दिवाळी

दिवाळी

कु . प्रिया प्रकाश निकुम
नाशिक, ७८७५०४०८२४
ईमेल - priyanikum@gmail.com

“आकाश कंदिल लागले दारांत, उजळल्या ज्योती दीप अंगणांत
सडा सन्मार्जने सजल्या अंगणी, आली आली आली सणांची ही राणी”

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरु आहे. दिवाळी, अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. असं म्हणतात कि, दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खुपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. रात्रीच्या अंधाराला चीरवून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याचे प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोत्सव. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धी च्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढुन पणत्या लावतात. प्राचीन साहित्यात या रात्रीचे वर्णन ‘यक्षरात्री’ असे आहे.

या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुटी असते.दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो.दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.ह्या सणाची सुरुवात तशी कराष्टमी पासून झालेली असते पण वसुबारसेपासून ते भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.

सर्व आबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्धा सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा. धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली,तो हा दिवस, दुष्टाचा नाश आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. आश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. आश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.

कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छा पत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात. म्हणूनंच, सगळ्या सण, उत्सवामध्ये दिवाळीचा थाट काही वेगळाच असतो. स्वतः जळुन अंधाराचा कोपरा न् कोपरा उजळत जाणं. हा प्रकाशाचा धर्म असल्यामुळे जगात अंधार तर उरतच नाही. पण, त्याचबरोबर दुख,दैन्य,वेदना हे सुध्दा उरत नाही. ओळीत लावलेल्या प्रत्येक दिव्यातुन तेजाच्या असंख्य शलाका बाहेर पडुन त्या शलाकांनी सारं जीवन तेजोमय चैतन्यमय होऊन जात. म्हणुनचं जगाला चैतन्याचा प्रकाश देण्यासाठी दिवाचं नको व्हायला, त्याची एक शलाका होता आलं तरी सुध्दा पुरे हाच संदेश प्रत्येक दिव्यातुन येत असावा. कारण,दिवाळी हा सण असतोच असा सगळं काही उजाळुन नैराश्य झटकण्याचा. म्हणुन, जेव्हा दिवाळी वाजत गाजत येऊन माहेरवाशीण सारखी चारदिवस घर पाहते आणि जेव्हा तीला घरातील माणसं, त्यांचे प्रेम हे सार जर तीला आवडलं तर तिथेचं रमते. आणि चार दिवसात परत जायचं विसरुन त्या घरातचं कायम वास्तव्य करते आणि मग वर्षभर दिवाळी साजरी होत असते.


comments powered by Disqus