम्पीच का? तर याआपल्या देशाला प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेला आहे. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि शाळेत “ पुढच्यास टप्पल व मागच्यास चप्पल “ मारत-मारत देशाचा जबाबदार नागरिक होण्याच्या दृष्टीने घोकलेली प्रतिज्ञा मला या प्रवासादरम्यान आठवू लागलो.ऑफीसला असलेल्या दोन दिवसांच्या सुट्टीला जोडून तीन दिवसांची रजा घेतली. सकाळी हम्पीला जाण्यासाठी निघालो, नगर, करमाळा, टेंभुर्णीमार्गे सोलापूरला पोहचलो, आज जवळ-जवळ ४२५ ते ४५० किलोमीटर प्रवास झालेला होता.

सकाळी सोलापूर-विजापूर रस्त्याने प्रवास सुरु केला. विजापूरला “ गोल घुमट “ बघितला. विजापूर हे आदिलशाहीच्या काळातील राजधानीचे ठिकाण होते. या आदिलशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी “सळो कि पळो” करुन सोडले होते. अफझलखान याच विजापूर दरबाराचा सरदार, ज्याचा महाराजांनी वध केला. विजापूरहून निघालो. रस्त्यात “अलमटटी धरण” बघितले. तिथे एकजण भेटले ते म्हणाले की, तुम्ही “कुडाळ-संगम” हे ठिकाणही बघा.

“कुडाळ-संगम” हे मलप्रभा नदीच्या काठावर असुन तेथे महात्मा बसवेश्वर यांची समाधी आहे. यासाठी बरेच खाली उतरुन जावे लागते. समाधीचे दर्शन घेतले आणि आता हम्पीकडे प्रवास सुरु झाला. आता बंडयाने बुलेट चालवायला घेतली होती. रस्त्याने एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो, तिथे एक आयशर ट्रक चालविणारा भेटला. साळुंके हे पुण्याचे होते व विजमंडळातून सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना विचारले तुम्ही या वयात ट्रक चालवता तेही क्लिनर न घेता ते म्हणाले साहेब मला सवय झाली आहे. आणि घरी बायको-मुलांकडे पैशासाठी हात पसरण्यापेक्षा मी स्वत:च कमवितो हे महाराष्ट्रातल्या तरुण मुलांनी शिकले पाहिजे.

हॉस्पेटला पोहचलो आणि हॉटेलवाल्याला फोन लावला. त्यांनी सांगितले हॉटेल हॉस्पेटमध्ये नसुन तिथुन पुढे ३५ कि.मी. अंतरावर “तोरंगल” या ठिकाणी आहे. “गो-आयबी” या साईटवरुन बुकिंग केल्याचे दुष्परिणाम. हॉटेलला जायला निघालो तेवढयात एक मुलगा “करिज्‍मा” बाईकवरुन आला. त्याने आम्ही बाईकर असल्याचे ओळखले व म्हणाला जर तुम्ही गावातुन जाल तर तुम्हाला उशिर लागेल मी तुम्हाला हायवेपर्यंत सोडतो मग तुम्ही जा. आणि दुस-या राज्यातही माणुसकी अनुभवास आली. रात्री दहा वाजता हॉटेलवर पोहचलो. हॉटेलचे किचन बंद झालेले. मग काय बंडयाने हॉटेलच्या वेटरला सोबत घेतले आणि जेवण घेवून आला. आता उदया सकाळी हम्पीला जायचे.

सकाळी हम्पीला जायला निघालो. हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी ! विजयनगर साम्राज्याची स्थापना १३३६ मध्ये हरिहर आाणि बुक्क या दोन भावांनी स्वामी विदयारण यांच्या मार्गदर्शना खाली केली. हॉस्पेट रस्त्याला जाताना उजव्या हाताला हॅम्पीला जाणारा रस्ता आहे. त्याकरिता हॉस्पेटला जायची आवश्यकता नाही. हम्पीला यायला एकरस्ता गंगानगरहुनही आहे. रस्त्यालाच “विजयनगर साम्राज्य की राजधानी मे आपका स्वागत है, कमलापूर” असा बोर्ड आहे. आता कमलापूर हे त्या काळातील छोट्याश्या खेड्याने गावाचे रुप धारण केले आहे.

प्राचिन हम्पीत अजुनही बरीचशी स्थळे अस्तित्वात अस्तित्वातआहेत. यात महत्वाची म्हणजे “विजय विठ्ठल मंदीर”, लोटस महाल, हत्ती शाळा, राणी महाल, हजार राम मंदीर, उगृ नरसिंह मंदीर, विरुपाक्ष मंदीर, हेमकुट्टा हिल, अंजनेय हनुमान मंदीर हे टेकडीवर असलेले मंदीर ही प्रसिध्द ठिकाणे आहे.

यातील “विजय विठ्ठल मंदीरात” खांबातुन सप्त सुरांचे आवाज येतात. २००८पर्यंत या मंदीरात सर्वांना जायला प्रवेश होता. मात्र आपल्या भारतीयांची प्रवृत्ती अशी कि, त्या खांबाचे हेरीटेज महत्व लक्षात न घेता त्याच्यावर मिळेल त्या वस्तूने मारायचे, नुकतेच बंगलोरच्या काही मुर्ख मुलांनी हम्पी येथील खांब पाडले आणि त्याचे व्हिडीओ अपलोड केले.

या विजय विठ्ठल मंदीरात प्राचीन दगडी रथ आहे. आपल्या लोकांनी त्याची ही चाके फिरवून-फिरवून खराब केली म्हणुन सिमेंटमध्ये आता पक्की केली आहेत.

आणि असेच लोक आपल्या देशात कशी शिस्त नाही? यावर भाषणे देतात.

“विजय विठ्ठल मंदिरातून” परत येतांना अनवाणी सहलीला आलेली लहान मुले भेटली. त्यांना बंडयाने सांगितले “ माझ्या बरोबर पळा, कोण पुढे पळते,? आणि त्यांनी रेस लावली. बंडया हा रनर आहे हे त्या मुलांना काय माहित!

त्यानंतर आम्ही त्या लहान मुलांना अननस/टरबूज खावू घातले. तेव्हा त्यांना झालेल्या आनंदाची तुलना कशाशीही करता येणार नाही.

हम्पी येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या सर्व हत्तींच्या पुतळयांच्या सोंडा त्या काळातील मुस्लीम आक्रमकांनी तोडलेल्या आहेत. कारण काय तर मुस्लीम आक्रमकांना वाटायचे कि, या सोंडेत हिरे-मोती- सोने भरलेले आहे.

विजयनगर साम्राज्य हे भारतातील शक्तीमान राज्य होते. ते जवळ-जवळ संपुर्ण दक्षिण भारतात पसरलेले होते. या साम्राज्याचा सर्वात शक्तीशाली राजा कृष्णदेवराय होता, तो तुलव वंशातील होता. त्याच्या दरबारात तेनालीराम हा पंडित होता. या साम्राज्याची राजधानी हम्पी होती. हे अतिशय संपन्न शहर होते. या ठिकाणी उघड्यावर हिरे-मोती-सोने-चांदी याची खरेदी-विक्री होत असे. या ठिकाणी त्या काळातील दुमजली शॉपींग सेंटर होते, ज्याचे अवशेष आजही दिसून येतात.

विजयनगर साम्राज्याचा नाश मुस्लीम आक्रमणांमुळे झाला. बहामनी साम्राज्याचे तुकडे होवून त्यातुन पाच शाहया निर्माण झाल्यात. या शाहया आपापसातील लढायांसाठी विजयनगर साम्राज्याची मदत घेत असत. या शाहया मधील काही शाहयांच्या डोळयात विजयनगर साम्राज्य, त्याची सुबत्ता भरली. कृष्ण्देवराया नंतर कोणीही कर्तबगार राजा या राज्यात झाला नाही त्याच्या नंतर या मुस्लीम सत्तांनी विजयनगरवर हल्ला केला. त्यात विजयनगर साम्राज्याचा पाडाव झाला. मुस्लीम सैन्य राजधानी हम्पीत घुसले व शहराचा विध्वंस केला.

हम्पी दर्शनानंतर आता पटटकल, एैहोळ व बदामी तथा वातापी बघायचे ठरले. एैहोळ, पट्टकल, बदामी येथे चालुक्य घराणे पाचव्या शतकापासून राज्य करीत होते. याच चालुक्य घराण्यातील पुलकेशी दुस-याने “सम्राट हर्षवर्धनाचा” पराभव केला होता. या ठिकाणी सुध्दा कला व वास्तु शास्त्राचा नमुना असलेली मंदिरे व राजवाडे आहेत. ही तिन्हीही ठिकाणे त्या-त्या काळात राजधानीचे शहरे होती. एैहोळ येथील दुर्गा देवी मंदीर, पटटकल येथील मंदिरे तर बदामी येथील गुंफा बघण्यासारख्या आहेत. याठिकाणी चालुक्य घराण्याचे राज्य होते. यातील एैहोळ येथे चौथ्या शतकात, बदामी येथे पाचव्या शतकात तर पट्टकल येथे सातव्या व आठव्या शतकात चालुक्य घराण्याचे राज्य होते हे सर्व बघुन सोलापूरकडे निघालो. रात्री सोलापूरला पोहचलो.

सकाळी नाश्ता करुन सोलापूरलाहुन साडेनऊ वाजता निघालो. रस्‍त्‍यात अनगर असा बोर्ड दिसला म्हणुन ते अहमदनगरला जाण्याचा शॉर्टकट समजून गाडी घातली तर ते अनगर नावाचे गाव होते. तिथून कुर्डुवाडीला पोहचलो. कुर्डुवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी पावणे अकरा वाजता तेथे रोज राष्ट्रगीत लाऊडस्पिकरवर लावले जाते, अशावेळी जो जिथे असेल तिथे उभा राहतो. हे बघुन थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावले असतांना स्वत:ला हाय सोसायटीतील समजुन उभे न राहणारे व नंतर त्यांना इतरांनी केलेली मारहाण ही योग्यच होती असे वाटते. आता माढा, करमाळामार्गे नाशिककडे प्रवास सुरु केला. वाटेत माढा-करमाळा रस्त्यावर हॉटेलवर स्पेशल मेनू म्हणुन “बाजार आमटी” असा पदार्थ लिहीला होता. त्याचे कुतुहल वाटुन चौकशी केली तर अनेक डाळी एकत्र करुन बनविलेला आमटीचा प्रकार होता.

आता नगरमार्गे नाशिक कडे निघालो व संध्याकाळी सात वाजता नाशिकला पोहचलो. म्हणजे फक्त दहा तासात आम्ही जवळ-जवळ ४२५ कि.मि. अंतर पार केले होते. अशा रितीने आमची बाईक टुर पुर्ण झाली. आता पुन्हा टुर कधी याचे प्लॅनिंग सुरु केले.