राशन –शासन

राशन –शासन

- चंद्रकांत पंडित

सध्या संपूर्ण जगात ‘ कोरोना विषाणू ‘ ने उच्छाद मांडला आहे. आपल्याकडे चीन, अमेरिका, इटली या देशांसारखा ‘कोरोना कहर’ जरी नसला तरी काळजी म्हणून सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्या असून त्यादृष्टीने अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लोकांनी बाहेर न जाता घरात थांबणे हा अतिशय उत्तम उपाय असून त्याकरिता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. संपूर्ण व्यवहार बंद, ऑफीसेस बंद, वाहतूक व्यवस्था बंद. सर्वांनी फक्त घरातच थांबयचं. पण ज्यांच पोट हातावर आहे अशा कुटुंबांचे मात्र या काळात खूप हाल होतात. भारताने इतर बाबतीत बरीच प्रगती केलेली असली तरी अजूनही भारतात गरीब व दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. या अशा अवघड काळात कोणीही उपाशी राहू नये, निदान प्रत्येकाला जेवण मिळावे म्हणून सरकारने तात्काळ रेशन दुकानातून अल्पदराने पुरेसे धान्य या गरीब जनतेला मिळण्याची व्यवस्था केली. हा खरोखरच एक अतिशय उत्तम उपक्रम असून कोणीही उपाशी रहाणार नाही याची काळजी व दक्षता सरकार घेत आहे. सध्या भारतात अन्नधान्य उत्पादन व्यवस्थित व पुरेसे आहे. परंतु या गरीब जनतेला या काळात रोजगार नाही, हातात पैसा नाही अशा परिस्थितीत अत्यल्प दराने रेशनद्वारे धान्याचे वाटप करणे योग्यच. याबाबतीत सरकारला कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहे.

रेशन दुकानांद्वारे स्वस्त दराने धान्यविक्री योजना नेहमी करीता असली तरी, अन्नधान्याची सुबत्ता असल्याने इतर वेळी फारसं कुणी या दुकानात जात नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की गरीब जनतेला या शिवाय काही पर्याय नाही. याबाबतीत जरा भूतकाळात डोकावले तर आपल्याला दिसेल की, एक काळ असा होता की या रेशन दुकानाला भेट देणा-या कुटुंबांची संख्या बरीच मोठी होती. सध्याच्या परिस्थितीमुळे आठवतात ते दिवस जेव्हा अन्नधान्यासाठी रेशनच्या दुकानात लाईन लावून धान्य आणावे लागायचं. रेशनच्या दुकानात धान्य, साखर इत्यादी आले असे समजले की हातातील सर्व कामं बाजुला ठेवून आधी रेशन मिळवणे. आपल्या पिढीला तर रेशन हा प्रकार चांगला माहित आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रेशन दुकान समोर लाईनीत उभे राहून धान्य आणले असेल. त्यावेळेचे रेशन कार्ड म्हणजे पाच-सहा पानांची निळे कव्हर असलेली “शिधा पुस्तिका”. प्रत्येक कुटुंबात आवश्यक असलेले हे रेशन कार्ड म्हणजे फार महत्त्वाचा दस्तावेज. रहिवासी असल्याचा सरकारने दिलेला पुरावा जणू. बॅन्केत खाते उघडण्यासाठी उपयोगी असणारा दस्तावेज. याशिवाय दर महिन्याला अल्पदराने धान्य, साखर मिळे. त्यावेळी रेशनचे दुकानात गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी असे धान्य मिळायचे. साखर ही मिळायची. सणावाराला बहुधा दिवाळीसाठी तेल व दाळी ही मिळायच्या. रेशनच्या साखरेमुळेच कित्येक कुटूंबांची दिवाळी गोड व्हायची हे सत्य होते. येथे मिळणाऱ्या मालाचा दर्जा हा विषय वादाचा असला तरी ही योजना गरीब जनतेला वरदान ठरत होती. त्यामूळे निदान त्यांचे पोटात दोन घास तरी जात होते. रेशन दुकानात मिळणारी साखर तर प्रत्येक कुटुंब आणायचा व ज्यांना अन्नधान्याची गरज आहे अशा शेजारचे कुटूंबाला मोठ्या उदार मनाने रेशन कार्ड दिले जायचे. या देवाणघेवाणीतून एकमेकांचे आपूलकीचे संबंध जोपासले जायचे.

या रेशन दुकानात मिळणारी लाल ज्वारी ( मिलो) माझ्या विशेष लक्षात राहीली. नागलीच्या रंगाची ज्वारी फक्त या दुकानातून बघायला मिळाली. रंगाने लाल आणि अतिशय निकृष्ठ दर्जा असलेलं हे धान्य भाकरी करून त्यावेळी पोट भरायला उपयोगी पडायचं. “खायला कोंडा आणि निजेला धोंडा”या आपल्या म्हणीप्रमाणे लाल ज्वारीची भाकरी ही छान पोट भरायची. सन 1965 चे युद्धाचे नंतर या प्रकारची ज्वारी मी रेशन दुकानातून आणल्याचं मला स्पष्ट आठवते. त्या बाबतीत माझी एक आठवण येथे सांगावीशी वाटते. 1966 मधे मी सहावीला होतो. मराठी शाळा नंबर दोन. माझे वडिल त्याच शाळेत मुख्याध्यापक होते. त्यादिवशी सकाळी 11 वाजता त्यांनी रेशन दुकानातून धान्य आणण्यासाठी मला पाठवले. ते रेशनदुकान चारफाट्यावर शेतकरी संघांचे आवारात होते. मी तेथे पोहोचलो. गर्दी होती. थोड्या वेळाने माझा नंबर लागला. सात किलो लाल ज्वारी मिळाली होती. घरापासून जरासे लांब अंतर व ओझे यामुळे मला घरी यायला उशिर झाला. घरी आलो. झटपट दोन घास खाल्ले आणि शाळेचं दप्तर घेऊन शाळेत पोहोचलो. शाळेत पोहोचायला मला उशीर झाला होता. शाळेची प्रार्थना सुरू झाली होती. उशिरा येणाऱ्या मुलांना एका बाजूला उभे केले होते. मला ही शाळेत येण्यासाठी उशीर झाला होता. मला ही तेथे उशीरा आलेल्या मुलांबरोबर उभे रहावे लागले. प्रार्थना संपली. आमची रांग सोडून सर्व मुलं आपापल्या वर्गात गेली. वर्गात जाण्यासाठी आमची चुळबुळ सुरू होती. पण गुरूजींची परवानगी असले शिवाय आम्ही जागेवरून हलू शकत नव्हतो. आम्ही शाळेत उशीरा आलो होतो म्हणजे शिक्षा तर होणारच! मुख्याध्यापक हातात छडी घेवून आले. प्रत्येकाचे हातावर उशीरा येण्याची शिक्षा म्हणून एक एक छडीचा फटका देत होते. त्यावेळी ‘ छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम् ‘ चा काळ होता. मी समोर आलो. माझ्याही हातावर सणसणीत छडी बसली. जीव कळवळला. त्यापेक्षा माझी चुकी नसताना शिक्षा मिळाली याचे वाईट वाटत होत. त्यांनीच मला रेशन आणायला पाठवले होते. शाळेत यायला उशीर झाला होता म्हणून त्यांनीच शिक्षा दिली होती. संध्याकाळी घरी आलो. शाळेत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी केलेल्या शिक्षेबद्दल आईसमोर कुरकुरलो. मला वाटतं होतं की आई माझी बाजू घेईल. पण उलट ती मला म्हणाली, “तुला शाळेत जायला उशीर झाला तर शिक्षा होणारच”. मग मात्र मला तक्रार कुणाकडे करू हा प्रश्न राहीला नाही. अजून कित्येक वर्ष उलटली तरी मला रेशनचे दुकान, दुकानातून आणलेली लाल ज्वारी आणि शाळेत उशिरा गेल्याबदल त्याच शाळेचे मुख्याध्यापक असलेल्या माझ्या वडिलांनी शिक्षा म्हणून दिलेली सणसणीत छडी आठवते. आज काळ बदलला. शाळेत छडीसारखी शिक्षा करणे तर दूरच, पण कोणा शिक्षकाने अशी शिक्षा केली तर पालक त्याचे विरूद्ध तक्रार करतात. कालाय तस्मै नम:.

त्याच दरम्यान रेशनचे दुकानात लाल रंगाचा बारीक गहू येऊ लागला होता. हा गहू अमेरिकेतून येत होता. या गव्हात एक हिरव्या रंगाचे बी मिसळलेले होते. ते कॉंग्रेस गवताचे बी होते आणि त्यामुळे आपल्याकडे कॉंग्रेस गवत मोठ्या प्रमाणात उगवू लागले असं म्हणतात. खरं खोटं माहित नाही!. सन 1965 भारतात हरीतक्रांतीचे वारे वाहू लागले. शेती व्यवसायात प्रगती होत गेली. शेतीचे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला होता, नविन सुधारीत बियाणे शोधले गेले. या सर्वांचा परिणाम म्हणून आपण अन्नधान्याचे बाबतीत स्वयंपूर्ण झालो. त्यामुळेच आयुष्यात परदेशातून आयात केलेली लाल ज्वारी किंवा लाल गहू परत रेशन दुकानात दिसला नाही..

परवा, टीव्हीवर एक बातमी होती. सध्याच्या या अडचणीचे काळातही एक रेशन दुकानदार ग्राहकांना कमी धान्य देत होता. हे असे अनेक प्रकार घडत आहेत. गरीब जनता आधीच या परिस्थितीत होरपळत आहे आणि या महाभागांना स्वार्थ दिसतो. कमी धान्य देणे, जास्त पैसे घेणे, माल उपलब्ध असताना माल नाही असे सांगणे. असे प्रकार सर्रास सुरू असतात.

याबाबतीत मला आलेला अनुभव फार बोलका आहे. सन 1980-81 साली रॉकेल सुध्दा रेशनवर मिळायचे. गावातल्या काही किराणा दुकानदारांकडे रॉकेल विक्रीचा परवाना असायचा. त्यांचेकडे रॉकेल ठराविक वेळी मिळायचे. मी बॅंकेत नोकरीला लागून एक-दोन वर्ष ही झालेली नव्हती. त्यावेळी आमचे घरी एलपीजी गॅस आलेला नव्हता. आम्ही रॉकेलचे स्टोव्ह वापरायचो. दसऱ्याचा दिवस होता. माझी आई स्वयंपाक करत होती. निम्मा स्वयंपाक होत आला होता तेवढ्यात स्टोव्ह मधले रॉकेल संपले. घरात रॉकेल शिल्लक नव्हते. मी रॉकेल घेण्यासाठी एका दुकानात गेलो. त्याचे दुकानाचे बाहेर रॉकेल भरलेल्या चार-पाच टाक्या होत्या. मी त्याच्याकडे पाच लिटर रॉकेल विकत मागीतले. शांतपणे सर्व परिस्थिती सांगितली. “सण आहे, घरात थेंबभर रॉकेल नाही. निदान आतापुरते तरी रॉकेल द्या”. असे सर्व सांगूनही त्याने मला रॉकेल दिले नाही.

रॉकेल शिल्लक नाही असे तो म्हणत होता. आदल्या दिवशी सायंकाळी मी त्या रस्त्याने येत असताना रॉकेलचा ट्रॅन्कर त्याचेकडील मोठ्या टाक्या भरत असलेल्या मी पाहिल्या होत्या. त्याच्याकडे रॉकेल आहे हे मला माहित होते. वारंवार विनंती करूनही तो मला रॉकेल देत नव्हता. मग मात्र माझा तोल ढळला. मी जोरात कॅन आपटली आणि जोरजोरात भांडू लागलो. अक्षरशः माझा खूप संताप झाला होता. त्या परिस्थितीत मी काही काही बोलून गेलो, अगदी तुझे दुकानाची लंका करेल असं काही बोललो, तेव्हा मात्र तो दुकानदार घाबरला आणि मला दोन लिटर रॉकेल दिले. आजही वाटते की त्या दुकानदाराने तसे वागायला नको होते.

सध्या अशा अनेक घटना घडत आहेत. दुकानदारांनीही थोडा परीस्थितीचा विचार करायला हवा. प्रत्येक वेळी स्वार्थी व्हायला नको. अरे तुमचे हातात वितरण व्यवस्था आहे तर तिचा गैरवापर करू नका. आज जगासमोर भयानक संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य संस्था, डाॅक्टर्स-नर्सेस स्वःताच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम घेत आहेत. पोलिस फोर्स दिवसरात्र रस्त्यावर उतरून जनतेला यापासून दूर राहण्याचं आवाहन करत आहेत. स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत. बँक कर्मचारी परिणामांची तमा न बाळगता गर्दीला तोंड देत आहेत. शेतकऱ्याची परिस्थिती तर फार वाईट आहे. कष्ट करून पिकवलेले विकता येत नाही. मग अशा परिस्थितीत धान्य वितरण व्यवस्था असलेल्या रेशन दुकानदारांनी माणुसकी विसरू नये. प्रामाणिकपणे धान्य वितरित करावे. भुकेल्या गरीब जनतेला सहकार्य करावे व आपल्या देशाच्या नेत्यांनी केलेल्या आव्हानाला साथ देवून कोरोनाच्या भयानक संकटातून बाहेर पडण्यास सहाय्य करावे…

comments powered by Disqus