आगंतुक – सविता कारंजकर
शेखर पुन्हा पुन्हा दोन्ही मुलांना कुशीत घेत होता.नीताच्या नजरेला नजर भिडवणे त्याला आज जड जात होते.नीताही सकाळपासून भरल्या डोळ्यांनी कामं करत होती.
सगळी आवराआवर करून झाली.
चार वर्षांचा सोनू आईजवळ घुटमळत होता.रोजपेक्षा काहीतरी वेगळेपण त्याला जाणवत होते आई मध्ये…पण कळत नव्हते.त्याचे वयतरी कुठं होतं एवढं?
आठ वर्षांच्या मनूला वातावरणातील गांभीर्य समजलं होतं पण नक्की काय होणार आहे याचा तिला अंदाजही येईना आणि आईबाबांना विचारायचं धाडसही होईना.ती हिरमुसली होती.आईच्या डोळ्यातले अश्रू आणि बाबांची हतबलता तिला समजत होती.
संध्याकाळचे साडेसहा वाजले होते.नेहमी देवासमोर समई लावून शुभंकरोती म्हणण्यासाठी गडबड करणारी आई आज कसलीही धावपळ करत का नाही?
असा विचार मनू करत होती.कसं बरं आईबाबांना मदत करता येईल मला? या प्रश्नावर ते चिमुकलं मन उत्तर शोधत होते.तेवढ्यात त्या बालमनात एक विचार चमकला…
येस्स्स्…बस्..आता मी माझ्या आईबाबांना खूश करू शकते…
मनू उठली..शेखरजवळ गेली हलकेच एक पापी घेतली आणि म्हणाली..
.”बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका..मला नवा फ्रॉक नको..खाऊ नको आणि कोणतीच पुस्तकंही नकोत..मी शाळेतही नाही जाणार..मी आई सोबत कामाला जाईन आणि भरपूर पैसे मिळवेन हं…”
मनूचे हे बोलणे ऐकून नीताचा संयम संपला .ती ढसढसा रडू लागली. तिचं सांत्वन करण्याइतपतही धैर्य शेखरकडे नव्हते. त्याला स्वतःच्या निष्क्रियतेची लाज वाटत होती आणि त्याने घेतलेल्या निर्णयाची भीती वाटत होती त्यालाच.
पण त्याच्यासमोर पर्यायच उरला नव्हता.त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तो स्वतःची आजवरची पुंजी आणि वाडवडिलार्जित सगळी इस्टेट गमावून बसला होता…
आणि म्हणूनच त्याने नीता आणि मुलांसह आज रात्री आत्महत्या करायचे ठरवले होते.
नीताचे रडणे संपले..हळूहळू तिला राग अनावर होऊ लागला.
ती शेखरवर तोंडसुख घेऊ लागली. तिचा आवाज टिपेला पोचला होता.डोळे आग ओकत होते..तोंडातून जणू आगीचे लोळ बाहेर पडत होते.
इतक्यात..दारावर टकटक झाली.सुरुवातीला दोघांनीही कानाडोळा केला..पण काही क्षणातच टकटक वाढली.शेखर चमकला.नीता बडबडू लागली..बघा, असेल कुणीतरी मागतकरी..कुणाकुणाकडून किती कर्ज घेतलंय देव जाणे! बघा…उघडा दार..
शेखर अत्यंत जड अंतःकरणाने उठला..दार उघडलं..दारात एक जख्ख म्हातारी उभी होती.अंगावरचे कपडे फाटलेले, मळलेले होते.आणि हातात फक्त एक कळकट कापडी पिशवी होती.ती शेखरला न जुमानता घरात शिरली . तशी नीता तिच्या अंगावर धावून गेली…
कोण आहात तुम्ही? अशाकशा घरात घुसलात?
आजी म्हणाली..अगं..मी तुमच्याकडे काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेय..बाई गं..माझे थोडेच दिवस राहिलेत..मला या घरात आसरा द्या..मी तुमचे उपकार विसरणार नाही ..म्हातारीच्या आवाजात कंप होता.
ती कुणाच्याही परवानगी वाट न पाहता एका कोप-यात जाऊन पडली.
नीता आणखी भडकली..आम्हाला इथं जगणं मुश्किल झालंय आणि ही कोण आगंतुक पाहुणी?
तिने शेखरकडे पाहिलं..तो मनाने कधीचा मेला होता..आता या आगंतुक पाहुणीची जगण्यासाठीची धडपड पाहून तो गलबलून गेला होता. त्याच्या केविलवाण्या चेह-याकडे पाहून नीतालाही कसंनुसं झालं.ती वरमली.
पाण्याचा तांब्या घेऊन ती आजीजवळ आली.घोटभर पाणी प्यायलावर आजीला तरतरी आली.
“आजी,तू आलीस आमच्याकडे पाहुणी…पण बाई गं आमचंच जगणं मुश्किल झालंय आम्हाला..आम्ही तुला काय सांभाळणार. गं?” नीता म्हणाली..
यावर आजी केविलवाणी हसली आणि म्हणाली..बाळांनो, मी असं किती जगणार? पोटच्या पोरांनी संपत्तीच्या पायी मला संपवायचं कटकारस्थान केलं..त्या नराधमांच्या तावडीतून सुटून मी जीव मुठीत धरून इथं आले..दुपारपासून तुमच्याकडे बघतेय..का कोण जाणे..असं वाटतंय..आपले काही ऋणानुबंध आहेत..म्हणून मग शिरले तुमच्या घरात..मला उबदार वाटतंय रे या तुमच्या घरट्यात!”
आजी एवढंच कसंबसं बोलली…तिची ताकतच संपली आणि ती तिथेच कलंडली.. तिच्या हातातली ती कळकट पिशवी मात्र तिने घट्ट पकडून ठेवली होती क्षीण अवस्थेत त्या आजीला बघून शेखर आणि नीता क्षणभर आपले दुःख विसरून गेली.होतं नव्हतं तेवढं दूध नीताने गरम केलं आणि चमच्याने आजीला पाजले.आजी प्रसन्न हसली आणि चेह-यावर प्रसन्नता समाधान घेऊन लगेचच निजली. अति विचाराने नीताशेखरचा मेंदूही शिणला होताच.घाबरून निद्रादेवीच्या कुशीत शिरलेल्या मुलांना जवळ ओढत ते दोघेही निद्राधीन झाले.
दुसरा दिवस उजाडला..शेखर नीता आता आजीच्या सेवेत मग्न झाले.आहे त्या परिस्थितीत आपण आपली आई समजून आजीची सेवा करू..तिला बरं करू आणि मग बघू तिचं काय करायचं ते..असं ठरवून ते कामाला लागले.
नीताने भाताची गरमागरम पेज आजीला दिली..कढत पाण्याने तिला अंघोळ घातली.आपला स्वेटर तिला घालायला दिला.ऊब आल्यावर आजी फ्रेश दिसू लागली.
असे करत करत आठवडा उलटला.नीता आणि शेखर आजीच्या सेवेत दंग होते.आजीही छान प्रतिसाद देत होती.
“आता पुढे काय?” नीताच्या या प्रश्नाने शेखर दचकला..
” मी बोलतो आजीशी…उद्या तिला तिची सोय करायला सांगू आणि…. “
“आणि?..आणि काय?” नीता म्हणाली .
“आपल्या समोर आहे का दुसरा पर्याय?”….शेखर नकळत खेकसला तिच्यावर .खरंतर तो आतून पूर्ण खचलेला होता..मुलंही दबावाखाली वावरत होती.कुणीच कुणाशी काही बोललं नाही ..
सूर्याने उधळलेली शतरंगी किरणं शेखरनीताच्या घरात शिरली.नीताला जाग आली..तिने डोळे किलकिले करून पाहिलं..शेखर शांत झोपला होता. मृत्यूच्या भयाची किंचीत छटासुद्धा त्याच्या चेह-यावर दिसत नव्हती.तिने मुलांकडे पाहिलं..मुलं बाबांच्या कुशी सुरक्षित होती आणि सोनेरी भविष्याची सोनेरी स्वप्नं पाहत होती.
नीताने आजीकडे पाहिलं .
आजी शांत झोपली होती..मंद स्मित आणि एका अनोख्या तेजाने आजीचा चेहरा उजळला होता .नीताने आजीकडे निरखून पाहिले..आणि एक कळ तिच्या काळजात उठली..नीताने शेखरला हलवून जागं केलं..
आजीचा निष्प्राण देह शांत समईसारखा भासला त्याला.
दोघांनीही अर्थपूर्ण नजरेने एकमेकांकडे पाहिले.शेखर उठला..थरथरत्या हाताने त्याने आजीची पिशवी उघडली..त्यात प्लास्टिकच्या चारपाच पिशव्यांमध्ये अगदी जपून ठेवलेली काही कागदपत्रे होती.त्या कागदपत्रावर एका प्रथितयश वकील साहेबांचे नाव आणि फोन नंबर होता.शेखरने त्या नंबरवर फोन करून आजीबद्दल सांगितले…आणि आजीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यावा अशी विनंती केली.
शेखर नीता अंतर्बाह्य हादरले होते.आठवडाभरापूर्वी ते ज्या मृत्यूला कवटाळणार होते तोच मृत्यू त्यांच्या घरात येऊन त्यांच्या आगंतुक पाहुणीला घेऊन गेला होता. जीवाचा थरकाप उडाला होता त्या दोघांच्या…
अर्धा पाऊण तास उलटला असेल तोच वकील महाशय शेखरच्या घरी आले.त्यांनी स्वतःची ओळख सांगितली. आजीचे अंत्यदर्शन घेतले आणि शेखरला ते म्हणाले..
.या लक्ष्मीबाई माझ्या क्लायंट होत्या..तीन मूलं सुना नातवंडं असा मोठा परिवार असूनही यांना कोणी सांभाळायला तयार नव्हते. गेले काही दिवस त्या स्वतंत्र एक खोली घेऊन राहत होत्या.या आजीबाई करोडोच्या संपत्तीच्या मालकीण आहेत..पण मुलांना फक्त संपत्ती हवी आहे आई नको.गेल्याच महिन्यात त्या माझ्या ऑफिस मध्ये आल्या होत्या आणि त्यांनी मृत्यू पत्र करून घेतले.त्यात त्यांनी असं लिहलंय…माझ्या शेवटच्या दिवसात जो मला सांभाळेल तो माझ्या संपत्तीचा वारस असेल.
आणि या त्यांच्या इच्छेनुसार ही सगळी संपत्ती तुमच्या मालकीची झाली..”
नीता आणि शेखरचा पुतळा झाला होता.
त्यांना भानावर आणत वकीलसाहेब म्हणाले…” हे घ्या माझं व्हिजीटींग कार्ड..काही फाॅर्म्यॅलिटीज् पूर्ण कराव्या लागतील. ..
“हे कसं शक्य आहे वकीलसाहेब?”
शेखर इतकंच बोलू शकला.
वकीलसाहेब म्हणाले,आजी तुमच्या कडे आगंतुक पाहुणी म्हणून आली आणि तुमचं आयुष्य बदलवून गेली…. आभार माना…बघता काय नुसते?
सविता कारंजकर, सातारा