आरंभ - मराठी ई साहित्यातील नवे पर्व!
सर्व वाचक रसिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
आरंभ दिवाळी अंकाच्या निमित्ताने संपादकीय लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ…०१ जानेवारी २०१८ पासून मराठी रसिक वाचकांच्या भेटीला आलेल्या आपल्या लाडक्या आरंभ ई मासिकाचा प्रवास मी आपल्यासमोर थोडक्यात मांडणार आहे…
एका व्हाट्सएप ग्रुप वर मराठी भाषेच्या आजच्या परिस्थिती बद्दल मला आलेला मेसेज पाठवला होता, खरं तर कित्येक असे ग्रुप असतात, जिथे मेसेज वाचून दुर्लक्ष केलं जातं पण त्या मेसेज वर या ग्रुप वर खूप सखोल चर्चा अनेकांनी त्यांची मते मांडली…पण ही मते फक्त चर्चे इतपत मर्यादित राहिली नाहीत तर त्यातून अभिषेक सरांच्या पुढाकाराने bookstruck आणि अर्थ मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी ई साहित्यात एका नवीन आधुनिक ई मासिकाचा जन्म झाला…
मराठी भाषेच्या विकासासाठी भाषेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन दर्जेदार साहित्य उपलब्ध झाले पाहिजे तंत्रज्ञानात देखील आपण कुठेही कमी पडता काम नये या विचारातून मराठी भाषेत एक नवीन आधुनिक ई मासिक सुरू करण्याचा विचार पक्का झाला…अभिषेक सरांनी यासाठी पुढाकार घेतला जे मासिकासाठी काम करण्यासाठी इच्छुक होते आशा सर्वांची माहिती आणि अनुभव जाणून घेऊन सरांनी मासिकासाठी टीम बनवली व मासिकाच्या कामाला सुरुवात झाली…
मासिकासाठी काम करणारे आम्ही सर्वजण कधीच भेटलो नाही, आम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात राहतो प्रत्येकाचं, कार्यक्षेत्र देखील वेगळं आहे पण मराठी भाषेवरील प्रेम आणि त्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द यातूनच सर्वज एकत्र आलो आहोत आणि आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून मासिकासाठी काम करत आहोत…अभिषेक सर तर मासिकासाठी खूप मेहनत घेतात मासिकासाठी नवनवीन विषय निवडून नव्या साहित्यिकांना एक हक्कच व्यासपीठ उपलब्ध करून देतात…
आरंभ मासिकाच काम हे पूर्णपणे ऑनलाइन पध्दतीने चालत जे ई मेल च्या माध्यमातून होत व प्रत्येक साहित्याची नोंद ठेवली जाते साहित्यकाच्या कॉपीराईटची देखील पूर्णपणे काळजी घेतली जाते. प्रत्येक महिन्याला एक नवीन विषय निवडला जातो, विषयाची निवड करताना केवळ मनोरंजनच नव्हे तर चालू घडामोडी, त्या महिन्यातील विशेषता यांचा विचार करून विषय निवडला जातो ज्यावर आधारित साहित्य पाठवण्यासाठी ठराविक वेळ दिला जातो व सर्व अटी नियमानुसार आलेले साहित्य प्रुफरीडिंग नंतर प्रकाशित केले जाते.अभिषेक सरांचे संपादकीय, अरुण देशपांडे यांच्या कविता, सिद्धेश यांची व्यंगचित्र, मंजुषा सोनार यांच्या पाककृती आणि निमिष सोनार यांचे टीव्ही सिरियल, नाटक यावरील लेख याच वाचकांसाठी खास आकर्षण असत…नवीन अंक प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपल्या भेटीला येतो जो गुगल प्ले स्टोअर वर ई पुस्तक app स्वरूपात उपलब्ध होतो…
या मासिकाचा हा पहिला वहिला दिवाळी अंक आहे जो अनेक खमंग लेख,कविता या फराळाने परिपूर्ण आहे जो तुम्हा साहित्य रसिकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे…तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद!
आशिष अरुण कर्ले
व्यवस्थापकीय संपादक