समाज माध्यम आणि मी

समाज माध्यम आणि मी

सविता सुनिल कारंजकर, सातारा
९९२२८१४१४३

एकमेकांना ‘कनेक्ट’ करतात ती समाज माध्यमे. फेसबुक,वाट्सप,इन्स्ताग्रम,ट्विटर,ब्लॉग या समाजमाध्यमांमधून आपण म्हणजे सर्वच स्तरातील लोक व्यक्त होऊ शकतात. वस्तुतः आपल्याला व्यक्त होण्याकरताच ही माध्यमे निर्माण झाली आहेत.अन्न,वस्त्र,निवारा या जशा मानवाच्या मुलभूत गरजा आहेत तशीच ‘अभिव्यक्ती’ ही मानवाची प्राथमिक गरज आहे. जी माणसे व्यक्त होऊ शकत नाहीत त्यांची मानसिक,शारीरिक वाढ खुरटते,मानसिक आजारांना ते बळी पडतात. मग अशांपैकी काहीजण डॉल्बीसमोर नाचाच्या नावाखाली चित्रविचित्र अंगविक्षेप करतात हे झालं अभिव्यक्तीचं विकृत स्वरुप.

पण अभिव्यक्तीची गरज समाज माध्यमांनी पूर्ण केली. या माध्यमांमधून लोक व्यक्त होऊ लागले,आपली मते मांडू लागले.परिचय नसतानाही अनेक मित्र मिळू लागले,त्यांचा एक परिवार तयार झाला.समान आवडी-निवडी असणारांचे गट तयार झाले.सगळ जग जवळ आलं कारण या माध्यमांमध्ये सगळ्याच प्रादेशिक भाषेत बोलता येते.या माध्यमांमुळे जे लोक पुस्तके वाचत नाहीत त्यांच्या ज्ञानात भर पडते.भाषा संवर्धनाकरताही या माध्यमांचा चांगला वापर होतो,तसेच अनेक व्यक्ती,संस्था,समाज आणि देशाला आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक तसच राजकीय क्षेत्रात समृद्ध होता आलं.या माध्यमांच्या सकारात्मक वापरामुळे कोणत्याही देशची एकता,अखंडता,धर्मनिरपेक्षता यामध्ये समृद्धताच आली आहे मग ते भ्रष्टाचारविरोधी अभियान असो,सामाजिक प्रश्न असोत,स्वच्छता अभियान असो अथवा जनजागृती अभियान. हे आहेत समाजमाध्यमांचे फ़ायदे.

पण कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात वापरली तरच फायदेशीर ठरते.अन्न अतिप्रमाणात खाल्लेअसता विषच ठरते..तसेच बंदूक पहारेकऱ्याकडे ही असते आणि गुंडाकडेही.जसा वापर तसे त्याचे फायदे.आज आपण जी समाजमाध्यमे वापरतोय त्याला १० ते १५ वर्षे झाली पण त्यांचा वापर मात्र विघातक कारणांसाठीच जास्त प्रमाणात होताना दिसतोय .समाज माध्यमांवर जातवार ,धर्मवार गट पडले,अफवा पसरवणे,लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे,चिथावणे,चिडवणे हेच या माध्यमातून जास्त प्रमाणात केलं जातंय.आपला देश बहुसांस्कृतिक,बहुभाषिक,बहुजातीय आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा आहे.युरोपियन राष्ट्रवादापेक्षा वेगळा असा राष्ट्रवाद असलेला हा देश,पण या संस्कृतीला,या संकल्पनेला समाज माध्यमे धक्का देत आहेत.त्यामुळे ‘मी भारतीय आहे’ या भावनेपेक्षा मी ठराविक जातीचा,ठराविक धर्माचा आहे ही विभक्त्पणाची जाणीव जास्त बळावते आहे. सगळेच कंपूशाहीकडे वळले आहेत.हा समाज माध्यमांचा महत्वाचा तोटा ..भारताच्या दृष्टीने .

वैयक्तिक पातळीवर पाहिले असता ही समाज माध्यमे वापरणारे आपण प्रत्येक जण यात च गुंतलेलो असतो .आपण आपला अतोनात वेळ यामध्ये घालवतो .पूर्वी घरच्या शुभ कार्याचे निमंत्रण घरोघरी जाऊन दिले जायचे त्यात स्नेह होता ,ओलावा होता ती पद्धत ही आता नष्ट होत चाललीय .फेसबुकवर असंख्य मित्र असलेल्या लोकांना प्रत्यक्षात मात्र एखादाच जवळचा मित्र अभावाने असतो.सातासमुद्रापलीकडे असलेल्या फेसबुक फ्रेंडने नाश्ता काय घेतला याची आपण रोज चवीने चर्चा करत असतो त्याच वेळी आपल्या शेजारच्या उंबरठ्याच्या आत झालेलं मयत आपल्याला माहिती नसत.ही भयानक विसंगती आहे.आपल्या प्रत्येक हालचालींचे फोटो ‘अपलोड ‘ करण्यात आपला बराचसा वेळ आपण निरर्थक वाया घालवतो.

या माध्यमांवर जी माहिती येते त्या माहितीची सत्यासत्यता न करताच आपण बरेचदा ती ग्राह्य धरून पुढे ढकलतो.पण त्याचा समाजमनावर काय दुष्परिणाम होणार आहे याचा विचार करण्याची सदसदविवेकबुद्धी आपण हरवून बसलो या सामाजमाध्यामांमुळे जग जवळ आलं हे खरे आहे पण माणूस मात्र माणसापासून दुरावत चाललाय हेही तितकंच खरं.या आभासी जगात,स्वप्नरंजनात माणूस रंगला आणि त्याची उत्पादन क्षमता,सृजनशक्ती साचून राहिली.

आपले पूर्वज अवजड कामे स्वतः करत होते,कष्टाची कामे ते हाताने करायचे. ती कामे करत असताना त्यांनी कोणती कौशल्ये वापरली असतील,कोणते तंत्रज्ञान वापरले असेल याचा आपल्याला अंदाजही येत नाही.उदाहरणच द्यायचे झाले तर इसविसनापूर्वीचे आपल्यासाठी नवलाचे आहेत.ते कसे बांधले,त्यासाठी वापरलेले दगड कोठून आणले हे काही केल्या कळत नाही.जसजशी उत्क्रांती होत गेली त्या उत्क्रांतीच्या प्रत्येक अवस्थेत माणूस बदलत गेला आणि कौशल्ये मागे पडत गेली कारण त्याच्या मदतीला यंत्रे आली.कॅल्क्यूलेटर आला आणि अडीचकी पावकीची मजा गेली,टीवी आला आणि निसर्ग सहलींचं प्रमाण कमी झालं.त्यामुळे माणुसकीचा ऱ्हास होत गेला. आता इथून पुढे माणसाची जागा यंत्र घेणार असे लेख प्रसिद्ध होऊ लागले.बिनशिक्षकी शाळा,इमारतीशिवाय बँकां,शिवाय ड्रायवरची जागाही यंत्रच घेणार.मग माणूस करणार काय? हृदयाचे ठोके मोजणारी त्वचा आली,हळू-हळू एकामागून एक अवयव बाहेरून येऊ लागले,माणसाशी मिळते-जुळते रोबो तयार झाले,माहिती आणि ज्ञान आता इंजेक्शनने टोचून घेता येतंय कारण मेंदूचा कुठला कप्पा काय काम करतो हे माणसाला समजलंय.खरतर प्रगती विज्ञानाची झालीये आणि माणसाची मात्र अधोगती झालीये.मग माणूस आणि मशीन यांचं एकत्रीकरण होऊन जे बनेल (क्लोन) त्याला ‘साईबोर्ग’ म्हणतात.

सातत्याने संगणक,मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसून बसलेली माणसाची मूर्ती तोच साईबोर्गचा अवतार आहे.

जेव्हा मी स्वतः या माध्यमांचा अतिरेकी वापर करते,तेव्हा मलाच वाटते, आपण साईबोर्ग होऊ का? आपण माणूस राहू का?अंतर्मुख होऊन मी या सगळ्याचा विचार करते.मला हे सगळे गुण,दोष,तोटे दिसतात .त्याबद्दल मी जागरुकदेखील आहे .त्यामुळे काही समुहातून मी बाहेर पडले.कोणताही संदेश,माहिती पुढे ढकलताना त्याची सत्यासत्यता मी पडताळून पाहते,अतिशय काळजीपूर्वक वापर मी या माध्यमांचा करते.माझ्या मित्रमैत्रिणींना,नातेवाईकांना देखील तसे करण्यास प्रवृत्त करतेच.ही समाज माध्यमे वापरताना कितीही काळजीपूर्वक वापरली,दक्षता घेतली तरीही बरेचदा अतिरेकी वापर होतोच.कळतंय पण वळत नाही अशी अवस्था सतत होते कारण ही नशा आहे,व्यसन आहे.दारू,सिगारेट अशी इतर कोणतंही व्यसन नसलेली माणसे केवळ समाज माध्यमाचे व्यसन सोडवायला व्यसनमुक्ती केंद्रात मोठ्या संख्येने दाखल होताना दिसतात.अगदी तळागाळातील माणसे व्हाट्सप वापरतात,मध्यम वर्गातील माणसे फेसबुक वापरतात आणि राजकिय पुढारी,कलाकार,खेळाडू ट्वीटर वापरतात.पण ट्वीटरवरची या उच्चभ्रू लोकांची वादग्रस्त विधानं पाहता सामान्य लोक आणि बुद्धिवादी लोक यांच्यातील बौद्धिक भेदाभेद मिटल्याचेच जाणवत राहते.अशी वादग्रस्त विधानं करताना ती योग्य कि अयोग्य ,हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारणे विसरलोय आणि खरोखर जेव्हा ही बुद्धी संपेल तेव्हा अराजक माजणारच हे नक्की.

हे अराजक टाळण्यासाठी मी काय करायला हवंय?मला हे जमेल का?हे प्रश्न जेव्हा मी स्वतः लाच विचारले तेव्हा अंतरंगातून ‘नाही’असे उत्तर आले…..मग मी नाराज झाले आणि बालपणीच्या काळात गेले.

आमच्या बालपणी आम्ही भावंडाना,नातलगांना,स्नेही जणांना पत्र लिहून क्षेमकुशल विचारायचो,कळवायचो..पत्र लिहिताना सप्रेम नमस्कार,वि.वि.,थोरांस नमस्कार,लहानांस आशीर्वाद हे लिहिताना,वाचताना त्यात ओलावा जाणवायचा,आपल्या लोकांचा मायेचा स्पर्श जाणवायचा .तीही अभिव्यक्तीच होती की..पण आपण तिकडे दुर्लक्ष केलं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पिल्ले असलेली ही समाज माध्यमे म्हणजेच व्यक्त होण्याच मध्यम अशी स्वतःची समजूत घालत गेलो.या समाज माध्यमांना आपण बळी पडत गेलो,त्यांच्या आहारी गेलो.अनेक शारीरिक तसेच मानसिक आजार आपल्या जवळ बाळगू लागलो.आणि आता ही समाज माध्यमे म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय ‘ अशी अवस्था होऊन बसलीय.

अभिव्यक्तीचा आनंद तर मिळाला पण या समाज माध्यमांचा आणि आमचा हा प्रवास आम्हाला कुठे घेऊन जाणार,हे शोधण्याचा विचार करतेय,त्याच्या दुष्परिणामांपासून दूर पळण्याचि केविलवाणी धडपड करतेय.याच विषयावर मार्ग शोधण्यासाठी खटाटोप करतेय आणि चाचपडतच या लिखाणाचा शेवट करते.


comments powered by Disqus