स्थानबद्ध
- प्रो.डॉ.वि.भा.पाटणकर
कीर, कीर, गजर किंचाळला. नेहमी प्रमाणे त्याचा गळा दाबला व पडून राहिलो. मस्त साखर झोप लांबवावी हाच विचार मनी.
पण कालची बातमी कोरोनाची, अस्वस्त झालो. आता काय? सर्वच बंद. बाहेर जाणेस बंदी.
छे ! आपण ही, स्तानबद्धता मस्त जगायची. आपले रुटीन आपणच ठरवायचे, मग माझे टाईम-टेबल करून टाकले.
सुखद सकाळ प्रथम योगापासून सुरु. योगाश्रमाचे पुस्तक काढले व नवीन काही आसने करू लागलो. आधीची आसने व
नवीन यामुळे चांगलाच तासभर आनंद देवून गेला.
देवपूजा नेहमी आटपत होतो, यथासांग करायचा मोह काही ना काही कारणाने पुढे पुढेच. आज छान पैकी रेशमी पितांबर नेसून
देवपूजा करू लागलो. नित्यनियम रीत होतीच. पण आज नवीन तुकारामाचा अभंग मनापासून गावू लागलो. वल्लभा, लक्ष्मी, वल्लभा
जमेल तसे. मन प्रसन्न व आत्मिक शांतता मिळाली.
नऊ वाजले. रामायणपरत पाहणेचा योग आला. तीस वर्षा मागील गोष्टी आठवल्या. दोन्ही मुले आजोबा आजीच्या कुशीत
बसून रामायण पाहात. आजी हळूच एक एक घास नातीच्या व नातवाच्या मुखात घाली. त्यांना नावडता पदार्थ ही गोड लागत असे. आता
दोघेच रामायणपाहतो. पण त्या सुंदर आठवणीत केव्हाच तास निघून गेला कळलेच नाही.
माझे पुस्तकाचे कपाट उघडले, समोर ज्ञानभांडार उभे. आगळेवेगळे विश्व दर्शन झाले. शाळा कॉलेज पासूनचे दिवस आठवले.
त्या काळी वि.स.खांडेकर व ना.सी.फडके यांचा पगडा. त्यांची आवडती पुस्तके हारीने लावलेली. खालचा कप्पा पुं.ल. व अत्रे यांचा,
मधूनच व.पुं. काळे व श.ना.नवरे डोकावत. ही पुस्तके सभोवार फेर धरू लागली. परत मृतुंजयशिवाजी सावंत वाचू का रणजीत देसाई
स्वामीवाचू असे झाले. आता सावर रेप्रवीण दवणे वाचतोय. वाचनातून प्रगल्भता येते व मनाला उभारी येते. ययातीमधील
देवयानीची व्यथा तर मृतुंजयमधील राधेयाची व्यथा, ह्या व्यक्ती कधीच डोळ्या पुढून धूसर होत नाहीत. पुलंचा नारायण, अंतू बर्वा
विसरणे अशक्यच. ही यादी मोठीच. परत परत वाचण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यातून मलाही काही तरी नव लिहिण्याची स्फूर्ती जागृत
होते. मॉर्निग वॉकव साबणाची वडीअसे काही मी ही लिहित आहे.
खालच्या कप्प्यात एक बॉक्स होता. कुतूहल म्हणून उघडला, तर काय जुने फोटो. एका मागून एक पाहत बसलो. जुन्या
आठवणींचा गहिवर आला. ते काळे पांढरे असूनही सप्तरंगी स्वप्नात घेवून गेले.
किती वेळ गेला कळलेच नाही. मधून कधी सौ. स्वयंपाक करण्यास गेली हे समजले नाही. तिची हाक येताच पोटातील कावळे
कोकलु लागले. मस्त आरामात जेवण झाले.
अहाहा, दुपारची झोप, किती तरी वर्षा नंतर वामकुक्षी. चांगली दोन तास घ्यावी म्हंटलं पण ती कशी येणार. ह्या कुशी, त्या
कुशी, करत कसातरी अर्धा तास काढला.
अडगळीच्या खोलीतून कँरमबोर्ड काढला, धूळ झटकली, उलटा सुलटा करून पुसून घेतला. त्यानंतर त्याची पाउडर व त्या
पांढऱ्या, काळ्या चकत्या आणि महत्वाची राणी चकती, ती पण सापडली. चला, आता खेळू या. त्या बोर्ड वर एक लाईन दिसेल तर
शपथ. पट्टी व स्केच पेन घेवून रेषा मारल्या व ते गोल अधिक ठळक केले.
परत शोधाशोध कोणाची स्ट्रायकरची ( मारकुटयाची) हा आमचा बालपणीचा शब्द. सापडला एकदाचा त्या कपाटाच्या तळाशी.
गेम सुरु झाला. आता खाली बसून खेळणे झेपत नाही. मग बोर्ड टी-टेबलावर ठेवून खेळू लागलो. पूर्वीचे डावपेच आठवू लागले व जोरात
मारकुट्यास ढकलले. तो कसला, त्याने त्या राणी सकट भोकात उडी मारली. आणि काय, भोकाला जाळीच नव्हती. राणी जी पळाली ती
कोपऱ्यात जावून लपून बसली, मारकुट्या रुसून केरसुणीत लपून बसला. शोधण्यात चांगलाच वेळ गेला. खेळ थांबवून त्या बोर्डास उलटा
केला व चार भोकास पांढरे कापड ठिगळा सारखे ठोकून दिले. तेव्हा कुठे कँरम खेळ सुरु झाला. पण चहाची वेळ झाल्यामुळे उद्यावर
मोठा डाव टाकण्याचे ठरले.
आज चहा सौ. सोबत गप्पा मारत बिस्कीट चुऱ्या सोबत तास घालवला.
टी.व्ही. लावावा म्हणाव तर रिपीट प्रोग्रॅम, नकोच. तो पर्यंत सौ.ने पत्ते शोधून काढले. एक पत्ता कमी होता. एक जुनी जाड
पत्रिका, त्याच आकाराची कापून बदाम आठतयार झाला. खेळ चालू, तास भर छान गेला.
आज ठरवले होते, दररोज एका मित्राला वॉट्सअप वर गप्पा करावयाच्या, देशपांडेचा नंबर लागला. तो आपल्या समोरच आहे
असा आभास झाला, छान २०/२५ मिनिटे गप्पा झाल्या. तोही खुश मी ही खुश, बरे वाटले. विज्ञानाचा असा फायदा.
बातम्या ऐकत होतो, आणखीन काही दिवस स्थानबद्ध. असू दे. आपण नाही घाबरत, आपला छंद जोपासू.
सतारीची आठवण झाली. अधूनमधून तिला बोलती करत असे. पण आता तासभर तरी रियाज होतो. मनाला निर्भेळ, स्वर्गीय
आनंद मिळतो. ते वेगळेच विश्व आहे. त्यासाठी तरुणपणी सतार शिकण्यास वेळ द्यावा लागतो.
जुनी गाणी हा आमच्या पिढीचा विक पाँईट. नातवाने कारवानदिलाच आहे, पाच हजार गाणी, मराठी व हिंदी. अबब !.
आम्ही लहानपणी रेडीओवर ऐकून लिहून घेत होतो. मी एक ओळ, तर दुसरी ओळ माझा भाऊ. मग परत गाणे लागले की पडताळून
पाहणे वा गुणगुणने. तरी ही किती तरी गाणी पाठ आहेत.
अमेरिकेतील छोटया नातवाने एक माईक दिलाय. त्यावर केरोवकेम्हणजे गाण्याचे संगीत व आपला आवाज. अगदी आपणच गाणे
गातो असे वाटते, आपले कोणतेही आवडते गाणे. चला, एक दोन गाण्याचा मस्त सराव झाला. आता मित्रमंडळीत बाजी मारता येईल.
करता करता दिवस संपत आला. सौ. स्वयपाक घराकडे. मी, एकटा, आता काय करावे?. लिखाणाची वही काढली पण विषय
सुचेना. सारख कोरोना, कोरोनामग मीच मनाशी म्हणालो करो, ना. कोरोनावर एक छानसे काव्य सुचले. हे तुमच्या साठी सुद्धा.
रात्री अमेरिकेतील मुलाला वॉट्सअप वर पाहून समाधानाने निद्रिस्त झालो.