कोरोना नंतर...
- विक्रम अरने
(द्वितीय क्रमांक)
आज कोरोनाचा विळखा केवळ भारतालाच पडलेला नसून जगातील जवळ जवळ सर्वच देशांना त्याने आपल्या विळख्यात घेतले आहे. काही देशांनी व तेथील प्रशासनाने वेळीच त्यावर उपाययोजना करण्याची खबरदारी घेतली उदा. भारत. तर काही देशांनी कोरोनाला तितकेसे गांभीर्याने नाही घेतले उदा. इटली व स्पेन व त्याच पावलावर पाउल ठेवणारा अमेरिका जेथे दिवसाला 23000 च्या आसपास नागरिक कोरोनामुळे बाधित होत असतानाही तेथील प्रशासन अद्यापही लॉक डाउनचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेले आढळले.
कोरोनाचे संकट हे किती दूरगामी परिणाम करणारे असेल हे नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने आपल्या निवेदनामध्ये सांगितलेले आहे; जगात दुसऱ्या महायुद्धानंतर कधी नव्हे ती अशी बिकट परिस्थिती उदभवलेली दिसून येते आहे. तिचा सामना आता केवळ कोणत्या प्रथम, द्वितीय किंवा तिसऱ्या वर्गातील राष्ट्रांनाच करावयाचा नसून सर्वानाच त्याची आर्थिक झळ ही बसणार आहे, किंबहुना ती बसण्यास सुरुवात झालेली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
उद्या आपण सर्वच जेव्हा या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडू तेव्हा एखादा पूर ओसरल्यावर जशी अवस्था असते तशीच अर्थव्यवस्थेची अवस्था आपल्याला दिसणार आहे, सर्वच अस्ताव्यस्त किंवा कायमचे अस्तित्वातून मिटून गेलेले. सर्व क्षेत्रांना आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील उद्योगांना तर आपला उद्योग, उद्योगाचे भांडवल, त्याची जागा आणि आपले हक्काचे कामगार या सर्वांचा शोध घ्यावा लागणार आहे. सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली, त्या पाठोपाठ मालकवर्गांनीही आपल्या कारखान्यांना टाळे लावले. तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या हातावर काही रक्कम ठेवली, त्यांच्या राहण्याच्या जागा काढून घेतल्या. अशा वेळी त्या कामगारांकडे कोणता पर्याय होता? एकच ! तो म्हणजे आपल्या मूळगावी परत जाणे. परंतु सरकारने सर्वत्र संचारबंदीचे कलम लावले असल्याने त्यांना आपल्या मूळ गावीसुद्धा जाता नाही आले. मग मिळेल तसे ते आपल्या कुटुंबकबिल्यासह गावाच्या वाटेकडे निघाले आणि अर्थातच चालतच….. मजल दरमजल, पोलीस प्रशासनाशी लपतछपत, उपाशी तर कधी अनवाणी….
आता जेव्हा सर्व परिस्थिती आटोक्यात येत असताना असंघटित क्षेत्रातील उद्योजकांना आपले मूळ कामगार पुन्हा परत मिळणार का असा प्रश्न आहे. अडीअडचणीच्या काळात मालक वर्गाचे वर्तन व पुन्हा जर यदा कदाचित अशी दुर्घटना पुन्हा जर उदभवलीच तर सावधगिरीचा दुसरा उपाय काय? तर अशी एक दाट शक्यता आहे की हे मूळ गावी परतलेले, स्थानिक नसलेले, विशेषतः परप्रांतीय कामगार पुन्हा नोकरीच्या ठिकाणी येऊन पुन्हा नव्याने सुरुवात करतील की आपल्या मूळ गावी किंवा राज्यातच थांबून तेथेच काहीतरी छोटा मोठा पोटापाण्याचा व्यवसाय करतील..? यातील पहिल्या शक्यतेपेक्षा दुसरी शक्यताच जास्त आहे. कारण जीवापेक्षा मोलाचे काही नसते. याचा परिणाम स्थानिक अर्थकारणावर खूप मोठ्या प्रमाणावर होताना आढळून येईल विशेषतः देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई. काही पुढारी लोक आता नोकऱ्या सोडून गेलेल्या परप्रांतीयांच्या नोकऱ्या या आता येथील स्थानिक भूमिपुत्रांनी ताब्यात घ्यायला हव्यात असे आवाहन करताना दिसत आहेत परंतु प्रश्न बदलत नाही तो म्हणजे स्थानिक तरुण असे व्यवसाय करण्यास पुढे येणार का..? आज संपूर्ण भारत देशाचा विचार जर केला तर किंवा नुसत्या आपल्या पुण्या-मुंबई पुरता जरी विचार केला तर समजेल, किती स्थानिक तरुण पाणीपुरी, भेळपुरी, आईस्क्रिम, साफसफाई, हातगाड्यांवर फिरून वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले, पान तंबाखूची टपरी चालवणारे, चहाच्या दुकानात काम करून अजागळ अशा वेशात मिळेल त्या जागी चहाची विक्री करणारे आणि मुख्य म्हणजे आर्थिक राजधानीत टॅक्सी चालवणारे आहेत? तर उत्तर आहे अतिशय कमी. कारण हे सर्व व्यवसाय उत्तर भारतीय कामगारांनी आपलेसे केलेले आहेत. आणि त्यांची विशेष अशी नाळ या व्यवसायांशी जुळलेली दिसून येते. अर्थातच हा परिणाम केवळ दिल्ली किंवा मुंबई इतकाच मर्यादित असणार नाही तर त्या कामगारांच्या मूळ राज्यातील राजकारण्यांची पण आता खरी कसोटी लागणार आहे कारण जर हा कामगार वर्ग आपल्या मूळ कामाच्या जागी परतला नाही तर त्याला त्याच्या पोटापाण्याच्या व्यवसायाची सोय स्थानिक सरकारला करावी लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी सोय करता येईल का ? नुकताच देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेला असेल तेव्हा सर्वात मोठा प्रश्न अन्नधान्याचा असेल. लॉकडाउनच्या काळात शेतीसाठी मजूर-कामगार वेळेवर उपलब्ध न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
रोजगारानंतर आरोग्य हा एक खूप महत्त्वाचा मुद्दाही असणार आहे कारण लोकांना आता स्वछतेचे महत्त्व समजले आहे. राज्याच्या बजेटचा बराच मोठा हिस्सा हा मागील काही काळात केवळ आरोग्य सेवांवर खर्च झालेला दिसून येतो, भविष्यातही अशीच तरतूद करावीच लागेल.
सरकारने उद्योगधंद्यांसाठी विशेष अशा सरल व अल्पव्याजाचे भांडवल पुरविणे गरजेचे आहे, भलेही त्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा अल्प ठेवावा. कारण केवळ सरकार आपल्या उद्योगांसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे हा एक मोठा विश्वास उद्योजकांच्या मनात निर्माण होईल. आपल्या मूळगावी गेलेल्या कामगारांनी पुन्हा येऊन आपल्या उद्योगांमध्ये चाकरी करावी अशी अपेक्षा असेल तर त्यांच्या सुरक्षित भविष्याची खबरदारी मूळ उद्योजकाने घ्यावी कारण कामगारांशी मालकाचा संबंध हा केवळ कामापुरताच असणे अपेक्षित नसून त्याच्या जीवनावश्यक आणि भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी लक्ष देणे किंवा तशी तरतूद करणे हे मालकवर्गाने आपले नैतिक कर्तव्य मानावे.
आज आपण एक आणखी गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे या जागतिक महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. एकीकडे मनुष्यबळ नाही म्हणून मदत नाही अशी जिकिरीची अवस्था तर दुसरीकडे बेरोजगारीची झळ बसलेला सुशिक्षित तरुण. सरकारने तातडीचे आदेश देऊन, स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन रिक्त जागांवर त्वरित नोकरभरती करावी, जेणेकरून भविष्यात अशी अवस्था पुन्हा उद्भवली तर त्यामुळे होणारी हानी जास्त नसावी.
या कोरोनाची आपत्ती ही एक संधी नसून धडा आहे असे राज्य पातळीवरील तसेच केंद्रातील विरोधी पक्षांनी समजून घेऊन आपल्या कृतीतून एकमेकांना साहाय्य करणे गरजेचे आहे कारण अशावेळी आपण एकजूट जर नाही दाखविली तर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच अवस्था असेल तसेच केंद्रातील सरकारनेही केंद्रीय पातळीवरील व संबंधित राज्यातील प्रश्न हे वेगळे असून राज्यातील सरकारांना निर्णय घेण्यात स्वातंत्र्य द्यावे. असा सहज सुलभ केंद्र-राज्य सबंध पोषक लोकशाहीच्या वातावरणासाठी आवश्यक आहे.
एक आदर्श लोकशाही राज्यातील सुजाण नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत. आपण आपले करपात्र उत्पन्न वेळेत जमा करावे. उत्पादक तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रेत्यांनी वस्तूंची साठवणूक करून काळाबाजार करू नये. संपूर्ण देशामध्ये 100% लॉकडाऊनची स्थिती असतानाही काही बेशिस्त लोक रस्त्यांवर उतरून आपल्या लाईव्ह अपडेट इतरांना देत होते अशांवर कठोर कारवाई करण्यात यावी कारण सरकारचे आदेश हे पाळण्यासाठी असतात मोडण्यासाठी नाही हे नागरिक शास्त्र सर्वानी शिकून आत्मसात करून घेणे गरजेचे आहे.
शेवटी जाताजाता, कोरोना या महामारीच्या काळात कित्येक कालावधीनंतर आपल्या कुटुंबियांशी, नातलगांशी संवाद साधता आला, भरपूर वेळ देता आला तसेच कठीण समय येता कोण कामास येतेयाचीही आपणास जाणीव झाली तर आपण इथून पुढेही असेच एकोप्याने राहुया अशी काळजी घेऊयात..!