अशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन
“राकट देशा,कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा..अंजन,कांचन, चिनार, बकुळ, फुलांच्या…..”
हे कवी गोविंदाग्रजांनी केलेले वर्णन निसर्गाच्या समृद्धीने नटलेल्या पाईन, देवदारवृक्षाच्या, दऱ्या, डोंगरांनी वेढलेल्या, खळाळत्या नद्यांनी गुंजनाऱ्या कुलु-मनालीलाही तंतोतंत लागू होते. साधारण पंचवीस वर्षापूर्वी मनालीला जाण्यासाठी निघालो.
दिल्ली पर्यंतचा प्रवास रेल्वेने ए.सी. मधून प्रथमच प्रवास करीत असल्यामुळे डब्यात पाय ठेवताक्षणीच थंडगार हवेने अंगावर सुखद रोमांच उभे राहिले. काही क्षण डब्यातील लोकांचे निरीक्षण करण्यात गेले. पण एक दीड तासातच कंटाळा यायला लागला. कारण नेहमीच्या जनरल डब्यातील जागेसाठी करावा लागणारा संघर्ष, भांडण, तसच गट्टी जमल्यावर एकमेकांच्या पदार्थांची चव चाखून विचारपूस करुन दाखविलेला जिव्हाळा, आपुलकी व मैत्रीची मजा या डब्यात नव्हती. जो तो कसा आपल्या आखीव विश्वातच मशगुल. माणसाला नेहमी संघर्ष, तडजोड करण्याची सवय पडली की सहज मिळालेलं सुखही मिळमिळीत वाटतं.
या विचारांच्या गर्दीतून बाहेर यायला दिल्ली स्टेशन आले. मनालीकडे प्रयाण करतांना सिमल्याजवळ घोडेस्वारी साठी स्पाँट लागतो. एखाद्या तासासाठी का होईना पण घोड्यावर बसल्यावर झाशीची राणी असल्याचा भास झाला. भलेही हातात तलवारी ऐवजी आपण पडणार तर नाही ह्या भीतीने गच्च आवळलेले लगाम का असेना.
त्याच आनंदात पुढे निघालो. रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या अवाढव्य डोंगराच्या रांगा, त्यात देवदार, पाईन वृक्षांची गर्दी. मधे वाहणारी व्यास नदी आणि त्यात त्यात असणाऱ्या तेवढ्याच अवाढव्य पांढऱ्या, काळ्या गुळगुळीत शीळा, दगड. म्हणायला नाव किती रुक्ष पण त्या दगडातही किती सौंदर्य असते.मला तर त्या एखादे स्थितप्रज्ञ साधूपुरुषच भासले.
निसर्गाने हातचे काहीही राखून न ठेवता केलेली रंगांची मुक्त उधळण पाहतांना हा रस्ता संपूच नये अस वाटतं. कुणीही सोबतीला नसलं तरी काही अडत नाही. एकच भाव असतो फक्त निसर्गाशी एकरूप होण्याचा. मधेच हनुमानाचे वंशज भेटले. समोर चालणाऱ्या एका मुलाच्या पारदर्शक बँग मधील फुटाण्याची पुडी त्याला दिसताच पटकन झडप घालून ती बँग पळविली व पुडी काढून बॅग दरीला अर्पण केली. बिचारा, त्या मुलाचा कँमेरा, वा्कमन सारं गेलं. ते पाहून त्या मुलाची किव ही आली व आपण वाचलो म्हणून मतलबी आनंद ही झाला. हे त्या वानराने बहुतेक पाहिले असावे.चार पाच पावलं चालली नाही तोच एकाने क्षणात माझ्या पर्सवर झडप घातली. क्षणभर मी खूप घाबरले.पण बँग गच्च हातात धरून ठेवली. हा प्रसंग खालून ह्यांनी पाहिला व ओरडले बँग सोडून दे. पण त्यात असणाऱ्या हजार दोन हजाराचा मोह मला सोडवत नव्हता. मी पर्स घट्ट धरून ठेवली. शेवटी ‘चमडी जाय पर दमडी ना जाय’ ह्या माणसाच्या प्रवृत्तीची त्या माकडालाच कगव आली असावी, त्याने हार मानली आणि बेल्ट तुटण्यावरच निभावले.
गजबवलेल्या वातावरणापेक्षा संपूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असलेली जुनी मनाली मुक्कामासाठी निवडली. ह्या भागात फाँरेनर्सच जास्त. त्यामुळे विदेशात आलो की काय असा भास होतो. बाकी ह्या लोकांचा अतिस्वैराचार सोडला तर त्यांचे देशप्रेम, जिद्द, धडाडी जग एकट्याने फिरण्याची आवड हे गुण घेण्यासारखे आहेत. जोडीला समोरच खळखळून वाहणारी व्यास नदी सारखी खुणावत असते. पण शाँपींगचाही मोह असल्याने पाय आधी तिकडे वळले. मार्केट बऱ्यापैकी मोठे आहे. त्यातच इथल्या प्रामाणिकपणाच उदाहरण पाहण्यास मिळाले. संपूर्ण दिवस आम्ही मार्केट मधे फिरत होतो, तेव्हा लक्षात आले एक दुकान सकाळपासून उघडे आहे पण त्यात दुकानाचा मालक नव्हता. सहज बाजूच्या दुकानात चौकशी केली तर कळलं घरी कुणीतरी आजारी पडले म्हणून तो गेला पण उद्या पर्यंत जरी दुकान उघडे राहिले तरीही एकही वस्तू चोरीला जाणार नाही. ऐकून आश्चर्य वाटले व डोळ्यासमोर पटकन आपल्या कडले दृश्य आले.
दिवसभर फिरुन दमलो असलो तरी रात्री व्यास नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसलो. दिवसा प्रसन्न काहीशी अवखळ वाटणारी ही नदी चढत्या निवांत रात्री मात्र रौद्ररूपामुळे काहीशी गूढ भासते. तिच्याकडे पाहतांना मनाच्या कोपऱ्यात एक वेगळीच उदासीनता व्यापते. ना मृत्यूची भीती असते ना जगण्याची आसक्ती. सगळं भरुन पावल्याची एक वेगळीच समाधानाची अनुभूती येते. माणूस खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ होतो.
मनालीपासून थोड्याच अंतरावर रोहतांग आहे. इथे पाय ठेवताक्षणीच प्रत्यक्षात स्वर्गात आल्याचाच भास होतो.पृथ्वीवरच एवढा सुंदर स्वर्ग असतांना लोक न पाहिलेल्या स्वर्गासाठी ऐवढे व्याकूळ का होतात कळत नाही. मोठमोठ्या हिमाच्छादित गगनचुंबी एकमेकांशी निरामय स्पर्धा करणाऱ्या पर्वताच्या रांगा.
सूर्याच्या कोवळ्या किरणात तळपणारी त्यांची शिखरे बघून आपल्या नकळतच दोन्ही कर त्याला मानवंदना देतात. आणि ह्याला देवभूमी म्हणून दिलेले न व किती सार्थ आहे ते जाणवते.
‘देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधियेल्या’
याची प्रचीती येते व नकळत पावले वर चालू लागली.आठदहा पावले चाललो नाहीतर लगेच दम लागला.तेवढ्यात बर्फात गाडीतून नेणारे आले व बसायचा आग्रह करु लागले. पण नुसत चालल्यानेच जर आपल्याला एवढी धाप लागली तर आपल्याला ओढताना यांचे काय हाल होईल ह्या कल्पनेने नाही म्हटले.पण त्यांना कदाचित आमचा भाव कळला आणि म्हणाले अरे,आप लोग ऐसा सोचोगे तो हमारा पेट कैसा चलेगा?आणि आमची ट्यूब पेटली. आग्रहाखातर गाडीत बसलो खंर पण थोड पुढे गेल्यावर त्यांना लागणारा उर फोडणारा श्वास पाहून त्यांचे ठरवलेले पैसे देऊन परत पाठविले. अशा वेळी त्यांच्या श्रमाची किंमत करु नये.एक शांत जागा पाहून एका बर्फाच्या ढीगावर निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत बसलो.एवढ्या लांबवर असूनही एका काँफीवाल्याची नजर आमच्यावर पडलीच व तो बिचारा एवढ्यावर आमच्याकडे चालून आला व काँफी घेण्याचा आग्रह केला. मी चहा काँफी काहीच घेत नसे. त्यामुळे ह्यांनी स्वतःसाठी घेतली.
ते बघून तो म्हणाला मँडमजी ऐसे मोसम में साहब क्या अकेले काँफी पीयेंगे? उन्हे आप कंपनी नहीं दोगी तो और कौन देगा।असे वाटले की ह्यात याचा चार दोन रुपये कमवायचा हेतू नाहीतर यशस्वी संसाराच गमक च तो मला सुचवीत होता. खरंतर थंडीने मी ही अकडले होते. काहीतरी गरमागरम पोटात घालावेसे वाटत होते. ह्या सगळ्यामुळे त्याचा प्रेमाचा आग्रह मला मोडता नाही आला. अजूनही जेव्हा मी थंड प्रदेशात जाते तेव्हाच काँफी घेते त्यावेळी चेहरा आठवत नाही आता पण त्याचा प्रेमळ आग्रह रुंजी घालतो.
काँफीचा आनंद घेत असतांना अचानक समोरून लष्कराच्या गाड्या लेहकडे जातांना दिसल्या आणि माझे आकाशाला गवसणी घालणारे मन धाडकन जमिनीवर आले.
ज्यांच्या जीवावर आम्ही मुक्तपणे पर्यटनाचा आनंद लुटत होतो ते मात्र आपल्या मुलं बायका, घरादारापासून दूर ह्या हाड गोठवनाऱ्या थंडीत आपले कर्तव्य निभावत होते. भावविवश होऊन दिलेली मानवंदना त्यांनी सौम्य स्मित करुन स्विकारली. पण जवळ असलेल फराळाचं घेणं मात्र त्यांनी नम्रपणे नाकारले. केवढा हा संयम,त्याग आणि शिस्त.
नंतर मणिकरणला जातांना निसर्गच सोबतीला. पण प्रत्येक ठिकाणचे रुप आपल्याला वेगवेगळे संदेश देनारे.व्या स नदीतील प्रचंड शिळा सुखदुःखातही स्थितप्रज्ञ राहा सांगणाऱ्या तर आकाशाला गवसनी घालणारे पर्वत माणस ला त्याच्या खूज्या हंकाराची जाणीव करून देतात. तर मणीकरणचा हिरवागार निसर्ग फिनिक्स पक्षाप्रमाणे उडण्याची प्रेरणा देतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे तुकारामांनी उगाच नाही म्हटले. इथल्या थंड बर्फाळ वातावरणात झाडाझुडुपांनी तग धरावा म्हणून तेथील पानाफुलांची रचनाही त्या वातावरणाशी अनुकूल आहे. सुळेदार पाने व उलटी रचना असणारी लाकडासारखी दिसणारी पाईनची फुले.त्यावर बर्फ पडला तरी खाली निसटतो व त्यांना इजा पोहचत नाही.प्राण्यांही दाट केसाळ कातडीची. तसेच उपकाराची फेड अपकाराने करणाऱ्या निष्ठूर मानवासाठी सुद्धा जीवघेण्या थंडीत जगणं सुसह्य व्हावं म्हणून उकळत्या पाण्याचे कुंड निर्माण केले. खंरतर ह्या निसर्गाची थोरवी शब्दातीत आहे. ह्या सर्व भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतांनाच आमचा इथला मुक्काम स़पण्याची चिन्हे दिसायला लागली,परतीला निघालो तेव्हा माझी स्थिती ‘कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाहे’ अशी झाली होती. आज परत मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या त्या आठवणी लिहीताना मन परत मनाली भोवती पिंगा घालत आहे. ‘अशी ही मनाली खूप खूप भावली’.
लेखिकाद्वय: रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन
ईमेल: rita.joharapurkar@gmail.com