महिला सक्षमीकरण: स्त्री पुरुष समानता : काळाची गरज - निखिल शेलार
फोन: 9987959084
दंगल या चित्रपटात आमिर खान हा आपल्या मुलींना तालुक्याच्या गावी दंगल नामक कुस्ती स्पर्धा खेळायला घेऊन जातो. या स्पर्धेत गावागावातून तरबेज आणि तयार मल्ल आपले नशीब आजमावण्यासाठी आणि आपली कुस्तीतील कसब दाखवण्यासाठी आलेले असतात. अडचण एकच असते की आजपर्यंत या स्पर्धेत फक्त पुरुष भाग घेत होते. आमिर खान या परंपरेला छेद देण्यासाठी नांगर हाकतो. पण स्पर्धा आयोजक हे स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडथळा आणू पाहू लागतात, विरोध दर्शवतात. होकार आणि नकाराच्या लढाईत अखेर आमिरची मुलगी गीतासाठी दंगलमध्ये खेळण्यासाठी हिरवा कंदील भेटतो. दंगलच्या नियमाप्रमाणे आपण आपला प्रतिस्पर्धी निवडू शकतो. नव्या कोऱ्या मल्लापासून ते कुस्तीत निपुण असलेले मल्ल गीता समोर उभे असतात. तिथे जमलेल्या प्रेक्षकांना असे वाटत असते की गीता एखाद्या कच्चा लिंबूला निवडेल पण गीता सर्वांचे समज हे गैरसमज मध्ये बदलून ती एका काटक, तरबेज, तयार मल्लला आपला प्रतिस्पर्धी म्हणून निवडते. जमलेल्या प्रेक्षकांच्या भुवया उंचावतात. कोणी याला चुकीचा निर्णय समजते. पण आमिर खान म्हणतो की “दंगल से लढने के पहले अपने अंदर के डर से लढना पडता है, आज डर के खिलाफ तो मेरी बेटी जित गयी” या वाक्यातून आमिर आपल्या मुलींच्या निर्णयाचे स्वागत करतो. कुस्ती सुरू होण्यापूर्वी पंच त्या पुरुषी प्रतिस्पर्ध्याला आठवण करून देतात की “ ये मत भुलो की सामने छोरी हैं” तेव्हा गीता या लिंगभेदाच्या गोंधळाचा ताबा घेत आपल्या पुरुष प्रतिस्पर्ध्याला बाणेदारपणे सांगते की “ सामने छोरी हैं ये समजकर खेलने की गलती मत करीयो” अशा प्रकारे गीता स्त्री ही पुरुषापेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे आपल्या वृत्तीने आणि आपल्या खेळाने आजूबाजूच्या समाजाला ठणकावून सांगते.
अनेक क्षेत्रात आजही लिंग भेद होतो. कधी कधी हा भेद चुकीच्या प्रवृत्तितून होतो तर कधी कधी हा भेद नियमात लिहलेला असतो. नियमानुसार केलेला भेद बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. नियमानुसार केलेला लिंगभेद खेळाच्या मैदानात प्रकर्षाने जाणवतो. उदाहरण म्हणजे पूर्वी टेनिस ग्रँड स्लॅम फायनलचा अंतिम सामना पुरुषांचा असो किंवा स्त्रियांचा असो. स्टेडियमची एखादी सीट सुद्धा रिकामी नसे. सर्व जग या दोन लढतीकडे उत्सुकतेने पाहत असे. मग सर्व चढाओढी नंतर एकीकडे कधी कधी पीट सम्प्रोस जिंकत असे तर दुसरीकडे कधी कधी मार्टिना नवरातिनीलोवा जिंकत असे. पण पुरुष आणि महिला गटातील बक्षिसाच्या रक्कमेत फार मोठी तफावत असे. महिला गटाच्या बक्षिसाची रक्कम नक्कीच पुरुषांपेक्षा कमी असे. स्त्री आणि पुरुष समान कष्ट या स्पर्धेत घेत असे. पण तरीही हा असमानतेचा भेद केला जात असे. पण सदैवाने यांची दखल घेतली आणि २००७ पासून विम्बल्डन मध्ये स्त्री पुरुष यांची बक्षिसांची रक्कम सेम करण्यात आली. पुढे इतर टेनिस स्पर्धा मध्ये यांचे अनुकरण झाले. ऑलिम्पिक मध्ये सर्व खेळाडू आपल्या देशाचा ध्वज पदक वितरणात आकाशात उंच मिरवावा यासाठी चार वर्ष कसून सराव करतात. घाम गळताना घाम असा विचार करत नाही की मी पुरुषाच्या शरीरातून स्त्रीच्या शरिरापेक्षा अधिक वाहील. पण तरी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा बक्षिसांच्या रक्कमेत तफावत असते. याच वादावरून प्रसिद्ध स्क्वॉश चॅम्पियन दीपिका पल्लिकल कार्तिक हिचे स्क्वॉश बोर्डशी खटके उडाले आणि तिने नेशनल चॅम्पियन मध्ये खेळण्यास नकार दिला. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की दीपिका भारताचा विकेट किपर फलंदाज दिनेश कार्तिक बरोबर विवाहबद्ध झाली. दिनेश कार्तिक या तिच्या लढाईत नक्कीच तिच्या पाठीशी आहे.
चक दे इंडिया या चित्रपटात आयत्या वेळी महिला हॉकी संघाचा प्रायोजक काढून पुरुष संघाला दिला जातो आणि महिला हॉकी संघाची विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया जाण्याची परवानगी नाकारली जाते. तेव्हा कोच शाहरुख खान या सर्व अन्यायाविरुद्ध उभा राहतो. आणि मग मधली वाट म्हणजे महिला संघ आणि पुरुष संघ यात एक औपचारिक सामना होतो ज्यात अटीतटीच्या सामन्यात पुरुष थोड्याशा फरकाने जिंकतात. पण महिला संघ ज्या जोशात खेळतात की त्यांचा विश्वचषक मध्ये खेळण्याचा मार्ग सुकर होतो. पुढे सर्वांना माहीतच आहे की महिला संघ सर्व घरगुती अडचणी असो किंवा व्यावसायिक अडथळे असो यावर मात करून विश्वचषक जिंकतात.
बऱ्याच ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या की नेते मंडळी स्त्री वर्गाची मते मिळवण्यासाठी हळदी कुंकु समारंभ, पाक कला स्पर्धा वगैरे आयोजित करतात. त्यात स्त्रियांची वाजवीपेक्षा जास्त स्तुती होते जी स्तुती निवडणुकीसाठी नंतर लगेच ओसरते. काही स्त्रिया रिक्षा , टॅक्सी ड्रायव्हर असतील तर त्यांचा सत्कार होतो. मला वाटते की स्त्रियांनी या अमिषाना बळी पडता कामा नये. जी स्त्री विमान चालवते, जी स्त्री रेल्वे चालवते, जी स्त्री इस्रो, नासाच्या अवकाशमोहिमेचा अविभाज्य भाग असते ती स्त्री रिक्षा आणि टॅक्सी का चालवू शकत नाही. स्त्रियांनी असे अचानक अवकाळी पावसाप्रमाणे आलेले पुरस्कार नाकारले पाहिजे. मी रिक्षा आणि टॅक्सी चालवते म्हणून माझी स्तुती नको तर मी फार सुंदर रिक्षा आणि टॅक्सी चालवते, वाहतुकीचे नियम पाळते, गिऱ्हाईककडे दुर्लक्ष न करता त्यांचा प्रवास सुकर करते जर या कारणासाठी मेरिट वाइज पुरस्कार भेटले तर मी नक्की आवर्जून घेईल. मला माझ्या यशाचे प्रमाणपत्र द्या पण दया म्हणून दिलेले सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिपेशनचे ओझे नको अशी भूमिका आजच्या स्त्रियांची हवी.
माझ्या या लेखाचा उद्देश फक्त स्त्रिया वर होणारा अन्याय दाखवणे अजिबात नाही. कारण एक ओरड पुरुषाच्या बाजूने सुद्धा आहे की बऱ्याच स्त्रिया कॉर्पोरेट ऑफीस मध्ये जेथे पॉलिसी प्रमाणे स्त्री पुरुष भेद होत नाही तिथे स्त्री होण्याचे अडवांटेज घेतात. मग ऑफीस मध्ये काम भरपूर असेल तर पुरुष वर्ग जर ऑफीस वेळे नंतर ही काम करतोय तरी एखादी स्त्री खोटे कारण सांगून घरी पळणे, आम्हाला घरी जाऊन आयते जेवण गिळायला भेटत नाही ते बनवायला लागते असे एखादी उद्धट स्त्री पुरुषावर आक्रमण करत टोमणे मारते. स्त्री जेव्हा मेटर्णीटी लिव्हवर जाते तेव्हा बऱ्याच वेळा तिचा बॅकअप पुरुषाला बनवले जाते. मग पुढचे सहा महिने तो आपली कामे सांभाळत तिची ही कामे सांभाळतो. मग पुढचे सहा महिने तो तिची आतुरतेने वाट पाहत असतो. सहा महिने झाल्यावर कळते की तिने अजुन एक महिन्याचा एक्स्टेन्शन घेतला आहे. मग त्याचा रागाचा सुर अजुन तीव्र होतो.
या लेखाचा उद्देश स्त्री वरील अन्याय किंवा पुरुषाची ओरड दाखवणे नाही तर स्त्री पुरुष समानता दाखवणे हा आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो त्यावर लहानपणा पासून लिंग भेदभावाचे ओझे टाकले जाते. स्त्रीला हळू बोलावे लागते, नम्र बनावे लागते. याउलट पुरुष वरच्या पट्टीत बोलू शकतो. पुरुष जर घाबरला तर हातात बांगड्या घाल असे डीवचले जाते. पुरुष हा रडू शकत नाही. जर रडला तर तू काय मुलींसारखा रडू बाई आहेस असे हिणवले जाते. बहुधा स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू फार लवकर येतात. पुरुषाचे दुःख अश्रू रूपाने बाहेर फेकले जात नाही म्हणून हृदय विकारचे प्रमाण पुरुषात जास्त असते. थोर समाज सुधारक र. धो. कर्वे बोलायचे की लाजणे हा स्त्रीचा नैसर्गिक गुण नव्हे तर तिच्यावर लादलेला गुण आहे. निसर्गाने फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची रचना वेगवेगळी केली आहे. आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष ही दरी अधिकच खोल केली आहे. याबाबत प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्या मुळे कोणताही कळत असो किंवा नकळत असो लिंग भेदभाव झाला नाही पाहिजे. मी माझ्या पत्नीस जॉब करण्याची परमिशन दिली असे सांगून आपला मोठेपणा मिरवण्यात कोणतेही शहाणपण नाही तर माझी पत्नी सुजाण आहे. तिने जॉब करावा की नाही हा सर्वस्वी निर्णय तिचा असेल. मी तिच्या निर्णयात तिला पाठिंबा देईन. असे जेव्हा घराघरातून शब्द ऐकू येतील तेव्हा नक्कीच स्त्री पुरुष भेदभाव कमी झालेला असेल. चला तर मग आजपासून स्त्री पुरुष समानतेचा विडा उचलू.
लेखणी निखिल