उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ

उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ

राज धुदाट
जयसिंगपूर, 7083900966

मी पाचवीत असताना आमच्या गावात एक घटना घडली जी अजूनही माझ्या स्मरणात जशीच्या तशी आहे. आमच्या गावात केवळ चौथी पर्यंतच वर्ग होते आणि अजूनही आहेत. एका वर्गात पहिली व दुसरीचे विद्यार्थी बसत आणि दुसर्‍या वर्गात तिसरी व चौथीचे. ह्या दोन्ही खोल्यांतील अंतर केवळ पाच फुट असल्याने एकच सूचना फलक होता. वर्गाच्या बाहेरील भिंतीवर काळा रंग देऊन तयार केलेल्या या फळ्यावर तिसरी व चौथीला शिकवणारे गुरुजी सूचना आणि सुविचार लिहित असत.

नेहमी प्रमाणे गुरुजींनी त्या दिवशीही एक सुविचार लिहिला तो होता: “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.” दिवसभर तो सुविचार त्या फळ्यावर होता सर शिक्षा देतील या भीतीने कोणीही चुकूनही त्या फळ्यावरील काहीच पुसत नसे. मात्र त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर तेथे खेळायला आलेल्या गावातील काही खोडकर मुलांनी या सुविचाराखाली आणखीन एक ओळ लिहिली: “बोले तैसा न चाले त्याची तोडावी पाऊले.”

दुसऱ्या दिवशी गुरुजी शाळेत आल्यावर फळ्यावरील ते वाक्य पाहून संतप्त झाले. ते वाक्य कोणी लिहिलं हे त्यांनी दोन्ही वर्गात जाऊन विचारलं. “फळ्यावर असलं वाक्य लिहिणार्‍याच नाव सांगीतलं नाही तर सर्वांना शिक्षा मिळेल” आवाज उंच करून गुरुजीनी धमकी दिली. एकजण घाबरत- घाबरत उठला आणि म्हणाला, “सर आम्ही कोणीच ते वाक्य लिहिलं नाही, पण काल संध्याकाळी गावातली काही मुलं येथे खेळत होती कदाचित त्यांनीच ते लिहिलं असावं.” या मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गुरुजीने गावातील काही मुख्य लोकांना ते वाक्य दाखवलं. गावकर्‍यांनी गावातील काही मुलांची विचारपूस केल्यावर ती खोडकर मुलं कोण होती हे शोधून काढलं. सायंकाळ झाल्यावर त्या मुलांना चार लोकांसमोर बोलावून त्यांनी शाळेच्या फळ्यावर ते वाक्य का लिहिलं असे विचारले असता त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “हा मास्तर, मुलांना शहाणपणाच्या गोष्टी शिकवतो स्वतः मात्र दिवसभर तंबाखू व गुटखा खात राहतो, तंबाखूच्या पिचकार्‍यांनी शाळेचा बाजूचा कोपरा रंगून गेला आहे. मग तुम्हीच सांगा बोले तैसा न चाले त्याची वंदावी पाऊले की तोडवी पाऊले कोणत बरोबर आहे.” मुलांचं हे धाडशी उत्तर ऐकून गावकरीही पुढे काहीच बोलले नाही कारण त्यांना ही वस्तुस्थिती माहीत होती. मुलं थोरांकडून उक्तीपेक्षा कृतीची जास्त अपेक्षा करतात हे गावकर्‍यानी लक्षात घेऊन त्या शिक्षकाची बदली करवून आणली आणि एका निर्व्यसनी शिक्षकाला त्याच्या जागी आणले.


comments powered by Disqus