संपादकीय

संपादकीय

फेब्रुवारी महिन्यापासून मी आरंभचा संपादक झालो. हे माझे दुसरे संपादकीय. आरंभच्या मार्च अंकाच्या प्रवासवर्णन भाग 2 ची तयारी सुरू असतानाच नुकतीच एक बातमी येऊन धडकली. 14 फेब्रुवारीला काश्मीर मधील पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्याची. खूपच वाईट वाटले. आरंभ टीमतर्फे मी सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असलेल्या व्यक्तींना, संघटनेला आणि देशांना योग्य तो कायमचा धडा लवकरच शिकवला जाईल असा आशावाद बाळगतो. सरकार, सर्व पक्ष व लष्कर एकजूटीने दहशतवादाचा सामना करण्यास नक्की पूर्ण समर्थ आहेत. देशातील करोडो लोक त्यांच्या पाठीशी आहेतच. आरंभ मासिकाच्या टीम मधील अक्षर प्रभू देसाई यांनी मित्रांसह आरंभ टीम तर्फे या हल्ल्याचा कॅलिफोर्निया येथील सॅन होजे येथे निषेध केला. या लेखाच्या शेवटी तुम्ही ते फोटो पाहू शकता.

प्रवासवर्णनच्या मार्च अंकासाठी नेहमीप्रमाणेच लेखकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. मागच्या अंकाप्रमाणेच या अंकात सुद्धा आपल्याला खुसखुशीत शैलीत आणि माहितीपूर्ण अशी प्रवासवर्णने वाचायला मिळणार आहेतच. खरेतर शब्दश: प्रवासवर्णन म्हटलं तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आलेले अनुभव. असे शब्दशः “प्रवास वर्णन” आपल्याला या अंकात वाचायला मिळतीलच. पण प्रवासवर्णन या शब्दाचा अर्थ अर्थातच व्यापक आहे ज्यात आपण प्रवास करून पाहिलेल्या एखाद्या विशिष्ट निसर्गरम्य ठिकाणाचे किंवा वास्तूचे वर्णन करत असतो म्हणजे एका अर्थाने ते झाले स्थलदर्शन.

या अंकात आपल्याला लडाख, मनाली, केरळ, भूतान, भाजे लेणी, कोकण, पंढरपूर, बेंगलोर येथील ओरियन मॉल, इस्कॉन मंदिर, म्हैसूर दर्शन ही प्रवासवर्णने आणि चायनीज व्हेज मंचुरियन ही रेसिपी वाचायला मिळेल तसेच तसेच कलादालनात स्केचेस व व्यंगचित्रे बघायला मिळतील. या अंकापासून किरण दहिवदकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली “भावस्पर्शी व्यक्तिचित्र” ही लेखमाला सुरु करत आहोत त्यातील पहिले पुष्प कसे वाटले ते जरूर कळवा. हा अंक कसा वाटला ते खाली दिलेल्या ईमेल आयडी वर जरूर जरूर कळवा. लेखकाला डायरेक्ट त्याच्या ईमेल आयडीवर लेख आवडल्याची प्रतिक्रिया द्यायची असल्यास त्याच मेलच्या CC मध्ये आरंभ मासिकाचा ईमेल आयडी सुद्धा असावा. निवडक प्रतिक्रिया आम्ही पुढच्या अंकात समाविष्ट करू! (aarambhmasik@gmail.com)

  • निमिष सोनार,
    संपादक, आरंभ (लिहिते व्हा, व्यक्त होत रहा!)