मुलाखत: राजेश बाळापुरे

मुलाखत: राजेश बाळापुरे

(सोलर पावर जनरेशन प्रोजेक्ट) - निमिष सोनार

(सोलर पावर जनरेशन प्रोजेक्टबद्दल राजेश बाळापुरे यांची हि मुलाखत निमिष सोनार यांनी घेतली असून राजेश यांना 9823531615 या नंबर वर अधिक माहितीसाठी कॉल करू शकता)

चिंचवड येथील एका स्नेह्याकडे एका कार्यक्रमानिमित्त नुकताच जाऊन आलो. त्यांचे नाव राजेश बाळापुरे. त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या गच्चीवर एक प्रोजेक्ट उभारला आहे. सोलर एनर्जी पावर जनरेशन प्रोजेक्ट म्हणजे सौर उर्जा वीज निर्मिती प्रकल्प. ते बघून मी खूप आश्चर्यचकित झालो.

असं काहीतरी उपयुक्ततापूर्ण आणि विधायक आपल्या आसपास वापरलं जातंय आणि मला याची कल्पनासुद्धा नाही? आणि विशेष म्हणजे त्यांनी हा प्रोजेक्ट उभारण्यासाठी आधी चार वर्षे अथक संशोधन केले आणि मग हा प्रोजेक्ट उभारला. त्यांनी उभारलेला प्रोजेक्ट सर्वात जास्त खर्चिक आहे. चार लाख रुपये त्यांना खर्च आला.

मग मी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली आणि त्यातून जे ज्ञान मिळाले ते मी येथे आपल्यासोबत जसेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

राजेश: हे सगळे सोलर पॅनेल वरच्या बाजूला एलिव्हेटेड आहेत. खांबांवर उभारले आहेत. यातून घरासाठी वीज मिळते.

मी: म्हणजे फक्त घरातले लाईट्स लावता येत असतील नाही का?

राजेश: फक्त लाईट्स नाही, घरातलं सगळं काही जे इलेक्ट्रिकवर चालू शकतं ते सर्व यातून चालतं. अगदी पंखे, कुलर, इस्त्री, फ्रिज सगळं! आणि सर्वकाही अगदी फ्री!

मी: काय? फ्री? कसे काय? अगदी २३० व्होल्टेज मिळतं?

(मी जरी बी. ई. इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शिकलेलो असलो आणि आता तुलनेने थोड्या वेगळ्या क्षेत्रात म्हणजे टेलिकॉम डोमेन मध्येच पण सॉफ्टवेअर क्वालिटी आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये काम करत असतो तरीही मला इंजिनीयरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हील असे सगळे विषय होते. त्यामुळे त्या विषयांचे मला थोडे थोडे का होईना नॉलेज आहे म्हणून मी त्यांना अनेक प्रश्न विचारू शकलो)

राजेश (हसून): होय. २३० व्होल्ट, अगदी वीज मंडळाकडून आपण जशी वीज मिळवतो ना अगदी तशीच वीज या प्रोजेक्ट मधून मिळते. फरक काहीही नाही. किंबहुना त्यांच्याच कनेक्शनमधून आपल्याला वीज मिळते. आणि फ्री कसं ते सांगतो. ते असं असतं की हा सर्व प्रोजेक्ट उभारण्यासाठी आधी वीजनिर्मिती मंडळाची परवानगी घ्यावी लागते.

मी: पण का? आपण फक्त आपल्या पर्सनल वापरासाठी हे उभारतोय मग त्यांची परवानगी का?

राजेश: सांगतो. या प्लांटची वीज इतकी तयार होते की ती वापरून उरते. मग एक्स्ट्राची वीज आपण महामंडळाला वापरायला देतो. त्यासाठी त्यांचे एक वेगळे मीटर बसवलेले असते, त्याला नेट मिटरिंग म्हणतात. त्यात इम्पोर्ट एक्स्पोर्ट चे युनिट मोजले जातात. मग रात्री सूर्य नसतो तेव्हा मग वीज मंडळाकडून आपल्याला वापरायला वीज मिळते. ती आपलीच असते. आपण त्यांना वापरायला दिलेली. शक्यतो आपल्याला पैसे भरावे लागत नाहीत. बिल शून्य येते. पावसाळ्यात वगैरे पण आपल्याला त्यांचेकडून फ्री वीज वापरायला मिळते कारण आपल्याकडे तयार झालेली जास्तीची वीज आपण त्यांना देत असतो तीच ती पावसाळ्यात आपल्याला देतात.

मी: अरे वा. ही तर कमाल झाली.

राजेश: आणखी कमाल तर पुढे आहे. ऐका जरा. आता हे बघा, मी हे जे पाणी गरम करण्यासाठी मोठ मोठे रॉड लावलेत (सोलर वॉटर हिटिंग प्लांट) ते आता हळूहळू कालबाह्य होतील. कारण ते खूप जागा व्यापतात. आणि मला एक सांगा फक्त पाणी गरम करण्यासाठी सोलरचा प्रोजेक्ट लावण्यात अर्थच काय जेव्हा तुमच्याकडे संपूर्ण घरासाठी फ्री वीज मिळते. त्यातूनच गिझर, रॉड आणि इतर नेहमीचे उपकरण वापरून तुम्ही पाणी गरम करा ना! फक्त पाणी गरम करण्यासाठी वेगळे सोलर लावण्याची गरजच संपली आता.

मी विचारात पडलो आणि म्हणालो, “अरे हो! खरंच की! ही विचार मी केलाच नाही!”

मी पुढे विचारले: मी हिंजेवडीत फेज थ्री मध्ये नव्याने उभारलेल्या एका कंपनीचे स्वत:चे पावर जनरेशन प्लांट पहिले आहे. तेव्हा त्या कंपनीपर्यंत महामंडळाची वीज पोहोचली नव्हती. त्यात ते डीझेलचा वापर करत होते. त्यासाठी भरपूर जागा व्यापली होती. आणि पावर जनरेशन म्हटलं म्हणजे इंधन म्हणजे डीझेल किंवा मग पाण्याची वाफ असे लागणारच मग ट्रान्सफॉर्मर्स पाहिजे. पण या तुमच्या प्रोजेक्टमध्ये तर तसे काहीच दिसत नाही आहे, मग मला एक सांगा यातून जी वीज तयार होते ती एसी की डीसी?

राजेश हसून म्हणाले: सगळी वीज डीसी तयार होते. पण सगळीकडे इन्व्हर्टर आहेत. आधी डीसी तयार होते मग एसी मध्ये रुपांतर. काम सोप्पं झालं.

मला एकाहून एक सुखद आश्चऱ्याचे धक्के बसत होते. नवीन नवीन नॉलेज मिळत होतं.

पुढे राजेश यांनी सांगितलं: हे सोलर पॅनल उभारताना आजूबाजूच्या बिल्डिंग, झाडे वगैचचा अंधार तसेच सूऱ्याचे उत्तरायण दक्षिणायन वगैरेचा विचार करून त्यानुसार वर्षभर जास्तीत जास्त काळ जास्तीत जास्त ऊन त्या पॅनल वर कसे पडेल याचा अंदाज घ्यावा लागतो आणि मग त्यानुसार पॅनल उभारावे लागतात. तुमच्या सोसायटीत पण तुम्ही याचा वापर करू शकता.

मी: पण आमच्या सोसयटीत तीन पावरफुल बोअरवेल मोटर्स आहेत पाणी खेचण्यासाठी आणि वर टाकीत पोचवण्यासाठी. त्यांना थ्री फेज सप्लाय लागतो, तो कुठून आणायचा?

राजेश: अगदी योग्य प्रश्न विचारलाय. हे बघा, या पॅनेलचे तीन वेगवेगळे भाग केलेत. त्या प्रत्येक भागातून तीन वेगवेगळे फेज तयार होत आहेत. ह्या तिन्ही फेजमधली ज्यादाची वीज ही वीजनिर्मिती महामंडळाला जाते आणि हेच तिन्ही फेज मोटरला लावले की झाला तुमचा हवा असलेला थ्री फेज सप्लाय!

मी: धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीबद्दल. एकदाच पैशांची गुंतवणूक केली की आयुष्यभर फुकट वीज मिळते. आणि याचा मेंटेनन्स चा खर्च?

राजेश: जास्त खर्च येत नाही. तुम्हाला मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेत हा मेंटेनन्स चा खर्च नगण्य असा आहे.

मी त्यांना निरोप दिला आणि मनात एक नवीन ज्ञानभांडार घेऊन बाहेर पडलो.


comments powered by Disqus