स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी! - विक्रम अरने

स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी! - विक्रम अरने

स्पर्धा परीक्षा व त्यांच्या अभ्यासाची तयारी पदवीच्या सुरुवातीच्या वर्षा पासूनच क्रमाक्रमाने करणे आज खूपच गरजेचे आहे. कारण आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व त्यांच्या अभ्यासासाठी दिवस-रात्र एक करणारे, यांची स्पर्धा ही परस्परांशी सुरू आहे.

आज स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे तो म्हणजे हा अभ्यास मी खरेच माझ्या मनाला वाटत आहे म्हणून मी करत आहे का? यातील यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेण्याची माझी शारीरिक आणि मानसिक तयारी झालेली आहे का? आणि जर या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तरच या आव्हानांचा सामना करावयास सज्ज व्हावे आणि अशातही या परीक्षांचा काटेकोरपणे नियोजन करून अभ्यास जरी केला तरी यश मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे आपण निराश न होता प्रयत्न करतच राहावे.

स्वतःवर विश्वास ठेवून आपण यशस्वी होण्यासाठी आणखी कशा प्रकारे आपल्या अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास तज्ञांची मदत घ्यावी. विशेष संदर्भ पुस्तकांचा, नियमित पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा.

स्पर्धा परीक्षांमधून काय मिळणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. तर एक सामान्य व खरे उत्तर म्हणजे सरकारी अशी कायम स्वरूपाची नोकरी तसेच त्या शासकीय नोकरी बरोबर मिळणारा मानमरातब व रुबाब. केंद्र शासनाच्या यू.पी.एस.सी. व राज्य शासनाच्या एम.पी.एस.सी च्या वर्ग-1 च्या पदावर निवड झाल्यास मिळणारा अधिकारी पदाचा दर्जा, लाल दिव्याच्या गाडीचे असणारे आकर्षण, दिमतीला असणारा कनिष्ठ अधिकारी व सेवक वर्ग, प्रशासनातील प्रत्येक निर्णय घेण्यात असणारा आपला सहभाग, आपल्या निर्णयाला असणारे महत्त्व या सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण यशस्वीपणे पूर्ण केल्यास मिळू शकतात.

आता पुढची तयारी म्हणजे वरील परिच्छेदात जे काय सांगितले आहे ते सर्व मिळण्यासाठी एक विद्यार्थी म्हणून काय व कशी तयारी करावी लागेल.

तर अशा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दैनिक कार्यक्रमाचे नियोजन करावयास हवे. ज्यात आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय व कसा अभ्यास करावा याचे तंत्रशुद्ध वेळापत्रक करावयास हवे. त्या वेळापत्रकाचा काटेकोरपणे पाठपुरावाही करावयास हवा. कदाचित सुरुवातीचे काही दिवस या सवयींचे नियमन व पालन करणे आणि स्वतःला समजावणे हे खूप अवघड वाटेल परंतु या सर्व गोष्टींवर मात करून जर आपण हे सर्व पालन करायचेच असा दृढनिश्चय करून स्पर्धा परीक्षेत मी काही झाले तरी यशस्वी होणारच ही खूणगाठ मनाशी पक्की बांधण्यात यशस्वी झालात तर तुमच्या स्पर्धा परीक्षेतील अर्ध्या विजयाची खात्री येथेच मिळालेली असते. उर्वरित यश हे तुम्हाला तुमच्या या अभ्यासाच्या सहाय्याने मिळणार असते!

उदाहरण सांगायचे झाल्यास:

समजा, एकदा एक महाविद्यालयाची मुलगी तिची स्कुटी गाडी घेऊन महाविद्यालयाला निघालेली असते.

महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा? या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केलेले असते. ती मुलगी महाविद्यालयात येते त्या व्याख्यानास उपस्थित राहते व ती खूप भारावून जाते. आपणही स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी व्हावे असे ती मनाशी ठरवते. तसेच खूप मन लावून दिवस रात्र एक करून अभ्यास करायचा असा ठाम निर्णय ती घेते. व्याख्यान सुटल्यानंतर भारावलेल्या अवस्थेतच ती तिच्या उर्वरित तासांना उपस्थित राहते व महाविद्यालय संपल्यानंतर ती घरी येण्यास निघते.

ती मोठ्या ऐटीत पार्किंग मधली आपली स्कुटी गाडी काढते. तिला आता तिची स्कुटी गाडी म्हणजे जणू लाल दिव्याची गाडीच वाटू लागलेली असते तसेच तिची गाडी पार्किंग गेट मधून सोडणारा चौकीदार हा एखाद्या अधिकाऱ्यास सॅल्युट ठोकणाऱ्या सेवेकऱ्यासारखा वाटू लागलेला असतो.

ती गाडी घेऊन घराच्या दिशेने निघते. परंतु दोन अडीच किलोमीटर गेल्यावर तिची गाडी रस्त्यातच बंद पडते ती गाडी पुन्हा सुरू करण्याचा खूप प्रयत्न करते. परंतु काही केल्या गाडी सुरू होत नाही. ती निराश होते ती डिक्की खोलून टूलकिट बाहेर काढते. काही करता येईल याची चाचपणी करते की जेणेकरून आपली गाडी सुरू होईल व आपण लवकर घरी जाऊ. पण तिच्या पदरी निराशाच येते.

तिची हतबलता पाहून आसपासचे नागरिक तिला सांगतात पुढे शंभर मीटरच्या अंतरावर एक गॅरेज आहे गाडी घेऊन तिथे जा. तिला बरे वाटते ती त्वरित या ठिकाणी गाडी ढकलत घेऊन पोहचते. मेकॅनिक हातातले काम सोडून तिच्या गाडी जवळ येतो तिच्याकडे गाडीला काय झाले याची विचारपूस करतो, थोडावेळ गाडीकडे पाहतो मग आपली अवजारे आणतो व इंजिन जवळ त्याच्याजवळ असणाऱ्या हातोड्याने अंदाज घेऊन एक हलकासा प्रहार करतो व त्या मुलीला म्हणतो “ताई , चावी ऑन करून स्टार्टर द्या व गाडी स्टार्ट करा.”

ती मुलगी स्वतःशीच म्हणते काय वेडा आहे का हा? मी तासभर प्रयत्न करत होते तरी गाडी सुरू नाही झाली आणि हा शहाणा एकच हथोडी मारून म्हणतोय करा सुरू.

तिने नाईलाजानेच गाडीला चावी लावून स्टार्टर ऑन केला आणि काय आश्चर्य!

गाडी क्षणात सुरू झालेली होती. तिने मेकॅनिकला धन्यवाद दिले व सकाळच्या असणाऱ्या तोऱ्यात तिने विचारले ,

“दादा, किती पैसे झाले?”

यावर मेकॅनिक तितकाच नम्रपणे म्हणाला “ताई ,एक हजार रुपये झाले.”

त्यावर ती मुलगी क्षणभर उडालीच. म्हणाली ,

“अहो तेवढा एकच हाथोडा मारायचे एक हजार रुपये? वेड लागल आहे की काय ? मला सांगायचे मी मारला असता”

तिच्या या आवेशावरही जराही संयम ढळू न देता तो मेकॅनिक उत्तरला.

“ताई, हातोडा मारायचा तर मी केवळ एकच रुपये घेतला आहे पण बाकीचे नऊशे नव्याण्णव रुपये हे मात्र मी हातोडा कुठे मारायचा याचे घेतलेत!”

यावर ती मुलगी ओशाळवाणे होऊन निमूटपणे एक हजार रुपये त्या मेकॅनिकच्या हातावर ठेवून आपल्या घराच्या दिशेने गाडी घेऊन निघून गेली.

वरील उदाहरणात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने सांगायचे तात्पर्य एवढेच की आपण जो अभ्यासक्रम निवडला आहे त्याचा अभ्यास नेमका असायला हवा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण जीवनात सर्वजण करत असतो परंतु नेमका अभ्यास कसा करावा? कोणती पुस्तके व प्रकाशने यांचा संदर्भ घ्यावा? कोणाचे मार्गदर्शन घ्यावे? या सर्व प्रश्नांची नेमकी आणि अचूक उत्तरे मिळाली तरच आपल्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा राजमार्ग खुला होईल यात मात्र शंका नाही.

भारतीय परंपरेत म्हटले आहे की ‘न ही ज्ञानेन सदृश्य, पवित्र इहमिद्यते’. ज्ञानसंचित गोळा करण्यापेक्षा पवित्र अशी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. तेव्हा स्पर्धा परीक्षा देताना जर पैसा, कीर्ती, मान अशा गोष्टी दुय्यम स्थानी ठेवून ज्ञानसाधना केली, तर निराश होण्याची वेळ येणार नाही. मर्यादित जागा असल्याने प्रयत्न, चिकाटी, मेहनत, धाडस असे सर्व गुण आत्मसात करूनही व संपूर्ण झोकून देऊन प्रयत्न करूनही यश मिळेल, असे नाही.

अशावेळी जेव्हा प्रयत्न संपल्यावर निराशा येते, तेव्हा बाकी उरेल, ते उमेदवाराने मिळवलेले ज्ञानसंचित. जर त्याने खरोखरच मनापासून अभ्यास केला असेल, तर यानंतर तो ज्या क्षेत्रात प्रवेश करेल (नव्याने सुरुवात करताना सुरुवातीची वर्षे खडतर असतील हे जमेस धरूनही) त्यात आपला ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी अधिकारी होणे हे साधन आहे व समाजासाठी योगदान देणे साध्य.

साध्य-साधन विवेक सुटला, तर आत्महत्येची वेळ येते. तेव्हा आपल्या प्रेरणा जर चुकीच्या पायावर उभ्या असतील, तर त्यांना आत्ताच सुधारून घ्या. यश मिळेलच, पद मिळवल्यावर किंवा पद न मिळवूनसुद्धा. शुभेच्छा!

लेखक: श्री विक्रम अरने

ईमेल: vikramarne@gmail.com

मोबाईल: 09975252587

(लेखक हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत)


comments powered by Disqus