आयुर्वेद: जीवन जगण्याचे शास्त्र - डॉ.केतन हरिभाऊ दांगट

आयुर्वेद: जीवन जगण्याचे शास्त्र - डॉ.केतन हरिभाऊ दांगट

9422358617/9975427432

निरोगी व दीर्घायुषी जगण्याचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

आयुष्यासाठी हितकर ,अहितकर,सुखकर, दुःखकर तसेच पथ्य कारक व अपथ्याकारक गोष्टींचा विचार करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हा अथर्ववेदाचे उपांग असून तज्ञ अशा मुनिवरांकडून उत्तरोत्तर विकसित झाला आहे. कोणतेही आधुनिक साधने उपलब्ध नसताना हजारो वर्षे निसर्ग आणि मानवी शरीराचे सखोल निरीक्षण करून लिहून ठेवलेले आरोग्याचे नियम व औषधी यांचे दिसून येणारे सुपरीणाम पाहून आपण अचंबित होतो.

त्रिदोष:

वात ,पित्त ,कफ हे तीन दोष शरीर व मनाचे नियंत्रण करतात ,असे आयुर्वेद शास्त्र सांगते .शरीराची वाढ करणारा कफ, आहाराचे शरीर भावात रूपांतर करणारे पित्त, संचलन करणारा वात असे तीन दोष. शरीराच्या सर्व क्रिया व रचना या तीन दोषांच्या अधीन आहेत. या त्रिदोषची उत्पत्ती ,पृथ्वी ,जल ,तेज ,वायू ,आकाश या पंचमहाभूतांपासून होते. दोष समतोल अवस्थेत असल्यास शरीराचे क्रियाव्यापार सुरू राहून शरीर निरोगी राहते, पण हाच समतोल बिघडला तर विविध व्याधी उत्पन्न होतात.

निदान:

व्याधीचे निदान हे पूर्वरुप, रूप,लक्षण यावरून त त्रिविध परीक्षा ( दर्शन , स्पर्शन, प्रश्न) तसेच प्रकृती, नाडी ,मल, मुत्र, जिव्हा ,सार, सत्व, सात्म्य या परिक्षांद्वारे केले जाते.

चिकित्सा:

ज्या उपक्रमांच्या साहाय्याने त्रिदोष, सात धातू व तीन मल यांचे समतोल प्रमाण राखले जाते त्यास चिकित्सा असे म्हणतात. दोन प्रकार - १. शमन चिकित्सा २. शोधन चिकित्सा ( पंचकर्म )
शमन चिकिस्तेत वनस्पती औषधी व रसौषधीचा आंतर्भाव होतो. चूर्ण, वटी, गुटी, काढा, आसव, अरिष्ट, भस्म, स्वरस, अवलेह, लेप, सिद्ध तेल, तूप यांचा व्याधिनुसार वापर केला जातो.

रोग निर्माणकारी दोषांना शरीराच्या बाहेर काढून टाकणाऱ्या सर्व उपक्रमांना शोधन असे म्हणतात. प्रमुख पाच उपक्रम असल्याने यांना पंचकर्म असे म्हणतात.

पंचकर्म चिकित्सा:

पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी साठी करावयाचे उपक्रम.वमन-उलटी करविणे, विरेचन-जुलाब करविणे, बस्ती - औषधी तेल व काढा गुदद्वार द्वारे शरीरात सोडणे , नस्य- नाकात औषध टाकणं, रक्तमोक्षण- अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढणे. पंचकर्मामुळे व्याधी समूळ नष्ट होतात. तसेच रोग निर्माण होऊ नयेत आणि रोगप्रतिकरकशक्ती वाढवण्यासाठी पंच-कर्म उपयुक्त आहेत. म्हणजेच स्वस्थ व्यक्तींमध्ये स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि रुग्णांमध्ये आजार दूर करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरते.

डॉ.केतन हरिभाऊ दांगट
एम.डी. आयुर्वेद
महेश्वर क्लिनिक,
तुकाई टेकडी चौक,
हडपसर,
पुणे -४११०२८


comments powered by Disqus