अंतरंगात डोकावताना...
- नीता नितीन चापले
मुलगा १२ वी ला, २९ मार्च पासून माझ्या जिल्हास्तरीय स्पर्धा. ५ मार्च पर्यंत मुलाची परीक्षा, मुलाचं हे महत्वाचं वर्ष, त्याच्या कडे लक्ष देणे गरजेचे होते. मी एक राष्ट्रीय महिला खेळाडू ( पॉवर लिफ्टीग). मुलगा क्लास ला गेला की त्या वेळेत मी जिम मध्ये जाऊन माझा व्यायाम सुरू ठेवला. माझ्या सोबतची मैत्रीण ती सुद्धा १२ वी ला, तिचा शेवटचा पेपर ११ मार्च होता. सरांचा मात्र तिकडे आरडाओरड, सरावासाठी या एक तास तरी या म्हणून. १ तासासाठी गेलं तरी ४ तास लागायचे घरी येईपर्यंत. तरी देखील ५ मार्चपासून सराव सुरू केला. स्पर्धा खेळण्याच्या जोमनेच सराव सुरू झाला. अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व १४, तारखेपासून जिम बंद करण्यात आले, २२ तारखेपासून लॉकडाऊन.
माझ वय वर्ष ४८ असून मुळात मी क्रिकेट ची राष्ट्रीय पातळीवर खेळलेली महिला खेळाडू आणि कोच. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, येथील शालेय क्रिकेट ला निवड समिती सदस्य व मार्गदर्शक आहे.
मुळात एकही क्षण वाया नाही घालवायचा हा माझा स्वभाव, मागच्या वर्षी २०१९ ला जुन ते सप्टेंबर हा क्रिकेट चा ऑफ सिजन असतो मग घरात बसून काय करायचे म्हणून मी powerlifting करायला सुरुवात केली. गुडघ्याला दुखापत असून देखील, स्वतःचे वजन सुद्धा ८८ किलो होते. जून ५ तारखेला सुरू झालेला प्रवास, लगेच ३० जुलै ला जिल्हास्तरीय स्पर्धा आल्या, मुळात खेळाडू असल्यामुळे हार मानणार नाही असे स्वतःशी प्रामाणिकपणे ठरवत स्पर्धेला उतरले. जिल्हा स्तरीय गोल्ड मेडल, राज्य स्तरीय गोल्ड मेडल, राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक. जून ते ऑक्टोबर ६ गोल्ड व १ रजत पदक मिळाले.
आता लॉक डाऊन सुरू झाले, वेळ तर भरपूर मिळणार होता, सक्तीने घरातच बसायचे होते व्यायाम, खाणे आणि झोपणे हे मला शक्य नव्हते. अश्या वेळी मग मैत्रीणीना एफबी वर आव्हान केल की पत्र व्यवहार सुरू करू यात, तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना, मित्र, मैत्रीणीना, गुरूंना पत्र लिहा. हस्तलिखित असेल तर उत्तमच पण नसेल तरी चालेल पण लिहा, ही संकल्पना बऱ्याच मैत्रीणीना मनापासून आवडली. पत्रातल्या त्या भावना, मेल किंवा व्हाटस् अँप संदेश ला नसतात. तो पोस्टमन काका आजही आठवतो. आपली संस्कृती आपणच जोपासायला पाहिजे, काही वेळ का असेना पण लिहित्या झाल्या, त्यातून त्यांना आनंद मिळाला.
मी स्वतः ललित लेख लिहायला लागली, भाषा शैली सोपी आहे, पण ती समोरील व्यक्तीच्या मनात घर करतेय. कुठे तरी ते स्वतः ला शोधतात माझ्या लिखाणात, त्यांच्या अवती भवती माझ लिखाण रिंगण घालताना त्यांना जाणवत.
अंतरंगात डोकावताना, मनुष्य जगाला प्रदक्षिणा घालताना, मात्र तो स्वतः च्या अंतरंगात किती रंग आहेत ते बघायला विसरतो, ह्या लॉक डाऊन च्या निमित्याने स्वतः मधील स्व ची ओळख झाली, व माझ्यातील लेखक ह्या नवीन प्रतिभेसोबत माझी ओळख झाली.
आता मी ब्लॉग्स लिहिते. लॉक डाऊन मुळे माझ्यात ही सुद्धा प्रतिभा आहे हे मला जाणवलं. लिखाण अखंडपणे चालू राहील. कारण सातत्य आणि एकनिष्ठा ह्याच्याच जोरावर आपण आयुष्यात स्वतः ला सिद्ध करू शकतो.