विनोदी कथा: संशयाचे शरसंधान - सविता कारंजकर, सातारा

विनोदी कथा: संशयाचे शरसंधान - सविता कारंजकर, सातारा

फोन: 9922814183

“हुश्श! छान झाली ना पार्टी? अगदी झाडून सगळे हजर होते. कुण्णी म्हणजे कुण्णी चुकवलं नाही हं!”, सोनाली अत्यंत समाधानाने म्हणाली!

सूरज कपडे बदलत होता. त्याचं बहुतेक लक्ष नव्हतं.

सोनाली म्हणाली, “काय हो..मी काय म्हणतेय?”

सूरज, “हम्म!”

अरेच्चा! गेले पंधरा दिवस किती मेहनतीने तयारी केली ह्यांनी आजच्या कार्यक्रमाची! त्याचं फळही मिळाले..किती देखणा झाला कार्यक्रम! आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस!

ती परत परत सूरजला कार्यक्रम छान झाला. सगळे आले. आनंदीआनंद. सोहळा देखणा वगैरे वेगवेगळ्या शब्दात वर्णन करून सांगत होती, पण सूरज मात्र हरवल्यासारखा!

तिला काही कळेना!

ह्यांनी खुश व्हायलाच हवं! किती सगळे जण कौतुक करत होते ह्यांच्या नियोजनाचं!

तरीही.!!

काय बरं घडलं असेल?

शेवटी सोनालीने विचार केला. पंधरा दिवस धडपडतायत..थकले असतील!

पन्नाशीच्या आसपास आहेत आता!

तो बेडवर…!!

ती…पंचविशीत!

कांदेपोहे खाताना सूरज काय रुबाबदार दिसत होता. पाहिलं होतं मी पाटावर बसून. तिरछी नजरसे!!

माझ्या गालावर गुलाब फुलले होते त्याने तिरका कटाक्ष टाकला ना माझ्याकडे आणि त्या गुलाबांनी तेव्हाच होकार कळवलेला वरपक्षाला!!

देवाब्राम्हणाच्या साक्षीने, वडीलधारी मंडळींच्या आशीर्वादाने लग्न पार पडलं!!

ना मानपान.. ना रुसवा फुगवा!

“देवमाणसं भेटली हो सोनाला”, पंगत बोटं चाटत चाटत कौतुक करताना थकली नाही हो तेव्हा!

आणि आहेच माझं सासर तसं! कुणाचीही दृष्ट लागावी अस्सं!! आणि आमचे हे तर विचारू नका!

स्वच्छ मोकळ्या मनाचे..सरळ मार्गी! अगदी नाकासमोर चालणारे!!

नोकरीत उच्चपद. मानाचं स्थान समाजात. ऐश्वर्यसंपन्न. निर्व्यसनी!!

बापरे ही सद्गुणांची यादी लांबलचक!!

आणि हो…. एक बात.. खासम् खास..!!

कान इकडे करा पाहू…

तुम्हाला माहितै? आमचे हे अगदी सरळ हो…

अगदी सुतासारखे!

कुणा परक्या बाईच्या सावलीला पण उभे राहणार नाहीत हो!

मी सोडून तमाम महिलावर्ग माझ्या सासवा-नणंदा!!

किती छान नं!

संशयाला तीळभर जागा नाहीच!!

ऑफिस मधल्या ललना…

लाल लाली लावून लालभडक कपडे घालून लालेलाल सॅण्डल!!

टॉक टॉक टॉक !!!

पण सूरजसरांची मान वर निघेल तर शप्पथ!

उलट मीच म्हणते त्यांना अधूनमधून, “अहो, पुलंनी त्यांच्या ‘हे जग मी सुंदर करुन जाईन’ या लेखात सांगितलंय की सुंदर मुलींकडे पहावं! नाहीतर अपमान होतो त्यांच्या सौंदर्याचा!! बघायला काय हरकतै?”

तर माझ्या वरच भडकत असतात हे!!

म्हणतात, “तुझ्या जीभेला काही हाड?”

मग मी स्वतःच्याच नशिबावर लट्टू!!

तर असा हा माझा भोलूराम!

मी त्याची अंजलीबाई आणि तो माझा राणादा!!

सोनालीला त्या रात्री कधी डोळा लागला कळलंच नाही!!

सुखस्वप्नात ती रममाण झाली!!


झुंजूमुंजू झालं. सोनालीचे डोळे किलकिले झाले. सूरजराव खिडकीशी! उदासवाणे..

किसकी याद सता रही हैं?

सोनं चमकावं तसे सोनाचे डोळे चमकले…

हे काय? शून्यात नजर? प्रेमातबिमात पडला की काय माझा नवरा? तेही या वयात?

देवा! आता असलं काही बघायला लावू नको रे!!

ज्या वयात पाऊल घसरायचं त्या वयात चालले की नाकासमोर!!

आणि आता? काही दिवसांत सुनाजावई येतील…

छे छे…असा नाही आपला लाडोबा… चांगलं माहितै बाई मला…

संशयात्मा विनश्यति!

आज दिवसभर सूरज घरात..नजर शून्यात..! सोनाली संशयात..!!

कश्श्यात म्हणजे कश्श्यात लक्ष नाही..

तेवढ्यात वाजली की रिंग…मोबाईलची हो…!!

सूरजने कानोसा घेतलेला आडोशाला उभ्या सोनालीने पाह्यला.

डोळ्यात ढग…पदर नाकाला…मुसूमुसू …कान अगदी सूरजकडे..!!

पण हा पठ्ठ्या अगदी कुजबुतच होता…एक अक्षरही कळेना…

हिनं ठरवलं..झोपू देच आता…मोबाईलच चेक करते…!!

सूरजशेठन बोलता मुकाट्याने जेवले आणि गाठली बेडरूम..!!

ब्रम्हानंदी टाळी लागली मिनिटभरातच!

संशयात्मा ह्याच क्षणाची वाट पहात होता…

अलगद मोबाईल काढून घेतला.. अरे देवा!

पॅटर्न लॉक?

असा नव्हता हो माझा नवरा!

कोण सटवाई भेटली आणि ही अशी लपवाछपवी सुरू झाली ?

हे कधीपासून सुरू झालं प्रकरण?

आता उठू दे सकाळी! सुरूवात याच विषयाने होईल..

चांगलाच जाब विचारणारै मी ह्यांना…!!

दात-ओठ खात.. बांगड्या वर चढवत सोनालीने निश्चय दृढ केला…पदरही खोचला असताच.

पण नेमका गाऊन घातलेला ना…!!

तळमळ! तळमळ..तळमळ…

रात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत पहाटेकडे कलली…

हल्ली कोंबडं बांग देत नाही हो…!!

त्याची जागा मोबाईलच्या “अलारामने” बळकावलीय ना….!!

सोनाली ताडकन् उठली.. चूळ भरायच्या आधी मनातली आग ओकायची असं तिनं ठरवलेलं…

तिने मोर्चा सूरजकडे वळवला…

नावात सूर्य असला तरी आभाळातला सूर्य डोक्यावर आल्याची धमकी दिल्यावरच उठणारा हा सूर्यवंशी…

गायब होता हो…!!

कालवाकालव पोटात आणि खळबळ मनात…

तासाभरात मान खाली घालून स्वारी आली…

ही भांडणारच होती..पण केविलवाण्या चेह-याकडे पाहून रागाची जागा सॉफ्ट कॉर्नरने घेतली..

ह्यांच्याच्याने काही होणारै का असलं?

मी का ओळखत नाही माझ्या नवरोबाला..!!

विचारचक्र गरगर…गरगर…

तेवढ्यात मोबाईलची रिंग…

कान टवकारले…

“हा.. बोल गं पटकन… आत्ता का फोन केलायैस? ही घरातच आहे आणि तिला बहुतेक संशयपण आलाय!”

सूरज बोलला आणि तिकडून बहुतेक शब्दांचा मारा सुरू झाला..

“अगं हो हो..किती बोलतीयेस? इथं लपवता लपवता मला नाकी नऊ येतंय! तू धीर धर! आपण भेटू, मग ठरवू!”

तिकडून… ब्ला…ब्ला….ब्ला…ब्ला…

सूरज, “प्लीज जानू, आत्ता नको या विषयावर बोलायला. सगळं तुझ्या मनासारखं होईल! पण आत्ता तू ठेव फोन. हिचे कान इकडंच आहेत बहुतेक!”

प्लीज जानू…डू यू ट्रस्ट मी ना?

जानू?

जानू?

हा कुणाला जानू म्हणतोय?

आणि…आणि काय म्हणाले हे?

डू यू ट्रस्ट मी ना?

तुपारे मध्ये नाही का…सरंजामे सारखा म्हणायचा इशाला…लव यू पेक्षा जास्त महत्वाचे..

आय ट्रस्ट यू…म्हणजे…

म्हणजे हा विक्रांत सरंजामे… आणि ती त्याची इशा?

आता हा आपला नवरा… आपल्या पोरीच्या वयाच्या शनायाच्या प्रेमात पडला की काय?

आता विक्रांत सरंजामे सोबत शनाया कुठं घुसवली?

शनाया तर गुरूनाथची…नाही नाही…गॅरीची…

बापरे!! म्हणजे ती बया याला बच्चा म्हणत असणार…

अरे देवा! प्रसंग काय, मला आठवतंय काय?

या कुठल्या सिरयली आणि कुठली ती अफेअर्स?

मला आत्ता हे सगळं का आठवतंय?

बाई गं… आपण अशा सदा त्या सिरयलीमध्ये गुंतलेल्या राहतो …

म्हणून की काय आपला सुतासारखा सरळ नवरा त्या अॅटम बॉम्बच्या जाळ्यात अडकला?

बाई बाई बाई…सिरयलींवरचं प्रेम वेळीच आवरतं घ्यायला हवं होतं!

सोनालीला सगळीकडून धरणीकंप होत असल्याचा भास झाला….

आता कसं सावरू?

डोळ्यात गंगायमुना मावेनात.

गालांवर ओघळू लागल्या आणि तिचे हात रुमाल शोधू लागले…

सूरज किचनमधे आला…

“आज मला नाश्ता जेवण काही नकोय… मी बाहेरच जाणार आहे!”

दुसरा अॅटमबॉम्ब फुटला हिच्या डोक्यात!!

“का हो?”, रडवेली होत सोना म्हणाली!!

सूरज स्वतःच्याच तालात…

अहो..माझं काही चुकलं का?

मला माफ करा ना हो…

पाया पडते तुमच्या…

सोनाली धाय मोकलून रडू लागली…

सूरज दुर्लक्ष करत उठला…तयार झाला…परफ्यूम पावडर वगैरे!

हिला परत धडकी भरली..

चकार शब्द काढता तो बाहेर पडला… ती चोरपावलांनी बाहेर आली..

गाडीत बसताच सूरजने जानूला फोन लावला…

“बोल जानू.. आवरलं का तुझं? मी पंधरावीस मिनीटात पोचतो आहे तुझ्याकडे! मग तू आणि मी! दिवसभर तुझ्या मनासारखी खरेदी! ब्रेकफास्ट.. लंच… सगळं तुझ्या फेवरेट फूड रेस्टॉरंटमध्ये….!! हा ..बघ..आलोच…!”

बापरे!! मामला बराच पुढं गेलेला दिसतोय…

म्हणजे आज हजारो रुपये हा जानू त्या बच्चावर उधळणार तर!

सोनाच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली..

खरंतर ती आतून खचली होती…

पण तिनं या घोड्या प्रेमवीराला अद्दल घडवायचे ठरवले..

परत निश्चय दृढ..

आत गेली..

धडाधड पंधरावीस फोन फिरवले….

संध्याकाळपर्यंत घर माणसांनी भरलेलं…

याची झाडून सगळी मामे, आते, मावस भावंडं, आत्या, मामा, काका, काकू, मावशी, काका, आजी, पणजी..काही कॉलेज मित्रही बोलावली!

हिच्या डोळ्याचं पाणी आटेना…

कोणाला काही कळेना….

काल तर धुमधडाक्याने साजरा केला लग्नाचा पंचविसावा वाढदिवस…

आज लगेच एवढं काय बिनसलं?

कुणी शानीसुरती मावळण पुढे आली… सोनाच्या पाठीवर मायेने हात फिरवला.. तिला जवळ घेतलं…

बाई गं.. सोन्यासारखा नवरा तुझा… भरल्या घरात का टिपं गाळतीयेस?

तशी नागीण फुत्कारावी तशी सोना फुत्कारली….

सोन्यासारखा आहे होय तुमचा भाचा?

ओळखता का तरी त्याला?

पन्नाशीच्या घरात… शेण खाऊ लागलाय…

ती मावळण तीन ताड उडाली….

सूरज्या.. लेका छुपा रूस्तुम निघालास….साल्या मला नाही दाखवलीस तुझी ढींचॅक जीएफ्?

सूरजचा मावसभाऊ नितीन उगीचच चेकाळला …

पण क्षणभरच…

त्याची राधिका डोळे वटारून त्याच्याकडे पहात होती ना…

झाली… सगळ्यांची चुळबूळ सुरू झाली..

म्हैला वर्ग सोनालीला एव्हाना राधिका म्हणून आंजारूगोंजारू लागला होता…

काहीजण अगदी रजचे काकामामा पण हिरो गॅरीवर चरफडत होते..कोणी उगाचच स्वतःच्या नशिबाला दोष देत हात चोळत बसले होते…..

कधी एकदा सूरज येतोय असं सर्वांना वाटत होतं…

पण मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार?

सूरजला जाब विचारायला कोण पुढे होणार?

अधूनमधून सोनाला हुंदके अनावर होत होते….

तरी बाई… कुठं कर्तव्यात कसूर नाही… कधी घर सोडून माहेरी गेले नाही.. की कधी मला पिवळी करा म्हणून हट्ट नाही….

साधं माझ्या भावाला जेवायला बोलवा म्हटलं.. तर कुरकुर करायचे..

पण…च्याक्….कधी हट्ट नाही केला…

मग हे सगळं माझ्या नशीबी का?

एव्हाना शेजीबाईच्या भींतीनं घडला प्रकार तिला सांगितला होता…

हिच्या आगीत तेल ओतायला ती बया हजर होतीच ….

अगं. तुला माहित नाही.. पुरुष प्रेमाचा मार्ग पोटातूनच ह्रदयाकडे जातो..

कधी केलास का नीट सैपाक?

नाही का दहाबारा वर्षापूर्वी मी तुपातला शिरा दिल्ता तुम्हाला….

तुझा नवरा बोटं चाटत आल्ता आमच्या हेंच्याकडं…

म्हणत होता…नशीबवान हैसा….

सोनालीच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली…

“ए भवाने… बारा वर्षापूर्वी दिलेला शिरा तुझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती म्हणून मीच करून दिलेला!”

लख्ख आठवतंय मला…

मला सांगतीय… बरी आली जखमेवर मीठ चोळायला….

चरफडत शेजीबाई उठली आणि दातोठ खात भिंतीला कान टेकवून उभी राहायला स्वगृही परतली….

उत्कंठा वाढत होती…

आज कुणाला भूक लागली नाही की कुणाच्या औषधाची वेळ झाली नाही….

खमंग विषयाला खमंग फोडणी तर बसली होतीच..

आता खुसखुशीत चव चाखायला मिळणार… या आशेवर सगळे सूरजची वाट बघत होते…

आता सूरज चोरपावलांनी घरात प्रवेशकरता होणार आणि ही तडकतीफडकती सोनाली त्याच्या अंगावर धावून जाणार… अशी स्वप्नं रंगवत सगळे बसले होते!

या गर्दीत एक बिचारा जीव पण आमंत्रित होता…

सोनालीचा आतेभाऊ… बिचारा बिनलग्नाचा…

तो भलत्याच स्वप्नरंजनात…

जोरात भांडणं होऊ दे… सोनाली चक्कर येऊन पडू दे… मी तिला अलगद झेलेन…

आणि सगळ्या जगातल्या सगळ्या दुःखापासून लांब घेऊन जाईन….

तशीही सोनाच्या लग्नाच्या आधी तीन वर्षापासून तो तिचाच झाला होता…

पण फक्त मनातल्या मनातच…

आणि हिनं वरमाला घातली या बेवफा सनमच्या गळ्यात….!!

या आतेभावाचं स्वप्न आता परत भंगलं कारण पोर्चमधे सूरजची इनोव्हा पार्क होत होती….


सगळे कान टवकारून.. टाचा उंचावून.. कुणी कमरेत ट्विस्टून.. वळवळून सूरजकडे बघत होते…

ड्रायव्हिंग सीटवरून उतरून सूरज बाहेर पडला..

गाडीच्या दुसऱ्या बाजूला जावून त्यानं गाडीचे दार उघडले!!

नखशिखांत पॅक झालेली स्कार्फने आपला चेहरा झाकलेली षोडशवर्षीय इशा,शनाया की जानू की बच्चा जी कोणी होती, ती पण उतरली….!!

हातात शॉपिंगच्या करकरीत चार बॅगा घेऊन!!

अगागागा… काय हे धाडस सूरजचं?

थेट घरी घेऊन आला बॉम्ब?

किती खोलवर पाणी मुरलंय… याचा अंदाज सगळ्यांना आला..

आधीच चेकाळलेले आणखी चेकाळले…

साळकाया माळकाया पदराआड खुसफूसू लागल्या…

मघाच्या शेजीबाईच्या घरात अर्धवट झालेला कुकरचा गॅस बंद केला गेला!!

आणि.. आणि आतेभाऊ….??

तो लाजून लाजून गाजरावाणी लाल झाला…

पन्नाशीत का होईना..लगीन गाठ बांधली जाणार…

ती बी स्वप्नातल्या सुंदरीशीच….!!

टॉक टॉक टॉक…

डबल टॉक टॉक टॉक…

दोघांचा गृहप्रवेश झाला…

सोनानं टाहो फोडला…

सूरज चरकला…. तिला खुणावत विचारू लागला…

“सोना…कोण गं?”

सोना कपाळावर हात मारून म्हणाली…“जळ्ळा माझा संसार..!.”

आणली ना माझी सवत…!!

अब देखो… मेरा मरा हुआ मुंह…

अरे सोना… एकदम फिल्मी श्टाईल मे क्या बात करेली है…

मुझे तो कुछ समझा नै आ रैला है…

सूरजने पण फिल्मी श्टाईल मे कहा….!!

मावळणीनं परसंगाचं गांभीर्य ओळखलं….

खरंतर ती पण जुन्या भाचेसुनेला कंटाळली होतीच…

उसे भी बदल चाहिएच था….

पण ….

उगाच उसना आव आणत ती भाच्यावर खेकसली….

“गतकाळ्या….कसली रं अवदसा आठवली तुला….?”

सूरजला काही समजेना…

स्कार्फांकित षोडशा पण बावचळली….

तिला काय घडतं याचा अंदाज येईना…

ती स्कार्फ काढेना!!

सूरज रडवेला होऊन आपल्या सोनाकडे गेला…

काय झालं ते सरळ सरळ सांगशील का राणी?

सोना चवताळली…..राणी? मी राणी?

आणि ती भवानी कोण?

इशा.. बच्चा…शनाया की जानू?

सूरज म्हणाला.. अगं वेडे.. ती जानूच आहे…!!!

सोनालीचा गळा भडकला…!!!

सरळ सरळ मान्य करतोय हा…???

ती अंगावर धावून गेली त्याच्या…

लाज नाही वाटत या कोवळ्या पोरीला माझी सवत म्हणून घरी घेऊन यायला?

मी घर सोडणार नाही..

काडी काडी… चमचा चमचा जुळवून घर उभं केलंय मी…

तुम्ही लाजलज्जा सोडली….

मी उघडं पाडणार तुम्हाला…

बघा.. तुम्हाला उखळात घालून कांडणारै मी!! तरच नाव राधिका सुभेदार सांगेन…

अर्र !! राधिका सुभेदार नव्हे…चुकून चुकून तोंडात आलं!

सोनाली नाव नाही सांगणार…

आता सूरजच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला… एव्हाना जानू पण सावरली….

तावातावाने बडबडणाऱ्या सोनाली जवळ जाऊन उभी राहिली….

सगळेच अवाक्…!!

आतेभावाचा “आ” वासलेला…!!!

त्याच्या मुखाच्या प्रदेशात माशी मुक्त विहार - संचार करून आलेली ही त्याला कळलं नाही….

जानूने स्कार्फ काढला… !!

“मी जानू….इकडे बघ..माझ्या कडे….!, ती सोनालीला म्हणाली.

मी तुझी जानू आहे आई…

तुझी आणि बाबाची लाडकी जान्हवी…..

अगं काल माझी परीक्षा…

मी नाही अटेंड करू शकले तुमचा पंचविसाव्या लग्नाचा वाढदिवस….

काही कळायच्या आतच सूरज घाईघाईत बोलला…

अगं बाई जानू.. नव्हे नव्हे…बाळ जान्हवी…

पंचविसाव्या लग्नाचा वाढदिवस नव्हे…लग्नाचा पंचविसावा वाढदिवस म्हण…

जानू म्हणाली…, “आई काय हे?”

“अगं काल येऊ शकले नाही परिक्षेमुळे होस्टेलवरून सो…. मीच रात्री बाबाला फोन करून प्लॅन केला.. तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट खरेदीचा….!”

सूरज म्हणाला..

“आणि हो! माझी एवढी लाडाची लेक नव्हती हजर सोहळ्याला आणि ही सोना म्हणतेय सगळे च्या सगळे हजर होते.. कुण्णी म्हणजे कुण्णी चुकवलं नाही!”

बापाच्या काळजात कळ उठली… म्हणून जानूला.. नाही नाही जान्हवीला घेऊन नाश्ता लंच बाहेरच केलं.. शॉपिंग केलं…बघ लेकीनं राणीहार घेतलाय तुझ्यासाठी….!!

सोनाली चक्कर येऊन पडायच्या बेतात…

शेजीबाई… क्यायै.. खोदा पहाड निकला चुव्वा..!!

चेकाळणारे आपल्या भाची-पुतणीचं म्हणजे जानूचं कौतुक करू लागले…

मावळण दिमाखात पुढे आली…

हाय कनाय माजा भाचा सोन्यावाणी? अक्शी बावनकशी!

सोनालीचं ततपप होऊ लागलं…

कशी काय मी मी अशी? इतक्या वर्षात कधी संशय घेतला नाही…आणि माझ्या काळजाच्या तुकड्याला कशी काय विसरले?

तेवढ्यात …

आतेभाऊ… ताई निघतो गं…!!!

सोना म्हणाली.. अरे जरा थांब..गोडाचे शिरा करतेय! तोंड गोड करून जा…

नको नको….ताई…आता पुढच्या रक्षाबंधनलाच येईन म्हणतो….

सविता कारंजकर, सातारा


comments powered by Disqus