माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर
(भावस्पर्शी व्यक्तिचित्र या लेखमालिकेतील हा चौथा भाग)
माई ही सर्वांची आई. समस्त चार पिढ्यांसाठी गेले नव्वद वर्ष खंबिरपणे सर्वांच्या पाठीशी उभी असलेली माई. माई - एक सिंन्धुदुर्ग हे नाव या लेखाला देण्याचे कारणही तसेच आहे. कारण माईंचे मुळ नाव हे सिन्धुं आणि कोकणांतील बळकट आणि खंबिर अश्या सिन्धुंदुर्गांप्रमाणेच माईसुध्दा अजुनही या वयात खंबीर आहेत. आपल्या आयुष्यातील नव्वद दशक बघितलेल्या माईंची आज जगण्याची आणि लढण्याची जिद्द् तशीच कायम आहे.माईंचा जन्म हा जळगांव खान्देशातील एरंडोल या गावातला. वडिल पंढरीनाथ हे गणित विषयांचे शिक्षक होते. शिस्तीचे पक्के आणि गावांतील प्रतिष्ठीत व्यक्तिपैंकी एक होते. त्यांना सर्वजण आदरांने नाना असे म्हणायचे. आई कावेरीबाई स्वभावाने कणखर आणि उत्तम गृहिणी होत्या. माईंचा जन्म हा तीन फेब्रुवारी 1930 साली झाला.माई त्यांच्या भावंडांनामध्ये सर्वात मोठ्या होत्या माईंच्या पाठीवर पाच बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार होता. माई सर्वांत मोठ्या असल्यांने त्यांनी लवकरच घराची जबाबदारी सांभाळली. आई आणि नानांना माईंचे त्यांच्या कामात खुप सहकार्य होत असे. लहान बहिण भावांना साभांळणे. त्यांच्या अभ्यासांकडे लक्ष देणे. घरात काही कमी जास्त लागत असल्यास त्याकडे लक्ष ठेवणे हे माईंचे नित्यांचे काम झाले होते आणि हो! हे सर्व करत असतांना स्वतःच्या अभ्यासांकडे लक्ष देणे. कारण वडिल शिक्षक असल्याने शिस्त आणि शिक्षण हे दोन्ही महत्त्वाचेच होते.
काळ आपल्या गतिने वाटचाल करीत होता. माई लग्नांयोग्य झाल्यात. माईंचा विवाह हा अमळनेर येथील बाबुराव यांच्यासह झाला. बाबुराव हे सुवर्णअंलकार कारगीर होते. सुवर्णनगरी म्हणुन आजही प्रसिध्द असलेल्या जळगांवात या दोघांनी आपले बि-हाड थाटायचे ठरविले. पुर्वाश्रमीच्या सिन्धुं आता लग्नानंतर प्रमिलाबाई झाल्यात. प्रमिलाबाई आणि बाबुराव यांनी जळगांवातील एका दोन खोल्यांच्या घरात गुण्यागोविंदाने आपल्या संसाराला सुरूवात केली. सुरूवातीला माई या कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणुनच होत्या आणि बाबुराव हे एका सोनारांच्या दुकानांत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत.सगळ कस अगदी छान चाललं होत. असेच दिवसांमागुन दिवस जात होते. हळुहळु माईंचा परिवार फुलत गेला, बहरत गेला. तीन मुलं आणि तीन मुंलीनी माईंचा परिवार पुर्ण केला होता. काही दिवस मुलांचे बालपण आणि कौतुक पहाण्यात गेले. सर्व मुलं हळुहळु मोठी होत होती तशी तशी जबाबदारीही वाढत होती. माईंनी आपल्या मुलाला दादाला माहेरी एरंडोल येथे वडिलांच्या देखरेखीखाली शिक्षण घेण्यास पाठविले होते. दादासुध्दा तिथे लवकरच मामा आणि मावश्यांसोबत छान रूळले. मात्र दादाची गट्टी ही समवयीन मामा आणि मावशीशी जास्त जमली. माईंची इतर मुले माईंच्या पंखाखाली वाढत होती. यानंतर मात्र परिस्थिती हळुहळु बिकट होत गेली. मासिक उत्पन्न आणि वाढता परिवार यांचा ताळमेळ बसेनासा झाला. माई मुळातच कर्तृत्वान आणि कार्यक्षम असल्याने, माईं या परिस्थितीमुळे अस्वस्थ होत होत्या. फक्त गृहिणी म्हणुनच काम करत असतांना बैचेन होत होत्या. त्यांच्यात घर सांभाळुन, घराला आर्थिक हातभार लावण्यांची क्षमतासुध्दा होती. कोणलाही मदत मांगणे त्यापेक्षा आपणच सामर्थंवान होणे यावर त्यांचा विश्वास होता म्हणुन मग माईंसाठी नोकरीची शोधाशोध सुरू झाली.
आपल्या जवळपासच्या संपर्कांतुन त्यांना डॉ. ठुसे यांचा पत्ता नोकरीसंदर्भात मिळाला. श्री व सौ. ठुसे हे दोघेही डॉक्टर होते. ठुसेबाईंनी माईंना नर्सिंगचा कुठलाही पुर्वाअनुभव नसतांना, आपल्यासोबत मदतनीस म्हणुन कामावर घेतले. ठुसे बाईंनी माईंना सर्व मनापासुन शिकवले. माईंपण सर्व मेहनतीने शिकत होत्या. लवकरच माईं त्यांच्या कामात तरबेज झाल्या. माईंचे काम व्यवस्थित चालु होते. संसाराची आर्थिक गाडीसुध्दा हळूहळू रूळावर येऊ लागली. माईंचा आर्थिकदृष्टया संसाराला हातभर लागू लागला. मुलंसुध्दा शाळेत शिकत होती. डॉ. ठुसेकडील काम सुरूळीत सुरू असंताना अचानक एक दिवस डॉ. श्री. ठुसे यांचे निधन झाले. सौ. ठुसेवर आभाळच कोसळले. दवाखांना आणि संसार यांची जबाबदारी त्यांच्यावर एकदम येऊन पडली. अश्या कठिण परिस्थितीत ठुसेबाईंना माईंचा खुप आधार मिळाला. माईं जणु त्यांच्या घरातील एक सदस्यच झाल्यात. ठुसेबाईंनी डॉक्टरांच्यानंतर त्यांचा दवाखाना त्यांचेच एक मित्र डॉ. केळकर यांना चालविण्यास दिला. माईंनी डॉ. केळकरांसोबत काम करण्यास सुरूवात केली. आता माईंचा नर्सिंग क्षेत्रातील अनुभव खुपच चागंला झाला होता. अभाव होता फक्त अधिकृत नर्सिंग प्रमाणपत्राचा. माईंना काही जाणकार लोकांनी अमळनेर येथे जाऊन नर्सिंगचा अधिकृत कोर्स करण्याचा सल्ला दिला. माईंनांही तो सल्ला योग्य वाटला. माईंची धडपड ही फक्त अधिकृत प्रमाणपत्रामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी होती. माईंचे अमळनेर येथे प्रशिक्षण सुरू झाले. सर्व मुलांना जळगांवला सोडून माई आपले प्रशिक्षण पुर्ण करीत होत्या. तसे अधुन मधून माई जळगांवला मुलांना भेटणयास जात असत. ज्याप्रमाणे एखादा पक्षी उंच आकाशात उडत असला तरी त्याचे लक्ष आपल्या घरटयाकडे आणि घरटयातील पिलांकडे असते. अगदी तसेच माईंचे झाले होते.अमळनेरला जरी शिक्षण घेत असली तरी तीचे संपुर्ण लक्ष हे जळगांवला असणांरा आपल्या मुलांकडे असायचे.
सुचना : लेखांच्या या भागांपर्यंतची माहिती माईंनी स्वतः वाचली आहे आणि घटनाक्रम सुसंगत करण्यास सहकार्य केले आहे. पुढील सर्व प्रंसंग सागुंन ते लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. दुर्दवाने माईंच्या हयातीत हा लेख पुर्ण करण्यास मला यश आले नाही. ही खंत माझ्या मनात कायम राहील.
माईंनी आपला नर्सिंगचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण केला आणि त्या परत आपल्या गावी आल्यात. माईंनी परत डॉ. केळकरांचा दवाखान्यात कामाला सुरूवात केली.आता सर्वकाही सुरुळीत चालु होते. माईंना आयुध निर्माणी वरणगांव येथिल सरकारी दवाखान्यात सहाय्यक परिचारिका म्हणुन सुध्दा नोकरीची संधी आली होती. पंरतू काही कारणास्तव त्यांना ती संधी सोडावी लागली. माईंच्या जीवनात अनेक आव्हांने येऊन गेलीत. परंतु प्रत्येक आव्हांनाला माई मोठ्या धैर्याने सामोरा जात होत्या. जेव्हा आर्थिकदृष्टया सर्व काही स्थिरस्थावर होत होते, त्या वेळेस त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. संपुर्ण परिवाराची जबाबदारी एकट्या माईंवर येऊन पडली. आपली नोकरी आणि घर साभाळूंन आपल्या मुलांचे शिक्षण, मुलांना त्यांच्या पायावर उभे करणे, त्यांचे लग्नकार्य आणि त्यांच्या संसाराची घडी बसवणे हे मोठे कार्य माईंवर येऊन पडले. या सर्व जबाबदारी पार पाडण्यात माईंच्या धाकट्या भावाचा सिहांचा वाटा होता. मुलांच्या डोक्यावरून पितृछत्र जाताच, या मामांनी आपल्या प्रेमाचे आणि आधारांचे एक भक्कम असे छत्र या मुलांवर धरले. आजसुध्दा मामाचा आधार आणि प्रेम या सर्वांना मिळत आहे. सर्व मुलांनाही त्या अडचणीच्या वेळी आपल्या मामांमध्ये वडीलांचा आधार मिळाला. मामा काही दिवस जळगांवला आपल्या शिक्षणासाठी होते. त्यांनी आपले शिक्षण तर उत्तमरितीने पुर्ण केलेच पण या मुलांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त केले. मामा शिक्षणांत खुप हुशार होते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मामांना त्याकाळी अनेक सरकारी नोकरींच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. त्यातुनच एक आयुध्य निर्माणी वरणगांव येथिल नोकरी मामांनी स्विकारली आणि ते तिथेच स्थाईक झाले.
माईंच्या परिवारांची जबाबदारी स्विकारली असल्यामुळे त्यांनी पहिली मोठी गोष्ट माईंसाठी केली असेल, ती अशी की माईंचे ज्येष्ठ चिरंजीव ज्यांना सर्व दादा असे म्हणायचे. त्यांच्या सरकारी नोकरीसाठी वरणगांव येथे प्रयत्न केलेत आणि त्यांनी दादांना सरकारी नोकरीत रूजू केले. त्याआधी दादा नुकतेच दहावी पास झालेले होते आणि दादा कुठेतरी छोटी मोठी नोकरी करून माईंना हातभार लावत होते.दादांची नोकरी माईंसाठी मैलाचा दगड ठरली. दादांना त्याकाळी सरकारी नोकरीमुळे सरकारी निवासस्थान सुध्दा मिळाले. माईंनी आपला संपुर्ण परिवार हा वरणगांव येथे दादांकडे स्थलांतरीत केला. माई आणि दादांची बहीणभावांड दादांकडे वरणगांव येथे राहायला आलीत. ती सर्व आपआपल्या परिने शिक्षण घेत होती आणि घरात हातभार लाऊ लागत होती. तो काळ ऐवढा प्रगत नव्हता.स्वयंपाकाचा स्टोव्ह हा सुध्दा प्रतिष्ठित लोकांनकडेच असायचा बाकीच्या सर्वसामान्यांचा वापर हा नेहमी चुलीवरच चालायचा. त्यासाठी लागणारा काड्या आणि छोटी लाकड ही भावंड जवळपासच्या जंगलात जाऊन आणत असत. दादा आपली नोकरी नियमित आणि जबाबदारीनी करत होते. दादांची दोन लहान बंन्धु नविन तयार होणारां इमारतीमध्ये रंगांचे काम आणि कंत्राटी पध्दतीचे कामे करून हातभार लावत होते. माई आणि दोन्ही बहिणींनी घराची आणि स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळली होती. सर्वात लहान बहिणीचे शिक्षणांचे वय असल्याने ती शिक्षण घेत होती. माईची ही सर्व मुले आपली परिस्थिती ओळखून एकमेकांना सांभाळून घेत होती माईंच्या मायेने आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली गुण्यागोविंदाने राहात होती. या काळात माईंना आपल्या आईचा म्हणजे कावेरी आजीचापण भक्कम असा आधार मिळाला होता. माईं आणि माईंच्या माहेरीची मंडळी हे जणू एकत्रच कुंटुंब असल्यासारखे वाटायचे. अश्यातच मामांचाही विवाह झाला आणि मामांच्या कार्यात आणि जबाबदारीमध्ये साथ देण्यासाठी एक साथीदार मांमाना मिळाला. मामांच्या बरोबरीने मामीनीसुध्दा या परिवारास चांगली साथ दिली. माईंना आता मुलांच्या लग्नांची चिंता लागली होती. मोठ्या मुलीचे लग्न आनंदात पार पडले आणि ती आपल्या सासरी निघुन गेली. माईंची एक जबाबदारी पार पडली होती. आता माईंना वेध लागले होते दादाच्या लग्नाचे. दादासाठी स्थळे पाहण्यास सुरूवात झाली आणि पहाता पहाता दादाचे पण दोनांचे चार हात झाले. माईंच्या या परिवारात आता जावाई आणि सुनसुध्दा सामील झाले होते. माईंनी आता आपल्या घरांची जबाबदारी नविन आलेल्या सुनेवर सोपवली आणि जळगांवला वैद्यकीय सेवेसाठी परत आल्या.
काही दिवस आपल्या जुन्याच घरात राहिल्या. माई ठुसे बाईंना जाऊन नोकरीसंदर्भात भेटल्या. पंरतू दवाखाना चालवण्यास बाईंना अवघड जात असल्याने तो त्यांनी बंद करण्याचा निर्णय माई येण्यापुर्वीच घेतला होता. पंरतू माईंची परिस्थितीची जाणिव असल्यांने त्यांनी आधीच माईंच्या नोकरीची व्यवस्था डॉ.आठवले यांच्याकडे केली होती. डॉ. आठवले दांपत्य हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर होते. माई या जिथे राहात होत्या तिधुन आठवलेंचा दवाखाना अतिशय दुर असल्यांने सुमनताईंनी आपल्या दवाखान्यालगतचीच एक खोली माईंना राहण्यास दिली. खरा अर्थांने माईंच्या आयुष्यांतील आठवले पर्वाला येथुन सुरूवात झाली. माईंची खोली फार छान होती. चोकोनी आकाराची, एका कोनात छोटे बाथरूम तर दुसरा कोनात स्वयंपाकाची जागा, तिसरा कोनात दारा आडचे सोयीचे कपाट तर चौथ्या कोनात एक चारखानी टेबल ज्यामध्ये माईंचे सर्व सामान आणि वस्तू असायच्या. खोली जरी लहान असले तरी समोरील अंगण खुप मोठे होते. बाजुला पाण्याचा एक मोठा हौद होता. अंगाणात लिंबाची आणि नारळाची खुप झाडे होती. संध्याकाळी आठ वाजता गिरणीच्या भोंग्याचा आवाज नियमीत येत असे. घराजवळंच असणारां मेनरोडवरील वाहतुकीचा आवाज सतत येत असे.असो. सरकारी नोकरीत ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपले संपुर्ण आयुष्य देऊन टाकते. अगदी तसेच माईंनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्ष डॉ. आठवले यांच्याकडील खाजगी नोकरीस दिले. माईंची वैद्यकीय सेवा ही 24/7 तास होती. दवाखान्याजवळच राहात असल्यांने कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी आणि वेळकाळ न पहाता माईं डॉक्टर आणि पेशंट यांच्या एका हाकेवर धाऊन जात. या त्यांच्या सेवाकार्यामुळे माईंनी फार कमी कालावधीत असंख्य लोक जोडली होती. माई या प्रसुतीसंदर्भातील वैद्यकीय सेवा देत असल्याकारणांना पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक यांना माईंचा खुप मानसीक आधार वाटायचा. माई सर्वांना सढळ हाताने मदत करायच्या. आपले घर, वस्तू आणि स्वयंपाकघर इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देत होत्या. डॉक्टर आणि पेशंटप्रमाणेच माईं या आठवलेंच्या दवाखान्यांतील स्टाफच्यासुध्दा आधारस्तंभ होत्या. स्टाफमधील सर्वात वरिष्ठ आणि सुमनताईंच्या खास मर्जीतल्या असल्याने स्टाफच्या व्यवस्थापनांची अतिरिक्त जबाबदारीसुध्दा माईं फार खुबीने पार पाडत असत. आठ तासांची एक शिफ्ट असा ड्युटीचा प्रकार होता आणि त्यातच नाईट शिफ्टपण येत असे. मग स्टाफमध्ये माईंच्या सहकारी असलेल्या रमाबाई, विमलबाई, सुशिलाबाई यांच्या आपल्या वैयक्तीक सोयीनुसार ड्युटी लावण्यांवरून सतत भुणभुण चाललेली असायची. आता मागे वळून पहातांना जरी या गोष्टी गंमतीदार वाटत असतील तरी तेव्हा मात्र माईंसाठी या गोष्टी फार कटकटीच्या असायच्या. पण त्यात फार गंमती जंमतीसुध्दा असायच्या. माई जेव्हा आपल्या घरी मोकळ्या वेळेत बसलेल्या असायच्या त्यावेळेस या सहकारी मैत्रिणी एकमेकांच्या नकळत एका मागोमाघ येऊन आपआपल्या पध्दतीने तक्रार मांडून जात आणि माईंकडून त्यानांच माईंचे सहकार्य मिळेल असे आश्वासन घेऊन जात. त्यावेळेस त्या सर्वांच्या समस्या ऐकून त्यांचे सर्वांचे समाधान करण्याचे कसब हे माईंकडे होते.
कालातंराने माईंच्या मधल्या मुलींचे लग्न वरणगांव येथे पार पडले होते. माईंच्या मोठ्या सुनेने आता माईंचा बराच भार हलका केला होता. लग्नकार्य, मुलींचे माहेरपण, पाहुण्यांचे स्वागत आणि येणारां जाणारांची सरबराई उत्तमरित्या सांभाळत होती. तसे माईंचे वरणगांवला अधूनमधून येणे चालू असायचे. माईंचे दोघेही धाकटे मुलं आपल्या उज्ज्वल भविष्यांच्या शोधात मायानगरी मुंबई येथे संघर्ष करण्यासाठी दाखल झाले होते. मुंबई येथेसुध्दा माईंच्या लहान भावांनी आपल्या या भाच्यांना आधार दिला आणि मुबंई मध्ये स्थाईक होण्यास मदत केली आणि यथावकाश दोघेही सरकारी नोकरीत रूजू झालेत. माईंची तिनही मुले सरकारी नोकरीत स्थिरस्थावर झालीत. त्याकाळी तिनही मुले सरकारी नोकरीत असणे ही खुप मोठी भाग्याची आणि सामाजिकदृष्टा प्रतिष्ठेची बाब समजली जायची. एकंदरीत आता माईंच्या आयुष्याला एक नविन वळण मिळाले होते. मुलं स्थाईक होऊन मुलंचे विवाह संपन्न झाले होते. पण म्हणतात ना सुखा पाठोपाठ दुःख ही माणसांच्या आयुष्यात पाठलाग करत असते. अश्यातच अभ्यासात अत्यंत हुशार असणारां माईंच्या सर्वात धाकट्या लेकीला एका दुर्दैवी आजारांने ग्रासले. त्या आजारांने अत्यंत हुशार असणारां मुलींचे आणि त्यासोबतच माईंचे संपुर्ण आयुष्यच बदलवुन टाकले. माईं स्वतः वैद्यकीय व्यवसायात असतांनाही आणि शहरातील मोठ मोठ्या डॉक्टरांची ओळख असतांनाही माईंना लेकीच्या आजाराला पराभुत करण्यास अपयश येत होते. माईंनी आपल्या या लेकीला जळगांव येथे आपल्यासोबत उपचारासांठी ठेऊन घेतले. आजार इतका भंयकर होता की त्यामुळे तिला आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागले पंरतू अभ्यासाबद्दल असणारी गोडी आणि प्रंचड इच्छा या मुलींचे अभ्यासावरील प्रेम कमी करू शकली नाही. कारण जरी शाळा सुटली असली तरी तिची शिकण्याची जिद्द, तिचे आजारपण कमी करू शकली नाही. तिचे शाळेचे दफ्तर, वह्या, पुस्तकं, खोडरबर, पेन्सिल आणि कंम्पास हेच तिचे आता सोबती बनले होते. त्याकाळची रोज संध्याकाळी पाढे म्हणायची पद्धत, शुभंकरोती आणि रामरक्षा हा तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरला होता. आता माई इतर मुलांच्या काळजीतून मुक्त झाल्या होत्या. पंरतु या मुलींच्या काळजीने माईंना ग्रासले होते. पंरतु हरणे हे माईच्या स्वभावातच नव्हते. माईंना कधीही रडतांना पाहील्यांचे आठवत नाही पंरतु लढतांना नेहमी पाहीले. माईंचे जीवन हे खुप संघर्षमय होते आणि माईंनी जीवनाचा हा संघर्ष खुप जिद्दीनी आणि हिमंतींने लढला. आता माईंची ही लेकच माईंच्या जगण्याचे कारण झाली होती. माईंनी आता आपले पुर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित केले होते. तिच्यावरील औषधौ-उपचार सतत चालले असायचे. परदेशातुन येणारे डॉक्टरांनासुध्दा, माईची मुलीला उपाचारांसाठी दाखवण्याची धडपड चाललेली असायची. माईंचा आपल्या कर्मावर आणि कर्तृवावर जास्त विश्वास होता. माईंनी कधीही फक्त देव देव केले नाही, कर्म हाच माईंचा देव होता. पण याचा अर्थ असा नाही की माई या नास्तिक होत्या. माईंकडेपण स्वतःचे असे एक छोटेखानी देवघर होते. त्या देवघरांत माईंच्याच शब्दात.. लंगडा बाळकृष्ण, महादेवांची पिंड, स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरू विराजमान होते. माईंनी आधुनिक उपचारांसोबतच दैवधर्म, व्रतवैकल्ये, उपासनासुध्दा आपल्या लेकीच्या आरोग्यासाठी केली. पंरतु त्यात अपेक्षित असे यश माईंना येत नव्हते. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने माईंना हे आधीच कळून चुकले होते की या आजारावर जगात कुठेही उपचार नाही पंरतु माईंमध्ये असणारी आई, माईंना स्वस्थ बसू देत नव्हती आणि लेकीवरील उपचार हा माईंच्या जीवनाचां नित्याचा भाग बनून गेला होता. पण एका अर्थाने माईंनी लेकीचे आजारपण स्विकारले होते. लेकीला लागणारां सर्व सुख सुविधा देण्याचा त्यानी अखेरपर्यंत प्रयत्न केला आणि तिला खुपच सुखांत ठेवण्याचा प्रयत्न केला.
माईंनी आपल्या मुलांनप्रमाणेच इतरांच्या मुलांवर सारखेच प्रेम केले. माईंच्या नात्यागोत्यातील मुलेसुध्दा माईंला आपल्या आईप्रमाणेच मानत असत. माईंपण त्या सर्वांचे जातीने लाड पुरवायच्या. माईंची सर्वात धाकटी भावंड ही माईंच्या मोठ्या मुलांच्याच बरोबरीची असल्याने त्या भावंडांसाठीसुध्दा माई, आईच्याच जागेवर होत्या. माईं या सर्व परिवारासाठी धन्वंतरीच होत्या. तशा त्या इतरांसाठीसुध्दा होत्याच. आरोग्यासंदर्भात कोणालाही कोणतीही समस्या असो पहिला संपर्क हा माईंना होत असे. माईंच्या दवाखान्यात समस्या सुटत असेल तर उत्तमच अथवा माईंच्या किंवा माईंच्या डॉक्टरांच्या ओळखीने इतर संबंधित डॉक्टरांचा संपर्क केला जाऊन समस्या सोडविल्या जात असतं. स्त्रीरोग आणि लहांन मुलांच्या समस्या सोडविण्यात माईं आणि माईंच्या डॉक्टर तंज्ञ होत्या. अनेक निसंतान जोडप्यांना मार्गदर्शन करणे. त्या काळातील उपलब्ध उपचार पध्दतीचे माहिती देऊन, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला होता. अनेक आईवडीलांनी आपल्या मुलांच्या व्याधीने त्रस्त होऊ त्यांच्या जीवनाबद्दलच्या आशा सोडल्या होत्या, त्यांनासुध्दा माईंनी मानसिक आधार देऊन, त्यांच्या मुलांना ओषधोपचार करून, आरोग्यदृष्ट्या संपन्न बनवून त्यांचा जीवनातील आंनद परत मिळवुन देण्याचे पुण्यकर्म केले होते. अनेकांना मृत्युच्या दाढेतुन खेचुन आणले होते. अशा अनेक जवळच्या, दुरच्या नातेसंबंधातील, ओळखीचे आणि अनोळखी लोकांच्या मदतीला माई नेहमी धाऊन गेल्यात. माईंनी किती जणांना, कश्या स्वरूपात मदत केली असेल हे माईंसुध्दा आठवत नाही. काही जाणिव आणि संवेदनाक्षम असलेले लोक आजही माईंचे नाव घेतात आणि मनोमन आभार व्यक्त करतात. माईंचा सामाजिक कार्यात सहभाग होता. आपल्या माहेर असो वा सासर या परिवारातील सुख, दुख, समस्या आणि अडीअडचणींच्या काळात माई त्यांच्या सदैव सोबत असायच्या. माई जिथं राहायच्या ते एक जिल्हांचे ठिकाण होते. तेथे आजुबाजुच्या गावातील नातेवाईक आणि ओळखीचे लोक नेहमी आपल्या नोकरीनिमित्त, सरकारी कामानिमित्त यायचे. त्या सर्वांचासुध्दा माईंच्या घरी एक चक्कर असायचा. माईचे घरसुध्दा कचेरीच्या ऑफिससारखेच होते. तिथे लोक आपआपल्या समस्या सुख दुःख माईंना सांगत असत आणि माईसुध्दा त्यांच्या समस्या माईच्या परिने सोडवण्याचा प्रयत्न करत असायच्या. त्यात आरोग्यासंदर्भात तर असायच्या, परंतु त्या व्यतिरिक्त लग्न जुळवणे, लग्नांतील विघ्न, वधु वरांकडील समस्या, घरगुती समस्या, कोंटुबिक वादविवाद, शिक्षण या सर्व समस्या असायच्या. माईं ज्या वैद्यकीय व्यवसायात होत्या त्यात माईंच्या पेशंटमध्ये मोठे मोठे अधिकारी, शिक्षक, मोठे व्यापारी आणि पोलीस अधिकारीही होते. त्या सर्वांना माईंनी नेहमीप्रमाणेच मदत केली असल्याने ते सर्व मोठे लोक माईंना माईमावशी म्हणुन आदराने सन्मान देत असत. माईंच्या शब्दालासुध्दा त्यांच्याकडे मान असे. या सर्व गोष्टीचां फायदा माईंना आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी होत होता. जळगांवतील मोठ मोठे सोन्यांचे व्यापारीसुध्दा माईंना, त्यांच्या कार्यामुळे आदरांने ओळखत असतं. तसाच माईंना आपल्या घराजवळच राहणारां चुलतभावाचा आणि त्यांच्या परिवाराचा खूप आधार होता. माईंच्या प्रत्येक अडीअडचणींच्या वेळी हा भाऊ आणि त्यांची मुले पुढच्या क्षणाला माईंच्या मदतीस धाऊन येत असत. माईंच्या या भावाच्या उल्लेखाशिवाय माईंचा हा लेख अपुर्ण राहिला असता. माईंचा हा जीवनप्रवास असाच सुरू राहिला. माईंचा परिवार हळूहळू वाढत गेला. इतर मुलांची लग्ने झालीत.जवळपास सगळीच नातवंडे ही माईंच्याच दवाखान्यात माईंच्याच देखरेखीत जन्माला आली. माईंनी इतके वर्ष आपली सेवा या क्षेत्रात दिली की नातवंड तर नातवंड, माईंचा एक पंन्तूसुध्दा माईंच्याच दवाखान्यात जन्माला आला होता. आता नातवांचीसुध्दा लग्न कार्य होऊ लागली होती. माईं शारिरीकदृष्ट्या थकत चालल्या होत्या. माईंची धाकटी मुलगीच आता पंन्नाशीच्या जवळ आली होती. त्यावरून माईंच्या वयाचा अंदाज येत होता.
माईंच्या नोकरींच्या ठिकाणीही बराच झपाट्याने बदल होत होता. सुमनताई ज्याच्यासोबत माईंनी आपली नोकरीतील वाटचाल सुरू केली होती, त्यांनीही आपली सेवा आता कमी केली होती आणि निवृतीचा विचार केला होता. जसा काळ कोणासाठी थाबंत नाही तसा येथेही थांबला नाही. नव्या पिढीनी जुन्या पिढीची जागा घेण्यास सुरूवात केली. सुमनताईनी निवृती घेऊन आपला दवाखाना आपल्या चिल्ड्रंन स्पेशलिस्ट असलेल्या आपल्या सुनेच्या स्वाधीन केला होता. प्रसृती केंद्र हळूहळू बंदच केले. आता फक्त लहांन मुलांचा दवाखाना मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. नविन डॉक्टरांना नविन लोकंच सहाय्यक म्हणुन लागू लागली. माईंच्या बरोबरीचे सहाय्यक कमी करण्यात आले किंवा त्याना इतरत्र दवाखान्यात स्थलांतरीत करण्यात आले. पंरतू माईंची एकनिष्ठ सेवा आणि सेवेची दखल घेऊन त्यांना नविन लोकांमध्ये आदरांने आणि सन्मानाने सामील करून घेण्यात आले होते. पंरतु माईंनासुध्दा नविन पिढीचा वेग आणि पध्दत जळवून घेणे कठिण जात होते. माई हे सर्व याही वयात फक्त ऐवढ्याचसाठी करत होत्या की त्यांची आणि त्यांच्या मुलीची जबाबदारी आणि भार कोणावरही पडू नये. तसे मुलं आपल्या आईचे कष्ट पाहुन अधुन मधुन आपल्या आईला नोकरी सोडून आपल्या घरी बोलवण्यासंदर्भात बोलत असत. पण माईं म्हणायच्या माझ्याकडून होईल तोपर्यंत मी काम करेल आणि नाही जमेल, तेव्हाच तुमच्याकडे येईल. माईंचे मुलांकडे जाणे त्यांच्या दृष्टीने तेवढे सोपे नव्हते. कारण माईंसोबत त्यांची मुलगीपण होती आणि तिच्यासह माईंना मुलांकडे जाणे योग्य वाटत नव्हते. तसे माईंच्या मुलांना माईंच्या कष्टांची जाणिव असल्याने, ते आपआपले संसार सांभाळून, आपल्या आईकडे लक्ष देतच होते.आता माईंचे नातूसुध्दा शिक्षण संपवून नोकरीला लागले होते, म्हणजे माईंची तिसरी पिढी आता नोकरीला लागली होती. नातंवंड लग्नांची झाली होती. तरी आजी आपली नोकरी करत होती. माईंचा मुलगासुध्दा आता निवृत्तीच्या वयाला येऊन पोहचला होता.आता सर्व नातवंडांनासुध्दा आजीने नोकरी सोडवी असे वाटू लागले होते. तसा आग्रह ते तिच्याजवळ करत असत. अखेर तिने ते मान्य केले आणि मुलांनीसुध्दा बहिणीसह आईला आहे त्या परिस्थितीत साभांळ्यांचे मान्य केले. माईंना आपली कर्मभुमी, आपली जोडलेली जीवाभावाची लोक सोडून, आपल्या मुलांकडे जायचे होते तिच्यासाठी हे सोपे नव्हते. पण असे म्हणतात वृध्दपकाळ हा सर्वांसाठीच कठीण असतो. त्याला माईं तरी कश्या बरा चुकणार. उतारवयातील कमी जास्त सुख दुःख ही माईंच्या वाट्यालासुध्दा आलीत. अश्यातच आपल्या लेकीचा आजार बळावला आणि ती माईंना सोडून या जगातुन निघुन गेली. तीच खरा अर्थाने माईंच्या जगण्याचा आधार आणि कारण होती. माईंना तिची कमी खुप दिवस जाणवत होती.पंरतू लोकांच्या म्हणण्यानुसार माईं आता खरा अर्थाने आता मोकळ्या झाल्या होत्या. पंरतू त्या मातेचे दुःखं तीच जाणो.
माईंनी आयुष्यभर सर्वांना विना अपेक्षा मदत केली होती. भरभरून दिले होते आणि परतीची कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती. आता आयुष्याच्या या वळणांवर वेळ होती त्या प्रत्येक व्यक्तीची ज्यांना ज्यांना तिने भरभरून दिले होते. तिने कोणाकडे कधीही काहीही मागितले नाही. परंतु ही त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी नव्हती का? की आपण जाणिव ठेऊन या व्यक्तीचे काहीतरी देणे लागतो. असो. यापैकी कुठलीही अपेक्षा तिने आपल्या आयुष्यात ठेवली नाही आणि व्यक्त केली नाही. प्रत्येक व्यक्ति ही गुणदोषांचा पुतळा आहे असे संत महात्मा सांगून गेले आहेत. त्याला माईं तरी कसा अपवाद असणार. त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती, मुलांचा सांभाळ, त्यांच्यावरील संस्कार आणि आयुष्यातील सततचा संघर्ष यातुन त्या घडल्या आणि स्वभावातील गुण दोष त्यांनाही लागू होते. माझे एक स्पष्ट म्हणणे आहे. त्याच लोकांनी इतरांचे दोष दाखवावे, ज्याच्यामध्ये फक्त गुणंच गुंण आहेत आणि एकही दोष नाहीत. हा नियम सर्वांनाच लागू होतो. माईं आयुष्याच्या ज्या वळणावरती होत्या त्या वळणावरून आपल्यालाही कधी ना कधी वळण घेऊन जायचेच आहे नां. आयुष्याचा हा टप्पा आपणा सर्वांनाही कधी ना कधी पार करायचाच आहे. असो.
माईंचा जीव आपल्या सर्व लोकांसाठी शेवटपर्यंत तुटतच राहिला. हे जे लोक त्यांच्या जवळ शेवटपर्यंत राहिले तेच चांगल्याप्रकारे जाणु शकतात. असे म्हणतात आईला आपल्या मुलांवर प्रेम आणि माया व्यक्त करण्यासाठी कुठलेही वय आडवे येत नाही. प्रंचड पाऊस पडल्यानंतर आपल्या 72 वर्षाच्या मुलांला पावसात बाहेर पडू नको हे सांगणारी हीच 90 वर्षाची आई असते. आपल्या आधीच आजारांने अंथरूणाला खिळलेल्या, आपल्या 68 वर्ष वयाच्या मुलीला पुन्हा आजारातुन उठवण्यासाठी प्रयत्न करणारी हीच 90 वर्षाची आई असते. सुनांच्या आजारपणात काळजी करणारी हीच ती 90 वर्षाची सासु असते. इतक्या सर्व नातवंडांनाच्या गोकुळांत, प्रत्येकांची नावानिशी काळजी आणि चौकशी करणारी हीच ती 90 वर्षाची आजी असते. या वयात आपल्या पंणतूची शाळेतुंन येण्याची वाट पहाणारी, त्याला गरम वरण भात देऊन त्यांच्यासोबतच जेवणाचा आंनद घेणारी हीच ती 90 वर्षाची पणजी असते. भाऊबीज आणि रक्षाबंन्धनाला आपल्या 80 वर्षाच्या भावाला त्याच उत्साहाने ओवळणारी हीच ती 90 वर्षाची बहीण असते. माईंचे आयुष्य हे सुखां दुःखाचे संमिश्र मिश्रण होते.
माईंनी जसे दुःख पाहिले तसेच अलौकिक असे सुखही पाहीले. नातवंड, पंतू आणि पणती यांचा आनंद मनमुराद लुटला. ती आपल्या पंणतूंमध्ये खुप रमायची. माईंनी आपल्या नातवांसोबत आणि त्यांच्या परिवारांसोबत आयुष्यातील खुप चांगला कालावधी घालवला. नातवासोबत हैद्राबाद येथे स्थलांतरीत होऊन तिथेल संस्कृतीचा आनंद लुटला. माईं आपल्या तिन्ही मुलांकडे ठराविक कालावधीसाठी राहण्यास जात असतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपल्या नातवाला स्पष्टपणे सांगितले होते की मी आता येथुन कुठेही जाणार नाही आणि जाईल तर येथुनच देवाघरी जाईल. माईंनी कधीही देवाजवळ मरण मागितले नाही किंवा मुक्ती मागितली नाही. कारण तिला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली होती. सतत कार्यमग्न राहणे आणि विनातक्रार मिळालेले आयुष्य जगणे हाच तिचा उंदड आयुष्याचा मंत्र होता. तिने आपल्या आयुष्यात ऐवढे कठिण दिवस पाहिले होते, त्यांना किंवा नशिबाला ती कधी दोष देत बसली नाही आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण ती आनंदाने जगली तिच्या अश्या पध्दतीने जीवन जगण्याने, कुठलाही रोग तिला स्पर्श करू शकला नाही किंवा कुठलीही गोळी तिला लागली नाही. स्वतःची घरगुती पध्द्तीने काळजी घेत तिने आपल्या शरीरांची आणि आपल्या मनांची काळजी घेतली. यासोबतच नवनविन गोष्टी शिकण्यासाठी तीचा उत्साह असायचा. आपल्या पंतूकडून मोबाईल आणि कंम्प्युटर शिकणे. फुलांची झाडे लावणे, त्याची काळजी घेणे, पंतू, नातवासोबत अभ्यास करणे हे सर्व तिचे चालेले असायचे. तिने शिकलेली आधुनिक कला म्हणजे लिफ्टचा स्वंतत्रपणे वापर करणे आणि सेल्फी घेणे. तिने स्वतःच्या हाताने अनेक सेल्फी आपल्या नातंवडासोबत घेतल्या. नातवाच्या कारमध्ये पुण्यात फेरफटका मारला, कारमध्ये जाऊन आपली कर्मभुमी जळगांवला भेट देऊन झाली. फक्त विमानप्रवास बाकी होता तोही जवळपास निश्चितच झाला होता. पंरतु नियतीला माईंची एकतरी इच्छा बाकी ठेवायची असेल. कारण देवाची आणि माईंची जीवन जगण्याबद्दलची जणू स्पर्धाच लागली होती. पण म्हणतांत ना शेवटी तोच जिकंतो.
दसराचा सण उजाडला. माईंची सकाळपासुन लगबग सुरू होती. सणाला माई आवर्जुन नविन पातळ घालायच्या, मोत्याची माळ आणि दागिने घालायच्या, छान तयारी करायच्या, आपलासोबतच इतरांनाही तयार होण्यास सांगायच्या. माईंमुळे सगळ्या घरात आनंदाचे आणि सणांचे वातावरण निर्मिती व्हायची. दसराला सर्व तयारी करून सणांच्या जेवणाचा यथेच्छ आनंद घेतला. तीने त्या दिवशी पुरणपोळीचा मनमुराद आनंद घेतला. नातसुनेचे जेवण उत्तम झाल्याचे कौतुक केले. दुपारी बसल्या बसल्या आराम केला. सध्याकाळी पुन्हा तयारी केली. मला नमस्कारांसाठी येणारां लहान मुलांसाठी खाऊ मागितला आणि आपल्या जागेवर जाऊन मुलांची आणि येणारा जाणारांची वाट पाहू लागली. मी, माझा मुलगा आणि माझे वडील सीमोलंघनासाठी जाऊन आलो. आल्यावर विधीवत पुजा झाली. प्रथेप्रमाणे मोठ्यांच्या आशिर्वादाने सणाची सुरूवात झाली. आम्ही सर्वानी माईला साष्टांग नमस्कार केला. तिने आम्हाला भरभरुन आशिर्वाद आणि खाऊ दिला आणि तिच्यासोबत तिने एक गृप फोटो काढण्यासाठी सांगितले आणि बोलता बोलता असेही बोलुन गेली की पुढच्या दसराला मी असेन, नसेन माझ्यासोबत एक फोटो काढा.आम्ही सर्वांनी छान फोटो काढला. ती थोड्यावेळ आमच्याशी हसत खेळत बोलली आणि आपले कपडे बदलुन आरामास जाते असे सांगून गेली. आज ती दुपारी झोपली नव्हती. म्हणुन तीला पडताच क्षणी गाढ झोप लागली. आम्ही सर्व आपआपल्या कामास निघुन गेलो. रात्र झाली सर्वजण झोपी गेलो. माईंची नातसुन सकाळी नित्यनेमाने पाच वाजता उठली आणि सवयीने माईंच्या खोलीत डोकावली. तिला रोजच्यासारख नाही वाटले, ती माईंजवळ गेली. माईंना आवाज देऊन बघितले पण माईंनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. माझे वडील आलेत. त्यांनीसुध्दा माईला आवाज देऊन पाहिला. मला माईंचे शरीर थंड जाणवले आणि तेव्हाच मला कळले की माई झोपतेच आम्हाला सोडून पुढच्या प्रवासाला निघुन गेल्यात. अगदी त्यांना हव तसंच कोणालाही त्रास न देता आणि नातवाच्याच घरून, हे जग सोडून ही सर्वांची आई सर्वांना पोरक करून गेली….कायमची!!!!