कोरोनाचा धडा....
- बाबू घाडीगांवकर
आजवरच्या इतिहासात कधीच न थांबलेली मुंबई थांबली… मुंबईची धमणी असलेली रेल्वे थांबली…. मुंबईच काय पण अख्खा देश थांबला…केवळ आपलाच देश नाहीतर संपूर्ण जग थांबलंय…आणि हे इतिहासात पहिल्यांदाच घडलंय! हे सगळं ना थांबवलंय कोणा मातब्बर शत्रूने… ना कोणी परग्रहावरील आसूरी शक्तीने…. ना एखाद्या नैसर्गिक आपत्तीने… हे सारं जग गेल्या अनेक दिवसांपासून अगदी जागेवरच ठप्प केलंय एका डोळ्यांनीही न दिसणार्या एका सूक्ष्म विषाणूने! ‘ कोरोना ‘…किंवा कोविड -१९ हे त्याचं आपणच ठेवलेलं नाव, पण त्याचं नाव काय असावं याच्याशी त्याला काहीही देणंघेणं नाहीय… एका अनामिक… अद्भूत… अमानवी… किंबहुना ‘आसूरी’ शक्ती प्राप्त असलेल्या ह्या एवढ्याशा विषाणूने संपूर्ण जगाभोवती आपला अजगरी विळखा घातला आहे. चीनमधील वुहान प्रांतात जन्मलेला (?) हा विषाणू आता एकेक प्रदेश गिळंकृत करीत पुढे पुढे चालला आहे. या एवढ्याशा सूक्ष्म जंतूने एकाच दणक्यात संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. परस्परांना वैज्ञानिक प्रगतीचे सोहळे दाखवून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाऱ्या जगातल्या प्रत्येक देशाला आज आत्मचिंतन करण्याची वेळ या कोरोना नामक जंतूने आणली आहे. इतकी विशाल पृथ्वीसुद्धा अपुरी वाटू लागल्याने परग्रहावर जाऊन तिथे सृष्टी निर्माण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मानवावर आता मात्र या पृथ्वीवरचे स्वतःचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी धडपड करण्याची नामुष्की या इवल्याशा सूक्ष्म विषाणूने आणली आहे यावरून या कोरोनारूपी विषाणूच्या अंगी असलेली अचाट ताकद लक्षात येते.
कुणाच्याही ध्यानीमनी नसताना या विषाणूचा संसर्ग इतक्या प्रचंड वेगाने पसरला की, त्याचा प्रतिबंध करणे जगातल्या कोणत्याही देशास अजूनपर्यंत तरी शक्य झाले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘अति प्रगत’ असा मानाचा शिक्का मिरवणारे देशही या कोरोनारूपी आक्रमणापुढे हतबल झाले आहेत. संपूर्ण जगाला स्वतःच्या दावणीला बांधण्याची भाषा करणारी काही ‘मुग्ररी’ राष्ट्रे देखील आज कोरोनाच्या वावटळीत उध्वस्त होऊन इतर देशांकडे मदतीची याचना करीत आहेत. ‘समृद्ध’ आरोग्य यंत्रणा अशी बिरुदावली मिरवणारे ‘समृध्द’ देश या कोरोनारूपी जबरी फटक्याने देशोधडीला लागले आहेत. चीनच्या प्रांतातच हजारो नागरिकांना यमसदनी पाठवलेल्या या महासूराने पुढच्या काहीच दिवसांत संपूर्ण जगभरात हल्लकल्लोळ माजवला आहे. इटली, स्पेन, अमेरिका यांसारख्या अतिप्रगत देशांमध्ये सध्या सुरू असलेली कोरोनाची महामारी पाहिली की सामान्य माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. या तीनही देशांमध्ये आज घडीला दररोज हजारो निरपराध नागरिक हकनाक कोरोनाचे बळी ठरत आहेत. तेथील रस्त्यारस्त्यांवर जीवाच्या आकांताने तडफडत तडफडत हजारो नागरिक गतप्राण होत आहेत. मोठमोठ्या शहरांत असे पडलेले मृतदेहांचे खच पाहिल्यावर ‘ तिसरे ‘ महायुद्ध तर सुरू झाले नाही ना… असेच क्षणभर कोणालाही वाटेल. पण इथे ना कोणी ताकदवान शत्रू दिसत आहे… ना शस्त्र, अस्रांचा मारा… ना युध्दाचा आवेश… ना रणदुंदूभी….! पण नागरिकांच्या प्रेतांचे ढीग मात्र ठिकठिकाणी दिसताहेत हे वास्तव पचवताना सर्व सामान्य माणसाची मती गुंग झाली आहे. अशा अतिप्रगत देशांमधील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा जिथे कुचकामी ठरल्या आहेत तिथे विकसनशील किंवा अप्रगत देशांच्या स्थितिबाबत विचारही न केलेला बरा. इटली,स्पेन,अमेरिकेसारख्या देशांमध्ये रस्तोरस्ती कोरोनाच्या महामारीचे बळी ठरलेल्या नागरिकांच्या प्रेतांचे खच दिसतात…. पूढचे अंत्यसंस्कार तर दूरची गोष्ट, पण त्या मृतदेहांना स्पर्श करण्यासही कोणी धजावत नाही. शोक करण्यासाठीही कोणी रक्ताचे नातेवाईक जीवंत नाहीत… कोणी असलेच तरी दूर उभे राहून पाहण्याखेरीज त्यांच्याकडे गत्यंतर नाही…. शवागारे प्रेतांनी तुडुंब भरलीत…. आपल्या रक्ताच्या नातेवाईकाचे दफन करण्याचीही कुणाची तयारी नाही…अशी दुर्दैवी शोकांतिका होईल असे चित्र दोन महिन्यांपूर्वी जगातल्या कोणीही अगदी स्वप्नातही पाहिले नसेल. साम्राज्य विस्ताराच्या हव्यासापोटी जगातल्या दुर्बल राष्ट्रांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याची स्वप्ने बघणाऱ्या अशा सत्तापिपासू राष्ट्रांची अशीही कधी अवस्था होईल अशी कल्पनाही कोणी केली नसेल इतकी भयंकर दुःस्थिती बघण्याची वेळ संपूर्ण जगावर आली आहे.
सध्या जगभरातल्या चर्चेचा ‘ कोरोना ‘ हाच सार्वत्रिक विषय आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्व प्रकारचे मुद्दे, आव्हाने व समस्यांची व्याख्याच या कोरोनाच्या महामारीने बदलून टाकली आहे. ‘ उद्या काही करण्यासाठी आज जगणेच महत्वाचे आहे ‘ या अंतिम सत्याची जाणीव आज जगभरातल्या प्रत्येकाला झाली आहे. जात,धर्म, समाजाबद्दलच्या माणसानेच निर्माण केलेल्या नि वाढवलेल्या समस्या आजच्या घडीला दुय्यम ठरल्या आहेत. शह - प्रतिशह - काटशह यांसारख्या ‘ आसूरी ‘ भावना आज मृतवत झाल्या आहेत. कोरोनाच्या आक्रमणापुढे हतबल झालेला प्रत्येक मानव आज स्वतःच्या ऊद्याच्या अस्तित्वासाठी धडफडताना दिसत आहे. ‘ सीर सलामत तो पगडी पचास…’ हे वास्तव स्विकारून आज प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र तरीही कोरोनाच्या आक्रमणाला घाबरून भयभीत झालेल्या जीवाला हा कोरोनाचा विषाणू कधी;आणि कुठे गाठील याची शाश्वती नाही. ‘ आजचा दिवस आपला…’ हेच सत्य समजून काही समाज विघातक शक्ती अशा आणीबाणीच्या काळातही स्वतःचे ऊखळ पांढरे करण्याची अमानवी धडपड करीत आहेत हे आणखी दुर्दैवी म्हणावे लागेल.
जगभरात मृत्येचे तांडव निर्माण करणाऱ्या कोरोनाचाही शेवट होणार आहेच. आज ना उद्या या राक्षसाचा शिरच्छेद निश्चित आहे. पण तसे होण्याआधी हा कोरोनाचा राक्षस किती बळी घेणार आहे याचा अंदाज मात्र कोणीही करू शकत नाही. वैद्यकीय क्रांतीचे ढोल बडवणाऱ्या कोणाही राष्ट्राकडे या कोरोना विषाणूचा अचूक वेध घेणारी कोणतीही लस आज मितीला उपलब्ध नाही हे आजच्या वैद्यकशास्राचे खूप मोठे अपयश आहे. सध्या तरी केवळ घरातच राहून या राक्षसाचा संसर्ग होण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे एवढेच आपल्या हाती आहे. जगभरातील प्रशासकीय यंत्रणाही कोरोनाच्या या आक्रमणापुढे हतबल होऊन आपापल्या नागरिकांना घरातच थांबण्याचे कळकळीचे आवाहन करीत आहेत. बरेचसे सूज्ञ नागरिक अशा आवाहनाला व सूचनांना प्रतिसाद देऊन घरातच थांबत आहेत. कोरोनाच्या धास्तीने आज संपूर्ण जगच ‘ लॉकडाऊन ‘ झाले आहे. देशोदेशीचे पंतप्रधान नागरिकांना जीव वाचवण्याचे कळकळीचे आवाहन करीत आहेत. या निमित्ताने यापूर्वी कधीही जीभेवर न आलेले ‘ होम क्वारंटाईन ‘, आयसोलेट ‘,लॉकडाऊन ‘ यांसारखे शब्द आज प्रत्येकाच्या जीभेवर वळवळत आहेत. कोरोनाच्या निमित्ताने रात्रंदिवस पैशाच्या मागे धावत स्वतःच्याच कुटुंबापासून दूर गेलेली माणसे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तरी घरी राहून कुटूंबाशी सुसंवाद करीत आहेत. भौतिक सुखांवाचून तसे काही अडत नाही. आपल्या गरजा अतिशय मर्यादित करूनही आपण सुखेनैव जीवन जगू शकतो ही एक नवीन मनुष्यवृत्ती आता बाळसे धरत आहे ही अशा आपत्कालीन काळातही कोरोनाने आपल्या माणसांपासून दूर गेलेल्या आपल्याच माणसांना दिलेली अनमोल देणगी ठरावी. मानवी मूल्यांपुढे धर्म, जात,सत्ता, संघर्ष, पैसा आदी सर्व गोष्टी निरर्थक असल्याची भावना यापुढे वाढीस लागेल असे वाटण्याजोगी परिस्थिती आता मूळ धरू लागली आहे. निसर्गाच्या मनात आले तर निसर्ग एका क्षणात संपूर्ण पृथ्वी होण्याची नव्हती करू शकतो. निसर्गावर मात करण्याचे मानवाचे प्रयत्न तो एका फटक्यात हाणून पाडू शकतो हेही सत्य आता समोर आले आहे. निसर्ग जेव्हा अतिउग्र रूप धारण करतो तेव्हा तो गरीब -श्रीमंत, प्रगत - अप्रगत, उच्च - नीच यांसारख्या मानवी परिसीमा न बघता त्याला वाटेल त्याप्रमाणे तो मानवाचा नाश करू शकतो याची जाणीव आता जगातील सर्वांनाच झाली आहे. या कोरोनाच्या महामारीत निसर्गाने पशू - पक्षी, वृक्ष - वेली, कीड - मुंगी यांसारख्या घटकांना अजिबात इजा केली नाही. कोरोनाचा हा महाराक्षस केवळ आणि केवळ माणसाचा संहार करीत पुढे पुढे चालला आहे. कारण निसर्गाला माहित आहे, इतर कोणी नाहीत, पण माणूसच खूप मातला आहे. ज्या निसर्गाच्या छायेखाली तो राहतो त्याच निसर्गाशी त्याने प्रतारणा केली आहे. निसर्गाचे ऋण मानून त्याच्या ऋणात राहण्याची माणसाची वृत्ती कधीच लोप पावली आहे. याउलट कृतघ्नतेच्या आसूरी भावनेच्या आहारी जाऊन त्याने निसर्गाची कत्तल सुरू केली आहे. केवळ सणासुदीच्या काळात निसर्गाची पूजा करून इतर वेळी निसर्गाला ओरबाडून रक्तबंबाळ करणाऱ्या माणसाला क्रोधित निसर्ग आता कोरोनासारख्या विषाणूच्या रूपात अद्दल घडवित आहे. कोरोनासारख्या अतिसूक्ष्म जंतूने जगभरात हाहाकार माजवून मानवाची वैद्यकशास्त्रातली भरारी कुचकामी ठरवली आहे. माणसाला ‘ चिरंजीव ‘ करण्याच्या वैद्यकीय प्रयत्नांना यामुळे खूप मोठी ठेच लागली आहे. कोरोनाच्या सूक्ष्म विषाणूने अतिरेकाने माजलेल्या संपूर्ण जगाला सणसणीत चपराक देऊन आत्मचिंतन करण्यासाठी खूप मोठा धडाच दिला आहे. संरक्षणक्षेत्रातला आपला वचक अधिक मजबूत करण्यासाठी अत्याधुनिक संरक्षण सामग्री निर्माण करणाऱ्या देशांना एका सूक्ष्म जंतूचे पारिपत्य करताना नाकी नऊ आले आहेत ही संपूर्ण जगासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. कोरोनासारखा एखादा सूक्ष्म जंतू अपरिमित मनुष्यसंहार करून संपूर्ण जगाला अशा प्रकारे वेठीस धरत असेल तर यानंतरच्या काळात पुढे काय वाढून ठेवले असेल याची कल्पनाही न केलेली बरी.