आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड
सोसूनी असह्य यातना ,
हास्य चेहऱ्यावरी फुलविते .
प्रेमाची करूनी उधळण ,
दु:ख आपुले हृदयी ठेवते .
संसारासाठी होऊनी पणती,
सदैव ती तेवत राहते .
तिमिर जाळूनी विरहाचा ,
वाट ती सुखाची दावते .
साऱ्यांसाठी जगता जगता अशी ती,
सर्वस्व आपुलेच विसरूनी जाते.
स्वप्नांना देवूनी आपुल्या मुठमाती,
तीच आपुल्या रक्तांचे स्वप्न होते .
चंदनापरी झिजवूनी आयुष्य ,
ती स्वत:च गंधहीन होते .
बळ पंखास मिळताच ऊडूनी जाती पाखरे,
सारे आपुलेच म्हणता म्हणता शेवटी एकटीच ती घरट्यात राहते.
साऱ्या सुख दु:खांचा मांडीत हिशोब,
आसवांत ती पुरतीच बुडूनु जाते.
तुटलेली स्वप्ने कवठाळूनी ऊराशी जीवनास पाहते,
-
-
- तरीही आई कुठे काय करते?
-