माहेरची चैत्रगौर - श्रेया गोलिवडेकर
चैत्र महिना सुरु झाला की पाडव्यानंतर वेध लागायचे ते चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचे!
आमच्या लहानपणी तो एक छान आनंददायी सोहळाच असायचा. पहिल्या तिजेला देवघरातली अन्नपूर्णा छान घासून पुसून स्वच्छ केलेल्या पितळी झोपाळ्यावर विराजमान व्हायची तिला मोगऱ्याचा गजरा, डाळ, पन्ह, खिरीचा नैवेद्य असा सगळा थाट असायचा.
आजी सांगायची ही चैत्रगौर आता महिनाभर म्हणजे अक्षयतृतीयेपर्यंत माहेरी आलेली असते. तिला सगळं थंडगार द्यायचं तिचं गोडकौतुक करायचं मग एखादा मंगळवार किंवा शुक्रवार ठरवून हळदीकुंकवाचा दिवस ठरायचा. या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहायचो , आदल्या दिवसापर्यंत गौरीपुढे ठेवायला लाडू,शेव,चकली असे फराळाचे पदार्थ करण्याची आजीची आणि आईची गडबड असे. आमची नुसतीच लुडबुड…
मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून उन्हाच्या आत बायकांना आमंत्रण द्यायचं काम आमच्याकडे असायचं. आमची आजी कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं हे इतक्या छान पद्धतीने सांगायची की आमची ग्राम प्रदक्षिणा व्हायची.
गौरीपुढे आरास करण्यासाठी आजोबा, बाबा, भाऊ, मामा ही पुरुषमंडळी देखील खूप उत्साहाने सहभागी व्हायची.घरातली बाकं, पत्राचे डबे, पाट हे ठेवून दोन तीन पायऱ्या तयार करायच्या. त्यावर शाली, रंगीबेरंगी बेडशीट अंथरूण त्या पायऱ्या तयार करायच्या. दोन्ही बाजूला रंगीत साड्यांच्या कमानी सजायच्या. आंब्याचे डहाळे आंब्यासकट आणले जायचे, द्राक्षांचे घड, कलिंगड कापून छान कमळं तयार करून ती गौरीपुढे ठेवली जायची.
गौरीचा मुखवटा स्टँडवर ठेवून आजी छान साडी तिला नेसवायची. दागिने, फुलांचे गजरे घालून तिला सजवायची ही उत्सवमूर्ती. . आणि झोपाळा मधील गौर तिच्यापुढे ठेवायची.
फराळाचे केलेले पदार्थ आकर्षक रित्या मांडायचे हे सगळं झालं की आजीनं 40-50 वर्षांपासून जपून आणि जमवून ठेवलेली खेळणी, चित्र काढायची हा आमचा सर्वात आनंदाचा भाग असायचा कारण ही खेळणी फक्त आत्ताच काढली जायची एरवी ती माळ्यावरच असायची.
त्यात कितीतरी जुन्या काचेच्या बाहुल्या, पक्षांच्या जोड्या, हत्ती, मोर, कृष्ण आणि त्याच गोकुळ, गायी, घोडे काही मोत्यांनी विणलेल्या वस्तू, प्रत्येक वस्तूशी आजीची एक आठवण असायची. ती प्रत्येक वेळी सांगायची अशी मजा करत नाजूकपणे आणि कलात्मक पद्धतीनं गौरीची आरास करायची. तिच्या पुढं छान रांगोळी काढायची कधी कधी ही रांगोळी पाण्यातली असायची. म्हणजे पाण्यावर बुक्का किंवा कोळशाची पूड टाकून त्यावर मग मी बदकाची रांगोळी काढायचे.
आजी आजोबांना त्याच किती कौतुक!!
ही आरास होईतोपर्यंत आईनं डाळ पन्ह तयार केलेलं असायचं, नंतर छान नटून थटून हे डाळ पन्ह ओले हरभरे गावातल्या अंबाबाईच्या रामाच्या देवळात जाऊन ठेवून यायचं.
मग सगळ्या बायका हळदी कुंकूवाला यायला लागायच्या. त्यांना अत्तर लावणं, गुलाबपाणी, पन्ह डाळ देणं आम्ही बहिणी अगदी हौसेनं करायचो. मग सगळ्या बायका आरास चे तोंडभरून कौतुक करायच्या. ओघानं आमचंही कौतुक व्हायचं. सगळ्या बायकांनी नाव घ्यायचं असा आग्रह आमच्या आजीचा असे आणि बायकाही छान छान उखाणे घ्यायच्या. यामध्ये रात्रीचे 9 -10 कधी वाजायचे कळायचं नाही. मग पुरुष मंडळींना बोलावून हरभऱ्याची उसळ (त्यावेळची या उसळी ची चव पुन्हा यायची नाही) फराळाचे पदार्थ, डाळ, पन्ह यावरच गप्पागोष्टी करत जेवण व्हायचं. असा हा हळदीकुंकवाचा दिवस छान साजरा व्हायचा.
रात्री आरास उतरवताना मात्र एक हुरहूर वाटायची. पुढल्या वर्षीच्या हळदी कुंकवाच्या दिवसाची प्रतीक्षा असायची. आजही हे सगळं लिहिताना तो सगळा सोहळा डोळ्यासमोर उभा राहतोय. आजही आईकडे गेलो की अशीच आरास करण्याचा प्रयत्न करतो आणि या आठवणी पुन्हा पुन्हा जागवतो. हा आनंद सोहळा अनुभवतो.
लेखिका: श्रेया गोलिवडेकर, सातारा
ईमेल: shreyagoliwadekar10319@gmail.com