संपादकीय (जून 2019)

संपादकीय (जून 2019)

आरंभचा पहिला त्रैमासिक अंक (जून) आपल्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. ठरल्याप्रमाणे 1 जून या तारखेला अंक काही अपरिहार्य कारणास्तव प्रकाशित होऊ शकला नसला तरी वाचकांना काही फार जास्त काळ वाट बघावी लागली नाही, यात आनंद!

आरंभ मासिकाचे त्रैमासिक करण्यामागे काही कारणे आहेत.

आरंभ टीम ही आपापला व्यवसाय नोकरी सांभाळून या मासिकासाठी काम करत असते (आणि वाचकांना आश्चर्य वाटेल की आजवर आम्ही आरंभ टीम सदस्य एखादा अपवाद वगळता एकमेकांशी प्रत्यक्ष कधीही भेटलेलो नाही) आणि दुसरे म्हणजे या अंकासाठी लिहिणारे नवोदित आणि प्रस्थापित लेखक हे सुध्दा आपापल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून कोणतेही मानधन न घेता लिखाण करायला वेळ देतात.

शेवटी मोफत मासिक तेही कोणत्याच जाहिराती न छापता नियमितपणे चालवणं म्हणजे थोडी तारेवरची कसरत आहे, नाही का?

तरीही हे सगळं आम्ही सर्वजण का करतोय?

तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून!

मराठी भाषा आणि वाचनसंस्कृती वाढावी म्हणून!

नवोदित लेखकांना संधी द्यावी म्हणून!

त्यांचे लिखाण हजारो वाचकांपर्यंत पोहोचावे म्हणून!

प्रस्थापित लेखकांचे नवनवीन विचार आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरतात म्हणून!

लिखाणातून वैचारिक बदल घडावा म्हणून!

वैचारिक बदलासोबतच थोडा विरंगुळा आणि मनोरंजन हे हेतू सुद्धा साध्य व्हावे म्हणून!

अनेक वाचकांच्या मागणीनुसार यापुढील अंकांमध्ये विनोदात्मक लिखाण सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात अंतर्भूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील! सध्या प्रत्येक अंकात व्यंगचित्रे तर असतातच!

तसेच आम्ही कलादालन सुध्दा या मासिकात खुले केलेले आहे. फक्त साहित्यिक लिखाणच नाही, तर कोणतीही कला तुमच्या अंगी असेल तर या मासिकात तुम्हाला नक्की स्थान मिळेल!

2018 च्या जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या मासिकाला पहिल्या अंकापासून वाचकांचे आणि लेखकांचे उदंड प्रेम मिळाले आणि ते उत्तरोत्तर वाढत गेले. त्यामुळे अंकाचा दर्जा आणखी वाढवत नेण्याच्या उद्देशाने आरंभ टीमने मासिका ऐवजी त्रैमासिक काढण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आरंभ मासिक आता जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या चार महिन्यांत म्हणजे वर्षातून फक्त चार वेळा प्रकाशित होईल.

म्हणजे एका वर्षात चारच अंक काढायचे पण प्रत्येक अंक हा सर्व प्रकारच्या कला आणि साहित्याचा एक दर्जेदार आणि मनात तसेच हृदयात जतन करून ठेवण्याजोगा खजिना आणि नजराणा असेल हे मात्र नक्की! जणू काही प्रत्येक त्रैमासिक अंक हा एक दिवाळी अंकच असेल! किंबहुना त्यापेक्षाही खूप काही जास्त असेल. या जून अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत.

या अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.

आरंभ मासिकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे कोणत्याही लेखाला, कथेला आम्ही शब्दमर्यादेचे बंधन घालत नाही, कारण सृजनशीलतेला बंधनात अडकवले तर ती नीट तिच्या संपूर्ण रूपात प्रसव पावू शकत नाही असे आरंभ टीमला वाटते.

जानेवारी आणि फेब्रुवारी च्या दोन्ही प्रवासवर्णन विशेषांकाप्रमाणेच या जून अंकाला सुद्धा वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल अशी आशा बाळगून मी हे संपादकीय येथे थांबवत आहे!!

टीप: अंकाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जर कुणा वाचकाला अंकासाठी स्वेच्छेने आर्थिक मदत करायची असल्यास तसेच यापुढील अंकात जाहिराती द्यायच्या असतील, तसेच अंकासाठी आरंभ टीम ला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.

निमिष सोनार,
संपादक (आरंभ)
aarambhmasik@gmail.com


comments powered by Disqus