सोवळे.. तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे
- जयंत नाईक
करोना विषाणूच्या दहशतीने आम्ही शांतपणे घरी बसलो आहे. आमची सदनिका सहाव्या मजल्यावर. संध्याकाळी थोडावेळ सोसायटीच्या आवारात थोड्या फेऱ्या मारणे आणि औषधे किवा भाजीपाला आणण्यासाठी जवळच्या दुकानात जाणे एवढेच काय तो बाहेरचा संपर्क. सगळे सुरळीत चालले आहे असे वाटते आहे तेवढ्यात आमच्या water purifier ने लाल दिवा दाखवला. त्याचा फिल्टर राम म्हणण्याच्या बेतात आहे असे त्याने आम्हाला समज दिली. आम्ही रीतसर तक्रार नोंदवली पण आता सर्व बंद आहे १४ एप्रिल नन्तर पाहू असा निरोप आला. आता आपण सुद्धा १४ एप्रिल नंतर पाणी पिऊ असे आम्ही म्हणू शकत नसल्याने मी आणि बायकोने बऱ्याच विचारांती तळमजल्यावरील महानगरपालिकेच्या नळावरून पिण्याचे पाणी भरून आणायचे नक्की केले. मग बायकोने माळ्यावरची आमची जुनी घागर खाली काढली. बरेच दिवस वापर नसल्याले ती बिचारी काळवंडली होती. मग बायकोने तिला दोन तीनदा घासून पुसून चमकवून टाकली. एकदोन दिवस त्यात साधे पाणी भरून ठेवले. मग एकदा दुसरे दिवशी सकाळी मी तळमजल्यावरील नळावरून पाणी आणायला सज्ज झालो.
सकाळी सकाळी मी स्वच्छ हातपाय धुतले. एका हातात घागर आणि दुसऱ्या हातात पेन घेऊन लिफ्ट पाशी आलो.पेनच्या टोकाने लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट आली. घागरीचा कुठेही स्पर्श होऊ न देता परत लिफ्टचे बटन पेनने दाबून खाली आलो. नळापाशी आल्यावर पहिल्यांदा पाणी सोडून ज्या जागेवर घागर ठेवणार ती जागा थोडे पाणी सोडून धुवून घेतली. मग थोडे पाणी हातात घेऊन नळ धुतला. घागर परत एकदा धुतली आणि त्यात पाणी भरले. पाणी भरे पर्यंत सोसायटीच्या दारात असलेल्या सानिटायझरने पेन आणि हात स्वच्छ केले. मग तसेच पेनच्या मदतीने लिफ्ट बोलावून घरी आलो. लिफ्ट मध्ये घागर खाली न ठेवता मी तशीच अधांतरी धरून ठेवली होती.. बायकोने दार उघडेच ठेवले होते.
चपला बाहेरच ठेऊन ओट्यावर बायकोने धुवून ठेवलेल्या जागी घागर ठेवली. मग तसेच बाथरूम मध्ये जाऊन साबणाने हात पाय धुतले आणि सोफ्यावर बसून हुश्य..म्हणून एक दीर्घ निश्वास सोडला. चला आता दोन दिवसांचे काम झाले.
जरा कुठे निवांत बसतोय तोच मनाने एक उसळी मारली आणि पन्नास वर्षापूर्वी जतला आमच्या आजोळी पोचवले. म्हणजे मी शरीराने इथे पुण्यात आणि मन तिकडे पन्नास वर्षापूर्वीच्या आमच्या आजोळी.
सकाळची वेळ. बंकेश्वराच्या देवळा शेजारी असलेल्या आमच्या वाड्यात आमची न्याहारी नुकतीच झालेली.सकाळी नेहमीप्रमाणे पिण्याचे पाणी आणायला माझे बाबा निघाले. माझी दोन तीन चुलत भावंडे आणि मी त्यांच्या मागे निघालो. बाबांची नुकतीच अंघोळ झाली होती. आणि तसेच ओलेत्याने एक पंचा गुंडाळून त्यांनी घागर उचलली होती.पोरानो..लांब रहा..मला शिवायचे नाही…त्यांची नेहमीची ताकीद. मग पुढे ते..मी त्यांना भाऊ म्हणत असे. भाऊ पुढे आणि थोडे अंतर सोडून मी आणि माझी काही चुलत भावंडे अशी वरात निघे. थोड्याच अंतरावर एक विहीर होती. त्याला पिण्याच्या पाण्याची विहीर म्हणत. तिथे कपडे धुणे..भांडी घासणे..याला मज्जाव होता. तिथले पाणी फक्त प्यायला वापरायचे आणि ते ओलेत्याने ओढून घ्यायचे अशी पद्धत असे.
मग भाऊ विहिरी पाशी येऊन घागरीला दोर बांधून घागर विहिरीत सोडायचे. पहिल्यांदा थोडेच पाणी काढायचे आणि मग ते पाणी आपल्या पायावर ओतायचे..घागर परत एकदा धुवायची आणि परत विहिरीत सोडायची. आम्ही सगळे लांब उभारून हे सर्व पहात असे. कथी आमचे इतर कोणी काका हे असे पाणी भरायचा उद्योग करायचे पण पद्धत हीच. कंबरेचा पंचा सोडला तर अंगावर कोणतेही वस्त्र घालायला आमच्या आजीची परवानगी नसे. मग ती घागर खांद्यावर घेऊन भाऊ घरी जात. आज्जीने धुऊन ठेवलेल्या हंड्यात ते पाणी ओतायचे.अश्या दोन तीन चकरा होत असत.
हे सर्व पाणी भरून झाले कि मग भाऊ ना कपडे घालायची आणि आम्हाला त्यांच्या जवळ जायची परवानगी असे. आमच्या आजीचे सोवळे बाकी फार कडक नव्हते पण या पिण्याच्या पाण्या बाबतीत अगदी कडक असे.
आपल्या बाबांना प्रश्न विचारायची अक्कल मला आल्यावर म्हणजे मी कॉलेज ला गेल्यावर मी एकदा त्यांना हा प्रश्न विचारला होता. ( आजकालच्या मुलांना ते बालवाडीत जायला लागल्यावर लगेच अशी अक्कल येते असे म्हणतात. )
भाऊ या सोवळ्या ओवळ्यावर तुमचा विश्वास कसा काय आहे ?
ते मला म्हणाले,
अरे या सगळ्याच्या मुळाशी सर्वांगीण स्वच्छता असणे हेच आहे. पिण्याचे पाणी जंतू रहित असावे आणि ते तसेच राहावे हेच याच्या मुळाशी आहे. आता पुढे पुढे याचा अतिरेक झाला हे तितकेच खरे आहे.
तेवढ्यात कोणी तरी जोरात खदखदून हसल्याचा आवाज आला. मी माझ्या भूतकाळातून वर्तमानात आलो.
मी सोफ्यावर बसल्याबसल्या किती लांबची सफर करून आलो होतो. पण हे हसले कोण ?
तो सर्वसाक्षी काळ माझ्या शेजारी बसून हसत होता.
मला म्हणाला,तुझे भाऊ जसे सोवळ्यातून पाणी आणत होते तसेच आज तू आणलेस..वर्तुळ पूर्ण झाले नाही का ? त्यांचे ते त्या वेळचे सोवळे आणि तुझे हे आजचे करोना सोवळे …
मी त्या सर्वसाक्षी काळाला कोपरापासून हात जोडले.