वाटचाल... नव्या साहित्यक्षेत्राची...

वाटचाल... नव्या साहित्यक्षेत्राची...

Bookstruck ची सुरुवात २०१२ मध्ये झाली. स्मार्टफोन भारतांत लोकप्रिय होत होते आणि अगदी सामान्य माणसाकडे सुद्धा आता स्मार्टफोन दिसत होता. ह्याचे कोणते दूरगामी परिणाम भारतीय लोकांवर होतील ह्यावर चर्चा सुरु होती. माझ्या मते इंटरनेट एकदा माणसाच्या हातांत आला कि त्या माणसाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या कक्षा ह्यांचा विस्तार होतो. अचानक आपण फक्त आपला गांव, राज्य, देश ह्यांचा नागरिक नसून संपूर्ण जगाचा आणि मानवी सभ्यतेचा भाग आहोत अशी एक जाणीव मनाला होऊ लागते. कूपमंडूक आता गरुड बनून आकाशांत घिरट्या घालू लागतो आणि जग किती मोठे आहे हे समजू लागतो.

अश्या सामान्य भारतीय माणसाला जागतिक साहित्याची त्याच्या आपल्या भाषेंत ओळख घडविणे हा उद्देश ठेवून मी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली. भारतीय साहित्यांत आधुनिक कलाप्रकारांची वानवा आहे. विज्ञान कथा, रम्य काल्पनिक कथा, भयकथा इत्यादी कलाप्रकार भारतीय साहित्यांतून लुप्त होत आहेत आणि जर आम्ही भारतीय भाषांत उकृष्ट साहित्याची निर्मिती केली नाही तर भारतीय वाचक जगाच्या तुलनेत मागासलेले राहतील किंवा इंग्रजी सारखी भाषा भारतीय भाषांना मारक ठरेल.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आम्ही नवोदित लेखकांना नवीन प्रकारचे साहित्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली तर ? आणि हे साहित्य विनामूल्य आम्ही लक्षावधी वाचकांना पोचवले तर ? आज आम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक आहे. Bookstruck ची वाचक संख्या आज ३० लाख पेक्षा जास्त आहे. ५००० पेक्षा जास्त पुस्तके आमच्या संकेत स्थळावर आहेत आणि सुमारे १०० पेक्षा जास्त नवोदित लेखकांनी आमच्या साठी लेखन केले आहे. हजारो नवीन वाचक आमची अँप्स दररोज इन्स्टॉल करतात.

कुठल्याही लेखकाचे साहित्य आम्ही विनामूल्य प्रकाशित करतो आणि वाचकांकडे पोचविण्याची जबाबदारी सुद्धा घेतो. त्यामुळे आपले साहित्य कोणी वाचेल का? अशी भीती कुठल्याही लेखक लेखिकेला ठेवण्याची गरज नाही. आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी आपण ते authors@bookstruck.app ला पाठवू शकता. कुठल्याही भारतीय भाषेंतील कुठलाही साहित्यप्रकार आपण आम्हाला पाठवू शकता.

मी अतिशय खात्रीपूर्वक सांगू शकतो कि भारतीय भाषांतून हॅरी पॉटर किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्स च्या तोडीची पुस्तके लिहिण्याची ताकद असलेले अनेक नवोदित लेखक आमच्या देशांत आहेत. गरज आहे फक्त त्यांना शोधून प्रेरणा द्यायची. काही वर्षांत आम्ही अशी ब्लॉकबस्टर पुस्तके लिहिणारे लेखक आम्ही शोधून काढू. हे लेखक किंवा लेखिका, खादी आणि विस्कटलेले केस घेऊन फिरणारे आपले नेहमीचे साहित्यिक नसून जीन्स आणि टीशर्ट घालणारे आणि दुचाकीवरून कुठल्यातरी पांढरपेशा व्यवसायांत काम करणारे तरुण असतील. भविष्यांत साहित्य संमेलने सरकारी वरदहस्ताने होणार नाहीत तर झूम किंवा गूगल मिट्स वर होतील. ह्यांत Bookstruck चा खारीचा वाटा राहिला तर मी हा प्रकल्प सिद्ध झाला असे समजेन.

अक्षर प्रभू देसाई
सह-संस्थापक, Bookstruck

comments powered by Disqus