समृद्धं मन

समृद्धं मन

- अक्षया गौरव सरपोतदार

माणसाला समृद्ध होण्यासाठी किंवा जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी अनेक परिपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत. समृद्ध व्हायचंय म्हणजे नेमकं काय? जगणं हि कला कशी असू शकते? अन्न, वस्त्र, निवारा या गरजांबरोबर वाढ आणि विकासासाठी मनाची वेगळी गरज असते ती कोणती? मनाच्या गरजा भागवायच्या म्हणजे नेमकं काय? असे असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मार्ग आहेतच. त्यात अगदी जवळचा, मला जाणवणारा मार्ग म्हणजे; ‘स्वानुभव’. स्वतःला प्रचीतीस येणाऱ्या अनुभवांनी समृद्ध झालेल्या मनाची विकासनशक्ती खरंच प्रगल्भ म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाचे आपल्या अभिरुचीनुसार समृद्ध होण्याचे, प्रगल्भ होण्याचे मार्ग असतातच. काही पवित्र अशा संगितात आपल्या समृद्धीचे किनारे शोधतात, काही विविध विषयांच्या अभ्यासात व संशोधनात तर काहींची समृद्धी सृजनातही असते. अनेकांची परमेश्वराला शरण जाणाऱ्या भक्तीमार्गात मनाची समृद्धी बहरत जाते तर काहींना आपले काम प्रामाणिकपणे संपन्न करताना मनाची शांती मिळते. काहीवेळेस तर माणूस परिस्थितीच्या विळख्यात अडकल्यामुळे नकारात्मकतेकडे जाणाऱ्या मार्गांचा अवलंब करतो. प्रत्येकाचं आपल्या समृद्धीचं स्वतंत्र आभाळ असत आणि जगण्याची कला शिकणारी सगळीच मनं त्यात विहार करत असतात.

माझ्या मनाच्या समृद्धीचा मार्ग किंवा माझं आभाळ माझ्या पुस्तकांमध्ये सामावलंय. माझ्या मनाच्या शांतीची गरज भागवणारी मात्रा वाचनाने मला सापडली. वाचनाकडे मी लहान वयातच वळले आणि तिथेच रमले. कालांतराने वाढलेला अभ्यास, परीक्षा, करियर ह्या सगळ्या गोंधळात गुण मिळवण्यापुरतंच वाचन झालं. पुढे व्यवसायाची गरज म्हणूनही वाचनावर मर्यादा आल्या आणि माझ्या मानाचं समृद्ध होणं थांबलं. गरज असेल आणि अभिरुची असेल तर मार्ग नक्की सापडतो. तो मार्ग किंवा हि संधी ‘ कोविड-१९’ ह्या महाभयंकर अशा विषाणूमुळे, जगभर सुरु असलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे पुन्हा मिळाली.

सुरुवातीला २१ दिवस आणि मग वाढतच गेलेला ‘लॉकडाऊन’ काहींसाठी खरोखरच अडचणींचा ठरला आणि काहींसाठी स्वतःकडे बघायची, स्वतःला ओळखायची, मी तर म्हणेन मनाला समृद्ध करायची संधी घेऊन आला. माझ्यासाठी माझं थांबलेलं वाचन पुन्हा सुरु झालं. वाचायचा वेगही मूळ लयीत आला. पुस्तकांनाही कपाटाबाहेर मोकळा श्वास मिळाला. ‘काय वाचायचं’ हा प्रश्नच नव्हता.! खूप सारी पुस्तक गेले अनेक दिवस माझी वाट बघत होती त्यांनी उराशी सांभाळलेला पानांचा गंध माझ्याशी वाटण्यासाठी ती केव्हाची प्रतीक्षेत होती. लेखकाच्या प्रतिभेचा अनुभव देणारी, अर्थपूर्ण शब्दांची गुंफण कोणीतरी सोडवेल अशा प्रतिक्षेत होती.

लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मनाच्या समृद्धीला हातभार लावला ते शब्दांनी आणि भावनापूर्ण प्रसंगानी भरलेल्या मंजुश्री गोखले यांच्या ‘जोहार मायबाप जोहार’ या कादंबरीने. ‘संत चोखामेळा’ या पवित्र संतांना; संत नामदेवांनी नीट पारखून, ओळखून, पैलू पाडून, सुशोभित करून पांडुरंगाच्या चरणाशी आणलं. आपल्या भक्तांमध्ये रमणारा, त्यांच्या भक्तीची कठोर परीक्षा घेणारा, भक्त आपल्याला दुरावत अशी चिंता करणारा, भक्तांचा तारणहार पांडुरंग ह्या ‘जोहार मायबाप जोहार’ मध्ये आपल्याला रखुमाईसोबत भेटतोच मात्र जन्माने ‘महार’ असल्यामुळे तत्कालीन समाजाने आयुष्यभर विलगीकरणात टाकलेल्या; अंतर्बाह्य स्वच्छ आणि सुविचारी अशा चोखोबारायांचा जीवनपट लेखिकेने मनोवेधक मांडला आहे. मातेच्या पोटात रचल्यापासून ते जिवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत/क्षणापर्यंत चोखोबारायांनी विठ्ठलाची भक्ती केली. ह्यातील भावनाविवश करणारे प्रसंग वाचकाच्याही डोळ्यात पाणी आणतात. युगानुयुग ‘हा परमेश्वर कोण?’ याचा थांग लागण्यासाठी जप, तप, पारायण करणारे अनेक एकीकडे व ‘ आम्हा न कळे ज्ञान। पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा।’ असे म्हणणारे चोखोबाराय एकीकडे. ते अगदी प्रामाणिक व निरागस भावाने मान्य करतात, हे गाव स्वच्छ करण्याच्या कामात कुठे सापडायचा मला पांडुरंग तो माझ्या मनीच्या भावात आहे. अभंगाच्या शेवटची ओळ चोखोबारायांच्या प्रामाणिक भक्तीची ओळख करून देतात. ते म्हणतात,

‘चोखा म्हणे माझा भोळाभाव देवा । गाईन केशवा नाम तुझे । ‘

असे संतश्रेष्ठ चोखोबारायांच्या प्रतिभेतून निघालेले अनेक अभंग ह्या पुस्तकात लेखिकेने प्रसंगावधान राखून घेतलेले आहेत. ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारात मी हे पुस्तक वाचत असल्यामुळे अनेक प्रसंग ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे होते मात्र त्यावेळेची समाजव्यवस्था नक्कीच लक्षात आणणारे आहेत. देव आहे कि नाही ह्या गुंत्यात अडकण्यापेक्षा मला तर चोखोबारायांची भक्ती आदर्श वाटू लागली.

‘जोहार मायबाप जोहार’ चा अविभाज्य घटक असलेल्या, संत चोखामेळांच्या पत्नी ‘सोयराबाई’. अनेक दिग्गज गायकांच्या सुरांमधून मी ‘ अवघा रंग एक जाला’ हा अभंग अगणित वेळा ऐकला आहे. मात्र ह्या पुस्तकातून भेटलेल्या सोयराबाई वाचल्यानंतर ह्या अभंगाची खोली माझ्या चांगलीच लक्षात आली.

‘देही असोनि विदेही । सदा समाधिस्त राही ।
पहाते पाहणे गेले दुरी । म्हणे चोखियाची महारी ।’

या अभंगातील ओळींनी सोयराबाईंच्या मनाची समृद्धता माझ्या मनाशी ठसा उमटवून गेली. ज्या बाईला शिक्षण, विद्या, अभ्यास ह्यांचा गंधही नव्हता तिच्या प्रतिभेतून आणि स्वानुभवातून सापडलेल्या पांडुरंगाचं दर्शन तिने मला एका सुशिक्षित मुलीला दिल होत. संत चोखामेळा, सोयराबाई हे आपल्या अविश्रांत कर्माने आणि अमूल्य अशा भक्तीने समृद्ध होते. देव आहे कि नाही या विचारांपेक्षा एखाद्याचं ‘समर्पण’ किती महत्वाचं असत आणि अगदी तळागाळातल्या मनालाही ते समृद्ध करून जातं. माझ्या वाचनाला आणि मनाला समृध्दीकडे नेणाऱ्या संकल्पाला ‘जोहार मायबाप जोहार’ च्या नांदीमुळे शुभारंभच झाला.

ह्या पवित्र ग्रंथानंतर माझ्या मनाच्या समृद्धीत भर घातली ती माझ्या व्यवसायाशी संबंधित दोन पुस्तकांनी. मी शिक्षिका आहे. मानवाच्या ‘वाढ व विकास’ या संकल्पनेत ज्या मूलभूत गोष्टींमध्ये क्रांती झाली त्यात शिक्षण हा खूप मोठा भाग आहे. मी भाषा विषयाची शिक्षिका आहे. त्यामुळे ‘स’ अधिक ‘हित’ अशा साहित्याच्या मी खूप जवळ आले. मुलांशी संबंधित वाचू लागले. भाषा ज्ञान प्राप्त करायचं माध्यम म्हणून शिकवायची, ह्या हेतूंनी वाचायला सुरुवात केली. शिक्षक म्हणून समृद्ध होणं तर न संपणारी प्रकिया आहे. मात्र या समृद्धीच्या क्रियेत मला संपन्न करण्यासाठी दोन पुस्तकांनी मदत केली. पहिलं पुस्तक - ‘जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल्स्’ लेखक - हेरंभ कुलकर्णी.’

शिक्षणाची वेगळीच पण मनाला पटणारी व्याख्या जे कृष्णमूर्तींनी मांडली. कृष्णमूर्ती म्हणतात ‘ मुक्त मनांची निर्मिती करणारं शिक्षण असायला पाहिजे’. जे कृष्णमूर्ती शिक्षणाचा सर्व बंधनांपलीकडे जाऊन विचार करतात. लेखकाने शिक्षक, विद्यार्थी व पालक ह्या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेऊन कृष्णमूर्तींच्या विचारांची मांडणी केली आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात हरवत चाललेली मुलांची निरागसता, नकारात्मक मार्गाकडे वळणारी मूलं किंवा कितीही बुद्धिमान असली तरी कुठेतरी कारकुनी करून त्याला आपलं करियर मानणारी मुलं आजूबाजूला दिसली की कृष्णमूर्ती गरजेचे वाटतात या लेखकाच्या विचाराशी मी सुद्धा सहमत झाले.

‘शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत कि जिथे कुणीही स्वतःहून जात नाही, तिथे दाखल करावं लागत…’ असं धाडसी विधान कृष्णमूर्ती करतात. सर्वमान्य असलेल्या ‘निसर्गात शिक्षण’ ह्या पद्धतीची मूळं कृष्णमूर्तींच्या विचारांमध्ये आहेत. आजवरच्या शिक्षण पद्धतीचे होणारे परिणाम, अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेल्या घटकांचा अभ्यास, घटक शिकवण्याच्या पद्धती आणि सर्वात शेवटी गाठले जाणारे शिक्षणाचे यश या सगळ्यांवरच कृष्णमूर्ती गंभीरपणे चिंतनपूर्ण भाष्य करतात.

शिक्षक म्हणून मनाच्या समृद्धीचा विचार करताना मनाला स्पर्शून गेलेलं कृष्णमूर्तीच विधान प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखं आहे. ते म्हणतात ‘ मला शिक्षणाचे यश साक्षरतेचे प्रमाण किती वाढले यावर मोजावेसे वाटत नाही. समाजातील संवेदनशीलतेची पातळी किती वाढली यावर ते मोजायला हवे.’ शासनाने आज प्रत्येकाला साक्षर करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. मात्र ह्या संवेदनशीलतेचंं काय? शिक्षण ही संधी समजून शाळाशाळांमधून मुलांमध्ये संवेदनशीलता व मानवी मूल्ये रुजायला हवी असं कृष्णमूर्तींच स्पष्ट मत होत. आज मार्क्स मिळवण्याच्या दबावाखाली असणारी मूलं, मार्क्स वाढले नाहीत तर त्यांचं भविष्य धोक्यात येईल अशी चिंता करणारे पालक आणि दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या वेगात असणारे शिक्षक (माझ्यासकट) पहिले कि शंका येते. खरंच करतोय का आपण मुक्त मनांची निर्मिती. मला तर मुलं शाळा सुटल्याची घंटा झाल्यावरच मनमुक्तं झालेली दिसतात. अर्थात काही उपक्रमशील शिक्षक ह्याला अपवाद आहेतच.

आपल्या प्रत्येकाच्या शालेय जीवनात आपले आवडते शिक्षक असतातच. आयुष्यभर आपल्या मनात त्यांच्यासाठी आदराचं स्थान असत. कधी त्यांच्या अध्यापनाच्या शैलीमुळे किंवा विषयाच्या सखोल ज्ञानामुळे ते आपले आदर्श होतात. ‘ शिक्षक-विद्यार्थी हे नातं तयार झाल्यानंतर ; त्या शिक्षकांनी कितीही दम दिला किंवा शिक्षा केली तरी मनातला आदर कायम राहतो. हे सर्व कशामुळे होत तर त्या नात्यात निर्माण झालेल्या निरागस प्रेमामुळे. कृष्णमूर्ती ‘प्रेम’ या संकल्पनेला शिक्षणाच्या मांडणीचा गाभा म्हणतात. निरपेक्ष प्रेम मग ते ज्ञानावर असो अथवा व्यक्तीवर, कृष्णमूर्तीचे विचार अनेक विषयांवर स्पष्टपणे उहापोह करतात. जे कृष्णमूर्ती सामाजिक परिवर्तन, स्वभाव, प्रेम, श्रवण, ज्ञान, मृत्यू, संस्कार, मन, भीती, एकटेपणा आणि सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा आणि ध्यान अशा अनेक पैलुंवरती अभ्यासपूर्ण मत मांडतात. ‘मानवी विचारांची प्रक्रिया समजून त्याचा अंत केल्याने येणारी मनःशांती म्हणजे सत्य किंवा ईश्वर’ असा विचार कृष्णमूर्ती मांडतात. हे सर्व वाचत असताना ह्या सर्व विचारांना मी माझ्या शाळेतील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. हे विचार अभ्यासक्रमातून मुलांना कसे देता येतील किंवा माझ्या वागण्यातून उदाहरण मुलांसमोर निर्माण करू शकेन का? असाही विचार केला. कृष्णमूर्ती जसे समजायला अवघड आहेत तसे आचरणात यायला सुद्धा. अर्थात ‘कृष्णमूर्ती स्कुल्स्’ मध्ये त्यांनी हे शक्य करूनही दाखवलं आहे.

कृष्णमूर्तींशी झालेल्या पुस्तक भेटीतून माझ्या शिक्षक मनाला समृद्ध करणारा विचार म्हणजे त्यांनी सांगितलेला शिक्षणाचा हेतू. कृष्णमूर्ती म्हणतात ‘ ज्यामुळे प्रजा जागृत होते, मनातील गोंधळ संपून सुसंवाद निर्माण होतो तेच खरे शिक्षण’. लेखक श्री हेरंब कुलकर्णी यांनी अगदी समजेल व विचारांना पूरक होईल अशीच लेखाणाची मांडणी केली आहे. कृष्णमूर्तीचे विचार किंवा या पुस्तकाचा सारांश असा एका दृष्टीक्षेपात घेता येणार नाही मात्र मनाच्या समृद्धतेला दिशा मिळाली.

‘शिक्षक’ या अतिशय महत्वाच्या भूमिकेत असताना कृष्णमूर्तींच्या विचारातून मला या भूमिकेचा गाभा जसा लक्षात आला त्याचप्रमाणे ह्या भूमिकेची उंची लक्षात आणून देण्याचं काम ह्या लॉकडाऊनच्या काळात करून दिल ते लेखक ‘तेत्सुको कुरोयानगी’ ह्या लेखिकेच्या ‘तोत्तोयान’ या पुस्तकाने. शिक्षकाने सर्वच मुलांच्या बाबतीत स्नेहशील व कल्पक कसे असावे ह्या बाबतचे अनेक अनुभव ह्या पुस्तकात सापडतात. कितीही खट्याळ मुलाला प्रेमाने दिलेलं प्रोत्साहन त्या मुलाच्या विकासासाठी किती महत्वाचं असतं ह्याचं उदाहरण आदर्श घेण्यासारखं आहे.

मला ह्या ‘तोत्तोयान’ च्या शाळेतील आवडलेली गोष्ट अशी की ह्या शाळेतील शिक्षक मुलांना अमुक एक गोष्ट करू नका म्हणून कधीच दटावत नाहीत. मनात आलंय तर करा, चुकलात तर त्यातून शिका, थोडी इजा झाली तर तोही अनुभवच, त्यातूनच योग्य-अयोग्याची जाणीव होईल. विद्यार्थ्यांना आपोआप आपल्या कुवतीचा अंदाज येईल त्यासाठी गुणांची आकडेवारी प्रमाण नको.

‘तोमोई’ असं नाव असलेल्या ह्या जपानी शाळेच्या रचनेतंच वेगळेपणा जाणवला; रेल्वेच्या डब्याचे वर्ग, जेवणासाठी स्वतंत्र पण एकत्र अशी बैठक व्यवस्था आणि जेवण करण्याची पद्धतही विशेष. निसर्गाने भरून असलेलं शाळेचं पटांगण अगदी मुलांना आकर्षित करणारं. मुख्याध्यापक ‘कोबायशी’ मुलांच्या उत्साहाला शाळेचा मूलाधार ठरवून कार्य करताना दिसतात. गणवेश व साचेबद्ध अभ्यासापेक्षा मुलांच्या चौकस आहाराला ते जास्त महत्व देतात. संगीत, खेळ, शिबीर, नाटक, स्वयंपाक अशा क्रियाशील गोष्टीतून मूलं जीवनाचा आनंद घेताना दिसतात. मूळ लेखिका जपानी असून स्वतः त्याच शाळेत शिक्षण घेतलेली आहे. आज तीच चिमुरडी तोत्तोचान जपानमधील लोकप्रिय दुरदर्शन कलाकार तेत्सुको कुरोयानगी या नावाने ओळखली जाते. ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे ‘चेतन सरदेशमुख-गोसावी’ ह्यांनी.एक शिक्षिका म्हणून बालमानाच्या या अनुभव मांडणीतून केलेला विचार खरोखरच मार्गदर्शक आहे. शाळेत मुलांना यावंसं वाटण आणि शाळेतच राहावं वाटणं हा तर मला चमत्कारच वाटतो. याही पुढे जाऊन या प्रयोगशील शाळेला पालकांचा मिळालेला पाठिंबा तर औरच गोष्ट म्हणायला हवी.

शिक्षक नेहमीच आपला घटक शिकवताना मुलांना विविध अनुभव देऊन ती संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. अनुभवातून घेतलेलं ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते. मात्र कोबायशीनी ह्या छोट्या छोट्या मुलांना दिलेला एक आगळाच अनुभव सामान्य विचाराकडे पलीकडे होता. एक दिवस कोबायशीनी सर्व मुलांना पोहायचा कोणताच पोशाख न घालता सरोवरात डुंबायची सूचना केली. बारीक मुलं, जाड मुलं, मुलं-मुली, सगळेच हसत बागडत होते. अंगावर एकही कपडा नसताना. कोबायशीनच्या मते मुलं-मुलींना एकमेकांच्या शरीरातील फरकाबद्दल विकृत कुतूहल असणं चांगलं नाही. सगळीच शरीर सुंदर असतात. अर्थात सर्वानाच पटणं शक्य नाही मात्र हा विचार असामान्य आणि काळाच्या पुढे होता.या पुस्तकातून अनेक लहान-मोठे प्रसंग तोत्तोचानने खूप निरागसपणे कथन केले आहेत आणि ती माझ्या शिक्षक मनाच्या समृद्धीचा मैलाचा दगड ठरली.

या तीन पुस्तकांनंतर माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारं पुस्तक मी निवडलं, श्री शिवाजी सावंत यांचं ‘युगंधर’. नावातंच सगळं आलं. अर्थात मला याची जाणीव आहे की या प्रतिभासंपन्न माणसाच्या लेखणीबद्दल लिहिताना फक्त एक वाचक म्हणून मला सर्वतोपरी भान राखलं पाहिजे.

ही कृष्णमय कादंबरी जेव्हा वाचायला हातात घेतली तेव्हा ९७८ पानांचा हा विचार आपल्या मनाला झेपेल कि नाही असाच वाटलं. ‘श्रीकृष्ण’ कादंबरीमय स्वरूपात उलगडताना शिवाजीरावांच्या अभ्यासाची खोली मनाला अवाक करून जाते. लेखकाने हा कृष्णकाळ कथन करायची पद्धतसुद्धा अशी आगळीच निवडली आहे कि वाचतानाही मी मनोमन नतमस्तक झाले. स्वतः तो सावळा योगयोगेश्वर आपल्या जीवनाचा पट आपल्यासमोर कोणताही आडपडदा न ठेवता, कोणत्याही चमत्काराचा उल्लेखही न करता उलगडून दाखवत आहे. हे सर्व सांगताना सतत आग्रही आहे कि देवाचा अवतार किंवा चमत्कारी पुरुष म्हणून आता माझ्यापासून लांब राहू नका! तुम्हा प्रत्येकामध्ये चांगुलपणाच्या, प्रामाणिकपणाच्या, समाधानाच्या, निरागसतेच्या आणि सकारात्मकतेच्या अंश रूपात मी आहेच. आता मात्र मला देव्हाऱ्यात, सोवळ्यात ठेऊ नका.

लहानपणापासून मी श्रीकृष्णाकडे एक देवच ह्या ह्या एकाच संज्ञेच्या चष्म्यातून बघत आले. नावाप्रमाणे आकर्षून घेणारा असाच. ह्या कृष्णाचा जन्म, त्याच बालपण, त्याचा खट्याळ स्वभाव, महाभारतासारखं मोठं धर्मयुद्ध खेळविणारा, द्वारकाधीश म्हणून राज्य करणारा, त्या बालवयात मला न समजलेला गीतेचा संदेश देणारा हे सगळं इतर कोणत्याही दैवी अवतारापेक्षा वेगळं होत इतकच समजत होतं.

‘युगंधर’ ने मात्र श्रीकृष्णाच्या मला माहिती असलेल्या सगळ्या व्याख्याच बदलून टाकल्या. देव्हाऱ्यात बाळकृष्ण म्हणून स्थापित केलेला, फोटोफ्रेममध्ये असलेला, मोरपीस खोवलेला, बासरी वाजविणारा हा ‘श्रीकृष्ण’ म्हणजे एक विचार तसा समजायला आणि उमगायला सोपा नाही. माणसांना परस्परांशी जोडणाऱ्या ‘प्रेमयोगी’ अशा ह्या तत्वाला का बरं आपण माणसांपासून लांब सोवळ्यात ठेवलाय?

श्री शिवाजी सावंतांनी हा श्रीकृष्ण मांडताना कादंबरीमय असला तरी कोणत्याही चमत्काराचा मुलामा न देता माणसाला माणसासारखाच भिडेल असाच मांडला आहे. एकदाच मिळालेल्या ह्या मनुष्य जन्मात योग्य-अयोग्य अशी ओळख पटवून देणारा मार्गदर्शक असा ‘श्री’ हि सामर्थ्याची पदवी मिळवलेला तो ‘श्रीकृष्ण’. वाचताना आज इतके वर्ष आपण फक्त देव मानून राहिलो याची खंत वाटली. मनाला शांत करून ज्ञानाच्या जवळ नेणाऱ्या, पवित्र संगीत कलेच्या जवळ नेणारा कलावंत ‘मुरलीधर’. त्याच्या प्रत्येक नावात एक विचार आहे आणि तो समजून घ्यावा हिच माफक अपेक्षा तो बाळगून आहे.

‘युगंधर’ हे पुस्तकाचं नाव ‘श्रीकृष्ण’ हे तत्वज्ञान ब्रह्मांड व्यापून दशांगुणाने उरणारं आहे. या नावाबद्दल कादंबरीमध्ये सांदिपनी ऋषींच्या तोंडी जी वाक्य आहेत ती वाचताना सुद्धा हे विश्वरूप किती योजने मोठं आहे ह्याची कल्पना येते. प्रसंग असा आहे कि ‘अंकपाद’ आश्रमात सांदिपनी गुरुदेव उपदेश करीत आहेत. जन्मापासून आपण कोण आहोत हे जाणणारा ‘श्रीकृष्ण’सुद्धा शिष्यगणांमध्ये बसलेला आहे. उपदेश करताना ते म्हणतात- ‘ मोक्षाची कसलीच अपेक्षा नं धरता, प्रेमासाठी-प्रेम, कर्मासाठी-कर्म असं जीवनभर वावरताना देठ मोडून फळाने वृक्ष त्यागावा तसा सहज जो देह त्यागतो त्याला योग-योगेश्वर म्हणतात!! त्यांनी सहज उच्चारलेली जीवनतत्वं मानवजातीला युगानुयुग मार्गदर्शक ठरतात. ती तत्वं युगायुगांची धारणा करतात म्हणूनच त्या तत्वांचा अधिकारी पुरुष ‘युगंधर’ ठरतो’.

‘युगंधर’ म्हणजे काय हे जाणून घेताना मन तर भारावून गेलच मात्र श्री शिवाजी सावंतांच्या उच्च प्रतिभेचाही अंदाज आला. मनुष्य म्हणून मिळालेल्या जन्मात येणाऱ्या अनुभवांचे, प्रकट होणाऱ्या भावनांचे, अडचणींना सामना करताना लागणाऱ्या ऊर्जेचे अर्थ उलगडताना हा ‘युगंधर’ दिपस्तंभासारखा, ध्रुव ताऱ्यासारखा अढळ आपल्या पाठीशी उभा राहतो. फक्त एकाच कि देव म्हणून लांब करू नका, तुमचा मित्र, सखा अगदी खूप चांगला मनात आलेला विचार म्हणून जवळ घ्या.

कादंबरीमय कृष्ण वाचकांसमोर आणताना लेखकाने त्याच्या मनाच्या जवळ असलेल्या व्यक्तिरेखा बोलत्या केल्या आहेत. त्यात स्वतः श्रीकृष्ण, रुक्मिणी, दारूक, सात्यकी, द्रौपदी,अर्जुन व उद्धव अशा आहेत. ह्या छोट्याश्या लेखन प्रपंचात युगंधराने मला किती समृद्ध केलं हे सांगणंही अवघडच आणि माझ्यामते सांगण्यापेक्षा तो स्वतः अनुभवावा असा आग्रह राहील.

माझ्या मनातले विचार योग्य शब्दात तेही लिखित स्वरूपात मांडण्याचा अनुभव तोकडा आहे हे लिहिताना मला जाणवतंय. मात्र ‘युगंधर’ माझ्या मन समृद्ध करण्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी ‘वाचन’ हा मार्ग निवडलेल्या माझ्या मनाला नक्कीच दिशा देणारा आहे. ह्या लेखन प्रपंचातून मला कोणत्याही लेखकाचे परिक्षण करायचे नाही. माझी योग्यताही नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात स्वयंपाक, आवराआवर, आराम, शाळेची काही काम, योगासनांमधून शरीराशी साधलेला संवाद अशा सगळ्या सकारात्मक व्यस्ततेत माझं वाचन मला सर्वतोपरी समृद्ध करेल हे नक्की.

comments powered by Disqus