ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १

ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १

व्हिएन्ना आणि बुडापेस्ट

ऑस्ट्रियाला जाऊन देखील बरीच वर्षे झाली. मे मधे आठवडाभर सुट्टी काढून ऑस्ट्रियाला गेलो होतो. व्हिएन्नाला माझा मावसभाउ असतो. त्यामुळे संधी मिळाली की तिकडे जायचेच होते. आपलं कोणी असेल तर सगळं कसं निवांत होतं. दोन महिने आधी भावाला फोन करुन तो आहे का ते विचारुन घेतलं आणि विमानाची तिकीटे काढली.

कधी नव्हे ते जाताना ऑस्ट्रियन आणि येताना एअर फ्रान्सची तिकिटं स्वस्तात (हे महत्वाचं!) मिळाली. जरा बरं वाटलं की यावेळी सामान चेक-इन करुन नेता येइल! पण त्यानंतर आठवडाभराची आखणी भावावर सोडून दिली. ते निघण्याच्या आठवडाभर आधीपर्यंत आम्ही काही म्हणजे काहीही विचार केला नाही!

व्हिएन्ना तर बघायचं होतंच, त्याबरोबर आधी प्राग (चेक रिपब्किक) आणि बुडापेस्ट (हंगेरी) बघावं असं चाललं होतं. (म्हणजे अजुन दोन देशही झाले असते!) पण बुडापेस्टला भाऊच नेणार होता (एका दिवसात!) आणि प्राग तसं लांब पडतं. मग वाटलं ऑस्ट्रियाच नीट पाहावं. त्यामुळे साल्झबर्ग आणि इन्सब्रुक (स्वारोस्की क्रिस्टल्स् फेम) बघायचं ठरलं.

जाताना ऑस्ट्रियनच्या विमानात गरमागरम जेवण काय सही होतं, शाकाहारी पऱ्याय देखील होता. सगळ्या विमानात नसतात. स्वस्त विमानात तर काहीच (फुकट) मिळत नाही. पण परत येताना बघितलं, एअर फ्रान्स मधेपण थंड आणि (फक्त) मांसाहारी जेवण!’शाकाहारी आहे का?’ हे विचारल्यावर ती फ्रेंच (हवाई) सुंदरी ‘नाही’ म्हणाली आणि (कुणीही न सांगता) चक्क माझ्यासमोर ठेवलेलं ते थंड चिकन उचलून घेतलं! शेवटी मीच म्हणालो, ठिक आहे बाई, चिकन तर चिकन. काहीतरी खायला मिळू दे!”

तर, १ मे रात्री आम्ही व्हिएन्नाला पोचलो. दादा-वहिनी विमानतळावर न्यायला आले होते! इथुन आमचा आराम सुरू झाला. त्यांच्या गाडीतुन थेट त्यांच्या घरी, मग मस्तपैकी घरचं जेवण. नाहीतर एरवी विमानवळावरुन मेट्रो/बस ची सोय बघा. मग हॉटेलात चेक-इन करा. ते कसं असेल काय माहीत. मग आपल्याला काहीतरी खाता येइल असे एखादे हॉटेल शोधा. केवढ्या कटकटी! आणि ही तर सुरवात असते. मग सकाळी पर्यटन काऱ्यालय शोधा. हॉप ऑन बस. बऱ्याच ठिकाणांपैकी आज काय करायचं? सकाळी कुठ जायचं? आणि बरेच प्रश्ण. पण इथे दादा-वहिनीवर सगळं सोडुन आम्ही निवांत होतो.

दुसऱ्या दिवशी, ठरवल्याप्रमाणे, दादा (शनिवारी) आम्हाला व्हिएन्ना जवळची दुसऱ्या महायुद्धावेळची एक छळछावणी बघायला घेउन जाणार होता. दुसरा काहीच पऱ्याय नव्हता, कारण रविवारी आम्ही बुडापेस्टला जाणार होतो आणि बाकी आठवडाभर त्याला ऑफिस होते.

ही छळछावणी माउथ्हाउजन (Mauthausen) या गावी आहे. व्हिएन्नाहुन ऑटोबाह्न घेउन अडीच-तीन तासात तिथे पोहोचता येतं. ऑटोबाह्न म्हणजे जर्मनी-ऑस्ट्रिया मधले हमरस्ते, जिथे प्रती तास १३० कि. मी. एवढ्या वेगात गाड्या जातात. पहिल्यांदा त्या वेगाची थोडी भितीच वाटते! जर्मनी-पोलंड इथल्या मानानी ही छळछावणी तशी मोठ्ठी नाही. पण क्रौर्य सगळीकडे तेच. जवळपास लाखभर लोकांनी इथे प्राण गमावले. आत्तापर्यंत फक्त ऐकले होते. प्रत्यक्ष बघणं हा थरारक अनुभव होता.

प्रवेशद्वार :


ऑडिओ गाइड सगळं ऐकणं पण शक्य झालं नाही. पोटात कालवाकालव होऊ लागते. ते प्रवेशद्वार, बंदिवानांची बराक्स, गॅस चेंबर, मानेत गोळी घालायची जागा, रोगी बंघकांना एकाकी ठेवण्याची जागा सगळेच पाशवी.

गॅसचेंबर :


comments powered by Disqus