चित्रपट परीक्षण: फत्तेशिकस्त - निमिष सोनार, पुणे
दिगपाल लांजेकरचा “फर्जंद” मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण “चौकोनी कंसातील” वाक्यात अधून मधून येईलच!! कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल.
राजगडवर जिजामाता तर पन्हाळगडावर शिवाजीराजे आहेत. राजगडावर ताबा मिळवण्याचा शाहिस्तेखानचा प्रयत्न जिजाऊ राजगडावरून युद्ध करून अयशस्वी करतात.
लाल किल्ला आणि पुणे सध्या शाहिस्तेखानच्या (अनुप सोनी, सावधान इंडिया वाला) ताब्यात आहे. नामदार खान (समीर धर्माधिकारी) हा शाहिस्तेखानचा मुख्य सरदार, पुण्यातील गावांत अनेक लोकांना जाळतो जे शिवाजी महाराजांची मदत करतात. संभाजीराजे अजून लहान आहेत.
शिवाजीराजे कालांतराने पन्हाळाहून परत येतात.
मग ते खलील साथीदारांची आठवण काढतात आणि बोलावून घेतात: जेधे आणि बांदल (अंगद हनुमंत)
येसाजीराव कंक (अंकित मोहन फर्जंद चित्रपटातील कोंडाजी फर्जंद) आणि तानाजी मालुसरे (जे वाघांचे रक्षण सुद्धा करतात). नंतर शाहिस्तेखान या दोघांना कोंकण काबीज करायला पाठवतो: रायबागान (तृप्ती तोरडमल) आणि आस्ताद काळे (कर्टलाब खान उझबेग) ही खबर लाल महालातील महाराजांचे जासूस (गुप्तचर अथवा खबरी) आणि बहुरूपी बहिर्जी नाईक यांच्या साथीदार स्त्री पुरुषामुळे बहिर्जीला आणि नंतर शिवाजी महाराजांना कळते किसना (मुस्लिम वेशात) आणि फुलवंती (मृण्मयी देशपांडे).
[जोगवा हे गाणं जे बहुरूपीच्या वेषात बहिर्जी म्हणतो ते खूप छान आहे. चित्रपटाचे एकूणच गीत संगीत आणि पार्श्वसंगीत छान आहे. डायलॉग्ज छान आहेत. अनेक डायलॉग्जला प्रेक्षक टाळ्या वाजवतात.]
लोहगड आणि किल्ले विसापूरला रायबागान आणि कार्टलाब खान या दोघांना किल्ल्यावरील मावळे बघतात. जंगलात गेल्यावर इतरांना चकवा द्यायला बोरघाट ऐवजी कुरवांडा मार्गाने ते दोघे जातात. पण ही चाल शिवाजी महाराज आणि बहिर्जी ओळखतात. मग महाराजांसोबत तानाजी, येसाजी हे त्या दोघांना कुरवांडा आणि ताम्हिणी घाटातून वेढतात.
[बहिर्जी नाईक चे काम हरीश दुधाडेने (मराठी सिरीयल मधील कलाकार) केले आहे, त्याने छान अभिनय केलाय आणि चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चांगल्या अभिनयासोबत साहस दृश्ये देखील छान केली आहेत. मृणाल कुलकर्णी शिवाय जिजामाता भूमिकेचा विचार होऊच शकत नाही आणि इतर सगळ्यांनीही छान कामे केलीत. फर्जंद मध्ये चिन्मयला कमी वाव होता पण हा चित्रपट बहुतेक स्किन टाईम शिवाजी महाराजांवर केंद्रित आहे]
तिघेजण सैनिकांसह जंगलात दोघांवर (रायबगान, कर्तलाब खान) आणि त्यांच्या सैनिकांवर हल्ला करून दोघांना शरण यायला लावतात. त्यांना जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्यांचेकडून खंडणी वसूल करून ते पैसे नामदार खानाने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी महाराज वापरतात. रायबागान ही नंतर शाहिस्तेखानला दोन शब्द सुनावून माहूरला परत निघून जाते.
शाहिस्तेखानचा मुलगा फतेह खानला काबूलला लढाईवर पाठवलेले असते आणि फतेहची पत्नी लाल महालात असते. तिची दासी फुलवंती असते. फुलवंती स्वयंपाक, शाहिस्तेच्या सुनेला मेहेंदी लावून देणे, दासी यासारखे कामं करते.
[विशिष्ट प्रसंगानंतर एकदम सिन न बदलता कॅमेरा दूर दूर घेऊन जाणे ही स्टाईल दिगपालने दोन तीन वेळा वापरली आहे, तिचा प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पडतो. नामदार खानला फुलवंतीचा अधून मधून संशय येतो. हे बघतांना चाणाक्ष प्रेक्षकांना आलिया भटचा राझी आठवल्याशिवाय राहत नाही]
एका मराठ्याला/मावळ्याला मारून त्याची मुंडकी शिवाजींराजेंसाठी राजगडाच्या पाली दरवाज्याजवळ टाकून शाहिस्तेखानाची माणसे निघून जातात.
नेहमी शिवाजी महाराज शत्रूला त्यांच्या विभागात बोलावून मारतात तर यावेळेस असे आव्हान दिल्याने शिवाजी महाराज लाल महालात शाहिस्तेच्या इलक्यात येतील तेव्हा त्यांना मारू असा त्याचा अंदाज असतो, तो बरोबर असतो पण शिवाजी महाराज सरळ युद्ध न पुकारता रात्री लपून हल्ला म्हणजे गनिमी कावा म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करतात त्यावर आधारित हा चित्रपट आहे.
[गनिमी कावा का? सरळ युद्ध का नाही? याचे उत्तर चित्रपटात मिळेल. यानंतरचा पुढचा भाग म्हणजे ही सर्जिकल स्ट्राईक कशी फत्ते केली जाते ते पडद्यावर बघण्यासारखे आहे]
चिमणाजी देशपांडे हे लाल महाल नकाशा बनवणारे असतात पण त्या पूर्वीच्या नकाशानुसार तिथे आता लाल महालची रचना राहिलेली नसते असे फुलवंती सांगते. फतेह खान वापस येतो त्यावेळेस नाच गाणे होणार असते तेव्हा त्यात फुलवंती बहिर्जीला तिचा उस्ताद म्हणून वेष बदलवून कव्वाली गायला बोलावते मग लाल महालाची पाहणी करून पुढचा प्लॅन आखला जातो.
[येथून मग विविध थरारक घटना, रात्रीचे महालातील युद्ध, आणि शाहिस्तेखानाची पाठलाग करून तीन बोटे कापली जाणे हा थरार पडद्यावर अनुभव घेण्यासारखा आहे! शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर काय होते, शिवाजी महाराजांना लाल महाल आणि पार्यायाने पुण्याची सत्ता पुन्हा मिळते का? त्यासाठी चित्रपट बघायला हवा]
मी या चित्रपटाला पाच पैकी चार स्टार देतो. हा चित्रपट जरूर बघा. फर्जंद प्रमाणे हा सुद्धा सुपरहिट होईल.