बापाचं काळीज - किशोर चलाख
फोन: 9405900987
दिवस उजाडला. मनोहर शेताकडे जायला निघाले, शेताची वाट चालतांना डोक्यात विचार सुरू होता, तो त्याचा एकुलता मुलगा राकेशचा!
रक्ताचं पाणी करून त्यांनी त्याला डॉक्टर केलं, शेती विकून शहरात दवाखाना उघडून दिला,पण तो आईबापाला विसरुन गेला.दरमहा घरी येणारा मुलगा आता वर्ष झालं तरी गावा कडे आलाच नाही. शिकून डॉक्टर झाल्यावर तो आपलं संगोपन करणार या आशेने वडिलानी त्याचे स्वप्न पूर्ण केलं. पण आज तो सगळं विसरून गेला. पैसे कमविण्याच्या नादात प्रेम विसरून गेला. माझ्या प्रेमात काही तरी कमी असेल असं विचार करत ते शेतात कधी पोहोचले कळलेच नाही. जे स्वप्न पाहिले ते धुळीत मिळालं असं म्हणत कामाला सुरुवात केली.
काही दिवसाने गावातील मधुकरराव शहरात कामानिमित्त गेले होते,गावात आल्यावर त्यांनी राकेशचं लग्न झाल्याचे सांगताच मनोहरच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या मुलाने लग्न केलं साधं आम्हाला कळवलं सुद्धा नाही. जड पावलांनी त्यांनी घर गाठले आणि आपल्या बायकोला सर्व सांगितले.त्या माऊली ज्याला जन्म दिला. आपल्या पोटाशी धरून मोठं केलं त्या आईला देखील त्यांनी सांगितले नाही.पण ती आई होती तिने सगळं पचवून घेतलं. आपल्या मुलाला व सुनेला भेटण्याची इच्छा दर्शविली. आईच्या मायेपोटी मनोहरराव सुद्धा शहरात जायला तयार झाले.
दोघेही सकाळच्या बसने शहरात आले. आपल्या मुलाला डोळेभरून पाहण्याची इच्छा होती.घराजवळ जाताच सुनेने त्याची विचारपूस केली तेवढ्यात राकेश पोहोचला. त्याने मी एक डॉक्टर आहे आणि तुम्ही खेड्यातील लोक आहात त्यामुळे तुम्ही इथे आला तर माझं नाव खराब होईल म्हणून तुम्ही निघून जा. असे ठणकावून सांगीतलं.एक क्षणात पाहिलेलं स्वप्न धुळीस पडलं.जड अंतःकरणाने ते दोघेही आपल्या गावी परत आली. आणि आपल्या नशिबाला दोष देत होती.ज्या मुलासाठी आपण सगळं केलं आज तो आपणाला साधं घरात सुद्धा येऊ दिल नाही की विचारपूस सुद्धा केली नाही. असे म्हणत नशिबाला दोष देत दोघेही झोपी गेले. म्हणतात ना गरज सरो अन् वैद्य मरो!