करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर

करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर

(लेखक प्रसिद्ध पटकथा लेखक आणि सिने समीक्षक आहेत. त्यांचे लेख महाराष्ट्र टाईम्स सारख्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात)

माझे आई बाबा दोघंही नौकरी करायचे. मी पहिली दुसरीत असेन तेंव्हा फार तर. त्यामुळे जेंव्हा मी शाळेतून वापस यायचो तेंव्हा घरी कुणीच नसल्यामुळे शेजारच्या देशपांडे काकांच्या घरीच जायचो. दुपारचं जेवण वगैरे सगळं त्यांच्याकडेच. देशपांडे काका काकूंना दोन मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव संगीता तर छोटीचं वंदना. दोघीनी त्या काळात जवळपास मला दत्तक घेतलं होत. मला खाऊ घालणं, फिरायला घेऊन जाण सगळं त्या दोघीच करायच्या. दोघीना तारुण्यसुलभ कारणांमुळे सिनेमाचे स्वाभाविक आकर्षण फार. आणि आमच्याकडे मराठी सिनेमे क्वचित लागायचे. हिंदी सिनेमेच जास्त लागायचे. माझ्या लिखाणात हिंदी सिनेमे वारंवार येतात त्याचं कारण हे.

त्यावेळेस जुनमध्येच पाऊस यायचा आणि अखंड बरसायचा. चार चार दिवस झड लागायची. तर अशाच एका पावसाळी दिवशी मी असाच शाळेतून आलो तर संगीता आणि वंदनाने मला पटापट जेवू घातलं. गंध पावडर (संध्याकाळच्या फ्रेश होण्याला आमच्याकडचा शब्द ) करून दोघीही मला घेऊन तलरेजा टाकीला घेऊन गेल्या. बाहेर पावसाची झड चालू होतीच. पण एकदा थेट्रातले दिवे मालवले आणि बाहेरच्या पावसाचे आवाज ऐकू येणं पण बंद झालं. पडद्यावर मोठ्या अक्षरात नाव झळकलं (हिंदी, इंग्रजी आणि उर्दू ) मध्ये’ प्रेमकैदी’ . मला फारस सिनेमातलं कळत नव्हतं. पण संगीता आणि वंदना एकटक अनिमिष नजरेनं सिनेमा बघत होत्या. त्या गच्च काळोखात पण अक्की आणि तायडीचे विस्फारलेले डोळे मला दिसत होते. त्या तीन तासात त्या दोघींसाठी हरीश हा करिश्मापेक्षा पण जास्त बायल्या असणाऱ्या हिरो हा जगातला सर्वात देखणा पुरुष होता. तर करिश्मामध्ये त्या स्वतःला बघत असतील.

मला त्यावेळेस करिश्मापेक्षा मध्यंतरात मिळणाऱ्या फल्लीचं आकर्षण जास्त होत. तर प्रेमकैदी पहिल्यांदा बघितल्यावर मला लक्षात राहिली ते’ मेहेंदी रे’ म्हणत हात नाचवणारी करिश्मा आणि’ तेरे इन ओठो पे क ख ग घ लिखूनगा’ हे गाणं. करिश्माशी झालेली ही पहिली एकतर्फी ओळख. नंतर ‘ अनाडी’ , गोविंदासोबतचे डझनभर सिनेमे, ‘ राजा हिंदुस्थानी’ (काही विशिष्ट कारणांमुळे ) आणि कित्येक सिनेमात ही ओळख घट्ट होत गेली. अर्थातच एकतर्फीच. करिश्मा ज्या काळात बॉलिवूडमध्ये कार्यरत होती, तो काळ एकूणच स्त्री अभिनेत्यांसाठी आदर्श नव्हता. बहुतेक सिनेमांमध्ये हिरोईन शो पीस पुरती वापरली जायची. हिरोसोबत गाणे गायचे, छान छान दिसायचं आणि एखाद दुसऱ्या प्रसंगात अश्रू ढाळायचे एवढाच मऱ्यादित रोल अभिनेत्रीला असायचा. आणि करिश्मा पण काही महान अभिनेत्री वगैरे नव्हती. लेट्स फेस द ट्रुथ! करिश्माच्या बहुतेक भूमिकांचा एक ठरलेला साचा होता. ती बहुतेक सिनेमांमध्ये श्रीमंत बापाची बिगडी हुई औलाद असायची. जिला आपल्या संपत्तीचा घमंड असायचा. ती एक तर विदेशात शिकून आलेली असायची किंवा महागड्या गाड्या वेगात फिरवत असायची. केसांना मोहक झटके देत आणि इंग्रजी शब्दांचा भडीमार करत जीवावर आल्यासारखे हिंदी संवाद बोलायची. ‘ व्हॉट नॉन्सेन्स’ किंवा ‘ शट अप’ ही वाक्य बहुतेक नायकाला उद्देशून ती सतत म्हणत असायची. मग गरीब घरातून आलेला नायक तिला येनकेनप्रकारेण ताळ्यावर आणायचा. मग करिश्मा त्या नायकाच्या प्रेमात पडायची.

करिष्माच्या कारकिर्दीतल्या साठ टक्के भुमीकांचा हा गाळीव अर्क आहे. पण हे सगळं छोट्या शहरातून आलेल्या किंवा खालच्या आर्थिक स्तरातून आलेल्या पुरुषाला प्रचंड सुखावणार होत. अप्राप्य सौंदर्य आपल्याला पण मिळू शकत असा मनाच्या कोपऱ्यात आत्मविश्वास निर्माण करणार. मी वर म्हणल्याप्रमाणे पुरुष प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच अशा चित्रपटांची निर्मिती होत असल्यामुळे नायिकेला यामध्ये असं दुय्यम स्थान मिळायचं. करिश्माची कर्तबगारी ही की ह्या विशिष्ट’ टेम्प्लेट’ मधले रोल तिने मोठ्या टेचात केले. तिने अभिनयाचा प्रयत्न केला नाहीच असं नाही. एका टप्प्यात तिने’ फिझा’ , ‘ झुबेदा’ असे अर्थपूर्ण सिनेमे पण केले. अभिनय पण बरा केलाच. पण करिश्माची ओळख माझ्यासारख्या अनेकांसाठी मासेसची हिरोइन अशीच आहे. आज संगीता माजलगावला असते म्हणे. तिचं वैयक्तिक आयुष्य काही फारस आनंदाचं नाही असं आईकडून कळत. वंदनाला म्हणजे पक्षाघात झालाय आणि अर्ध शरीर कामातून गेलंय. मी पुण्यात आहे आणि काही फार तीर मारत नाहीये. आमच्या तीन टोकांना जोडणारा एक धागा म्हणजे करिश्मा कपूर. द करिश्मा कपूर. करिश्माला आयुष्यात कधी भेटलो तर तिच्यासोबत फोटो काढेन आणि त्या दोघींचा पत्ता शोधून त्यांना पोस्टाने पाठवून दिल हे नक्की. आज पुन्हा पावसाळी दिवस आहे आणि करिश्माचे गाणे ऐकण्याचा माहोल तयार झाला आहे. आज बड्डे आहे. हॅपी बड्डे द करिश्मा कपूर.

लेखाचा दिनांक 25 जून 2019


comments powered by Disqus