गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

- नीला पाटणकर

गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी या लॉकडाऊनच्या काळातील बऱ्याचशा उराशी बाळगुन ठेवलेल्या आठवणीत आपणास सहभागी करून घेण्याचा इरादा ठेऊन हा लेख लिहीण्याचा प्रपंच करत आहे.चला तर मैत्रिचा आनंद आपण द्विगुणीत करू या.

लॉकडाऊनमुळे क्षणिक दुरावलेल्या नात्यांची जोडणी पुन:च्च अलगद झालेली पाहुन मन भावूक होऊन गेलं.व अचानक नव्याने कोरीपाटी नात्याच्या गोडव्याने भरगच्च भरली.उतारवयातील आजी-आजोबांचा आशेचा दीप तेजाने उजळुन निघाला.आणि मनस्वी मनाची झोळी आनंदाने भरून वाहू लागली.क्वचित

प्रसंगी मतभेदामुळे गुंतलेले धागे दोरे उलगडून व गुंता सोडवून,जुळवून सांधले गेले.

मी व माझा भाऊ शाळा,काॅलेज व मित्र-मैत्रिणींत रत असल्याने,घरात आई व आजीला द्यायला वेळच

मिळत नसे.त्याची आता पुरेपुर भरपाई करणे चालू झाले.

कोरोनामुळे स्पर्धेला थकलेल्या जीवाला मिळणारी ही सक्तीची विश्रांती होती.विरंगुळा म्हणून केलेल्या

गोष्टी येथे नमूद करत आहे.बंदमुळे स्वत:च्या अंतर्मनात डोकावून स्वयंमप्रकाशित प्रगतीला वाव मिळाला.

हार मानायची नाही.या एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन संधी दवडू न देता अंतरंग शोधून काढायचे ठरविले.

जे न कधी दिसले ते मज लॉकडाऊनमुळे समजले.व वाईटातून चांगले गवसल्याचे समाधान मिळाले

घरांतील सर्वचजण कामाच्या रगाड्यात मग्न असल्याने,एकाच घरात राहुन सुध्दा एकमेकांशी बोलण्यास वेळ न मिळालेले कुटुंब,तणावाचे वातावरण असतांनाही एकत्र बसून आनंदाने गप्पा-गोष्टी,चर्चा करतांना दिसूं लागले.मने सुखावली.एक दुसऱ्याची मत,भावना जाणून घेण्यास निवांत मोकळीक मिळाली गंमतीदार किस्से ऐकून घेण्यास आई-बाबा,आजी-आजोबा उत्सुक दिसू लागले.कधी नव्हे ते हास्य्याचे फवारे उडू लागले.एक दुसऱ्यावर कुरघोडी करून मजेदार नर्म विनोदाचा आस्वाद घेण्यात गुंग झाले.त्याची आठवण म्हणून बच्चे कंपनी,तरूण वर्ग फोटो व सेल्फी काढण्यात रत झाले. काय काळाची व त्या लहानशा विषाणूची अगाध किमया आहे बघा ?

काय रे नगण्य विषाणू तूं,केवढे स्थित्यंतर घडवून आणलेस हे ? कोरोना तूं आम्हांला घरात डांबून एकत्र आणलस म्हणजे सत्कर्मच केलस की रे ! मग मी तुला शाप बोलूं की वरदान बोलूं ? नको रे बाबा अस बोलून मीच माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ की काय ? अशी चूक मी कधीही करणार नाही.स्वखुषीने मी केलेलं तुझं ते कौतुकच होईल की रे,जरा ते वाजवी पेक्षा जास्तीच होईल.असे तुला डोक्यावर चढवून ठेवणे बरोबर नाही.आ बैल मुझे मार अशी गत होईल की रे माझी !

चला तर मग त्याला त्याची पायरी दाखवून देणेच रास्त ठरेल.निघ रे चिमुकल्या जीवा जा तुझ्या देशाला परत,घेतलास तेवढा पाहुणचार बास झाला.तूं दिलेल्या दु:खातून आम्हीं साधी-भोळी माणस तुझा त्रास निमुटपणे सहन करतोय.नवीन मार्ग काढतोय.तुझ्या नायनाटाचे संशोधन करतोय.तर तूं जास्तच शेफारत आहेस.परत जाण्याचे नाव काढत नाहीस.क्लेषातून सुख शोधुन आम्हीं खूष राहातोय.तर तूं तुझा बाड-बिस्तरा आणखीच पसरत चालला आहेस.आमच्या सुखी जीवनात नाहक डोकावून तू आम्हांला मनस्ताप दिलास.आता आमची पाळी आहे.तुझ्या अंतरंगात डोकावून तुला नामशेष करण्याचा आम्हीं विडा उचलला आहे.सकारात्मक विचार तर आम्हीं नेहमीच करतो.तूं तुझे बघ.दिवस तुझे भरत आलेत.आमच्या मनाचा तळ ढवळुन तुला काय मिळाले रे बाबा ?

आता तुला इंगा दाखवलाच पाहीजे.आम्ही जितके शांत आहोत ना तितकेच खतरनाक आहोत.केव्हां तुझं

आम्ही वाटोळ करू ते तुला कळणार सुध्दा नाही.तुझी खेळी तुझ्यावरच उलटवून देऊ समजलं का ? उगा आमची गळचेपी करू नको.आम्ही चंद्रावर पोहचणारी हुषार,बुध्दीमान माणस आहोत.आमचे संशोधन चालूं आहे. हळुहळु काही धागेदोरे हाती लागत आहेत.कुणाला दाखवायला पण तुझी नामोनिशाणी शिल्लक राहणार नाही.

अशा कोरोनाच्या लॉकडाऊनी आम्हीं चिंताग्रस्त न होता घरात राहुन एकमताने मजा लुटण्याचे ठरविले

माणूस एक रसायन आहे बघा ! जागतिक सुट्टीने एकीकडे सुखावलेले मन,दुसरीकडे सक्तीच्या विश्रांतीला कंटाळले होते.अशा परीस्थितीत सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन,नव्या जुन्या आठवणींच्या अंतरंगात डोकावून रमायची मनोमन खूणगाठ बांधून ठेवली.व सर्व कुटुंब कामाला लागले.

लॉकडाऊन म्हणजे बायकांचा उजवा हात असणारी कामवाली बाई ! ती नाही म्हणजे घरकाम पदरी पडले आणि दमछाक होणे नशिबी आले.

पहीली सुरूवात घरापासून करण्याचे ठरवून कामाचे नियोजन केले.प्रत्येकाने प्रथम आपापल्या आवडीची

काम वाटुन घेतली.नंतर ती सर्वांनी आलटुन पालटुन करायची ठरले.मोठ्या उत्साहाने बाबांनी कुकींगची मला आवड आहे सांगून अंगावर घेतलेले काम निर्विघ्नपणे पार पाडण्याचे ठरवून कसोशिने त्याचे पालन करण्याचे प्रयत्न सुरू केले.पण थोड्याच वेळात त्यांना कळुन चुकले,जेणो काम तेणो थाय बिजा करे सो गोता खाय.

तातडीने नियम धाब्यावर बसवून,बाबांनी बिनशर्त माघार घेतली.पण माघार घेईल ती गृहीणी कसली ?

होईल तसे खाण्याची सर्वांनी तयारी दाखविल्याने बाबांची आवाजी बंद होऊन दातखिळच बसली.मग काय

आलीया कोरोनाशी गाठ ! अनेक पदार्थ करण्यापेक्षा एकाच पदार्थात अनेक गोष्टी घालण्याच्या कल्पनेला त्यांना मनाने दिलेला कौल शिरसावंद्य मानून,कधीही न पाहीलेले डाळींचे डबे शोधणे सुरू झाले.हळुच खूणावून खाणा-खूणा करून लेकीचा सल्ला घेणे चालू होतेच.दोन डाळींतील फरक न कळल्याने असतील तेवढ्या डाळी,मसाले,तांदुळ एकत्र करून एक रुचकर पदार्थ करण्यास त्यांच्या मनाने त्यांना मान्यता दिली तो मानस ग्राह्य मानून कुकर मधे अनावश्यक पाणी घालून खिचडी नामक पदार्थ शिजविण्यास ठेवला.

केर पोचा करून व भांडी घासून थकली-भागलेली आई व कपडे वाळत घालून मान मोडलेली मी आणि घराची साफ-सफाई व घर आवरून दमलेला माझा भाऊ भुकेने कासावीस होऊन अन्न ग्रहण करण्यास टेबलावर आतुरतेने वाट बघत बसलो.तेवढ्यात ताठ मानेने आपला मुलगा किती कर्तव्यदक्ष आहे,या नजरेने आईकडे एक तिरकस कटाक्ष टाकत आजी येऊन बसली.तिच्या पाठोपाठ आजोबा उत्सुकते पोटी काय आपला मुलगा तिर मारतोय हे पाहण्यास डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन स्थानापन्न झाले.थोड्याच कालावधीत भूकेचा डोंब उठलेल्या आजोबांच्या समोर खिचडी नामक सरबरीत पदार्थ ताटात येऊन धडकला.वाढलेल्या पदार्थाला कोणत्या खाद्य पदार्थाच्या नामकरणाने संबोधावे हा विचार करतच भुकेने व्याकुळ झालेल्या पोटाने नायलाजास्तव ताटात वाहत असलेला पिवळ्या रंगांचा पातळ पदार्थ आलीया भोगासी म्हणत पोटात ढकलण्याची क्रिया तत्क्षणी क्रमप्राप्त असल्याने चालू केली.

सकाळ तर निभावली.आता दुपारच्या कामांची यादी डोळ्या समोर तरळुं लागली. लॉकडाऊनचा पहीला दिवस असल्याने जो,तो कामाने प्रेरीत होऊन कधी नव्हेते ते अती उत्साहात विहरत होते.पुढे काय वाढुन ठेवलेय याची तिळमात्र कुणाला कल्पना नव्हती.वामकुक्षी न करता,दुपारी छान पैकी रमीचा डाव मांडण्यात आला हवेत जरा गारवा असल्याने मरगळलेल्या जीवाला आणि अर्धपोटी राहीलेल्या पोटाला नामी युक्ती सुचली. सकाळच्या अती दगदगीच्या कामाने शरीर शीणले होते.श्रमपरीहार म्हणून मस्त पैकी कांद्याची भजी व आल्याचा वाफाळलेला चहा पिण्याची हुक्की एकमताने मंजुर झाली.पण मांजराच्या गळ्यात घंटा बांघणार कोण ? दुपारच्या चहाची जबाबदारी माझ्यावर होती.पण त्याबरोबर खाद्य पदार्थाचा प्रस्ताव मांडलेला नसल्याने मी व सर्व बुचकळ्यात पडले.कारण मी ते मान्य करून बिलकूल अंगावर घेणार नाही हे सर्व जाणून होते.

सकाळचा अद्वितीय पदार्थ खाणारे व खाऊ घालणारा त्या वाटेला जाण्याचे धैर्य करणार नाही हे गृहीत धरून घरातील गृहीणी प.पू मातादेवी मदतीला धावून आली.व तिने नेहमी प्रमाणे ही कामगिरी स्वखुषीने व आवडीने आपल्या शिरावर घेतली.मंद नाट्यसंगीताच्या वातावरणात कुरकुरीत कांदा भजी चोपत उदर भरण अमंळ ढेकर येई पर्यंत उरकले.असा संध्याकाळ पर्यंतचा वेळ मौज-मजेत गेला.

पुढचे पुढे बघू असे म्हणून मी आळसावलेला माझा देह मऊ मुलायम कोचावर पसरून दिला.आणि कोरोनाचे पराक्रम न भूतो न भविष्यती दूरदर्शनवर दैनंदिन बातम्यात पहात असतानाच,थकलेले माझे शरीर सायंकाळीच केव्हां निद्रादेवीच्या आहारी गेले ते मला कळलेच नाही.गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी असे मी स्वप्नांत कुणाला तरी सांगत असतांना,आईने मला गदागदा हालवून सांजवेळी कसली झोपतेस हे हांक मिश्रित बंबारडींग पुसटस माझ्या कानावर पडले.व दचकून खडबडून मी जागी होऊन ताडकन उठून बसले…

comments powered by Disqus