माझ्यातल्या मीचा मान!! - उर्मिला देवेन, जपान

माझ्यातल्या मीचा मान!! - उर्मिला देवेन, जपान

urmiladev@gmail.com

(लेखिका मुळच्या नागपूरच्या असून IT क्षेत्रात कार्यरत असतात आणि NGO तर्फे समाजसेवा करतात, लिखाण त्यांचा आवडीचा छंद आहे)

मी, जन्माला आली तेंव्हा मुलगी होती आणि आज परिपूर्ण स्त्री आहे. आणि मला मान आहेच माझ्यातल्या मीचा. का नसावा. ? जर तो मला नसला तर समोरचा कधीच देणार नाही.

ही कृतघ्न दुनिया आहे. इथे जन्म देणाऱ्यालाही विकत घेतल्या जातं आणि पालन पोषण करणाऱ्यालाही! इथे आईची आणि मायेची पण किंमत कळत नाही, दाखवून दिल्याशिवाय!!

मग मी तर नुसती मी आहे. माझी किंमत मलाच कळली नाही तर कुणाला त्याचं काय?

दोन महिन्याआधी ह्याच्या मित्राकडे जेवायला आम्ही सर्वच गेलो होता. रती खूप छान गुजराती स्वयंपाक बनवते, हे मला त्या दिवशी समजलं. अगदीच एक एक गुजराती पदार्थच्या नावाने बोम फोडत होती. ढोकला, फाफळा, थेपला, उंधिव तर खूपच चविष्ट बनवले होते. मी तर त्या बोम्च्या हल्याने पार शब्दहीन झाले होते. बापरे!! माझ्याकडचे सर्वच शब्द संपले होते स्तुतीचे. मग मी निनाद ला छेडलं, “मस्त मज्जा आहे रे तुझी, सुगरण बायको गवसली तुला. लकी ना. हुशार आहे रे रती”

त्यावर तो बोलला, “हो ना, आहेच मी. पण तिला नाहीना अजूनही कळत हे की ती स्वतः किती खास आहे”

मग माझा मोर्चा रती कडे वळला, एक ढोकळा हातात उचलत मी स्वयंपाक घरात गेले, “रती, खूप मस्त हा, मला नाही ग जमत एवढं”

त्यावर ती एवढ्या हळू शब्दात म्हणाली, “ त्यात काय एवढ, घरीच तर असते, स्वयंपाकच की तो सर्वच बायकांना येतो. मला हे येत, ते येत असं म्हणायला नाही आवडत मला. माझ्यासारखा अजूनही आहेतच की ह्या जगात”

तिच्या चेहऱ्यावर जराही आनंद नव्हता. तिच्या जागी मी असती, आणि कुणी माझी एवढी स्तुती केली असती तर मी तर अगदीच फुलपाखरू झाले असते. माझ्या हातात फाफळा देवून ती हॉल मध्ये जावून आली.

मला थोडं विचित्रच वाटलं, मग तिचा हातच धरला, “काय ग काय झालं असं बोलायला?”

ती, “काही नाही, हे काय चालायचंच, शेवटी आपण स्त्री आहोत, आपल्याला काहीही उत्तम रित्या जरी आलं, तरी आपले पंख काटले जातात मग कशाला हवेत उडायचं”

मग मीच म्हटलं, “आपण आधी मुलांना भरवत इथेच बसू, तिकडे त्या दोन मित्रांना जरा निवांत. कुठ्ल्यारी प्रोजेक्ट वर बोलणं सुरु आहे. आपण आपला रोजचाच प्रोजेक्ट परत नव्याने सुरु करू. मुलांना भरवण्याचा”

आम्ही दोघी जरा हसलो. मी मुलींना हाक मारली आणि तिने तिच्या मुलांना. तिच्या स्वतःच्या नाराजीचा उगम मला जाणून घ्यायचाच होता. मी परत थेपला हातात घेत तिची मनसोक्त तारीफ केली आणि म्हटलं, “ ये, तू क्लास घेशील का, अगं अजूनही बऱयाच नवीन मुलींना नाही जमत ग ढोकळा वगैरे. आणि घरी आई बनवते, सहज मिळतात बाहेर, आणि अभ्यासाच्या नादात आणि तारुण्याच्या मस्तीत राहूनच जातं शिकायचं. आता यु ट्यूब आहेच पण अगदीच प्रत्येक्षात बघितल्या शिवाय ढोकळा वगैरे नाही जमत. अजून कुणाला माहित आहे का तुला असं छान बनवता येते म्हणून”

ती खाली बघतच म्हणाली, “ कुणाला कशाला सांगायचं. मी. मी कुचल्याची बी. सांगून काय मग ते मला खूप मान वगैरे देतील का? वाह वाह छान म्हणूंन विषय संपवतील आणि मी जागच्या जागी”

मीही म्हटलं, “ ये रती फार झालं हा तुझं. मग तू तर माझ्यासारखीला काय समजत अशील ग. आगावू ना”

ती अगदीच अगतिकपणे, “ नाही ताई. असं नाही”

मीही शब्दाला उचलतच म्हटलं, “मग कसं अगं? तू तुलाच कळली नाही तर समोरच्याला कशी कळणार? ह्या वेळ नसलेल्या जगात कुणालाच कुणालाच जाणून घेण्याचा वेळ बीळ नसतो. स्वतःला जे येत ते सांगतांनाही स्वतःला मान द्यावा लागतो. समोरचा कशाला मान देईल तुला. तुझा मान तुलाच आधी करावा लागेल. तुला सुंदर कला अवगत आहे आणि तूच त्याला वाव देणार नसशील तर घेवून जाशील का जात्तानी सगळं बांधून”

आता ती हसली. “ नाही ताई, माहेरी आई बाबा म्हणायचे उत्तम स्वयंपाक हे उत्तम गृहिणीच लक्षणच असतं, मग लग्नानंतर सासरी सगळे गुपचूप खायचे. आणि आता आमचं कुटुंब तिकडे राहायला आलं तर तो उत्साह सवयीनुसार संम्पला माझा. आता वाटत आपण कितीही उत्कृष्ट कार्य केलं तरी ते कर्तव्यात मोडणार. मग उगाच कशाला तोरा. आणि मी हे सगळ कुणाला कळावं आणि त्यांनी मला मान वगैरे द्यावा हा उद्देशच नाही ना माझा”

मी, “अग त्याला तोरा म्हणत नाहीच, आपण सर्वांमध्ये काही खास अहो हि भावना मनाला चिरतारुण्य देवून जाते. आणि व्यक्त होण्यासाठी आधी तू स्वतःला मान दे, तूच असं स्वतःला मी स्त्री आहे, मला काय करायचं आहे? मी काहीही केलं तरी कोण मला मान देणार. ? असं काही नसत, स्वतःचा मान स्वतःलाच द्यावा लागतो, आत्मविश्वास वाढला की मग आपण स्वतःहूनच सुंदर रित्या समोरच्यापर्यंत पोहचतोच”

“आता बघ, मला हा फाफळा नाही बनवता येत, आणि तू मला तो कसा बनवायचा ते सांगितलं तर मला तुझ्याबद्दल आदर वाटेल आणि ती भावना मला तुला सांगायची गरज नाहीच. ती तुझी तुलाच येईल आणि तेच म्हणजे स्वतःला मान देणं. अगदीच समोरच्यानं तू आलीस की उठून उभंच व्हावं, असं बीस नाही ग मान म्हणजे. तो स्वतःलाही स्वतःबद्दल आपल्या कामामुळे, गुणामुळे वाटला ना तरी आयुष्य सुंदर होत. तुझ्या एवढ्या सुंदर चेहऱ्यावर जरास स्वतःच्या मीचा मान झडकलना तर तू सर्व सुंदर स्त्रियांमध्येही सुंदर दिसशील. आणि त्याच्यासाठी कुणाच्या स्तुतीची गरजच पडणार नाही”

आमच्या चर्चा रंगतच होत्या तर माझे हे हॉल मधूनच म्हणाले, “अहो मॅडम लेक्चर झालं असेल देऊन तर निघायचं का?” मी तशीच भानावर आले आणि म्हणाले, “ ये रती, जरा विचार कर ग, आणि मी जरा जास्त बोलली असेल तर सांग तस. शब्द मागे घेऊ शकत नाही पण सॉरी म्हणायला माझा मान कमी होणार नाहीच” आणि आम्ही दोघीही हसलो.

महिन्या भराने मला रतीचा फोन आला, “ताई तुम्हाला फाफळा शिकायचं होता ना. वेळ असेल तर या ४ वाजता” मी घाईतच होते हो म्हणून फोन ठेवला. तिच्या घरी गेले तर अजूनही काही नवीन मुली होत्या आणि रती त्यान्ना ढोकळा शिकवत होती. खूप उत्साहित होती. सर्वच तिची स्तुती करत होत्या. तिच्या गुणांचं तेज चेहऱ्यावरचं सौन्दर्य फुलवत होत. माझ्याशी खूप बोलायला तिला वेळ नव्हता. आणि माझ्या बोलण्याने तिच्यात बदल झाला आणि तिच्यातल्या मिला मान देत तिने स्वतःचा आत्मविश्वास वाढवला हाच तर माझ्यातल्या मिला मिळालेला मान होता. आणि हे ती समजली होती. एक स्मित हास्य देऊन मी तिथून निघाले. तिच्या सन्मानाची गरज नव्हती मला. कारण मला मान आहे माझ्यातल्या मीचा.

मैत्रिणींनो, तुम्ह्लाही मान असूच द्या तुमच्यातल्या मीचा. कुणासाठी नाहीच स्वतःसाठीच. तुम्ही स्वतःला कळले तरी तुच्यातल्या मिला मान मिळालाच समजा मग तो दुसरीकडून मिळायला वेळ लागत नाहीच. धन्यवाद!!


comments powered by Disqus