कोरोना लॉकडाऊन डायरी
- महेंद्र धुराजी साळवे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात बसून वूहान(चीन) मधील हालचालींवर वर्तमानपत्र आणि युटूबच्या माध्यमातून लक्ष्य होत.खूप इच्छा होती की विद्यापीठात आपल्यालाही प्रवेश मिळावा आणि एकदा तरी ते वसतिगृहाच आयुष्य जगून बघाव.( कारण त्या मोहक आयुष्याबद्दल फक्त मित्रानकडूनच ऐकल होत) प्रवेश तर मिळाला पण तीन-चार महिन्यातच ते सोडून वाईन सिटीत याव लागल.पण येण्याअगोदर म्हणजे साधारण मार्च महिन्याचा सुरुवातीपासूनच(काही ठिकाणी फेब्रुवारी पासूनच) कोरोनाने वूहान (हुबेई प्रांत) शहरातून भारतात विमानाने सुखरूप प्रवास केला होता.कोरोनाचा जन्म वूहान शहरात वटवाघळाच्यामार्फत झाला अस काही लोकांच म्हणन होत तर काहींच तो चीनच्या प्रयोगशाळेत निर्माण केला आहे.अशा प्रकारे बातम्यांच्या माध्यमातून जग दोन भागात विभागल गेल आहे अस दिसत होत.हो,तसच जस पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात विभागल गेल होत.आता कोण कोणाच्या बाजूला आणि कोण विरोधात होत ह्याच्या खोलात न जाता सध्याच्या संकटावर विचार केल्यास वाटत हे तर तिसर महायुद्धाच सुरु आहे.कधी-कधी जागतिक इतिहास वाचताना वाटायचं की बर झाल आपण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जगात नव्हतो.पण आता अस वाटत यापेक्षा ते दोन महायुद्ध तुलनात्मकदृष्ट्या बरी होती.तस तर युद्ध नकोच.पुण्यात तर तो मध्य पश्चिमि देशातून आला.कोरोनाबाबत रोज अपडेट ठेवत असल्यामुळे त्याच गांभीर्य मला तर होत पण काहीना कोरोन म्हणजे फक्त खोकला आणि तापच तर येतो त्यात एवढ घाबरायच काय असा पुणेरी प्रतिसाद आमच्या वसतिगृहातीच्या प्रांगणातील छोटीशी टपरी असणाऱ्या काकाला कोरोनाबाबत विचारल्यावर मिळाला.तसही भारतातील बहुसंख्य लोकांना राजकारण, अर्थकारण, आरोग्य अशा अनेक क्षेत्राबाबत बोलायला आवडते पण समज किती माहीत नाही.त्यातही आरोग्य आणि शिक्षण ही क्षेत्र जास्त गांभीर्याने घ्यायची नसतात हा येथील राजकारणी व तथाकथित सुजान नागरिकांनी जाहिररित्या न सांगता ठरवूनच टाकलंय.मार्च महिन्याच्या (२०२०) पहिल्या आठवड्यात बहुतेक माझ्यासारखच अनेक विध्यार्थ्यांना करोनाच गांभीर्य लक्षात आलेल वाटत होत.कारण वसतिगृहातील माझ्या रूमच्या खिडकीतून अगदी सकाळी-सकाळी काही विद्यार्थी आपल बस्तान घेऊन गावी पलायन करतांना दिसत होते.आत्ता माझ्याही घरचे मला घरी ये अस सांगत होते कारण महाराष्ट्रात पुणे जस विद्येच माहेरघर मानल जात,तसच कोरोनानेही ते स्वतःच माहेरघर करून घेतल होत.अनेक स्वप्न उरात बाळगून पुण्यात आलेल्या विध्यार्थ्यांना इच्छा नसतानाही विद्यापीठातील वसतिगृह व पेठांमधील आपआपल्या रूम्स सोडाव्या लागल्या.प्रधानसेवकाने सांगितलेल्या जनता कर्फू (२२ मार्च) नंतर तर क्लासेस आणि ग्रंथालयेही बंद झाली त्यामुळे अनेकजन घरी निघून गेली,पण काहींना कोरोना म्हणजे चिल्लर आजार असल्यासारखा वाटला आणि ते पेठांमध्येच मुक्काम ठोकून होते.नंतर त्यांना कळलेच असेल की चिल्लर बाबीही किल्लर बनू शकतात.मी तर घरी आलो.बर वाईन सिटीच्या जवळपास तिन्ही-चारी बाजूनी सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत आणि त्याचा तेथील लोकांना अभिमान आणि स्वाभिमानही आहे. पण तरीही ह्या सर्व डोंगररांगा चिरून कोरोना गुलशनाबादच्या गर्दीत घुसला आणि मग शहरात मरनासन्न शांतता पसरली.याच काळात प्रधानसेवकाने २१ दिवसांसाठी समाजमान्य स्वातंत्र्य हिसकावून घेत असल्याच जाहीर केले.जसे-जसे लॉकडाऊनचे दिवस पुढे सरकत होते त्यात अनेक वेळा अस वाटल की संविधानातील कलम १९ काढूनच टाकलय.पुढे घरी बसून कंटाळा आला असेल म्हणून शासनाने कामही दिले दिवे पेटवण्याच,ज्यांच्या डोक्याचे दिवे नेहमी विजलेलेच होते ते सर्व रस्त्यावर येऊन दिवे आणि मशाली पेटवू लागले त्यामुळे कुठेतरी विमानतळावर आगही लागली.हा सर्व शासनाने पैसे न खर्च करता निर्माण केलेला तमाशाच नाही काʔत्यानंतर अनेक विरोधकांनी प्रधानसेवकावर टीका केली.पण ती येथील लोकांना पाकिस्तानातील हाफिस सईदच्या अडयावरील दहशदवाद्यांनी केलेला गोळीबारच वाटला आणि त्यांनी टीका करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही देशद्रोही अशा गोड उपमा दिल्या. मग अस वाटल की लोकशाही झोपली आहे की मेली पण सध्या तिला झोपेच इंजेक्शन दिलंय आणि ती गाढ झोपेत आहे.
मानवी अस्तित्व मिटवू शकण्याची ताकत असणाऱ्या विषाणूला काही देशांच्या प्रमुखांनी आणि जनतेनेही गांभीर्याने न घेतल्याने त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहे.आपल्यालाही ते किती प्रमाणात भोगावे लागतील माहीत नाही. पण या काळात अनेकांचे सुप्त गुण बाहेर आले. कोरोनाच्या लॉकडाऊनने ह्या गुणांना बाहेर येण्याची संधीच दिली असे म्हणाव लागेल.या काळात अनेकजन जे पुरुषसत्ता संस्कृती मानणारे व वर्तनातून दाखवणारेही घरकाम करू लागले.मी, ही संस्कृती मानत नसलो तरी घरात नवीन नवीन पदार्थ बनवू पाहत होतो थोडफार जमल पण शेफ बनन महाकठीण. जरा जास्तच व्यसनी लोकांसाठी हा काळ म्हणजे हिटलरच्या Auschwitz,बरगनबेल्सन आणि डकावू अशा कॉन्सनट्रेशन कॅम्पमध्ये त्यांना बंद करून ठेवल्याची भावना येत असावी.महामारीचा परिणाम सर्वांवर समान होत नाही आणि भारतात तर नाहीच नाही. जगण्याचा प्रश्न फक्त गरीबांचा,गरिबांना कोरोनाची भीती आहे पण त्याही पेक्षा जास्त भीती उपासमारीची आता भूकही उघड्या डोळ्याने पाहिलेल्या स्वप्नात आणि वास्तवात येऊन प्रश्न विचारत आहे.अनेक प्रदेशात घरापासून हजारो मैल दूर पोटाची खळगी भरायला आलेल्या कामगारांना फक्त जगण्यासाठी भुकेने विचारलेला प्रश्न मिटवायचा आहे.घरातबसून अनेक विचार आणि प्रश्न मनात येत होते फुकटात मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत नसते अस अनेकदा ऐकल आणि वाचलही आहे.आपल्याला ते फुकट भेटलही नाही. सर्वांनाच स्वातंत्र्यासाठीची ती चळवळ माहित आहे.घरातच अनेक दिवसापासून बंद असल्याने आज माझ्यासारख्या अनेकांना त्या स्वातंत्र्याची खरी किंमत कळत आहे.या काळात स्वातंत्र्य खूपच महाग झाल आहे आणि लोक गरीब,पण जे जास्त श्रींमंत आहेत ते आता थोडे कमी श्रीमंत झाले आहेत. कधी-कधी वाटत त्यांना स्वातंत्र्य विकत घेता येत का? मी तर असही ऐकल आहे की भारतातील श्रीमंतांना गरीबी उपासमारी जातीयभेदभाव धर्मभेदभाव व अशा अनेक गोष्टी भेटायलाच येत नाहीत.बहुतेक या सर्व गोष्टी गरिबानवरच जास्त प्रेम करतात.की,येथील समाजव्यवस्थेने आणि अर्थव्यवस्थेने त्यांना लाच तर दिली नसेल ना गरिबांवर भरभरून प्रेम करण्यासाठी?
लॉकडाऊन चालू झाल्यापासून मी स्वतःलाच समाधान वाटेल अस काहीच करत नव्हतो जास्त वेळ तर खान-पिण आणि झोपण यातच घालवला,नंतर हळू-हळू मात्र स्वतःला अनेक कामात व्यस्त करून घेतल.जगात काय चाल आहे हे आता प्रत्येकाला आपल्या घरात असणाऱ्या टीव्ही नामक खिडकीतून डोकावून पाहता येत पण आता ती खिडकीही कोणी दुसर्यानी विकत घेतल्यासारखी वाटते. मागील काही वर्षात तर ह्या खिडकीतून खबर देणारे वेगळेच वागू लागलेत.अनेकदा निऑम चॉम्स्कीची आणि त्याच्या पुस्तकाचीही आठवण आली “Manufacturing Consent: The Political Economy of the Mass Media. ८० च्या दशकात लिहिलेल हे पुस्तक आज जरा जास्तच प्रासंगिक वाटत.आजच्या भारतीय माध्यमांची पद्धत ही ९० च्या दशकातील रवांडा देशाच्या रेडियो रवांडा सारखी बनत चालली नाही का? ज्यामुळे त्या देशात नागरी युद्ध झाल होत आणि टूटसी अल्प संख्याकांची वंशहत्या करण्यात आली होती.त्या खिडकीतून जगाबद्दल सांगणारे खर सांगतात का?आज भारतात ह्या क्षेत्राला कीड लागली आहे का? अस असेल तर मग समाजालाही ती कीड लावण्याच काम ते करत असतील का?त्या आपल्या प्रिय लोकशाहीसाठी या प्रांतात वावरणारे दूत खूपच महत्वाचे असतात अस ऐकल आहे मी,पण तेही दरबारी झाले आहेत अस वाटत नाही का?
आज २९ एप्रिल लॉकडाऊनचा ३६ वा दिवस.आज व्हॉटसप स्टेटसला इरफान खानचा फोटो त्याच्या डायलॉगचे विडीओ ठेवलेले होते.त्याचा वाढदिवस होता म्हणून नाही,तर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी.कोरोनमुळे नाही तर कॅन्सरमुळे त्याला अकाळीच जग सोडून जाव लागल, हे असे कलाकार आपल्याला ओळखत तर नाहीत पण आपल्याला ते खूप जवळचे असल्यासारखे वाटतात.मलाही त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून खुप वाईट वाटल. मला त्याचा आवडलेला चित्रपट म्हणजे पानसिंग तोमर जो फुलनदेवीच्या संघर्षाची आठवण करून देतो.इरफान खान तर कॅन्सरमुळे अकाळी गेला पण कोरोना महामारीमुळे भारतातील पोलिसांना डॉक्टरांना नर्सेसला वार्डबॉयला अशा अनेक जणांना देशातील जनतेसाठी अकाळी मृत्युच्या तोंडात जाव लागत आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करण अगत्याच आहे पण ते फक्त टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच का? महामारीच्या या काळात डॉक्टरांनाआणि पोलिसांना कोरोना व्यतिरिक्त अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.संकटाच्या काळात देवाने आपली मदत करावी यासाठी लोक वर्षानुवर्षे ते सर्व करतात जे सांगितल जात.पण आता काही ठिकाणी तर देवालाच मास्क लावले जात आहेत.आता हे संकट एवढ मोठे आहे की जगातील सर्वच देव घाबरून तर गेले नसतील? घाबरून गेले की नाही माहीत नाही पण उन्हाळ्याची सुट्टीच घेऊन टाकली त्यांनी.असो,त्यांनाही सुट्टीची मज्जा घेऊ द्या.भारतात कोरोनाचा संचार होण्यास सुरुवात झाली आणि देशातील हजारो वर्षापासून सर्वच रोगांवर गुणकारी असणार औषध उत्तर भारतातील धार्मिक विद्वानांनी सांगितल ते म्हणजे गोमुत्र त्याची माहीती जनतेला व्हावी ह्यासाठी गोमुत्र पार्टीही आयोजित केली गेली. गोमुत्र हे औषध जालीम जरी असल तरी गुणकारी आहे हा दृढ विश्वास त्यांना तेवढाच आहे जेवढा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्याचा होता.उपाय कितीही चांगला असला तरीही किती जणांना पटेल माहित नाही.पुढे लोकसभा अध्यक्ष सुमित्राताईनीही कोरोनावर गुणकारी उपाय सांगितला तो म्हणजे एकच मंत्र बारबार उच्चारण्याचा पण तोही किती जणांना रुचला असेल काय माहित.जग बंद असल्यामुळे पर्यावरण किती छान व स्वच्छ बनत आहे हे समाज माध्यमातून सांगितल जात आहे.ते खरही आहे.मी तर हेही वाचाल की प्रदूषणाची पातळी इतकी कमी झाली आहे की ज्यामुळे पंजाब मधील जालंधरच्या रहीवाश्यांना हिमाचल प्रदेशातील धौलाधर पर्वताच्या रांगा दिसल्या.आता मलाही माझ्या घराच्या बाल्कनीतून ते इंग्रजांनी बांधलेलं मातीच गंगापूर धरण स्पष्ट दिसू लागल आहे.एक मित्र म्हणाला स्वच्छ वातावरणामुळे लोकांना एवढ लांबच दिसायला लागलय मग आपल्याला ते पी.एम.ओ.आणि ७ लोककल्याण मार्गावरील हालचाली का नाही दिसत.मी त्याला म्हणालो पर्यावरणाच प्रदूषण कमी झालय राजकारणाच नाही.असो,मी राहतो तेथून एक डोंगर दिसतो त्याला फाशीचा डोंगर असे म्हणतात.त्या बाबत असे म्हटले जाते की,इंग्रज लोक त्या काळी गुन्हेगारांना तेथे फाशी देण्यासाठी आणत असे,पण आता तीथ एक मंदिर आहे लॉकडाऊनच्या काळातही काही लोक तेथे जातांना-येताना दिसतात.बहुतेक देव सुट्टीवरून आला की नाही हे पाहायला तर जात नसतील ना? कोणास ठाऊक.
माझ्या एका मित्राने नवीनच बुलेट घेतली होती आणि लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सामान आणायला जात असतांना पोलिसांनी तीला अडवल,आणि काहीच ऐकून न घेता पोलीस चौकीत जमा करून घेतल. त्यांनतर मित्राची काही दिवस झोपच उडाली. मनभरून त्याने अजून तिला पाहीलही नव्हत आणि हे अस घडल.अत्यावश्यक सामान घेण्यासाठी बाहेर जाण्याची मुभा शासनाने दिली आहे अस मी ऐकल होत.पण बहुतेक पोलिसांना ते पटल नसाव आणि म्हणून आधी पोलिसांनी दांड्याने फटके आणि नंतर डायरेक्ट गाडी जमा करण्यास सुरुवात केली.पोलिसांनाही राग अनावर होणारच की,कारण काही महाभाग गरज नसतांना बाहेर विनाकारण फेरफटका मारायला जातात. घराबाहेर पडणार्यांमध्ये ते लोक जास्त होते ज्यांच प्रेम आणि गरजही तीच असते तीच म्हणजे दारू तंबाखू गुटखा सिगरेट इत्यादी इत्यादी.जीच्या शिवाय त्यांना एक-एक क्षण म्हणजे महिन्यासारखाच.एक शेजारी तंबाखूसाठी जवळपास ५ ते ६ किलोमीटरचा प्रदेश फिरून आला. पण तंबाखू काही भेटली नाही.पुण्यातील एका जणाणे तर विडीओच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री मोहदयांना दारूची दुकान केव्हाही म्हणजे अर्ध्या रात्री फक्त १०-१५ मिनिटांसाठी का होईना पण चालू करावी अशी विनंती केली.त्यामुळे सरकारला कसा महसूल मिळेल आणि कसा फायदा होईल याच गणितही सांगितलं हे सर्व ऐकून कळालच असेल की काही लोक किती गंभीर समस्येमध्ये आहे.
या लॉकडाऊनमुळे काही लोक खुश असतील तर काही दु:खी. खुश कोण असेल माहित नाही,पण हातावर पोट असणारे मजूर वेश्या व्यवसायकरणाऱ्या महिला रस्त्यावरचे भिकारी मुके प्राणी हे मात्र दु:खी आहेत.महिलांवर होणार्या कौटुंबिक हिंसाचारात जगभरात अनेक पटीने वाढ झाली आहे.असे वर्तमानपत्र सांगतात,वर्तमानपत्रे बरेचदा खरही बोलतात.तसेच या काळात अपघात बलात्कार आणि सरकारच्या तिजोरीतील पैसेही कमी झालेत.पण आधीतरी सरकारच्या तिजोरीत पैसे होते का? जर असते तर मग जनतेकडे का हात पसरले.काही आर्थिक विदुषक तर म्हणतात की कोरोनामुळे लोकांना आता आयसीयुत ठेवाव लागतय. पण आपल्या प्रिय देशाची ती जी लोक म्हणतात खूप महत्वाची असते ती अर्थव्यवस्था तर कोरोना आधीच आयसीयुत होती. किती खर किती खोट हे त्या राघुरामालाच माहीत.काही अर्थ जाणकार तर शासनाला मानवी संकटाच्या या काळातही हे सांगण्याची हिम्मत करतात की ते बघा जरा अर्थव्यवस्थेवर प्लाझ्मा थेरेपी करून नीट करता येते का? पण या जाणकारांना आता कोण सांगणार २०१४ पासूनच सरकार बहिर झालय.त्यांना फक्त जवळच्या लोकांच ऐकायला येतं.अमेरिकेत बसून कोण ते तज्ञ माणस रघुराम अभिजित आणि अमर्त्य सेन तसेच इतर त्यांच्याच माळेचे मनी त्याचं एवढ्या लांबून तर अजिबातच ऐकू येत नाही.आणि काय ते बेरोजगारी-बेरोजगारी शब्दच बदनाम करून टाकलाय इथल्या अर्बन नक्सलांनी.बेरोजगारी बाबत सरकार मागील सहा वर्षांपासून खुपच गंभीर विचारात गेल आहे,ते अजून बाहेरच आल नाही.बाहेर आल की बघता येईल एवढी काय घाई अस काहींना वाटत असेल.
शासनाला या सर्व बाबींची चिंता आहे अस वर-वर पाहता वाटते पण खर काय माहित नाही.आज लॉकडाऊनच्या ३७ व्या दिवशी कॅन्सरमुळेच भारतीय सीनेसृष्टीने आणखी एक नट गमवला.टिव्हीवर ऋषी कपूरच्या अंत्यविधीचा क्षण पाहत होतो,आणि वाटल त्या स्मशानभूमीला काहीच देणघेण नाही ती व्यक्ती किती मोठी होती की छोटी तीच्यासाठी ते फक्त जळायला आलेल एक प्रेत असत.नियतीच्या कायद्यापुढे कोणाचच काही चालत नाही अस म्हणतात ना तेच खर.आज जगात ऋषी कपूर प्रमाणे दोन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना महामारीमुळे मृत्यूंच्या विळख्यात गेले आहेत.एका बाजूला हे सर्व थांबवण्यासाठी पोलीस प्राणपणाला लावत आहेत तर दुसरीकडे नागरिकच पोलिसांनवर हल्ला करत आहेत.पंजाब मध्ये तर काही माथेफिरूंनी पोलिसाचा हातच तलवारीने कापला. तर दुसरीकडे तपासायला गेलेल्या डॉक्टरांनवरच दगडफेक होतांना दिसत आहे.अशा प्रकारे लोक का वागतात अज्ञान-अंधश्रद्धेमुळे तर वागत नसतील? बहुतेक इतर कारणही असतील त्यांनाच माहीत.या व्यतिरिक्त भारतात धार्मिक भेदभावाला उधान आल आहे.लोकांनीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जाहीरपणे सांगतात की अमुक एका धर्माच्या व्यक्तींकडून भाजीपाला घ्यायचा नाही.का अशा लोकांना जनता निवडून देते.कोणीतरी म्हणूनच ठेवलय ना जी लोकांची लायकी ते लोकांच सरकार.मग लोकप्रतिनिधींच्या बाबतही हेच वाक्य लागू पडत असेल.बर
देशात एवढ सगळ घडत असताना मलाही मजबुरीत अनेक दिवसानंतर घराबाहेर जाव लागल.कारण घडल अस की बाहेर उन्हाचा पारा शिगेला गेल्यामुळे पोटाला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये काही भेटतय का पाहू म्हणून फ्रीज उघडून पाहीला.तर चक्क त्यात श्रीखंड ठेवलेल दिसलं.मग मस्त २-३ चमचे श्रीखंड पोटात घातले.मी हे सर्व करत असताना घरचे मात्र सर्वच झोपलेले होते.त्यानंतर संध्याकाळी आई बोलली की समोरच्या मावशींनी त्यांचा श्रीखंडाचा डब्बा दिलाय फ्रीजमध्ये ठेवायला(नवीनच राहायला आलेले शेजारी लॉकडाऊनमुळे जुन्या घरून फ्रीज आणू शकले नव्हते) आणि रात्री द्यायचं आहे त्यांना ते परत.पुढे आईने विचारल कोणी खाल्ल तर नाही ना? (आई आम्हाला सांगायचच विसरली होती की ते श्रीखंड शेजारच्याच आहे अस) तिने माझ्याकडे पाहिल.मला समजेचना काय बोलाव पण कस सांगू तिला की आता ते पूर्ण फ्रीज मध्ये नाही तर थोड माझ्या पोटातही आहे अस.शेवटी मी सांगून टाकल मी खाल्ल आहे अस.पुढ असही म्हणालो की नवीन आणून देतो,पण नंतर लक्षात आल सर्वच दुकान सरकारी नियमांप्रमाणे ४ पर्यंतच चालू राहतात सध्या.तेवढ्यात थोडा-थोडा पाऊसही चालू झाला.तो ओसरल्यानंतर मी निघालो दुकान शोधायला एखाद चालू राहिलंय का चुकुन ते पाहायला.बराच वेळ फिरल्या नंतर एका ठिकाणी ते मिळाल आणि माझा श्वास मोकळा झाला.नंतर मी कुहू सोबत खेळू लागलो.कुहू म्हणजे आमचा ससा.आज-काल कुहू सारखे अनेक प्राणी प्राणीजग सोडून मानवी जगामध्ये मुक्त संचार करू लागले आहेत.माणसाने ते काबिज करायच्या आधी त्यांचच तर ते होत नाही का.किती बर झाल असत जर प्राण्यांना माणसांसारख बोलता आल असत तर.मानवी संस्कृती सोबतच एक समांतर प्राण्यांची संस्कृतीही चालली असती.मानवा सारखी समांतर राजकीय व्यवस्थाही बनली असती. पण मानवी संस्कृतीतील लोभी स्वार्थी कपटी निर्दयी प्रजेला नडणारे जातीयवादी धार्मिक नेते त्यांच्या संस्कृतीत असते का माहित नाही.भारतीय समाज व्यवस्थेत आणि राजकीयव्यवस्थेत जॉर्ज ऑरवेलच्या”अॅनिमल फार्म”कादंबरीतील बॉक्सर आणि स्क्विलर सारख्यांची कमतरता अजीबात नाही.डोळे बंद करून फक्त जो आदेश दिला तो गुलामाप्रमाणे पाळायचा.काळी टोपी घालणारे बॉक्सर आणि स्क्विलरही असच करत असतील का? ते तसच करतात पण त्यांना वाटत ते तस करत नाहीत अस ऐकदा एक मित्र म्हणाला होता.भारतात काही वर्षापासून मोठ-मोठया घटनात्मक संस्था आणि मोठ-मोठया सन्मानाच्या पदावर असणार्या लोकांना ते १९८४ नावाच्या कादंबरी मधल्या सारख “बिग ब्रदर वॉचिंग यु”ची भावना तर येत नसेल? कारण त्यांच्या पाठीचा कणाच तुटल्यासारखा वाटत नाही का? भारतातील काही पुढारी त्या शेक्सपिअरच्या सोनेट (कविता)मधील Narcissus प्रमाणे Narcissist वागताना दिसत आहेत. “ब्रिटिश तत्वज्ञ कार्लाईलला एकदा विचारल की ब्रिटिश साम्राज्य जे आर्ध्या जगावर पसरलय ते आणि शेक्सपिअर यापैकी एक निवडायच असल्यास तुम्ही कोणाला निवडाल.तर ते म्हणाले आम्ही साम्राज्य गमवायला तयार आहोत.”कार्लाईल प्रमाणेच भारतीय जनतेला जर प्रश्न विचारला की स्वत:ची जात व धर्म आणि महासत्ता बनण्याची संधी या दोन पैकी एक निवडायच असल्यास तुम्ही काय निवडाल? बहुसंख्यांक भारतीय स्वत:ची जात स्वत:चा धर्म सोडयला तयार होतील का? प्रश्न जरी काल्पनिक असला तरी उत्तरातून मानसिकता कळेलच की.भारतीय लोकांचं स्वतःच्या जातीवरच प्रेम आणि धर्मासाठीची ईमानदारी त्या जपानमधल्या हचीकोची(कुत्रा)त्याच्या मालकावर असणार्या प्रेम आणि ईमानदारी सारखीच आहे.फक्त फरक एवढाच की हाचीकोच्या प्रेमामुळे आणि ईमानदारीमुळे कधी भेदभाव आणि हिंसाचार नाही झाला.माझी डायरी वाचून एखाद्याला वाटेल की एवढी सरकारवर टीका केली. म्हणजे हा आमुक-आमुक विचारधारेचा असेल,आणि समाजव्यवस्थेवर टीका केल्यामुळे म्हणतील बहुतेक हा त्या-त्या जातीचा किंवा धर्माचा असेल.पण मला वाटते मी तर सिया आहे आणि सुन्नीही वैष्णव पंथीय आहे आणि शैवही कबीर पंथीय आणि वारकरीही.हो,मी तर बुद्धिस्ट जैन शिख हिंदूही.आस्थिक आणि नास्तिकही विशेष म्हणजे वास्तविकही आहे.पण या सर्वांच्याआधी मी भारत देशाचा एक सुजाण नागरिक आहे.भारतीय संविधानाने फक्त बोलण्याच नाही तर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यही दिल आहे.