कोरोना आणि मिळालेलं निवांतपण...
- श्रीपाद टेंबे
तसं पाहिलं तर करोना या विषाणूचे संभाव्य दुष्परिणाम आणि गांभीर्याची कल्पना आपल्या सगळ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरवातीपासुनच आली होती. त्यामुळे आपण सगळेजण बऱ्यापैकी सावध झालो होतो. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यायला सुरवात पण केली होती. त्यातून वर्तमानपत्रे आणि सोशल मिडियावरील चर्चा आणि बातम्यांवरून आज नाही तर उद्या आणीबाणीसदृष्य आपण घरातच नजर कैद किंवा लॉकडाऊन होणार असा अंदाज सगळ्यांनी बांधला होता. त्या दृष्टीने बहुतेक लोकांनी आवश्यक ती तयारी केलेली होती. किराणा सामान, नेहमी लागणारी औषधे, मास्क, निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या वस्तू घरी आणून ठेवल्या होत्या.
आपण नेहमी म्हणतो, हे विश्वची माझे घरपण या लॉकडाऊनच्या काळात, हे घरची माझे विश्व असं आपण मनाला आपण समजावून सांगितले आणि अचानक उद्भवलेल्या परीस्थितिशी तडजोड करून, शक्यतो चीडचीड न करता आनंदाने राहू लागलो. तसंही आपण आनंदातच राहतो, पण या लॉकडाऊनच्या कालावधीत कोणत्याही गोष्टीचा त्रागा न करता अक्षरशः दिवस-रात्र आणि ते देखील सध्या तरी ०३ मे २०२० पर्यंत म्हणजे ४० दिवस फक्त घरात म्हणजे घरातच आणि तेही आपल्याच घरात थांबायचे आहे. लॉकडाऊनच्या सुरु व्हायच्या अगोदर कसेही करून दिवसातले कमीत कमी तीन-चार तास बाहेर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बाहेर पडण्याची सवय असलेलेल्यांना घरात राहणे नक्कीच कठीण होते आणि आहे. थोडेफार आपण सगळेजण याच कॅटेगरीत मोडत असल्यामुळे आपल्याला बरीच मानसिक तयारी करावी लागली. या दिवसांना आपल्याला सामोरे जावे लागेल असा आपण विचार सुद्धा केला नव्हता. नियमांचे पालन केले तरच आपल्याला येणारा दिवस पाहता येणार आहे. मग संपूर्ण दिवस घरात बसून काय करायचे? रोज टी.व्ही, मोबाईल पाहून कंटाळा आला आणि शेवटी लक्षात येतं की आपण या लॉकडाऊनमधील दिवसात काहीच करत नाही. म्हणून कंटाळा येतो आहे. रोजच्या तथाकथित बिझी शेड्युलमुळे ज्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ मिळत नव्हता तो वेळ आता मिळाला असल्यामुळे अश्या गोष्टींची आपण सर्वप्रथम यादी तयार केली पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने घरातील सगळ्या व्यक्तींशी संवाद साधणे, या गोष्टीला आवर्जून प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना समजून घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे एकमेकांच्या विचारांना प्रेरणा मिळेल नक्की. हे सर्व लॉकडाऊनमुळे शक्य होऊ शकते यात शंका नाही. जुन्या आठवणींना उजाळा, जुन्या गोष्टी, फोटो हे सर्व पाहून चेहऱ्यावर येणारे हास्य ते इतरत्र अनुभवता येणार नाही. रोजच्या धावपळीमुळे बहुसंख्य लोक पेपर मधील फक्त हेडलाईन वाचत असतात. या दिवसात संपूर्ण पेपर वाचण्यासाठी वेळ मिळाला आहे, त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. वाचण्यासाठी वाचायचं या विचाराला लॉकडाऊनमुळे प्रेरणा मिळाली. इंटरनेटचा पुरेपूर उपयोग करून बऱ्याचजणांना नवीन नवीन स्कील शिकण्यास प्रवृत्त केलेले आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनाला लॉकडाऊनने आराम दिला आहे. परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घ्यायचे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे अभ्यासले. प्रत्येक संकटाला सकारात्मक दृष्टीकोनातून बघितलं तर संकट काहीतरी नवीन शिकवून जात असतं. परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तर, आपण आपल्या मनस्थितीमध्ये बदल करायचा आहे.
या काळात इंटरनेट, सोशल मेडिया, आणि फोनचा विशेष करून मोबाईलचा कमीत कमी वापर कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील राहिलो तर!! घरी बरीच वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके कपाटांमध्ये बंद आहेत, ती पुस्तके आपण ठरवून वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. या वाचनाचा महत्वाचा फायदा असा या छोट्याश्या कालावधीत पुष्कळ नवीन पुस्तकांचा आणि नवीन विषयांचा परिचय होण्यास मदत होणार आहे. नुकसान तर नक्कीच होणार नाही. एकूण काय तर लॉकडाऊनच्या कठीण कालावधीमध्ये घराचे दरवाजे बाहेर पडण्यासाठी जरी बंद असले तरी, एक नवीन पर्व प्रत्येकातील सुप्तगुण जागृत करून, चांगले निरोगी, प्रगतीशील जीवन जगण्यासाठी सज्ज आहे.
करोनामुळे या लॉकडाऊनच्या काळात नेमकं काय करावे, याचे निट आकलन अनेकांना झालेले नाही. अकस्मात मिळालेल्या सक्तीच्या रजेमुळे आनंद साजरा करावा की दु;ख या विचारांच्या गोंधळात बरेच जण अडकून पडले आहेत. खरं म्हणजे आजपर्यंतच्या प्रवासात आपण जे काही शिकलो तेच परत करतांना आपला वेळ कसा निघुन जाईल आपल्याला हे कळणारच नाही. आहे तेच जरी नव्याने केलं तरी वेळ मजेत जातो हे मी माझ्या अनुभवावरुन सांगू शकतो. इतके वर्षे न लाभलेली निरव शांतता, धावपळीच्या युगात लाभलेली क्षणभर विश्रांती, नैसर्गिक निरीक्षण करता येईल इतपतचा वेळ इत्यादी गोष्टींचा अनुभव आपण सगळेचजण घेत आहोत. प्रदुषणात झालेली लक्षणीय घट आपल्या आजूबाजूला होणारी पक्ष्यांची किलबिल, पुस्तक वाचन, वैयक्तिक छंद, संगीताचा आनंद घेण्याची आणि तोही कुटुंबीयासोबत या सुवर्ण संधीचा बहुतेक जण आनंद घेतांना आपल्याला दिसत आहेत. कोरोना या विषाणूमुळे आपल्याला आपले वैयक्तिक छंद जोपासण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे असा सकारात्मक विचार आपण केला तरच लॉकडाऊनचा कालावधी नक्कीच सुसह्य होणार आहे याबाबत शंका नाही..!!!