दहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com 9689995057
पावसाळी दिवस होते. गोष्ट कोकणातील आहे आहे, नुकताच पाऊस पडून गेला होता, . सकाळची वेळ होती, ऊन उबदार वाटत होते, गेले पाच सहा दिवस पावसाची झड (अविरत पाउस) असल्यामुळे सर्व काही गारठले होते. अशा वेळी जनावरे म्हणजे, सरपटणारे प्राणी गारठून गेलेले असतात, पाउलवाटेवर येऊन ते अंग शेकत बसतात. पाऊलवाटेवर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांच्या पायदळीमुळे सहसा गवत उगवलेले नसते, जमीनही टणक झालेली असते, त्यामुळे तो भाग कोरडा असतो. दुसरी सापांची आवडती जागा म्हणजे गडगा (दगडाने बांधलेला धक्का). तो भागही कोरडा असतो. मी घाईघाईने पायवाटेवरून जात होतो, अशा सकाळच्या वेळी पायाखाली नीट बघून चालावे, जनावरे उबेसाठी पायवाटेवर येऊन उन्हात अंग शेकत बसतात. हे सर्व मी विसरून गेलो होतो. विचाराच्या तंद्रीत भरभर चालता चालता माझा पाय एका पिवळ्या धम्मक जनावराच्या शेपटीवर पडला. मी दचकलो आणि चटकन पाय उचलला तेवढ्यात ते जनावर सळकन् गवतात निघून जाताना मला दिसले, तो अस्सल दहा आकडी नाग होता. नाग आणि आधेले हे दोन्ही साप दिसायला सारखेच असतात, तोंड आणि शेपूट यामध्ये फक्त फरक असतो. आधेल्याचे तोंड फुगीर नसते तर नागाचे फुगीर असते. त्यामुळे नागाला फणा काढता येतो, फणा काढल्यावर त्यावर दहा सारखा एक आकडा (आकृती )दिसतो. आधेले फणा काढू शकत नाही. नागाची शेपटी किंचित फुगीर असते व त्यावर शेवटपर्यंत विशिष्ट प्रकारचे खवले असतात. तर आधेल्याची शेपटी निमुळती व त्यावर खवले नसतात. सळकन निघून गेलेला साप नाग आहे हे मी पटकन ओळखले. नाग डूख धरतो व तो तुमच्या मागे कितीही अंतरापर्यंत येऊ शकतो, अशी समज कोकणामध्ये आहे. इतरत्रही तशीच असावी अशी माझी समजूत आहे.
सिनेमावाल्यांना नाग हे एक सिनेमासाठी आकर्षण आहे. नाग ज्यामध्ये नायक आहे असे दोन तीन तरी हिंदी सिनेमा पाहिलेले आठवतात. नागाला ऐकू येत नाही, तो डूख धरत नाही, असे जीवशास्त्र शिकणारे लोक म्हणतात. सापाला जमिनीतून जाणाऱ्या आघात लहरी कळतात व तो तुमच्या मार्गातून बाजूला होतो. तुमचे बोलणे ऐकून नव्हे असे शास्त्र म्हणते. जर त्याला ऐकूच येत नाही तर तो तुमचे बोलणे ऐकून तुमच्या मागे कसा येणार? प्रत्येकाचा आवाज जसा निरनिराळा असतो त्याप्रमाणेच आघात लहरीही निरनिराळ्या असाव्यात त्या आघात लहरी ओळखून नाग तुमच्या मागे येत असावा असे मला वाटते. या बाबतीत मला आलेला अनुभव पुढीलप्रमाणे.
त्या दिवशी नाग पटकन निघून गेला. नंतर मी ही गोष्ट घरी बोललो. आई वडिलांनी जरा सावध रहा लक्ष ठेव आम्हीही लक्ष ठेवतो असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी शौचाला जात असताना मला पुन्हा तसाच नाग दिसला. तोच नाग होता की हा दुसरा होता ते कळण्याला मार्ग नाही. ही साठ पासष्ट वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तर त्या वेळी शौचकूप कंपाऊंडच्या कडेला लांबवर असे, . बहुदा शौचकूप नसतच. हल्लीसारखी कम्पोस्ट खत करण्याची किंवा फ्लश करण्याची पद्धती तर नव्हतीच. सफाई व स्वच्छतेचे काम गुरांवर व निसर्गावर सोपवलेले असे. दोन तीन दिवस सकाळी शौचाला जाताना तो मला वाटेवर दिसत होता. आम्हीही काठी घेऊन त्याला मारण्याच्या तयारीत होतो. परंतु दर्शन देऊन तो क्षणार्धात गायब होत असे. अंगणात फिरताना कधी इथे तर कधी तिथे असा तो दिसत असे. मीही घाबरून गेलो होतो. आई वडीलही काळजीत पडले होते. त्यांनी मला दोन चार दिवस रत्नागिरीला जाऊन काकांकडे रहा म्हणून सांगितले. आमचे गाव व रत्नागिरी या मध्ये खाडी असल्यामुळे तो पाठोपाठ येऊ शकणार नाही अशी कल्पना त्यामागे होती. दोन तीन दिवस मीही अस्वस्थ होतो, झोपही नीट लागत नव्हती. मी तीन चार दिवस रत्नागिरीला जाऊन राहिलो. तीन चार दिवसांनी मी परत आलो.
एवढ्या दिवसांमध्ये तो कुणालाही दिसला नव्हता. एवढेच काय तर मी तिथे होतो, तेंव्हाही बहुधा तो फक्त मला दिसत असे. मी आल्यावर चौकशी केली तेव्हा तो कुणालाच दिसला नाही असे मला कळले. बहुधा कंटाळून किंवा विसरुन तो निघून गेला असावा अशी आमची समजूत झाली. दुसऱ्या दिवसापासून त्याने पुन्हा मला दर्शन द्यायला सुरुवात केली. एखाद्या गुंडाने वारंवार दर्शन देऊन घाबरवून सोडावे परंतु प्रत्यक्षात काहीच करू नये असे त्यांचे वर्तन होते. कधी शेजारी जाताना रस्त्यावर, कधी समुद्रावर फिरायला जाताना वाटेवर, कधी पुढच्या अंगणामध्ये तर कधी मागच्या अंगणामध्ये असे दर्शन देण्याचे व मला घाबरविण्याचे त्याचे काम चालूच होते. तो केव्हा तरी संधी साधून मला निश्चित डसणार असे मला वाटू लागले. सतत तणावाखाली राहण्याऐवजी मी सुट्टी संपायच्या अगोदर नाशिकला निघून जावे असे मला वडिलांनी सुचविले.
दोन चार वेळा तो आमच्या अगदी तडाख्यात जवळजवळ सापडला होता. परंतु तो इतका चपळ होता की आम्ही काठी मारण्याच्या अगोदरच तो अदृश्य होत असे. सापाला मारण्यासाठी कोकणामध्ये बांबूची काठी वापरतात. काही ठिकाणी वेताची काठी वापरली जाते. ज्या वेळी साप अडचणीच्या ठिकाणी असेल त्यावेळी वेताची काठी लवचिक असल्यामुळे अापण केलेला आघात वर्मी बसतो तर काही वेळा त्रिशूळ किंवा पंजा काठीला लावलेला असतो. अडचणीच्या जागी त्रिशूळ किंवा पंजा मारल्यानंतर त्याचा एखादा दात जरी सापाच्या शरिरात शिरला तरी त्याला हालचाल करत येत नाही, मग काठीने मारणे सोपे जाते. हल्ली शहरात किंवा एखादवेळ खेड्यात सुद्धा जसे सर्पमित्र दिसतात तसे त्याकाळी म्हणजे पंचाहत्तर ऐंशी वर्षांपूर्वी दिसत नसत. सरपटणारा प्राणी दिसला की मार अशी पद्धत होती किंबहुना खेडेगावात कोकणात अजूनही तशीच आहे. तो विषारी आहे किंवा नाही हेही कुणी पाहत नसे. तो विषारी आहे की नाही हे ओळखणेही कठीण असते. आपण सापाला जसे घाबरतो तसेच सापही आपल्याला घाबरतो, जर त्याला त्याच्या जीवाला भीती वाटली तरच तो हल्ला करतो. जंगली प्राण्यांच्या बाबतीतही असेच आहे.
नाग एकूण आम्हाला हूल देत होता. आम्ही त्याला मारण्यासाठी योग्य संधीची वाट पाहात होतो तर तो मला दंश करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहात असावा. उंदरा मांजराच्या खेळाप्रमाणे हा नाग माणूस खेळ चालला होता. असेच दहा पंधरा दिवस गेले. मध्ये एक दोन दिवस तो मुळीच दिसत नसे. आम्हाला वाटे चला सुटलो, तो विसरला व कुठे तरी निघून गेला. तर एखाद्या दिवशी तीन चार वेळा त्याचे दर्शन होत असे. कोकणात साप दिसतच असतातकिंवा सरसर निघून गेलेले जाणवतात. फुरसे, कांडर, मण्यार, सर्पटोळ, नानेटी, नाग, इ. त्यांच्या सुरस व मनोरंजक कथाही सांगितल्या जातात. शहरी माणसाला वाटेल/वाटते त्याप्रमाणे येता जाता जिकडे तिकडे साप दिसत नसतात. कधी कधी महिना दोन महिनेही साप दिसत नाही. बऱ्याच वेळा तो आपल्या चाहुलीने म्हणजेच जमिनीतून येणाऱ्या आघातामुळे पटकन् निघून जातो. तो होता हेही आपल्या लक्षात येत नाही. साप सरपटणारे प्राणी याना घाबरण्याचे मुळीच कारण नाही, असे असूनही या नागाने आम्हाला अस्वस्थ करून सोडले होते. हा नाग जरा जास्तच शहाणा व वक्र स्वभावाचा असावा. कदाचित आपल्याच सावलीला घाबरून आपण भूत म्हणावे किंवा आपलाच पदरव ऐकून भुताचा भास व्हावा त्याप्रमाणेही कदाचित चालले असेल. सरडा, उंदीर, घूस, कांडेचोर इत्यादी प्राणी गवतात पाचोळ्यात सरपटत असतात, परंतू आम्ही जास्त सावध असल्यामुळे आम्हाला तोच आहे असे कदाचित वाटत असावे. नाग तोच होता की काय हे सांगता येणार नाही परंतु नाग दिसत होता एवढे मात्र खरे.
संध्याकाळी, रात्री, काळोखातून, फिरण्याचे मी जवळजवळ बंद केले. काठी, टॉर्च घेतल्याशिवाय फिरत नसे. असेच काही दिवस गेले, नंतर मी आठ दहा किलोमीटरवरील मावळंगे गावी माझ्या दुसऱ्या एका काकांकडे काही कामासाठी जात होतो, त्या काळी वाहतुकीच्या सोयी विशेष नसल्यामुळे चालत जाणे हाच एक वाहतुकीचा मार्ग होता. चालत जाण्यासाठी दोन तास तरी लागत. कुणीतरी आपल्या मागून येत आहे असा मला भास होत होता. संध्याकाळच्या सुमारास मी माझ्या काकांकडे पोहोचलो. रात्रीचे आठ किंवा नऊ वाजलेले असावेत, जेवण करून आम्ही गप्पा मारत होतो, . त्या नागाबद्दल आमचे सविस्तर बोलणे झाले होतेच. एवढ्यात बाहेरून सळसळ असा आवाज आला क्षणार्धात पिवळा धम्मक नाग एकदम अंगणातून पडवीमध्ये आला. आम्ही सर्व टणदिशी उडी मारून उभे राहिलो. तेवढ्यात माझ्या काकांनी चपळाई करून वळचणीला खोचलेली वेताची काठी काढली. दीड दोन फूट उंचीवरच्या झोपाळ्यावर तो नाग चढला. तीन फुटांपर्यंत आपले शरीर सरळ काठी सारखे करून नंतर डोके व त्यामागील थोडासा भाग झोपाळ्यावर टेकून सरपटत त्याने झोपाळ्यावर विद्युत वेगाने चढण्यात यश मिळविले. तितक्याच वेगाने तो झोपाळ्याच्या कडीवरून आढय़ाकडे जाऊ लागला. एकदा तो आढ्यावरून नळ्यामध्ये शिरला असता की आमच्या तावडीतून सुटला असता. तेवढ्यात चपळाईने काकांनी एक काठी त्याच्यावर मारली. तो लगेच कडीवरून खाली कोसळला. आणखी एक दोन फटक्यांमध्ये त्याचा ग्रंथ आटोपला. तो नागच होता पिवळा धम्मक होता. एवढ्या झपाट्याने घाबरल्यासारखे आत येण्याचे त्याचे कारण आम्हाला कळले नाही. कदाचित त्याच्या मागे घुबड किंवा मुंगूस लागल्यामुळे तो जीवाच्या भीतीने आत आला असावा, असे काकांच्या बोलण्यात आले. बाहेर सरसर सरसर असा आलेला आवाज, आम्ही बाहेर दरवाज्याकडे पाहतो न पाहतो तो त्याची झपाटय़ाने झालेला प्रवेश डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच झोपाळ्यावर चढून कडीच्या मार्गे आढय़ाकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न व तितक्याच चपळाईने काकानी त्याला ठार मारणे, हे दृश्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले. काकांकडे आलेला तो नाग माझा ज्याच्यावर पाय पडला तो असेल किंवा नसेल परंतु त्या दिवसानंतर मला नाशिकला येईपर्यंत नाग दिसला नाही एवढे मात्र खरे!! साप डूख धरतो आणि पाठोपाठ येऊन सूड घेतो अशी कल्पना आहे या बाबतीत प्रत्यक्षात लेखकाला आलेला अनुभव!!