लॉकडाउन आणि तुमचे 'स्व'त्व

लॉकडाउन आणि तुमचे 'स्व'त्व

- सुशिल संगिता प्रकाश

‘जान हैं तो जहान हैं’ अशी एक प्रचलित म्हण आहे.कोरोना साथीने ही म्हण व तिचा या परिस्थितीतला संदर्भ सर्वांना जवळून अनुभवायला लावला. कधीकाळी आयुष्याच्या शर्यतीत एकमेकांना मागे टाकण्याच्या चढाओढीत लागलेल्या सर्व मंडळीना आज मी जेव्हा हातावर मागून पुढून, हाताचा मळ निघेपर्यंत चार-चार वेळा सॅनिटायझर चोळतांना, तोंडाला मास्क-कापड-फडकं जे मिळेल ते बांधतांना व घराघरात भीतीने दडून बसताना पाहतो तेव्हा मला अनेक प्रश्न पडतात.

काय करत होतो आपण ? या कोणत्या शर्यती माणसाने स्वतःच स्वतावर लादून घेतल्या आहेत ? ज्यातून खरंतर आयुष्याच्या शेवटी हातात थकवा, हतबलता आणि पश्चाताप याशिवाय काहीच उरत नाहीये. मोजक्या गरजा घेऊन जन्माला आलेला आदिमानव हा निएन्डर्थल व नंतर होमो सेपियन होता होता इतका उत्क्रांत व्हावा ? की त्याला त्याच उत्क्रांतीचा खरा फायदाही उचलता येऊ नये ??

खरंतर आता मानवाने हे चक्रच असे बनवून ठेवले आहे की त्यातून कुणाचीच सुटका होत नाही. जन्म, अध्ययन, संपत्ती, लग्न, संसार आणि मग अंत असं अगदी सरळ सोपं गणित आपण करून ठेवलंय आणि त्याच रटलेल्या गणिताला आयुष्यातल्या सर्व परीक्षेत लिहून येतो.

मी नक्की कोण आहे ? आयुष्य म्हणजे काय ? आपण का जन्माला आलो ? या जगात येऊन आपल्याला नक्की करायचं तरी काय आहे ? अशा प्रश्नांची उत्तर शोधणे तर दूरच, पण खूप लोकांना कधी हे प्रश्नच पडत नाहीत आणि ते त्याशिवायच मरणही पावतात. दुर्दैव…नाही ??

या प्रश्नांची उत्तरे शोधायला, काही मूलभूत गोष्टी फार गरजेच्या असतात. जसे की, मोकळा वेळ, स्थिरस्थावर जीवनसरणी, आर्थिक स्थैर्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक व आर्थिक समानता इ.

आहेत आपल्याकडे या गोष्टी ?? समाजातील काही लोकांकडे असतीलही या सर्व गोष्टी.पण बहुतांश लोक यापासून वंचित असतात. ‘कोरोना’ पूर्वीच्या जगाचा एकदा शांत मनाने विचार करून बघूया ??

सकाळची शाळा-ऑफिस साठी जाण्याची - स्वयंपाक बनविण्याची लगबग, सिग्नलवर गाड्यांचे वाजणारे हॉर्न, बाजारांत विक्रीसाठी जिवाच्या आकांताने ओरडणारी जनता, कामाच्या ठिकाणचे व्यस्त तास, दमल्या-थकल्यावर बिछाना मागणारे शरीर आणि सकाळी पुन्हा चक्रव्यूहात अडकण्यासाठी सज्ज झालेलो आपण. कुठे मिळणार वेळ ? या ‘फालतू’ प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ???

पण आज वेळ आहे ! हे प्रश्न विचारण्याची. त्यांची उत्तरं शोधण्याची. कारण तर तुम्ही सर्व जाणताच.

होय, ‘ लॉकडाउन ‘ !!

या ‘कोरोना’ महामारी च्या काळात सगळं उदासी, शिथिल, निश्तेज वाटत असताना आणि सर्वजण सध्या होत असलेले व भविष्यात होणाऱ्या तोट्यांचा हिशोब मांडत असताना, मी मात्र भलतंच घेऊन चाललोय असं काहींना कदाचित वाटेलही. पण ‘जान हैं तो जहान हैं ‘ असं म्हणताना त्या ‘जान’ आणि ‘जहान’ चा अर्थ च नीट समजून नाही घेतला तर काय उपयोग त्या आयुष्याचा?

विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकिकरण, जागतिकीकरण या सर्वांचा उदय झाल्यापासून व त्यांचा प्रभाव आपल्यापैकी प्रत्येकावर पडण्याला सुरुवात झाल्यापासून तर आतापर्यंत माणूस नेहमी या सर्वातच दंग राहिला. आज लॉकडाउन मुळे जो सक्तीचा का होईना पण मोकळा वेळ मिळाला आहे, त्यापासून माणूस वंचितच राहिला. तो त्यात इतका गुंतला होता की असा मोकळा वेळ कधी असू शकतो व तसं जगण्याचा त्याचा मानवी हक्क आहे हेच तो विसरला होता.

त्यामुळे आज ती वेळ मिळाली असतांना देखील तो संभ्रमातच दिसतो. फेसबुक, व्हाट्सऍप, इन्स्टाग्राम सारख्या पुन्हा त्याच गर्तेत अडकवणाऱ्या साधनांचा सहारा घेऊन तो आयुष्याच्या सत्यापासून लांब पळतो आहे. बहुधा या भीतीने, की या प्रश्नांची उत्तरे शोधतांना आजपर्यंत आपण जे करत होतो हे निश्फळ होते असे लक्षात आले तर? व लक्षात जरी आले तरी त्यावर आपण काही उपाय करू शकलो नाही तर? किंवा बहुधा त्याला अजुनही ह्या प्रश्नांचा थांगपत्ता च नाहीये. तो अजूनही नकारघंटेच्या स्थिती (Stage of Denial) मध्येच जगतो आहे.

आपल्या आयुष्यात आपले कुटुंब, मित्र मैत्रीणी, नातेवाईक, सहकारी कर्मचारी इ. यांच्या सहवासातच आपण नेहमी असतो. कधी न कधी,कुणी न कुणी आपल्या सोबत असतोच जो त्याचे विचार, इच्छा, कल आपल्या समोर मांडत असतो व ज्याने आपले मत प्रभावित होत असते. त्यात एकटा राहणारा म्हणजे घरकोम्बड्या, क़ुरहट, बोरिंग, स्वतःतच गुंग राहणारा म्हणून हिनवले जाणे ही समाजरितच. म्हणून इच्छा असूनही बरेच लोक एकटे राहत नाहीत.

याचा तोटा असा की नेहमी कुणाच्या तरी सोबत असल्याने, त्यांच्याशी बोलण्याने आपण त्यांचे विचार आपल्या मनावर बिंबवत असतो. तो त्याचे विचार, इच्छा, कल आपल्या समोर मांडत असतो व ज्याने आपले मत प्रभावित होत असते. चांगले विचार घेणे व वाइट विचार सोडून देणे है तत्व जरी अस्तित्वात असले तरी सर्वच करू शकतील इतके ते सोपे नाही.

म्हणूनच मी असे मानतो की या लॉकडाउन मध्ये स्वतःला स्वतःचा वेळ देणे फार महत्वाचे आहे. आपण आपलं आयुष्य फार कमी स्वतःसाठी जगत असतो. लहानपणी स्वतःसाठी वेळ फार असतो पण आपल्याला नक्की काय आवडते आणि आपल्याला ‘खरंच’ कशात आनंद मिळतो हे ठरवण्याइतके आपण सुज्ञ नसतो आणि जेव्हा सुज्ञ होतो तेव्हा काम, सांसारिक जीवन, व समाजाने ठरवून दिलेल्या मोठेपणाच्या पट्टी वर स्वतःचे माप वाढवण्याच्या शर्यातित स्वतःला वेळ द्यायचा राहून जातो म्हणून स्वतःला काय आवडते हे ठरवण्याच्या आधीच ते मरण पावतात.

‘स्वतःला ओळखणे ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे’ आणि या प्रक्रियेत ‘स्वतःला वेळ देणे’ सर्वात महत्वाचे. स्वतःला वेळ दिल्यानंतर च तुम्हाला कळेल की अशी खरच कोणती गोष्ट असेल जी करताना तुम्हाला सर्वात जास्त आनंद असतो व तुम्ही सर्व भान विसरून ती गोष्ट करता. अशी कोणती गोष्ट आहे जी करण्यासाठी तुम्ही काहीही हारू शकतात. मग ती गोष्ट समाजात रूढ़ मान्यतांच्या विरुद्ध ही असु शकतील. असा विरोध करायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण कमीत कमी तुम्हाला स्वताची ओळख तर नक्कीच होईल.

आपले मत त्यांच्या बाजूने वळविण्यासाठी बऱ्याच शक्ति कार्यरत आहेत पण आपण आपल्या विचारात स्पष्ट असलो तर आपले एक स्वतंत्र मत बनते जे आजच्या युगात दुर्मिळ दिसते. स्वतःच स्वतंत्र मत तुम्हाला स्वाभिमान आणि बुद्धिप्रामाण्याची अनुभूति करुन देते.

स्वतःला महत्व द्यायला आपण शिकायला हवं. थोड़े दिवस #selflove #selfimportance मोड़ मधे ही जाउन बघायला हवं. कारण आज तुमच्या सोबतची व्यक्ति उद्या तुमच्या सोबत राहिलच याची काही शाश्वती नाही. तुमच्या सोबत आयुष्याच्या शेवटपर्यंत राहणारी व्यक्ति एकच, ती म्हणजे तुम्ही. या लॉकडाउन मध्ये ‘स्वतः’ ला स्वतः ची ओळख झाली आणि स्वतःसोबतच आनंदी रहायला जरी शिकलं तर पुढील आयुष्य सोप झाल म्हणून समजा.”

comments powered by Disqus