कथा: प्रेमात पडताना (भाग 1)- सत्यजीत भारत

कथा: प्रेमात पडताना (भाग 1)- सत्यजीत भारत

सत्यजीत बी.एस्सी च्या दुसऱ्या वर्षात सोमय्या कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता. कॉलेजचा भरमसाठ खर्च पाहता घरी वारंवार पैसे मागणं त्याला पटत नव्हतं म्हणून त्याने चेंबूर मधील एका नामांकित कोचिंग क्लास मध्ये शिकविण्यास सुरुवात केली जेणेकरून पॉकेटमनीचा खर्च तरी भागेल.

सत्यजीत हा शांत स्वभावाचा. कसल्याही प्रकारचा वायफळ खर्च करने तो टाळत. सिनेमाला जाणे, पार्ट्या करणे, डिरींक्स घेणे, स्मोकिंग करने हा त्याचा स्वभाव नव्हता. मित्रांनी आग्रह केल्यास तो मित्र बदलेल पण सिद्धांत नाही.

त्याला छंद होता तो हरिनामाचा. वर्तमानपत्रा मध्ये आलेली आध्यात्मिक पोस्ट्स तो आर्वजुन कटिंग करून संग्रहित करत. दूरदर्शनवर दाखवलेली संतवाणी वहीत टीपून घेत. मराठीच्या पुस्तकातील अभंग तो नीट अभ्यासत. ईश्वराप्रति व सनातन धर्माविषयी त्याच्या मनात प्रगाढ़ श्रद्धा होती. तो एका आध्यात्मिक संघचा सदस्य होता. समविचारी मित्रांचा सहवास आनंददायकच होता त्याला. प्रत्येक आयितवारी तो सत्संगास जात.

पण जेव्हापासून सुरय्या त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून रविवारचा सत्संग बंदच झाला. आठवड्यातून तीनच दिवस त्याचे क्लासेस मध्ये लेक्चरस् असायचे पण आजकाल तो सातही दिवस क्लासेसवर या नं त्या कारणाने जात. तिच्याशी बोलण्याची संधी शोधत. त्याचं बदललेलं वागणं पाहून घरी कोणी काही विचारल्यावर त्याची चिडचिड होत. कारण होतं सुरय्या……

हो सुरय्या….. सुरय्या ही अत्यंत देखणी, मृदु भाषी, रंगाने सावळी पण स्वभावाने धवळ. तिचं शिक्षण उर्दू माध्यमातून सातवी पर्यंत झालेलं. इंग्रजीचा गंध ही तिला नव्हता. पण तरीही तिला एका नावाजलेल्या क्लासेस मध्ये काउंसलरचा (Counsellor) जॉब मिळाला होता. कारण होतं देखणं रूप आणि कमी पगारात काम करण्याची तयारी. तिच्या घरी अठराविश्व दारिद्र्य. तिचा अब्बा पक्का बेवडा. मोठा भाईजान रिकामटेकडा व उडान-टप्पू. लहान भावंडांची तर मोठी रांगच होती. तिची अम्मी ही भटक-भवानी. म्हणून घराची सर्व जबाबदारी सुरय्या वर होती.

सत्यजीत आणि सुरय्या च्या प्रेमाची कळी उमलू लागली. त्याचा गंध सगळीकडे पसरू नये याची काळजी दोघे पण घेत. पण उमललेल्या फुलांचा गंध कैद करता येत नाही. तसंच प्रेमाची वार्ता लपविता येत नाही. हो हो म्हणता म्हणता प्रेमाची खबर सुरय्या च्या घरात जाऊन पोहचली. सुरय्या वर प्रश्नांचा भडीमार झाला. तिनं हे सर्व साफ खोटं असल्याचं म्हटलं. तरी सुद्धा तिच्या अम्मीने तिला धम्मक लाडू घातले होते. मोठ्या भाईजान ने तर बकरा हलाल करायचा सुरा काढला होता. पण एवढ्या नंतर ही तिला काम सोड…. घरात बस…. असं कोणीच म्हंटलं नाही. पण जासुसांचा ससामीरा सुरू झाला.

दोघांना भेटण्याची पंचायत झाली.

दोघांची आठवड्याची ऑफ ( सुट्टी ) वेगवेगळ्या दिवशी होती. सुरय्या ची सुट्टी ज्या दिवशी असत त्या दिवशी कॉलेजेला दांडी मारून बेलापुरला भेटण्याचं सत्यजीतने ठरवले. नवी मुंबई मध्ये एवढ्या लांब कोणी कबाब में हड्डी असणार नव्हतं. पण रजेच्या दिवशी घरातून बाहेर पडण्यासाठी सुरय्याला बरीच कसरत करावी लागे. बेलापूर स्टेशन पासून सरळ चालत गेल्यावर खाडी च्या किनार्यावर सुंदर सरोवर विहार उद्यान साकारलं आहे. प्रेमी युगलांसाठी तर चांगले ठिकाण. पण काहींच्या डोळ्यात प्रेम ही खुपणारी गोष्ट. सर्व नैतिकतेचा ठेका या संस्कृती रक्षकांनी घेतलेला असावा. पोलिसात कंपलेट (तक्रार) करणं हे त्यांचे मजबूत शस्त्र. या शस्त्राचा प्रहार हा सत्यजीत आणि सुरय्यावर झाला.

एकदा दोघे उद्यानात बसले होते. अचानक उद्यानाच्या बाहेरच्या बाजूस वॅन येउन थांबली. एक प्रोढ हवालदार त्यांचं जणु सहा महिन्याचं पोट सांभाळत त्यांच्या मधोमध दत्त म्हणून उभा ठाकला.

कर्णकर्कश आवाजात त्याने दरडावयाला सुरूवात केली.

“पब्लिक प्लेस (सार्वजनिक स्थानी) मध्ये कसले चाळे चाललेत…. “

“सर आम्ही फक्त बसलोत..आणखी काही नाही.. “

सत्यजीतने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

“जास्त बोलू नकोस…. चल वॅन मध्ये बस….. “

“पण सर आम्ही काहीच चुकीचं केलं नाही….. “ सत्यजीत म्हणाला.

“मुकाट्याने गाडीत बस…. नाहीतर हा दांडका बोच्यावर पडला म्हणून समज…. “ हवालदार जोराने खडसावला.

सुरय्याची तर बोलती बंद झाली. तिच्या दोन्ही कमळनेत्रां मध्ये गंगाजमुना दाटून आल्या. सत्यजीत नाइलाजाने वॅन मध्ये चढला. वॅन मध्ये आधिच तीन-चार टाळकी याच कारणामुळे जमा होती.

वॅन मध्ये जाताच सत्यजीत वर अन्य पोलीसकर्मिन कडून सवालांची फायरिंग सुरू झाली.

“तुझं नाव काय ?

कोणत्या कॉलेज मध्ये शिकतोस ?

कौन होती ती पोरगी….??

थांब…. तिला पण आत घेतो….

कुठे राहतोस ?

बाप काय करतो…..? बापाचा नंबर दे….”

सत्यजीत पूर्ण भांबावून गेला.

बेचारा सत्यजीत केविलवाणा चेहरा करून चालत्या वॅन मध्ये स्थीर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता.

शेवटी पोलीस ते पोलीस….. त्यांच्या मुळ स्वभावावर आले.

एक हवालदार म्हणाला,

“तुला जायचं असेल तर फाइन भरावी लागेल.”

सत्यजीत ने उत्तर देण्या आधिच दुसरा म्हणाला,

“….. आठशे रूपये ची पावती फाडावी लागेल”

“पण सर माझ्या कडे इतके रूपये नाहीत…. “, असं म्हणत सत्यजीत ने वॉलेट समोर धरलं.

“आम्ही कोणाच्या पाकिटाला हात लावत नाही. …. “ असं म्हणत अन्य एका पोलीसकर्मींने

पूर्ण वॉलेट तपासलं. त्याच्या मध्ये फक्त अठ्यान्नव रूपये पन्नास पैसे होते. यामुळे तर पोलीसांचा पारा चांगलाच चढला. हाती आलेला बकरा काहीच कामाचा नव्हता.

सत्यजीतचा रडकुंडी चेहरा पाहून जमा टाळक्यां पैकी एक जण हळूच त्याच्या कानात म्हणाला, “भाई काय को रोता है, थोडी देर घुमायेंगे, खर्चा पाणी निकालकर सबको छोड देंगे…. टेन्शन नॉट…. समजा” बहुतेक तो महाशय बराच अनुभवी होता.

झालं ही तसच. बराच वेळ वॅन बेलापूर च्या परीसरात फिरली….शेवटी ज्याच्या कडून जितके निघतील तितके पैसे काढून सर्वांना वॉर्निंग देवून सोडलं. कोणाला ही पैसे घेतल्याची कसलीही पावती वा रसीद दिली नाही.

गाडी तून उतरताच ईश्वराचं आभार मानत पुन्हा इकडं यायचं नाही असं त्याने मनोमन ठरविले. भानावर येताच…..

सुरय्या कुठे असेल….? तिची हालत कशी असेल ? अशा अनेकानेक प्रश्नांचा कोलाहल त्याच्या मनात चालला होता. तिला शोधण्यासाठी त्याने संपूर्ण सरोवरविहार उद्यान परिसर, आजूबाजूचा स्टेशन एरिया पालथा घातला. बराच वेळ शोधल्यावर सुद्धा ती काही सापडली नाही.

क्रमशः . ..

उर्वरित कथा पुढील भागात….

प्रस्तुत कथा सत्य घटनेतून प्रेरीत आहे….कथे संदर्भात वाचकांनी आपला अभिप्राय लेखकास WhatsApp च्या माध्यमातून नक्की कळवावा….. WhatsApp No. 7208789104

लेखक: सत्यजीत भारत, नवीन पनवेल

मोबाईल: 7208789104

ईमेल: excelindia786@gmail.com


comments powered by Disqus