विनोदी: शेवटी मी मत कोणाला दिले? - शरणप्पा नागठाणे

विनोदी: शेवटी मी मत कोणाला दिले? - शरणप्पा नागठाणे

फोन: 7028963255

(सदर लेख हा केवळ कल्पना विस्तार असून कुठल्याही प्रकारचे साधर्म्य हा केवळ योगायोग असू शकतो!)

गेल्या दहा वर्षांत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत…

राजकारणात जुने प्रसिद्ध चेहरे अभावानेच दिसताहेत…

थोडक्यात पोस्टबॉय बदलले आहेत, एवढेच नव्हे तर आज कोण कोणत्या पक्षात आहे हे कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात टाकणारे आहे…

कांही टिव्ही चॅनलचे, वृत्तपत्रांचे संपादक बदलून दुसऱ्या चॅनल मध्ये , दुसऱ्या वृत्तपत्रातरूजू झालेत तशी त्यांची निष्ठा पण बदलल्या सारखे वाटते आहे..

जरी बरोबर एक दशक झाले असले तरीही काही गोष्टी अजिबात बदलल्या नाहीत, किंबहुना त्या बदलण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे असेही म्हटल्यांस वावगे ठरणार नाही ….

त्यावेळी लिहीलेले इथे थोडा फेरफार करून शेअर करतो आहे ……

आज ऑक्टोबर २१- २०१९.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस.

ह्या वर्षी ही इलेक्शन कमिशनने मतदानाची सुटी जाहीर करत मॉल्स , थिएटर , हॉटेल्स वगैरे बंद ठेवून आमच्या सारख्या सु(?)शिक्षित लोकांना मतदान करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे…

आज मला आठवतात ते (सोनेरी?) दिवस, मतदानाच्या दिवसाला जोडून आम्ही कामाला दांडी मारून किंवा (मिळत असेल तर) सुट्टी घेऊन आम्ही जवळचे पर्यटन स्थळ किंवा पिकनिक स्पॉट गाठत असू… नाही तर घरीच डिव्हीडी वगैरे आणून एंजॉय करत असू …

हां, तिसऱ्या दिवशी मात्र थोडी अडचण होत असे, जेंव्हा तर्जनीच्या नखांवर शाई नसलेली बघून काही नतद्रष्ट विचारायचे ,-“ काय बंडोपंत, काल ठप्पा मारला नाही वाटतं ? “

जसं काही ह्याच्या एका मतदानाने संबंध देश बदलणार आहे …

आता परिस्थिती बदलली आहे, स्मार्टफोन हातात आहे तर काही ही झालं की सेल्फी घेऊन what’s up, Facebook वर टाकण्याचा एक ट्रेंड उदयाला आला आहे, मतदानाच्या दिवशी तर तर्जंनी दाखवत जोडीने सेल्फी घेऊन मेसेज केला जातो - “आम्ही मतदान केले - तुम्ही ? “

त्यामुळे मतदानाला जावून सेल्फी टाकावी लागते…

ह्या वेळी “ चला,मतदान करु या “ मोहीमेची ब्रॅंड अम्बॅंसेडर माधुरी दीक्षित असल्याने (आणि माधुरीच आग्रह करत आहे म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं म्हणून) मतदान करायचे ठरवून टाकले…

प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत असल्याने आमचा आपला एक समज ( की गैरसमज?) असतो की आपण खूप विश्लेषणात्मक (Analytical) निर्णय घेत असतो..

आता मतदानाचा सारखे महत्त्वाचे काम करावयाचे म्हणजे उमेदवार, पक्ष वगैरे सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे असे ठरवून मी मुलाला विचारले की ह्या वेळेस निवडणुकीच्या मैदानात कोण कोण उमेदवार उभे आहेत?

मुलगा म्हणाला, - “ सगळे मिळून १५ उमेदवार उभे आहेत ? “

” पंधरा ?” मी आश्चर्याने विचारले.

मुलगा म्हणाला, -“ अहो पंधरा काय, एका ठिकाणी तर १३० उमेदवार उभे आहेत.. इलेक्शन कमिशनला प्रश्र्न पडला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन वर मतदान कसं शक्य होईल ? बऱ्याच जणांनी म्हटलं आहे की जिंकलो तर जिंकलो - नाही तर भिंती वर रंगलो…”

आमचे पिताश्री म्हणाले , - “ नुसता बाजार लावलाय् ह्या लोकांनी… इलेक्शन आलं की पाया पडायला तयार… इलेक्शन संपलं की तंगडं वर करायला तयार… काय इलेक्शन होत असे आमच्या काळात … इकडून काँग्रेस, तिकडून जनसंघ तर इकडून कम्युनिस्ट … आपले मुद्दे कसे ठासून सांगत की माणुस ऐकतच राहिला पाहिजे, तत्वाचे राजकारण… नाही तर हल्लीचे उमेदवार ? …….”

मी त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला.. नाही तर तासभर लेक्चर ऐकावे लागले असते…

मी म्हणालो, -“ जाऊ दे.. मला आपल्या उमेदवारांची लिस्ट दे “

मी लिस्ट पाहीली…

पंधरा पैकी ८ - ९ तर अपक्षच होते ‘ जिंकलो तर जिंकलो नाही तर भिंती वर रंगलो ‘ अशातले…

मग उरलेल्या ५-६ जणां बद्दल विचार करू लागलो…

  • “A” - हा उमेदवार सत्ताधारी पक्षाचा आहे.. गेली टर्म निवडून आला होता, ह्या वेळी मंत्री होऊ शकतो…

आपला आमदार मंत्री होतो आहे, चांगले आहे..

आपलं मत ह्याला दिले पाहिजे..

  • “B” - हा उमेदवार मागच्या मागच्या वेळी सत्तेत होता.. ह्याचा पक्ष म्हणजे विचारवंत लोकांचा पक्ष.. उमेदवार पण चारीत्र्यवान आहे..

आपण अशाच उमेदवाराला मत दिले पाहिजे…

  • ” X “ - अरे हा उमेदवार तर आपला नगरसेवक … हा पण निवडणुकीत उभा आहे…

व्वा , छान… म्हणजे ह्याला पण प्रमोशन पाहिजे…

ह्याचा आपला रोजचा संम्बध… रोजचा नमस्कार होणार .. आपलं तसं काही काम पडत नाही म्हणा.. पण आडले नडले तर हा पाठीशी उभा राहू शकतो..

तसं ही इंग्रजीत म्हण आहे की known Devil is better than unknown Angele..

आपण ह्यालाच मत दिले पाहिजे…

  • “Y” उमेदवार - मुलगा म्हणाला ,-“ पप्पा, हा माझ्या मित्राचा मामा आहे, ते तुम्हाला भेटायला येणारच आहेत.. माझे कंपनीत अप्रेंटीशिपचे काम ह्यांनीच केले होते.. आपण ह्यांना मत देऊ “

हो यार .. आजकाल कुठे ही काम करायचे म्हणजे ओळख लागतेच …

इंजिनिअर होऊन ही मुलाचे नोकरीचे कुठे जमत नव्हते, ह्यांनी मदत केली आहे, ह्या गृहस्थाचा विचार केला पाहिजे…

  • “Z” - ह्या उमेदवाराचे नांव घेताच मिसेस म्हणाली , - “ अहो, हे आपल्या समाजाचे आहेत.. (म्हणजे जातीचे आहेत)…

आज आपण एकविसाव्या शतकात आहोत, तरी देखील हे आपल्या जातीचे - आपल्या समाजाचे आहेत असं म्हटल्या म्हटल्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाल्यासारखे वाटले…

भावना काय आपल्या जातीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे असे प्रकर्षाने वाटले…

आपल्या समाजाच्या माणसाने पुढं गेलेच पाहिजे…

अमुक अमुक जातीचे लोक बघा कसं एक गठ्ठा मतदान करतात आपल्या जातीच्या उमेदवाराला…

तमुक तमुक लोक तर उघड उघड आपल्या स्वत:च्या जातीबद्दल बोलतात आणि मतदान करायचे आवाहन करतात..

उत्तरप्रदेशच्या एक नेत्या तर उघड उघड दिक्षा घेणार असे जाहीर केले आहे..

महाराष्ट्रातील ही कांही नेते मंडळी मागच्या पिढीच्या संचिता सोबतच वंचितांच्या बरोबर मोट बांधून बेरजेचे राजकारण केले असं म्हणतात पण तो ही उघड उघड जातीयवादच आहे.

गेली महिनाभर टिव्ही,वर्तमानपत्रे बघताना ही हेच लक्षात येत आहे की नेते देखील आडून आडून जातीयवाद करतच आहेत…

माझ्या मनात मघाशी आलेल्या जातीयवादी विचाराला छेद देणारी घटना, विचार, वक्तव्य गेल्या महिनाभरात खरोखरच कुठल्याही नेत्यांनी केलेले दिसले नाही….

मग माझा विचार पक्का झाला…

मतदानाचा दिवस उजाडला…

मुलगा सकाळी सकाळी म्हणाला, -

” ओ.के. डॅड…उद्या संध्याकाळी भेटू… आम्ही मित्रमंडळी म्हैसमाळला आऊटींगला चाललो आहोत.. गेस्ट हाऊस बुक केलं आहे..”

मी विचारले, - “ वोटींग ?”

” No dad, असा कितीसा फरक पडणार आहे माझ्या एका मताने ?…”

मुलगी रात्रीची शिफ्ट करून आली होती…

खरंतर मतदान हे गुप्त असते, कुणी ही कोणाला नाही विचारले पाहिजे, पण कुटुंब प्रमुख म्हणून मी तिला विचारले, तर ती म्हणाली , -

” आमची कंपनी गेली कांही वर्षे ह्या पक्षासाठी “ वार रुम (war room) कॅम्पेन करते आहे, आणि पुढच्या पाच वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे, त्यामूळे obviously I will vote that party only…

वडिलांचं ठरलेलं असतं … गेली ५०-६० वर्षे ज्यांना मत दिलं ह्या वेळी पण …..

श्रीमती म्हणाली , - “ आपल्या समाजाच्या बायकांच्या भीसी मध्ये ठरलेलं आहे की कांही ही झालं तरी आपल्याच उमेदवाराला मतदान करायचे… ते दुपारी टेम्पो पाठवणार आहेत, आम्ही ग्रुपने जाऊन मतदान करणार आहोत..”

आपल्या सारखी शिकलेली (सुशिक्षित शब्द न वापरलेला बरा !) मंडळी जर असा विचार करत असतील तर बाटली आणि नोटांच्या मोबदल्यात मत देणाऱ्या लोकांबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे ?

उन्हे उतरल्यावर मतदान करायला केंद्रावर गेलो..

वोटींग क्लर्कने नखावर शाई लावली…

शेवटच्या क्षणी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन वरचं बटन दाबतांना क्षणभर हात थरथरला..

शेवटी बटन दाबले…

आपण ज्याला मतदान केले, तो निवडून येणार नाही - आपण आपले मत फुकट घालवले , अशी एक guilty feeling मनात आली… मी पटकन ती बाजूला सारली … “पुढच्या पाच वर्षांसाठी”

(सदरचे लिखाण मी १३ ऑक्टोबर २००९ साली केलेले होते.. जुनी कागदपत्रे बघताना मला हे माझे अप्रकाशित हस्तलिखित सापडले.. त्यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू होत्या आणि योगायोगाने ह्यावर्षी ही ह्याच महिन्यात निवडणूका आहेत)

© शरणप्पा नागठाणे, औरंगाबाद
spnagthane@gmail.com


comments powered by Disqus