नाशिकची त्रिरश्मी लेणी - अजित मुठे

नाशिकची त्रिरश्मी लेणी - अजित मुठे

नाशिक - मुंबई रस्त्यावर अंजनेरी डोंगर रांगेत साधारणत: 70 मीटर उंचीवर एकुण 24 लेण्यांचा समुह कोरलेला आहे. या लेण्या बुध्दधर्मियांच्या असुन प्रामुख्याने हिनयान पंथीयांच्या आहेत. 24 पैकी 22 लेणी हिनयान पंथी, 2 महायान पंथीयांनी कोरलेल्या आहेत. 22 पैकी 5 शैलगृहे नंतर महायान पंथियांनी ताब्यात घेवून त्यात बुध्दाच्या मुर्ती कोरविल्या तर एक लेणे 11 व्या शतकात जैन धर्माच्या वापरात आले. महायान पंथातील भद्रयानीय संघाचा येथे मोठाप्रभाव होता.

वास्तुशास्त्राच्या दृष्टीने येथील लेण्यांचे चार प्रकार पडतात.

1) चैत्यगृह - लेणी क्रं. 18
2) लेणी - लेणी क्रं.1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,19,20,22,23,24
3) मटप - लेणी क्रं. 21
4) पोढी (पाण्याची कुंडे) - एकुण - 10

लेणी क्रं - 1 :-

हे लेणे पाण्याचा प्रवाह दगडातून वाहु लागल्यामुळे अपुर्णावस्थेत सोडुन दिलेले आहे. या लेण्यात पाण्याचा साठा करुन नंतर पाण्याच्या वापराकरीता या लेण्याचा उपयोग केल्याचे आढळते.

या अपूर्ण लेण्याचे विधान व दर्शनी भागावरील नक्षी याच्या आधारे हे लेणे इ. स. च्या दुस-या शतकाच्या पुर्वार्धात कोरले असावे असे दिसते. लेणे क्रं.3 शी हे लेणे जुळते आहे. लेणे अपूर्ण असले तरी लेणी कशी कोरली जात याची कल्पना या लेण्यावरुन येते.

लेणी क्रं. 2 :-

हे एक साधे व छोटे लेणे असुन यात एक सभागृह, व्हरांडा व त्याच्यामागच्या बाजुला दोन छोटया खोल्या अशी रचना आहे. या लेण्यात एक खराब झालेला शिलालेख आढळतो. (शिलालेख क्रं. 1) त्यात आज फक्त वासिष्ठीपुश फुळुमावीच्या (पुलुमावी) राज्यरोहणापासुन नंतरच्या 6 व्या वर्षाचा उल्लेख वाचता येतो.

लेणी क्रं. 3 :-

राणीचे लेणे तथा गौतमीपुत्राचे लेणे म्हणुनही हे लेणे ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील शैलगृहांचा कालक्रम मांडण्यासाठी या लेण्याचा फार महत्वाचा उपयोग होतो. या लेण्यात चार शिलालेख असुन हे लेणे तीन वेगेवगेळया कालखंडात कोरले गेले. वेगवेगळया कालखंडात लेण्याची अवस्था, तत्कालीन वास्तुशास्त्र व त्यास जोड देणारा शिलालेखाचा पुरावा या तिन्ही गोष्टींची सांगड घातल्यावर शैलगृहांचा काळ, वास्तुशास्त्रात झालेले बदल व प्रयोग त्यातील प्रगती यांची कल्पना येते.

या लेण्यात 18 छोटया खोल्या असलेले सभागृह, व्हरांडा, व्हरांडाच्या टोकाला एकेक लहान खोली अशी रचना असलेल्या विहार असुन त्यात बौध्दभिक्षुंची राहण्याची सोय असे.

याचे प्रवेशव्दार सांचीच्या स्तुपाच्या प्रवेशव्दारासारखे असुन त्याला तोरणा सारखा आकार दिलेला आहे. दोन्ही बाजुला हातात कमळ घेतलेल्या पुरुष मुर्ती कोरलेल्या असुन व्हरांडयातील खांबही वैशिष्टयपूर्ण आहेत. या खांबावर हत्ती, बैल, सिंह, वाघ, बकरी यासारख्या प्राण्यांवर स्वार झालेल्या मनुष्याकृती कोरलेल्या असुन काही प्राण्यांची तोंडे पक्ष्यांसारखी आहेत.

या लेण्यात चार शिलालेख आहेत. हे सर्व लेख व्हरांडयात कोरलेले आहेत. सर्वात जुना लेख व्हरांडयाच्या डावीकडे असुन गौतमीपुत्र सातकर्णीच्या राज्यरोहणच्या 18 व्या वर्षी कोरला आहे. या लेखात गौतमीपुत्र सातकर्णी याने बेष्णाकर या ठिकाणाहुन काढलेल्या हुकूमान्वये पश्चिम करवडी ( अपरक) गावातील उसभदात याच्याकडे असलेली 200 निवर्तने जमिन ते किरसी येथील भिक्षुंना देण्यात आली. दुसरा शिलालेख गौतमीपुत्र सातकर्णीच्या राज्यरोहणानंतरच्या 24 व्या वर्षी लिहीला गेला असुन त्यानुसार गौतमीपुत्र सातकर्णी व राजमाता यांच्या आदेशान्वये पुर्वी करवडी गावातील दिलेल्या जमिनी ऐवजी गोवर्धनच्या हददीतील असलेली जमिन तिरष्हुक लेण्यातील भिक्षुंस दान दिली आहे. तिस-या लेखात वासिष्ठपुत्र पुळुगावी याच्या राज्यारोहणा नंतरच्या 19 व्या वर्षात हे लेणे गौतमी बलश्री, वासिष्ठ पुत्राची आजी, हिने कोरविले व भदायनीय संघास दान दिले. तसेच सुदिसन, वसामलीपद ही दोन गावे दान दिली. चौथा लेख वासिष्ठपुत्र पुळगावी च्या 22 व्या शासन वर्षात कोरलेला असुन त्यात राणी लेण्यात राहणा-या श्रमणांना पिसाजी पद हे खेडे दान दिले असुन त्यात पुळुगावीने जिंकलेल्या प्रदेशांचा उल्लेख आहे.

शिलालेख व वास्तुशास्त्राच्या आधारावर हे लेणे तीन वेगवेगळया कालखंडात कोरले गेले असुन याचा कालखंड इ.स. 124 ते इ. स. 149 हा आहे.

लेणे क्रं. 4 :-

हे लेणे आज पूर्णपणे बदलेल्या अवस्थेत आहे. मुळची जमीन आणखी खोलवर कोरुन याचे पाण्याच्या टाक्यात रुपांतर करण्यात आले. दगडात मोठया प्रमाणावर दोष आढळल्यामुळे हे लेणे खोदणे सोडुन देण्यात आले. हे लेणे इ.स. 150 च्या आसपास कोरले असावे. हे लेणे क्रं. 2 शी साधर्म्य दाखविते व लेणे क्रं. 3 च्या शेवटच्या टप्यातील परंपरेशी सादृश्य दाखवतो.

लेणे क्रं. 5 :-

हे सुध्दा नंतरच्या काळात पाण्याच्या टाक्यात रुपांतरीत करण्यात आले.

लेणे क्रं 6 :-

हे लेणे साधे असले तरी शिलालेख व वास्तुशास्त्राच्या आधारे साधारणत: इ.स. 200 इतका मानला आहे.

शिलालेखातील उल्लेखाप्रमाणे हे लेणे गृहपती, व्यापारी वीर याने त्याची पत्नी नंदसिरा व कन्या पुरिस दत्ता यांना दान दिले.

लेणे क्रं. 7 :-

हे साधे लेणे असुन यात दगडी बाक कोरलेला आहे.

चारही दिशातील भिक्षु संघाच्या उपयोगासाठी सवस याची शिष्या भिक्षुणी तापसिनी हिने हे लेणे दिले असुन याचे खोदकाम इ.स. च्या तिस-या शतकात झाले.

लेणे क्रं. 8 :-

या लेण्यात दोन लेख कोरलेले आहेत. एका लेखात चेतिक संघाच्या मुगुदासाने हे दान दिल्याचे नमुद आहे. तर दुस-या लेखात मुगुदासाचा उल्लेख चेतिक उपासक असा केला आहे. हे लेणे इ. स. तिस-या शतकाच्या उत्तरार्धात खोदले गेले आहे.

लेणे क्रं. 9:-

हे लेणे दोन टप्यात खोदले गेले आहे. हे लेणे इ. स. च्या दुस-या शतकात कोरले गेले आहे.

लेणे क्रं- 10 :-

यास नहपानाचे लेणे म्हणुन ओळखतात. यात 6 शिलालेख असुन वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातुन लेणे क्रं.3 प्रमाणेच याचे महत्व आहे.

या लेण्यात चार खांब व दोन अर्धखांब असलेल्या व्हरांडा, एक सभामंडप व त्यात 16 खोल्या आहेत. सभा मंडपाच्या मागच्या भिंतीत स्तुप उठावात कोरला आहे. ओवरीचे खांब वैशिष्टयपूर्ण आहेत. या खांबाना तळाशी पाय-या असून वर घट आहे. वरच्या टोकीला उलटया घंटेसारखे अलंकरण असुन त्यावर एकमेकांकडे पाठ करुन बसलेले वाघ, स्फिक्स, शिंग किंवा शिंगा शिवाय बोकड, बैल, हत्ती व सिंह आहेत. त्याशिवाय वाघाचे शरीर व पक्ष्याप्रमाणे चोच असलेले प्राणीही आहेत.

यात सहा शिलालेख असुन त्यापैकी 3 उसवदाताचे 3 त्याच्या पत्नीचे व एक आभीरनृपत ईश्वरसेन याचा आहे. या शिलालेखात उसवदाताने त्रिरश्मी डोंगरातील लेण्याचे दान दिल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे उसवदाताच्या पत्नीने दान दिल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आभिरराजा ईश्वरसेन याने श्रमणांच्या औषधासाठी एका श्रेणीत पैसे गुंतविल्याचा उल्लेख आहे.

वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे लेणे महत्वाचे आहे. उसवदात (ऋषभदत्त) हा शक होता व तो नहपान या क्षत्रपाचा जावई होता. शैलगृहाच्या वास्तुशास्त्रात नविन गोष्टींची भर व पक्ष्याप्रमाणे चोच असलेले प्राणी हे अभारतीय प्रकार या कालावधीत कोरले गेले. इ.स. 120 मध्ये हे लेणे खोदले गेले.

लेणे क्रं. 11 :-

हे लेणे तिस-या शतकाच्या सुरुवातीला कोरले असावे. हे लेणे क्रं. 4 शी साधर्म्य दर्शविते. या लेण्यातील शिलालेखात रामनक याने हे लेणे दान केल्याचा उल्लेख आहे. इ. स. 11 व्या शतकात जैन धर्मीयांनी हे लेणे ताब्यात घेवून त्यात ऋषभदेव, अंबिका, वीर मणीभद्र यांच्या मुर्ती कोरल्या.

लेणे क्रं. 12 :-

लेण्यातील शिलालेखावरुन रामनक या वेलीदत्ताच्या मुलाने भिक्षुसंघाला वस्त्र पुरविण्यासाठी श्रेणीत पैसे गुंतविल्याचा उल्लेख आहे. लिपीवरुन हे लेणे इ.स. च्या 3 शतकाच्या उत्तरार्धात कोरले.

लेणे क्रं. 13 व 14 :-

ही लेणी साधारणत: लेणी क्रं. 3 च्या कालखंडात कोरली आहेत.

लेणे क्रं. 15 :-

हे लेणे महायान पंथियांनी इ.स.5 व्या शतकात कोरले. यात सिंहासनावर बसलेले बुध्द असुन दोन्ही बाजुस नागराजही कोरलेले आहेत. शिवाय बोधिसत्व दाखविले आहेत.

लेणे क्रं. 16 :-

मुळचे हिनयान पंथियांचे लेणे महायान पंथियांनी आपल्या ताब्यात घेवून त्यात बुध्दमुर्ती, बोधीसत्व, इंद्र, पदमपाणी, वश्रपाणी यांची शिल्पे कोरली. इ.स.6 व्या शतकात या मुर्ती कोरल्या.

लेणे क्रं. 17 :-

सर्वाधिक नासधुस झालेले मात्र वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे लेणे होय. या लेण्यातील शिलालेखात दत्तमितीचा रहिवासी व उत्तरेकडील यवनधमदेवाचा पुत्र इंद्राग्निमित्र याने तिरष्हु पर्वतावर चैत्य लेणे व कुंड खोदल्याचा पुरावा मिळतो.

लेणे क्रं. 18 :-

हे लेणे म्हणजे चैत्यगृह असुन यात 17 खांब आहेत. या सभागृहाचे छत गजपृष्ठकार असुन यावर तुळया सारख्या दगडाच्या पटया कोरलेल्या व त्या शेजारी लहान छिद्रे आहेत. त्यात लाकडाच्या पटटया अडकविल्या जात असाव्यात. प्रवेशव्दार चौकोनी असून त्यात लाकडी दरवाजे अडकविण्या करिता छिद्रे पाडलेली आहेत.

या लेण्यात 3 शिलालेख आहेत. प्रवेशव्दाराच्या वरच्या शिलालेखात धम्मिक-ग्राम-निवासींची देणगी असा उल्लेख आहे. यक्षमुर्तीच्या वरच्या दुस-या शिलालेखात नदसिरीया व आणखी एका व्यक्तीचे नाव नमुद आहे मात्र ते झिजले आहे. तिस-या शिलालेखात महाहकुसिरी भटपालीका हिने हे चैत्यगृह कोरविल्याचा उल्लेख आहे. या लेण्यांचा काळ इ.स.पुर्व 120 ते इ.स.120 मानला जातो.

लेणे क्रं. 19 :-

या लेणी समुहातील सर्वप्रथम कोरले गेलेले लेणे आहे. यात एक शिलालेख असुन नासिकचा महामात्र समन याने दान दिल्याचा उल्लेख आहे. हा लेखपहीला सातवाहन राजा कव्ह(कृष्ण) याच्या कारकीर्दीतला असून याचा कालवधी इ.स.पुर्व 205 ते 187 मानला जातो.

लेणे क्रं. 20 :-

हे लेणे दोन वेगवेगळया कालखंडात कोरले गेले. मुळचे लेणे शिलालेखातील माहितीनुसार, बोपकी नावाच श्रमणाने कोरविले व अपूर्ण असलेले हे लेणे वासु,भवगोप या सेनापतीच्या पत्नीने पूर्ण केले. या लेण्यातील शिलालेखात गौतमीपुत्र सतकर्णीचे 7 वे शासनवर्ष नमुद केलेले आहे. म्हणजे हे काम इ.स.179 या वर्षी करण्यात आले. त्यानंतर 400 वर्षांनी महायान पंथियांनी सभागृहाची मागची भिंत पाडली व एक गर्भगृह व 2 खोल्या खोदल्यात. गर्भगृहात बुध्दशिल्प असुन शिंग असलेले 2 सिंह कोरण्यात आले आहेत. या लेण्यात दोन शिलालेख असून उपासिका मम्माहिने दिलेल्या लेण्याच्या देणगीचा उल्लेख आहे.

लेणे क्रं. 21 :-

यात फक्त सभागृह आहे. कदाचित हे सत्र असावे.

लेणे क्रं. 22 :-

यात सभागृह, एक खोली व एक अपूर्णावस्थतेतील खोली आहे.

लेणे क्रं. 23 :-

मुलत: 5 ते 6 वेगवेगळया लेण्या असलेल्या हा समुह मधल्या भिंती नष्ट झाल्याने एकच लेणे झाले आहे. यातील काही भाग हिनयान पंथीयांनी तर काही महायान पंथियांनी कोरला आहे. महायान पंथीयांनी बुध्द मुर्तीची भर घातली. यातील शिलालेखानुसार वासिष्ठपुत्र श्री. पुळमावीच्या काळात म्हणजे इ.स. 132 मध्ये काही भाग कोरला तर महायान पंथीयांनी इ.स.च्या 5 व्या शतकात बुध्दमुर्ती कोरल्यात.

लेणे क्रं. 24 :-

यात सुध्दा एकापेक्षा जास्त लेणी मधल्या भिंती नष्ट झाल्याने एकच लेणे तयार झालेले आहे. याच्या दर्शनी भागावर बौध्द धर्माचे चिन्ह कोरलेले असून वरच्या पटटयावर प्राण्यांवर स्वार झालेली मुले दर्शविलेली आहेत. यात वाघ व घुबड या प्राण्यांचाही समावेश आहे. यात एक शिलालेख असुन त्यानुसार दशपुरचा रहिवासी एक शक व्यक्ती याने दिल्याचे कळते. लिपीच्या व वास्तुशास्त्राच्या आधारावर हे लेणे इ.स. 120 च्या आसपास कोरले असावे.

-: पांडव लेण्यातील शिलालेख :-

त्रिरश्मी लेण्यातील शिलालेखातुन ऐतिहासिक दृष्टयाच नव्हे तर राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टया महत्वपूर्ण अशी माहिती उपलब्ध होते.

दक्षिणापथावर म्हणजे महाराष्ट्रावर राज्य करणा-या सातवाहन राजघराण्याचे या लेण्यातुन 9 लेख बघावयास मिळतात. सातवाहनांचे समकालीन व त्यांना शह देणारे पश्चिमी क्षत्रप या राजघराण्याशी संबंधीत 5 लेख बघावयास मिळतात. सातवाहन राजवंशाचा सर्वात प्राचीन लेख लेणे क्रं.14 मध्ये आहे. या लेखांची लिपी प्राचिन ब्राहमी व भाषा प्राकृत आहे.

या लेण्यातील लेखांचे स्टिव्हन्सन, ब्रेट, सेनार्ट, पिशेल, एडवर्ड वेस्ट, ऑर्थरवेस्ट, फ्रिके, रा. गो. भांडारकर, भगवानलाल इंद्रजी, रॅप्सन, मिराशी इत्यादी तज्ञांनी त्याचे वाचन करुन त्यावर अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत.

लेखक: अजित मुठे, नाशिक

ईमेल: ajitmuthe@yahoo.com

(लेखक हौशी प्रवासी आहेत. संबंधित फोटो अंकाच्या शेवटी बघा)


comments powered by Disqus