देणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा

देणे सौभाग्याचे  - सविता कारंजकर,  सातारा

karanjkar.savita@gmail.com 9922814183

(लेखिका प्रसिद्ध निवेदिका आणि कथा लेखक तसेच पाककला निपुण आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला आहे)

श्वेता आज फणका-यात होती. तशी ती रोजच असायची. थोडी शीघ्रकोपी. पण मनाने स्वच्छ. आवलीच दुसरी.

सतत कामात बुडालेली. स्वतःसाठी आजवर तिनं काहीच केलं नव्हतं.

सासूचं दुखणंखुपणं, नव-याच्या व्यवसायात मदत, मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण. सगळं जातीनं पाहणार.
डोळ्यात तेल घालून तिनं कुटुंब जपलं होतं. तिच्या प्रेमळ उबदार पंखांखाली तिच्या घरट्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होत होती आणि तिच्या खांद्यावर सगळा भार सोपवून सगळे च निर्धास्त होते.

आज तिचा मूड काही बरा नव्हता. आज तिनं ठरवलेलं. आता फक्त स्वतःसाठी जगायचं. सगळ्या हौशीमौजी करून घ्यायच्या स्वतःच्या.

आग्र्याचा ताजमहाल बघायचाय. मैत्रिणींचे आहेत तसे काश्मिरी पोशाखातले फोटो काढून घ्यायचेत.

एक तरी हवाई सफर हवीच हवी. डान्सक्लास आठवड्यात फक्त दोनदा असतो आणि फीही आपल्या आवाक्यातली च. मग काय हरकतै?

आणि गेल्याच महिन्यात त्या शेजारच्या मंजीनं केवढे सुंदर सुंदर डिझाईन चे दागिने केलेत!!ते ही एकाचवेळी!!

कशी मिरवत होती माझ्या पुढे!! शी बाई!! माझी तर. दागिन्यांची कसली म्हणून कसलीच हौस नाही झाली बाई!! सतत आपलं बजेट आडवं येत असतं!

ते काही नाही. आजच चांगला मुहूर्त आहे. मी आजच्या आजच भारीतलं. नव्या डिझाईन चं मंगळसूत्र घेणार म्हणजे घेणारच!! घरात तिनं सर्वांवर हा मंगळसूत्राचा बॉम्ब टाकला.

सागरचा. आ. बराच वेळ! मुलं आईचा हा रुद्रावतार पाहून घाबरीघुबरी झाली. सासूबाई मात्र आपल्या सुनेची नस न् नस ओळखून होत्या. त्यांनी नजरेनंच सागरला दिलासा दिला आणि जा घेऊन तिला सराफाकडे अशी मूक संमती दिली.

श्वेता जरा आज खासच तयार झाली. अगदी ठेवणीतली साडी नेसली. छानशी हेअरस्टाईल केली. हलकासा मेकअप. स्वतःला आरशात पाहून आपल्या च रूपावर भाळली. किंचित हसली. पण. पण.

आपलं जुनं मंगळसूत्र पाहून ती परत खट्टू!! आज तेच मंगळसूत्र ती बदलणार होती.

मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये जायचंय. मग इंप्रेशन नको पडायला?

तिला सागरने घातलेले कपडे आवडले नाहीत. त्याला कपडे बदलायला लावले.

सागरही आपल्या अर्धांगिनीचा हा असा अवतार प्रथमच पहात होता. इतक्या वर्षात साध्या गज-याचीही मागणी किंवा अपेक्षा न करणारी आपली गुलबकावली आज हा असा अशक्यकोटीतला हट्ट का करतेय?आणि तेही परिस्थितीची जाणीव असताना! जोडी निघाली. शहरातल्या सर्वात मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये!!

दारवानाने सलाम ठोकला. तशी श्वेताने मान ताठ केली. दार उघडताच एसीची एक थंड झुळूक!!

ती प्रथमच अनुभवत होती.

सेल्सगर्लने अदबीने नमस्कार केला आणि मंजूळ स्वरात दोघांचं स्वागत केलं.

“मॅडम, काय दाखवू?”

मॅडम. असं संबोधन ऐकताच श्वेताच्या अंगावर मूठभर मांस चढलं.

ती म्हणाली. “ मंगळसूत्र”

त्या काऊंटरवरील बालेनं दुस-या खास मंगळसूत्र काऊंटरकडे इशारा केला आणि त्या दोघांना त्या काऊंटरवर जाण्याची प्रेमळ सूचना केली. रॅम्पवरील कॅटवॉक. स्टाईलनं श्वेता निघाली. मागोमाग सागर.

मंगळसूत्र काऊंटरवरील बाला : “ जान्हवी की राधिका?”

श्वेता नाक फुगवत म्हणाली: “ मी श्वेता”

बाला: मॅडम. सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. मंगळसूत्र खरेदी करणार आहात तुम्ही. मग डिझाईन कोणतं दाखवू ? जान्हवी स्टाईल की राधिका?”

श्वेता भानावर येत: “ ओह!! तुमच्या कडील सगळे प्रकार दाखवा”

मंगळसूत्राचे वेगवेगळे प्रकार गोळा करण्यात ती बाला गुंतली आणि श्वेता नव्या डिझाईन च्या मंगळसूत्राच्या स्वप्नरंजनात. तिला तिचं लग्न आठवलं. काळ्या मण्यांच्या लडीमध्ये दोन सोन्याच्या वाट्या. एक सासरची. एक माहेरची. एक शिवाचं प्रतिक तर एक आत्म्याचं प्रतिक.

सागरने तो सौभाग्याचा अलंकार देवाब्राम्हणाच्या साक्षीनं आणि वडीलधा-यांच्या आशीर्वादाने आपल्या गळ्यात घातला तेव्हा किती मोहरलो होतो आपण!!

मंगळसूत्र, गंठण, डोरलं. शब्द कोणताही वापरला तरी त्या अलंकाराचं महत्व वाढतंच. कारण मंगळसूत्र म्हणजे नात्यातला गोडवा, मान-मऱ्यादा जपणारा अलंकार!! विवाहितेचा साजश्रृंगार!! सौंदर्य वाढवणारा.

तितक्यात ती बाला आली आणि श्वेताची विचारश्रृंखला तुटली. काऊंटरवरील मंगळसूत्राचा प्रकार आणि वैविध्यपूर्ण डिझाईन्स पाहून श्वेता-सागरचे डोळे दिपले. दोन पदरी, पट्टीचे मंगळसूत्र, बाहेरून साखळी असणारे, आतून साखळी असणारे, मीना वर्क, खडी वर्क, कुंदन वर्क असणारी, १८ इंच उंचीपासून अगदी २४ इंचापर्यंतची. इटालियन पॅटर्न, प्लॅटिनम आणि गोल्ड अशा मिश्र रंगातील, मॅट्रीक फिनीश गोल्डमध्येही किती डिझाइन्स!! करप साखळी, नॅनो डिझाईन! बापरे!अगदी अलिबाबाची गुहा!!

तेवढ्यात तिचं लक्ष गेलं. सौभाग्याला हि-याचं कोंदण लाभलेलं!! तिने हि-याला स्पर्श करून पाहिले.
क्षणात ती मोहरली! मायक्रो पॉलिशची, क्रिस्टल्सचा अधिक वापर असलेली. भरपूर डिझाईन्सही बालेनं तिच्यासमोर ठेवली. काय पाहू आणि किती पाहू, असं श्वेताला झालं होतं. आता त्या बालेनं पेंडन्टस् ही दाखवायला सुरुवात केली. मोर, कमळ, बदक, चंद्रकोर, आडवे, गोल, चौकोनी. अबब! केवढे हे प्रकार!

सगळे प्रकार पाहिल्यावर तिचे लक्ष एका खास तिला आवडलेल्या मंगळसूत्राच्या प्राईस टॅगकडे गेले. ती चमकली. सगळं ब्रम्हांड आपल्याभोवती फिरत असल्याचा भास तिला झाला. काही क्षणातच तिची नजर सागरकडे गेली. त्याचाही चेहरा पांढराफटक!! त्याच क्षणी तिला वास्तवाचं भान आलं.

आपण आज सकाळपासून घरच्यांशी, सागरशी कसे वागलो याची जाणीव झाली. ती वरमली.

सागरचा हात घट्ट पकडून ती म्हणाली: “ आपण घरी जाऊया” सागर. नि:शब्द!!

” चल सागर. मला नकोय मंगळसूत्र” सागरने मान खाली घातली.
समजूतदार पणे श्वेता म्हणाली, “ सागर, मी चुकले!काही वेळासाठी मी वस्तुस्थिती विसरले.

मला जाणीव आहे. आणि माझ्या साठी मंगळसूत्र म्हणजे नव-याने स्वतःच्या कष्टाच्या पैशातून बायकोसाठी आणलेला एक दागिना. त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतिक!!

त्याचं रंग, रूप, आकार, वजन, किंमत याला फारसं महत्व नाहीए. महत्वाच्या आहेत त्या. त्यामागच्या भावना!!
मला नकोय नवं मंगळसूत्र!!”

आपल्या गळ्यातील मंगळसूत्राच्या वाट्या तिने हातात घेतल्या. दोन्ही डोळ्यांना त्या वाट्यांचा स्पर्श केला आणि म्हणाली.

” या दोन वाट्यांमध्येच तुझं माझ्यावर असलेलं प्रेम सामावलंय. मला आणखी काय हवंय?”

सागर भारावून गेला. श्वेता वळली. काऊंटरवरील त्या बालेला म्हणाली, “ सॉरी मॅडम. मी तुम्हाला त्रास दिला. आम्हाला नाही खरेदी करायचं मंगळसूत्र”
ती मुलगी पुढं आली, म्हणाली, “ ऐकलंय मी सगळं. पण मॅडम, तुम्ही नाराज होण्याचं कारण नाहीच”

श्वेता आश्चर्यचकीत. सागरकडे पाहून ती मुलगी म्हणाली, “ सर, तुम्ही पुढच्या वर्षी याच महिन्यात मॅडमना आवडलेलं मंगळसूत्र नक्की घेऊ शकाल”

सागरलाही नवल वाटलं. “ ते कसं काय बुवा?” सागरने विचारले.

तत्परतेनं मुलगी म्हणाली, “तुमच्या करता खास अशी आमची एक योजना आहे. सुवर्णभिशी योजना. यात तुम्ही दरमहा कितीही किंवा ठराविक रक्कम गुंतवायची. असे बारा हप्ते तुम्ही आमच्याकडे भरलेत की तुमचा तेरावा हप्ता आम्ही भरतो. जमलेल्या रकमेतून तुम्ही तुमचा आवडता दागिना घेऊ शकता”

श्वेता-सागर हरखले. काही शंका आणि प्रश्नांचं निरसन होताच सागरने सुवर्ण भिशी योजनेत श्वेताचं नाव नोंदवलं. पहिला हप्ता भरलादेखील. सागरने आपल्या गुलबकावलीचा हात घट्ट धरला. एकमेकांची नजरानजर झाली. आता शब्दांची गरजच उरली नाही. या ह्रदयाचा संवाद त्या ह्रदयाशी झाला. मनातलं मळभ दूर झालेलं. ते दोघे घरी आले.

अंगणात छोटीशी पण आकर्षक रांगोळी पाहिली आणि घरातल्या आनंदाच्या लाटांची कल्पना श्वेताला आली. ती धावतच आईंकडे गेली. त्यांना गळामिठी मारली. आईंचा खांदा ओला झाला.

आईंनी तिचे डोळे पुसले.

“आता एकही शब्द बोलू नको. चल बघू. बस पाटावर.”

आई म्हणाल्या. तसं श्वेतानं ओळखलं.

“आई, मी तुमच्याशी सकाळपासून वाईट वागले. चिडले. तरी तुम्ही माझ्या आवडीची गव्हल्यांची खीर केलीत ना?”

आई म्हणाल्या, “ अगं. ओळखतो ना आपण एकमेकांना!!”

त्या दिवशीच्या जेवणाची चव अवीट होती!!


comments powered by Disqus